सोन्याचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार, दक्षिण आफ्रिकेच्या अवैध खाणीतील भयावह कहाणी

    • Author, मायेनी जोन्स
    • Role, बीबीसी न्यूज
    • Reporting from, जोहान्सबर्ग

(या बातमीतील काही तपशील तुम्हाला विचलित करू शकतील)

जोनाथनसाठी (नाव बदललेले आहे) दक्षिण आफ्रिकेतील एका बंद पडलेल्या खाणीत सहा महिने राहून काम करण्याचा अनुभव अत्यंत धक्कादायक होता. या भूमिगत खाणीत अत्यंत कठीण परिस्थितीत काम करत असताना त्यानं तिथं लहान मुलांवर अत्याचार होताना पाहिले.

काही मुलांना इथं स्वस्त मजुरीसाठी भरती करण्यात येतं. परंतु, काही मुलांना खास करून लैंगिक शोषणासाठीच आणलं जातं, असं तिथले कॅम्पेनर्स सांगतात.

जोनाथन, जो आता विशीत आहे, सहज आणि लवकर पैसा कमावण्याच्या आमिषामुळं तो दक्षिण आफ्रिकेत स्थलांतरित झाला होता.

बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांना फायदेशीर नसलेल्या खाणी बंद करुन निघून जातात. पण त्या ठिकाणी बेकायदा खाणकाम केले जाते. अशा खाणींमध्ये मुलांना पैशाचे, सोन्याचे आमिष दाखवून कामाला लावले जाते. जोनाथन हा त्यांच्यापैकीच एक होता.

प्रसारमाध्यमांना अवैध खाणीत चालणाऱ्या या उद्योगाबद्दल माहिती दिल्यानं जोनाथनच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या अवैध खाण उद्योग चालवणाऱ्या क्रूर गुन्हेगारी टोळ्यांकडून भीती असल्याने आम्ही त्याची संपूर्ण ओळख लपवून ठेवत आहोत.

अल्पवयीन मुलांचा गैरफायदा

गेल्या वर्षीच्या अखेरीस स्टिलफॉन्टेन शहराजवळ डझनभर बेकायदेशीर खाण कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर युवक वर्ग या खाणीत का कामाला जात आहेत याचा पोलिसांनी शोध घेण्यास सुरूवात केली. यासाठी त्यांनी खाणीवर नाकाबंदी केली, त्यावेळी ही गोष्ट उघड झाली.

शांत आणि धीरगंभीर आवाजात, जोनाथनने त्याच्या शरीरावर झालेल्या परिणामांची माहिती दिली. उष्णता, कामाचे जास्तीचे तास, मर्यादित अन्न आणि अपुऱ्या झोपेमुळं शरीरावर परिणाम झाल्याचे त्यानं सांगितलं.

पण तो ज्या शाफ्टमध्ये काम करत होता, त्या शाफ्टमध्ये अल्पवयीन खाण कामगारांसोबत काय घडलं हे त्याच्या स्मृती पटलावरून कधीच पुसलं जाणार नाही.

"मी खाणकामात ही मुलं पाहायचो, खरं तर किशोरवयीन मुलं, 15- 17 वर्षांची."

"कधी कधी काही लोक त्यांचा गैरफायदा घेत असत. ते थोडंसं भीतीदायक होतं, आणि माझ्यासाठी त्रासदायक होतं."

त्यानं सांगितलं की, प्रौढ खाण कामगारांनी लैंगिक संबंधाच्या बदल्यात त्यांना सापडलेलं काही सोनं देण्याचं वचन देऊन त्यांच्यावर बलात्कार केला.

"जर त्या मुलाला पैशांची गरज असेल असेल तर तो धोका पत्करत असत."

जोनाथन सांगतो की, कसं लहान मुले खाण कामगारांच्या संघटनेकडे सुरक्षा मागण्यासाठी जात, पण "त्या संघटनेच्या काही अटी असत."

जर ती टीनएजर्स मुलं त्यांच्या टीमसाठी त्यांचं काम पूर्ण करण्यात अपयशी ठरले तर शिक्षा म्हणून देखील सेक्सचा वापर केला जात असे.

शेजारच्या देशातून मुलांचं अपहरण

जोनाथन म्हणतो की, ज्या खाणीत तो काम करत होता, त्या खाणीतले सर्व मुलं परदेशी होती. त्यांना आपण काय करत आहोत याची कल्पनाही नव्हती.

खाण संशोधक आणि कार्यकर्ते मखोटला सेफुली यांनी या म्हणण्याला दुजोरा दिला आहे.

ते म्हणतात की, दक्षिण आफ्रिकेतील अवैध खाणींमध्ये काम करण्यासाठी गुन्हेगारी टोळ्या विशेषतः मुलांना लक्ष्य करतात.

त्यापैकी अनेकांचे शेजारच्या देशांतून अपहरण करून त्यांची तस्करी केली जाते. त्यांना खाण उद्योगात रोजगार मिळवून देण्याचे खोटं आश्वासन देऊन भुरळ घातली जाते.

"जेव्हा ही मुलं दक्षिण आफ्रिकेत पोहोचतात, तेव्हा त्यांचे पासपोर्ट जप्त केले जातात... या मुलांना शारीरिक शोषणाचा सामना करावा लागतो, हे सर्वज्ञात आहे," असं सेफुली म्हणतात.

'लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं जातं'

बीबीसीने किमान दोन इतर बेकायदेशीर खाणींमध्ये काम करणाऱ्या खाण कामगारांशी संवाद साधला. ते काम करत असलेल्या शाफ्टमध्ये मुलांवर अत्याचार होताना पाहिल्याचे या कामगारांनी सांगितलं.

काही पुरुष लहान मुलांना आपल्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडायचे, असे आपण पाहिल्याचे त्शेपो (नाव बदललेले आहे) सांगतो.

"काही वेळा, ते पैशांसाठी असं करतात. काही मुलांना फक्त त्या हेतूनंच भरती केलं जातं. कारण कदाचित छुप्या सेक्स व्यापाराचे आर्थिक फायदे मिळण्याची शक्यता असते."

या अत्याचाराचा मुलांवर खोलवर परिणाम झाला, असं तो पुढं म्हणाला.

"त्यांची वर्तणूक बदलते आणि ते कुणावरही विश्वास ठेवत नाहीत. ते तुम्हाला त्यांच्याजवळ येऊ देत नाहीत, कारण त्यांना वाटतं की ते आता कुणावरही विश्वास ठेवू शकत नाहीत."

गेल्या वर्षी स्टिलफॉन्टेन शहराजवळील बफेल्सफॉन्टेन सोन्याच्या खाणीत पोलीस आणि खाण कामगार यांच्यात संघर्ष झाला. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या या बेकायदेशीर खाण उद्योगाची जागतिक प्रसारमाध्यमांनी दखल घेतली होती.

'वाला उमगोडी' ऑपरेशन सुरू

अधिकार्‍यांनी बेकायदेशीर खाणकाम रोखण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामुळे सरकारच्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेच्या अर्थव्यवस्थेला गेल्या वर्षी 3.2 अब्ज डॉलर्स (2.6 अब्ज पाऊंड) इतके उत्पन्न गमवावे लागले.

त्यांनी डिसेंबर 2023 मध्ये वाला उमगोडी नावाने एक ऑपरेशन सुरू केले, ज्याचा अर्थ 'सील द होल' किंवा शब्दशः अर्थ छिद्र बंद करा असा होता. (बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या खाणी पूर्णतः बंद करुन त्याद्वारे होणारे शोषण थांबवणे हा या मिशनचा उद्देश आहे.) आणि या टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

ऑपरेशनचा एक भाग म्हणून, पोलिसांनी स्टिलफॉन्टेन खाणीत खाली जाणारे अन्न आणि पाण्याचे प्रमाण मर्यादित केले, ज्याला एका मंत्र्याने बेकायदेशीर खाण कामगारांना बाहेर काढण्यासाठी "स्मोक आऊट" केल्याचं म्हटलं.

परंतु, अटक होण्याच्या भीतीनं हे कामगार बाहेर येण्यास नकार देत होते, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

लवकरच खाणीतून काही फुटेज बाहेर आले, ज्यामध्ये अनेक अशक्त आणि कृश झालेले पुरुष बचावाची विनंती करत होते, तसेच तिथे शवपेट्यांच्या रांगा दिसत होत्या. अखेर न्यायालयाने अधिकाऱ्यांना त्या लोकांना वाचवण्याचे आदेश दिले.

त्यामध्ये अनेकांनी ते अल्पवयीन असल्याचं सांगितलं. पण बऱ्याच जणांकडे कागदपत्रं नव्हती. ज्यामुळं त्यांचं वय निश्चित करता येत नव्हतं. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांच्या वयाचा अंदाज घेण्यासाठी वैद्यकीय चाचण्या केल्या.

याद्वारे, डिपार्टमेंट ऑफ सोशल डेव्हलपमेंटने (डीएसडी) माहिती दिली की, सुटका केलेल्या स्टिलफॉन्टेन खाण कामगारांपैकी 31 मुलं होती. ते सर्व मोझांबिकचे नागरिक होते आणि नोव्हेंबरमध्ये त्यांच्यापैकी 27 जणांना परत पाठवले गेले.

मुलांचं मानसिक खच्चीकरण

"सेव्ह द चिल्ड्रन साऊथ आफ्रिका" ने अल्पवयीन खाणकामगार आणि बचावकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांदरम्यानच्या काही मुलाखतींचे भाषांतर करण्यास मदत केली.

"त्यांनी त्रास सहन केला, कारण त्यातील काहींनी इतरांचे लैंगिक शोषण होताना देखील पाहिलं होतं," असं चॅरिटीच्या सीईओ गुगू जाबा यांनी बीबीसीला सांगितलं.

"आता आपण इथून बाहेर जाऊ शकणार नाही, असं त्यांना वाटत होतं. त्यामुळं या मुलांचं मानसिक खच्चीकरण झालं होतं."

त्या म्हणतात की, त्यानंतर त्या मुलांना प्रौढांबरोबर लैंगिक कृत्ये करण्यास भाग पाडले गेले आणि नंतर त्यांच्यांवर वारंवार बलात्कार केला गेला.

"तुम्ही पाहू शकता की, प्रौढ व्यक्तीकडे तीन किंवा चार मुलं असतात, ज्यांच्याबरोबर ते त्याच त्याच गोष्टी करत असतात."

जाबा म्हणतात की, खाण टोळ्या मुलांची भरती करतात, कारण त्यांना हाताळणं सोपे आणि स्वस्त असते.

सेक्ससाठीच मुलांची भरती

जाबा सांगतात, "मुलांना समजत नाही जेव्हा तुम्ही म्हणता: 'मी तुम्हाला दिवसाला 20 रँड्स (1 डॉलर- 0.80 पाउंड) देईन.' प्रौढ काही वेळा काम करण्यास नकार देतात, पण मुलांना पर्याय नसतो.

त्यामुळं मुलाला काम करण्यासाठी वापरणं सोपं असतं. मुलांना घेऊन त्यांना तिथे आणणं सोपं असतं, कारण ते खूपच कमकुवत असतात आणि ते आवाजही उठवू शकत नाहीत."

हे सर्व आर्थिक शोषणाच्या पलीकडे असल्याचे सांगत त्या म्हणतात की, काही टोळ्या खासकरून सेक्ससाठी मुलांची भरती करतात.

अवैध खाणकाम करणारे कामगार अनेक महिने भूमिगत असतात, आणि ते क्वचितच वर येतात. त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठी भूमिगत बाजारपेठा तयार असतात.

"बहुतेक मुलांचा लैंगिक गुलाम म्हणून वापर करण्यासाठी तस्करी केली जाते. तुमच्याकडे एक 'दलाल' असतो जो पैसे घेतो, याचा अर्थ दररोज या मुलांचा वापर व्यावसायिक सेक्स वर्कर म्हणून केला जातो."

बीबीसीने पोलीस आणि डीएसडी यांना लैंगिक शोषणाचे कोणावर आरोप लावले आहेत का, असा प्रश्न विचारला. परंतु, त्यांनी त्याला काहीच प्रतिसाद दिला नाही.

अनेक मुलं साक्ष देऊ इच्छित नाहीत, असं स्टिलफॉन्टेन खाण कामगारांच्या प्रकरणांवर काम करणाऱ्या एकानं सांगितलं.

दरम्यान, बेकायदेशीर खाण उद्योग अजूनही जोमात सुरू आहे.

आणि अंदाजे 6,000 रिकाम्या खाणी सहज उपलब्ध असल्याने, हा उद्योग लवकर थांबेल असं वाटत नाही, ज्यामुळं हजारो असुरक्षित मुलांचं भवितव्य धोक्यात आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)