एक जूनपासून बदलणार 'हे' नियम; कोणकोणत्या बदलांचा होणार तुमच्यावर परिणाम?

आज मे महिन्याचा शेवटचा दिवस. उद्या कॅलेंडरचं पान बदलून 1 जून हा नव्या महिन्याचा पहिला दिवस उजाडेल. नवा महिना म्हटलं की नवे बदल आलेच.

1 जून 2025 पासून असेच काही महत्त्वाचे आणि नवे बदल रुजू होणार आहेत.

हे बदल तुमच्या आर्थिक घडामोडींसाठी फार महत्त्वाचे ठरु शकतात. त्यामुळे, ते जाणून घेणं तुमच्यासाठी कधीही फायद्याचंच ठरेल.

अगदी आधार कार्डपासून ते म्युच्यूअल फंडमधील गुंतवणुकीपर्यंत, आर्थिक घडामोडींशी निगडीत असणारे आणि तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारे हे कोणते बदल आहेत, ते पाहूयात.

UPI पेमेंटमधील बदल

'नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन'ने प्रसिद्ध केलेल्या एका सर्क्यूलरनुसार, 1 जूनपासून, 'पर्सन-टू-पर्सन' तसेच 'पीअर-टू-मर्चंट' पेमेंटमध्ये (म्हणजेच व्यक्तीला अथवा एखाद्या दुकानदाराला पैसे पाठवताना) काही महत्त्वाचे बदल घडणार आहेत.

या बदलांनुसार, यूपीआय ॲपमधून ज्या व्यक्तीला तुम्ही पैसै पाठवत आहात, त्या व्यक्तीच्या बँकेचे नाव देखील तुम्हाला दिसणार आहे.

याचा अर्थ असा की, तुम्ही पेमेंट पूर्ण करण्यापूर्वी, पैसे कोणत्या बँकेत जात आहेत, हे तुम्हाला पाहता येईल.

या सर्क्यूलरनुसार, यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढावा म्हणून हे बदल करण्यात आले आहेत.

जेणेकरुन, आपण योग्य त्या व्यक्तीला पैसे देत आहोत की नाही, हे यामुळे समजू शकेल.

याशिवाय या सर्क्यूलरमध्ये असंही म्हटलंय की, 1 जूनपासून जेव्हा तुम्ही एखादा क्यूआर कोड स्कॅन करता अथवा जेव्हा तुम्ही यूपीआय वापरुन पैसे पाठवता, तेव्हा त्या क्यूआर कोडशी संलग्न असलेले इतर कोणतंही नाव तुमच्या ऍपमध्ये दिसणार नाही.

याऐवजी, ज्या बँकेमध्ये आपले पैसे जाणार आहेत, त्या बँक अकाऊंट धारकाचं नावचं आपल्याला ऍपमध्ये दिसू शकेल.

यामुळे, आपण आपले पैसे नेमके कुणाला पाठवतो आहोत, ते आपल्याला समजू शकेल.

या माध्यमातून होणारी ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी हे पाऊल उचललं जात आहे.

शिवाय, आणखी एक बदल म्हणजे जी व्यक्ती पैसे स्वीकारते आहे, तिला यूपीआय ॲपमध्ये आपलं नाव बदलून दुसरंच काहीही ठेवता येणार नाहीये.

त्या व्यक्तीला तेच नाव ठेवावं लागेल जे रजिस्टर्ड बँक अकाऊंटला नोंद आहे.

याचा अर्थ असा आहे की, पैसे पाठवताना आता तुम्हाला खऱ्या अकाऊंट धारकाचेच नाव दिसेल आणि त्याची ओळख कळू शकण्यास मदत होणार आहे.

कोणतंही खोटं आणि बदललेलं नाव दिसणार नाही. या माध्यमातून पैसे पाठवताना ग्राहकांचा आत्मविश्वास आणखी वाढू शकेल आणि ऑनलाईन फसवणुकीपासून आपलं संरक्षण करता येईल.

'आधार कार्ड अपडेट' करण्यासंदर्भातील बदल

'यूनिक आयडेन्टीफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया' अर्थात 'UIDAI'ने प्रसिद्ध केलेल्या एका नव्या सुचनेनुसार, आता 'माय आधार' पोर्टलवरुन काही डॉक्यूमेंट्समध्ये अगदी मोफत बदल करता येणार आहेत.

14 जून 2025 पर्यंत हे बदल मोफत पद्धतीने करता येतील.

म्हणजेच या तारखेपर्यंत, आधार कार्डधारक पोर्टल वापरून त्याच्या ओळखपत्रामध्ये तसेच 'ॲड्रेस डॉक्यूमेंट'मध्ये मोफत अपडेट करू शकेल.

या काळात, आधार कार्डधारक नोंदणीच्या वेळी नमूद केलेले नाव, लिंग, जन्मतारीख आणि पत्ता यासाठी कागदपत्रे अपडेट करू शकतील.

मात्र, आधार केंद्रावर या प्रक्रियेसाठी 50 रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे.

म्युच्यूअल फंड कट-ऑफमधील वेळेत बदल

'Upstox.com' या इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मने दिलेल्या माहितीनुसार, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने अलीकडेच ओव्हरनाईट म्युच्युअल फंड योजनेत बदल जाहीर केला आहे.

हा बदल 1 जूनपासून अंमलात आणला जाईल.

नवीन नियमानुसार, म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठीची अंतिम मुदत बदलली आहे. जर तुम्ही ऑफलाइन गुंतवणूक करत असाल (बँक किंवा एजंटद्वारे), तर अंतिम मुदत दुपारी 3 वाजता आहे.

जर तुम्ही ऑनलाइन गुंतवणूक करत असाल (अ‍ॅप किंवा वेबसाइटद्वारे), तर अंतिम मुदत संध्याकाळी 7 वाजता आहे.

जर तुम्ही या वेळेनंतर गुंतवणूक केली तर तुमच्या पैशांवर कामकाजाच्या पुढील दिवशी प्रक्रिया केली जाईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)