You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुतिन यांनी मंत्रिपदावरून हटवलं, दुसऱ्याच दिवशी सापडला मृतदेह; रशियाच्या माजी मंत्र्यांच्या मृत्यूचं गूढ
रशियाचे माजी परिवहन मंत्री रोमन स्टारोव्होइट यांचा मृत्यू अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांना पदावरून हटवलं होतं, आणि नंतर काही तासांतच त्यांचा मृतदेहच सापडला.
स्टारोव्हाइट यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी सुरू होती. या मृत्यूमुळे रशियन राजकारणात खळबळ उडाली आहे.
रशियाच्या तपास समितीने देशाचे माजी परिवहन मंत्री रोमन स्टारोव्होइट हे मृत अवस्थेत सापडले असल्याचं जाहीर केलं आहे. स्टारोव्होइट यांना सोमवारीच पुतिन यांनी त्यांच्या पदावरून हटवलं होतं.
त्यांच्या बडतर्फीचं कोणतेही कारण सांगण्यात आलं नव्हतं. त्यानंतर काही वेळातच उप परिवहन मंत्री आंद्रेई निकितीन यांची नवीन मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
ही घटना नेमकी कशामुळे घडली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे तपास समितीने सांगितलं आहे.
स्टारोव्होइट यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा होण्यापूर्वी, क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांना पत्रकारांनी त्यांच्याबद्दल प्रश्न विचारले होते.
कुर्स्कमध्ये घडलेल्या घटनांमुळे पुतिन यांचा स्टारोव्होइट यांच्यावरचा विश्वास उडाला होता का? असा प्रश्न होता.
त्यावर उत्तर देताना पेस्कोव्ह म्हणाले, "जर विश्वास उडाला असता, तर राष्ट्राध्यक्षांच्या आदेशात तसं स्पष्टपणे नमूद केलं असतं. पण तशा कोणत्याही प्रकारच्या शब्दांचा वापर करण्यात आलेला नाही."
स्टारोव्होइट यांचा मृत्यू कदाचित शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री झाला असावा, असं फोर्ब्स प्रकाशनाने तपास यंत्रणेशी संबंधित सूत्रांच्या हवाल्यानं लिहिलं आहे.
"स्टारोव्होइट यांचा मृत्यू बऱ्याच आधी झाला होता," असं रशियन संसद म्हणजेच स्टेट ड्यूमाच्या संरक्षण समितीचे प्रमुख आंद्रेई कार्तपोलोव्ह यांनीही आरटीव्हीआय या रशियन प्रसारमाध्यम संस्थेशी बोलताना सांगितलं
आरबीसीच्या वृत्तानुसार, सोमवारी स्टारोव्होइट त्यांच्या स्वतःच्या कारपासून काही मीटर अंतरावर असलेल्या झुडपांच्या मागे मृत अवस्थेत सापडले
ज्या ठिकाणी त्याचा मृतदेह सापडला त्या ओडिंटसोवो पार्किंगमध्ये काम करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांचे फोटो आणि व्हीडिओ समोर आले आहेत.
गेल्याच वर्षी झाले होते परिवहन मंत्री
स्टारोव्होइट यांची मे 2024 मध्ये परिवहन मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते जवळपास एक वर्ष या पदावर होते.
त्याआधी ते सुमारे पाच वर्षं युक्रेनच्या सीमेलगत असलेल्या कुर्स्क प्रदेशाचे गव्हर्नर होते.
त्यांच्या नंतर अलेक्सी स्मिरनोव यांची त्या ठिकाणी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली.
त्याआधी स्मिरनोव यांनी कुर्स्क सरकारचे प्रमुख म्हणून काम केलं होतं.
प्रसारमाध्यमं आणि टेलिग्राम चॅनल्समधील सूत्रांच्या मते, स्टारोव्होइट यांच्या विरोधात फौजदारी खटला दाखल होण्याची शक्यता होती.
कोमर्सेंटने लिहिलं आहे की, स्मिरनोव्ह यांनी कथितपणे माजी मंत्री स्टारोव्होइट यांच्याविरुद्ध साक्ष दिली होती.
आरबीसी प्रकाशनाच्या माहितीनुसार, स्टारोव्होइट कुर्स्क प्रदेशात तटबंदी उभारणीच्या वेळी भ्रष्टाचारात सहभागी होते का नाही, याची चौकशी सुरू होती.
2019 मध्ये बनले कुर्स्क प्रदेशाचे गव्हर्नर
स्टारोव्होइट यांचा जन्म 1972 मध्ये कुर्स्कमध्ये झाला होता. पण काही काळानंतर त्यांचं कुटुंब सेंट पीटर्सबर्गला स्थलांतरित झालं.
त्यांनी आपला राजकीय प्रवास सेंट पीटर्सबर्गमधून सुरू केला. त्यावेळी व्हॅलेंटिना मॅटविएन्को तिथल्या गव्हर्नर होत्या आणि स्टारोव्होइट त्यांच्या टीमचा भाग बनले.
सुरुवातीला स्टारोव्होइट यांना सेंट पीटर्सबर्गमधील ऑटोमोबाईल प्रकल्पांची जबाबदारी देण्यात आली होती.
त्यानंतर त्यांनी शहरातील मोठ्या बांधकाम प्रकल्पांची देखरेखही सांभाळली.
नंतर स्टारोव्होइट रशिया सरकारच्या उद्योग आणि पायाभूत सुविधा विभागात सहभागी झाले. त्याचं नेतृत्व त्या वेळी व्लादिमीर पुतिन करत होते.
या काळात ते रशियाच्या सोची शहरात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांच्या तयारीतही सहभागी झाले होते.
2012 साली स्टारोव्होइट यांची नियुक्ती रोसाव्हेटोडोरचे (रशियामध्ये रस्ते बांधण्याची सरकारी संस्था) प्रमुख म्हणून करण्यात आली.
2018 मध्ये त्यांना परिवहन मंत्रालयाचे उपप्रमुख बनवण्यात आलं.
ऑक्टोबर 2018 मध्ये त्यांची कुर्स्क प्रदेशाचे कार्यवाहक गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली.
स्टारोव्होइट यांच्या मृत्यूप्रकरणी बीबीसी रशियन सेवेचे प्रतिनिधी सर्गेई गोर्याश्को यांचं मत
रोमन स्टारोव्होइट यांचा मृत्यू पुतिन यांच्या रशियासाठी एक असामान्य घटना मानली जात आहे.
स्टारोव्होइट यांची कहाणी सोव्हिएत काळातील आणखी एक गृहमंत्री निकोलाई श्चेलोकोव्ह यांची आठवण करून देते.
श्चेलोकोव्ह यांना राजीनामा दिल्यानंतर भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून फौजदारी कारवाईची धमकी देण्यात आली होती. डिसेंबर 1984 मध्ये, ज्या दिवशी त्यांच्याकडून सर्व पदे काढून घेतली गेली, त्याच दिवशी त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती.
रशियन सरकारी एजन्सींच्या माहितीनुसार, 2022-2023 मध्ये कुर्स्क प्रदेश सरकारला दिलेल्या निधीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालं आहे. त्या काळात या प्रदेशाचे गव्हर्नर रोमन स्टारोव्होइट होते.
असं मानलं जात आहे की, आपल्या माजी उपमुख्य अलेक्सी स्मिरनोव यांची अटक झाल्यानंतर, रोमन स्टारोव्होइट यांनी गेले तीन महिने आपल्या भवितव्याबाबत भीती आणि अनिश्चिततेत घालवले होते.
रशियामध्ये हे नेहमीच दिसून येतं की, अटक करण्यात आलेले लोक अनेकदा आपल्या वरिष्ठांविरुद्ध साक्ष देतात. कदाचित, स्टारोव्होइट यांनाही याचीच चिंता होती.
आत्तापर्यंत बहुतांश अधिकाऱ्यांचा असा विश्वास राहिला आहे की, वरच्या स्तरावरील संपर्क त्यांना वाचवतील. काही जण तर अटक होण्यापूर्वीच देश सोडून जातात.
रशियाच्या चेल्याबिन्स्क प्रदेशातील दोन वरिष्ठ अधिकारी, मिखाइल युरेविच आणि त्यांचे उत्तराधिकारी बोरिस दुब्रोव्स्की यांनी असं केलं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.