औषध आणि अन्नाचे नाते काय? 'हे' फळ जर 'या' औषधासोबत घेतले तर होतात गंभीर परिणाम

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सोफिया क्वाग्लिया
आपण घेत असलेल्या औषधांच्या प्रभावीपणावर कधीकधी आपण खाल्लेल्या अन्नामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो. उपचार अधिक प्रभावी व्हावेत यासाठी या परिणामांवर नियंत्रण मिळवून त्याचा प्रभावीपणा वाढवण्यासाठी वैज्ञानिक आता प्रयत्न करत आहेत.
ही एक लाजिरवाणी समस्या होती. सलग पाच तास लिंगात ताठरपणा राहिल्यामुळे तर ही समस्या खूपच वेदनादायी झाली होती. तामिळनाडूत डॉक्टरांना एका अतिशय वेगळ्या केसचा अनुभव आला. ज्यात हॉस्पिटलच्या इमरजन्सी वॉर्डमध्ये 46 वर्षांचा पुरुष भरती झाला. त्याला आलेल्या समस्येमुळे सगळेच डॉक्टर आणि स्टाफ गोंधळलेला होता.
त्या माणसानं 'व्हायग्रा'चे सेवन केले होते. पत्नीशी शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी त्याने औषध घेतलं. त्याचा डोसही अगदी योग्यच होता. मात्र त्या औषधाच्या परिणामातून बाहेर पडण्यासाठी तो काहीही करू शकत नव्हता.
डॉक्टरांनी त्याच्या या समस्येबाबत त्याच्याकडे अधिक चौकशी केली. तेव्हा डॉक्टरांना कळालं की तो माणूस आधीच डाळिंबाचा रस देखील भरपूर प्रमाणात प्यायला होता.
त्याला या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांनी एक इंजेक्शन दिलं. तसंच त्या भविष्यात डाळिंबाचा रस न पिण्याचा सल्ला दिला.
यातून डॉक्टरांनी निष्कर्ष काढला होता की डाळिंबाचा रस प्यायल्यामुळे तो घेत असलेल्या औषधाची क्षमता अनपेक्षितपणे आणखी वाढली होती.
अन्नाचा औषधावरील परिणाम
आपण घेत असलेल्या औषधांबरोबर आपण सेवन केलेल्या अन्नाचा एकत्रितपणे काय परिणाम होऊ शकतो, याचं हे फक्त एक उदाहरण आहे.
अन्न आणि औषधांचा एकत्रितपणे कशाप्रकारे प्रचंड, विचित्र आणि अनपेक्षित दुष्परिणाम होऊ शकतात, हे सांगणारं वैद्यकीय साहित्य विपुल प्रमाणात आहेत. कधीकधी हे परिणाम खूप चिंताजनक असू शकतात.
यापैकी बहुतेक प्रकरणं वैयक्तिक स्वरुपात किंवा काही थोड्या प्रकरणांच्या माहितीच्या स्वरूपात अस्तित्वात असली तरी देखील, माणसानं औषध घेतलेलं असताना, अन्न, पेयं आणि औषधी वनस्पतींचा त्यांच्यावर काय परिणाम होऊ शकतो, याचं तपशीलवार वर्णन करणारं संशोधन आता वाढतं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
उदाहरणार्थ, द्राक्षांमुळे बऱ्याच औषधांचा परिणाम वाढतो, दुष्परिणामांचा धोका वाढतो किंवा औषधाचे साधारण डोसदेखील विषारी किंवा अपायकारक ठरू शकतात, हे पूर्वीपासून माहीत आहे. तर दुसऱ्या बाजूला फायबरयुक्त अन्नांमुळे काही औषधांचा प्रभाव कमी होऊ शकतो.
सर्वसाधारणपणे, औषधनिर्मिती कंपन्या औषधं विकसित करताना अनेक दशकं त्यावर काम करतात, त्यांची चाचणी करतात. ती औषधं माणसांसाठी सुरक्षित आणि प्रभावी आहेत याची खातरजमा त्यातून केली जाते.
मात्र तरीदेखील बाजारात हजारो औषधं आहेत आणि त्यांच्यासोबत घेता येणारे लाखो अन्नपदार्थ आहेत.
योग्य आहाराद्वारे औषधं प्रभावी करण्यासाठी संशोधन
वैज्ञानिकांनी घेतलेल्या आढाव्यातून असं दिसून येतं की तोंडानं सुरक्षित आणि प्रभावी घेतल्या जाणाऱ्या औषधांसाठी अन्नाबरोबरचा त्यांचा संबंध एक मोठा असू शकतो.
तज्ज्ञ आता औषध आणि अन्न यातील परस्परसंवादाचा शिस्तबद्धपणे मागोवा घेऊ लागले आहेत.

फोटो स्रोत, Serenity Strull/BBC
या अभ्यासामुळे औषध एकट्यानं जितकी प्रभावी ठरतील त्यापेक्षा अन्न आणि औषधांचा एकत्रितपणे होणाऱ्या परिणामांचा वापर करून औषधांचा प्रभावीपणा अधिक वाढवता येईल अशी आशा काहींना वाटते आहे.
"बहुतांश औषधांवर अन्नाचा परिणाम होत नाही," असं पॅट्रिक चॅन म्हणतात. ते कॅलिफोर्नियातील वेस्टर्न युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसमध्ये फार्मसी प्रॅक्टिस आणि ॲडमिनिस्ट्रेशनचे प्राध्यापक आहेत.
ते पुढे म्हणतात, "काही प्रकरणांमध्ये काही औषधांवर अन्नाचा परिणाम होतो, अशा औषधांवर आपण लक्ष ठेवलं पाहिजे."
अमेरिकेचं अन्न आणि औषध प्रशासन (यूएसएफडीए) आणि युरोपियन औषध एजन्सी यांचा निकष आहे की औषधांवरील अन्नाच्या परिणामाची चाचणी केली पाहिजे.

फोटो स्रोत, Getty Images
या चाचण्यांमध्ये ज्या लोकांनी उपवास केला आहे किंवा जास्त कॅलरीचं, जास्त चरबीचं जेवण घेतलं आहे, बटर असलेले दोन ब्रेड, तळलेल्या बेकनचे दोन तुकडे, दोन अंडी, काही बटाटे आणि मोठा ग्लासभर दूध घेतलं आहे अशांचा समावेश करण्याची आवश्यकता असते.
मात्र सर्व गोष्टींची तपासणी करणं जवळपास अशक्य आहे. मानवी शरीरातील चयापचय ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया असते, असं जेलेना मिलेसेविक म्हणतात. त्या सर्बियातील बेलग्रेडमधील सेंटर ऑफ रिसर्च एक्सलन्स इन न्युट्रिशन अँड मेटाबोलिझममध्ये रिसर्च असोसिएट आहेत.
त्या पुढे म्हणतात, "हे एखाद्या छोट्या कारखान्यासारखंच असतं. कारखान्यात ज्याप्रमाणे गुंतागुंतीच्या प्रक्रिया पार पाडल्या जात असतात तसंच हे असतं. कारखान्यात जसं अनेक गोष्टी येतात आणि अनेक गोष्टी बाहेर पडतात, काहीसं तसंच हे होत असतं."
एकदा का शरीरातील, अन्नाच्या आणि औषधाच्या सर्व रासायनिक अभिक्रिया एकत्र झाल्या की "त्याचं प्रमाण खूप मोठं असतं आणि मग त्यांना वेगळं करणं खूप कठीण असतं," असं मिलेसेविक म्हणतात.
व्हिटामिन डीचा शरीरातील औषधांवर काय परिणाम होतो, तसंच औषधांचा व्हिटामिन डी वर काय परिणाम होतो, यावर त्या संशोधन करत आहेत.
आपण जी औषधं घेतो त्यावर आपण सेवन केलेल्या अन्नाचा दोन प्रकारे परिणाम होऊ शकतो: अन्न औषधाच्या मुख्य किंवा सक्रिय घटकांबरोबर मिसळलं जातं किंवा आपल्या शरीरावर औषधाचा काय परिणाम होतो, यात अन्नामुळे बदल होऊ शकतो.
अन्न आणि औषधाचे कॉम्बिनेशन्स
1980 च्या दशकापासून अन्न आणि औषधाचे काही कॉम्बिनेशन माहीत आहेत. याचं एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे, द्राक्ष आणि द्राक्षांचा रस कशाप्रकारे औषधांच्या कामात व्यत्यय आणू शकतं.
यात स्टॅटिन्ससारखी काही कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधं असतात. तसंच निफेडिपाइन आणि फेलोडिपाइन सारखी उच्च रक्तदाबासाठीच्या औषधांचाही समावेश आहे.
अवयव प्रत्यारोपणानंतर शरीरानं तो अवयव नाकारू नये, यासाठी रोगप्रतिकारशक्ती कमी करण्यासाठी वापरलं जाणारं सायक्लोस्पोरिन या औषधावरही द्राक्ष आणि द्राक्षाच्या रसाचा परिणाम होतो. तसंच जगभरातील रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक औषधांवर देखील त्याचा परिणाम होतो.
द्राक्षामुळं एखाद्या औषधांचं रक्तातील प्रमाण किंवा उपलब्धता वाढू शकते. त्यामुळे औषधाच्या डोसचा प्रभाव वाढतो. यात आर्टेमेथर आणि प्राझिक्वान्टेल सारख्या मलेरियाविरोधी आणि सॅक्विनावीरसारख्या अँटीव्हायरल औषधांचा समावेश आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सायटोक्रोम P450 3A4 नावाच्या एका एन्झाइमला प्रतिरोध करून हे होतं. या एन्झाइममुळे विविध औषधांचं विघटन होतं. यामुळे औषधं इतक्या अति प्रमाणात जमा होऊ शकतात की ती विषारी ठरू शकतात.
उदाहरणार्थ इरेक्टाइल डिसफंक्शन किंवा ताठरतेच्या समस्येवर वापरलं जाणारं सिल्डेनाफिल हे औषध. ते व्हायग्रा या नावानं विकलं जातं.
"या एन्झाइमशिवाय औषध शरीरात दीर्घकाळ राहतं आणि औषधाचं वाढलेलं प्रमाण शरीरासाठी विषारी ठरू शकतं," असं मारिया दा ग्राका कॅम्पोस म्हणतात. त्या पोर्तुगालमधील कोइम्ब्रा विद्यापीठात औषधं-औषधी वनस्पतींमधील परस्परसंवादाच्या वेधशाळेच्या संचालक आहेत.
फळांच्या रसाचा औषधांवर अधिक शक्तीशाली परिणाम होतो. कारण ते अनेकदा घट्ट स्वरूपात असतात. याचाच अर्थ त्यामध्ये सक्रिय संयुगांचं प्रमाण अधिक असतं ज्यांचा फळांच्या तुलनेत औषधांवर अधिक परिणाम होतो.
क्रॅनबेरीच्या फळाचा औषधांवर होणारा परिणाम
क्रॅनबेरीज या फळांचा देखील वॉरफेरिन या औषधावर असाच परिणाम होतो, असं मानलं जात होतं. वॉरफेरिन हे एक अँटिकोॲगुलंट औषध असतं.
क्रॅनबेरीचा रस पिण्यासंदर्भात डझनभर रुग्णांची प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. एका रुग्णाच्या बाबतीत आठवडाभर दररोज सॅंडविचमध्ये अर्धा कप (113 ग्रॅम) क्रॅनबेरी सॉस घेतल्यानं असं दिसून आलं की वॉरफेरिनमुळे रक्त पातळ केली जाण्याची जी क्रिया होते, त्याचा प्रभाव क्रॅनबेरीमुळे वाढू शकतो.
क्लिनिकल चाचण्या आणि पुराव्यांच्या शिस्तबद्ध आढाव्यामधून मात्र निष्कर्ष काढण्यात आला की क्रॅनबेरीजच्या सामान्य सेवनामुळे वॉरफेरिनच्या प्रभावामध्ये व्यत्यय येत नाही.
मात्र हे लक्षात घेतलं पाहिजे की वॉरफेरिन औषध आणि क्रॅनबेरीचा रस यांच्या कॉम्बिनेशनमुळे होणारा परिणाम शोधण्यात अयशस्वी ठरलेल्या एका व्यापकपणे उल्लेख करण्यात आलेल्या चाचणीला एका क्रॅनबेरीच्या रस उत्पादकानंच निधी पुरवला होता.

फोटो स्रोत, Getty Images
"बहुतांश वैद्यकीय साहित्य रुग्णाच्या अतिशय निष्कृष्ट दर्जाच्या अहवालापुरतं मर्यादित आहे, ज्यात निष्कर्षाविषयी गोंधळ निर्माण करणाऱ्या घटकाकडे दुर्लक्ष केलेलं असतं," असं ॲन हॉलब्रुक म्हणतात.
त्या कॅनडातील हॅमिल्टनमधील मॅकमास्टर विद्यापीठात क्लिनिकल फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजीच्या संचालक आहेत.
या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी फक्त वॉरफेरिन दिल्यावर होणारे परिणाम आणि वॉरफेरिनबरोबर क्रॅनबेरीचं सेवन केल्यान होणारे परिणाम यांची एकमेकांशी तुलना करण्यासाठी शेकडो रुग्णांचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, तसंच त्यात क्रॅनबेरीच्या उत्पादनांचा मानकांचाही विचार झाला पाहिजे, असं हॉलब्रुक म्हणतात.
ताजा रस, घट्ट रस किंवा अर्क घेतल्यास त्याचबरोबर फळाचं प्रमाण आणि औषध घेण्याच्या वेळेच्या तुलनेत फळाचा रस घेण्याची वेळ याचादेखील औषधाच्या प्रभावावर परिणाम होऊ शकतो, अँड्रयू मॅकलॅचलन म्हणतात. ते सिडनी विद्यापीठातील फार्मसीचे डीन आहेत.
2011 मध्ये, अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं (यूएसएफडीए) वॉरफेरिनसाठीच्या त्यांच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा केली. त्यातून त्यांनी क्रॅनबेरीसंदर्भातील इशारे काढून टाकले. मात्र युकेतील एनएचएस अजूनही रुग्णांना इशारा देतं की औषध घेत असताना क्रॅनबेरीचा रस पिणं टाळावं.
हृदयविकार, रक्तदाब आणि मधुमेहापर्यंत विविध आजारांवर वेगवेगळा परिणाम
लिकोरिश म्हणजे ज्येष्ठमधाचा काही औषधांबरोबर संबंध आल्यास त्याचा परिणाम होतो. त्याचा सायक्रोम एन्झाइमवर परिणाम होतो, जे सामान्यपणे औषधांचं विघटन करण्याचं काम करतात.
डायगॉक्सिन हे हृदयविकारावरील औषध आणि काही अँटिडिप्रेसन्ट औषधांसह त्याचा औषधांवर परिणाम होतो.
मात्र या परिणामांच्या प्रमाणाचा बारकाईनं केलेल्या अभ्यासातून असं दिसून येतं की त्याचे वैद्यकीयदृष्ट्या कोणतेही संभाव्य दुष्परिणाम होत नाहीत.
स्लायडिंग स्केल प्रकाराच्या दृष्टीकोनातून अन्न आणि औषधांचा एकमेकांशी असणारा संबंध आणि होणारा परिणाम समजून घेण्यासाठी ही सर्व कारणं आहेत.
"आपण औषध आणि अन्नाचा परस्परसंवाद हा एकतर पूर्णपणे होईल किंवा अजिबात नसेल, या पद्धतीनं विचार करू शकत नाही. औषध आणि अन्नाचा एकमेकांशी येणाऱ्या संबंधाचं वर्गीकरण केलं जातं. ते तीव्र स्वरुपाचं, मध्यम किंवा किरकोळ स्वरुपाचं असू शकतं," असं चॅन म्हणतात.

फोटो स्रोत, AFP via Getty Images
2017 मध्ये मारिया दा ग्राका कॅम्पोस यांनी अन्न आणि औषधामधील एक विचित्र परस्परसंवाद समोर आणला. संधिवातासाठी औषध घेत असलेल्या एका रुग्णाला अंग दुखत असल्यानं आणि अशक्तपणा असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, तेव्हा हे घडलं.
असं दिसून आलं की त्या रुग्णानं संधिवातासाठी घेतलं जाणारं कोल्चिसाइन हे औषध आर्टिचोक (एक भाजी) पासून बनवलेल्या पेयाबरोबर घेतलं होतं. तसंच त्याच्यासोबत मधुमेह आणि उच्च रक्तदाबासाठी तो घेत असलेली इतर औषधंदेखील घेतली होती.
आर्टिचोकमधील काही जैवरासायनिक घटकांमुळे त्याच्या शरीराची त्या औषधांना हाताळण्याची सामान्य क्षमता कमी केली होती. त्यामुळे त्याच्या यकृतात विषारी घटक गोळा झाले होते.
"ते खरोखरंच खूप वाईट होतं. सुरुवातीला आम्हाला वाटलं की त्याच्या यकृताचं प्रत्यारोपण करण्याची आवश्यकता असू शकते. ते खरोखरंच गुंतागुंतीचं झालं होतं," असं दा ग्राका कॅम्पोस म्हणाल्या. सुदैवानं त्या रुग्ण आपोआप आणि पूर्ण बरा झाला.
पारंपारिक औषधांमध्ये, आर्टिचोकपासून बनवलेल्या पेयासारखे अर्क आणि औषधी वनस्पती वापरले जातात. तसंच त्यांचं काटेकोरपणे नियमन केलं जातं नाही. कधी कधी ते कृत्रिम औषधांइतकेच प्रभावी किंवा परिणामकारक असूनदेखील तसं होत नाही, असं दा ग्राका कॅम्पोस म्हणतात.
हळद आणि शैवाल एकत्र घेतल्यास यकृतावर परिणाम
त्याचप्रमाणे, 'दा ग्राका कॅम्पोस' यांनी एक अभ्यास केला, ज्यात हळद आणि क्लोरेला शैवालापासून बनवलेले पोषकतत्वांचे सप्लिमेंट यांचा रुग्णाच्या कर्करोगावरील औषधांशी परस्परसंवाद झाला आणि त्यामुळे रुग्णाच्या यकृतात अत्यंत विषारीपणा निर्माण झाला.
हळद रक्त पातळ करणारं आणि मधुमेहाच्या औषधांचा परिणामकारकपणा वाढवणारी बाब म्हणूनदेखील ओळखली जाते.
सेंट जॉन्स वॉर्ट या फुलापासून बनवलेला अर्काचा अँट-अँक्झायटी आणि अँट-डिप्रेसन्ट औषधांशी, तसंच गर्भनिरोधक आणि काही केमोथेरेपीच्या औषधांशी परस्पसंवाद होऊन त्याचा परिणाम होऊ शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
"औषधी वनस्पतींमुळे मोठ्या प्रमाणात अशाप्रकारचा परस्परसंवाद होऊ शकतो आणि त्याचे परिणाम होऊ शकतात, हे लोकांनी लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे," असं दा ग्राका कॅम्पोस म्हणाल्या.
औषध आणि अन्नाशी संबंधित, हे पॅटर्न कायमस्वरुपी आणि व्यापक स्वरूपाचे आहेत की कधीतरी एखाद्या रुग्णाच्या बाबतीत आढळतात, हे पाहण्यासाठी अधिक क्लिनिकल चाचण्या करण्याची आवश्यकता आहे.
काहीवेळा विशिष्ट अन्नपदार्थामुळे औषधाचा परिणाम कमी देखील होतो
अन्न आणि औषधांच्या एकमेकांशी संबंध आल्यावर प्रत्येक वेळेस औषधं अधिक विषारी किंवा धोकादायक होत नाहीत. यामुळे काहीवेळा औषधांचा प्रभाव कमीदेखील होऊ शकतो.
वॉरफेरिन (अँटिकोॲगुलंट औषध, ज्याचा क्रॅनबेरीशी संपर्क आल्यावर औषधावर परिणाम होतो) या औषधाचा पालेभाज्यांमध्ये आढळणाऱ्या व्हिटामिन के बरोबर संबंध आल्यास त्याचा वेगळा परिणाम होत असल्याचं दिसून येतं.

फोटो स्रोत, Getty Images
रक्तप्रवाह जेव्हा वॉरफेरिन औषध आणि व्हिटामिन के यांचा एकमेकांशी संपर्क येतो तेव्हा वॉरफेरिनचा प्रभाव कमी होतो. त्याचा अर्थ असा होत नाही की जे रुग्ण वॉरफेरिन घेत आहेत त्यांनी पालेभाज्या खाऊ नयेत.
मात्र त्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या औषधाचा डोस त्यांच्या आहारानुसार असावा आणि त्यांचा आहार सातत्यपूर्ण असला पाहिजे.
"तुम्ही माझ्यापेक्षा जास्त पालेभाज्या खाता का? मग त्या हिरव्या पालेभाज्यांचा परिणाम कमी करण्यासाठी कदाचित डॉक्टर तुमचा वॉरफेरिनचा डोस वाढवतील," असं चॅन म्हणतात.
रुग्ण जर मोनोमाइन ऑक्सिडेस इनहिबिटर (एमएओआय) या नावानं ओळखल्या जाणारी अँटिडिप्रेसन्ट घेत असतील तर त्यांना आहारात सहसा कमी आंबवलेलं अन्न आणि थोडंसं चीज खाण्याचा सल्ला दिला जातो.
कारण त्यात टायरामाइनचं प्रमाण अधिक असतं. या एन्झाइममुळे शरीराची टायरामाइनचं चयापचय करण्याची क्षमता बदलते आणि त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो.
दुग्धजन्य पदार्थांचा 'चीज इफेक्ट'
दूध, दही आणि चीजसारखे दुग्धजन्य पदार्थांमुळे तुमच्या पचनसंस्थेत काही विशिष्ट अँटीबायोटिक्स (सायप्रोफ्लोक्सासिन आणि नॉरफ्लोक्सासिन) ज्याप्रकारे शोषली जातात, त्यावर परिणाम होऊ शकतो. याला संशोधक 'चीज इफेक्ट' असं म्हणतात.
संपूर्ण धान्यासारख्या ज्या अन्नात फायबरचं प्रमाण अधिक असतं, त्यांचादेखील असाच परिणाम होऊ शकतो. औषधं जेव्हा आतड्यांमध्ये असतात तेव्हा दुग्धजन्य पदार्थ आणि फायबरयुक्त अन्नपदार्थांचे रेणू या औषधांना एकप्रकारे 'मिठी' मारतात आणि त्यांना रक्तप्रवाहात प्रवेश करण्यापासून रोखतात, असं चॅन म्हणतात.
"आतड्यांमध्ये दुग्धजन्य पदार्थांशी औषध बांधलं गेल्यामुळे औषध रक्तात जात नाही. परिणामी ते तुमच्या आतड्यात अडकतं," असं चॅन म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
ते पुढे म्हणतात, यावरचा उपाय सोपा आहे. रुग्णांनी अँटिबायोटिक औषध घेण्यापूर्वी किंवा नंतर दोन ते चार तास दुग्धजन्य पदार्थांच सेवन टाळलं पाहिजे.
"तुम्ही दूध आणि चीजचं सेवन करू शकता, फक्त हे पदार्थ आणि औषधं एकाचवेळेस घेऊ नका," असं चॅन म्हणतात.
औषधं आणि अन्नपदार्थांमधील हा संबंध थोडासा भीतीदायक वाटू शकतो, मात्र सर्वकाही फार वाईट आहे असं नाही.
काही संशोधक असे आहेत ज्यांना आशा आहे की औषधं आणि अन्नपदार्थ, पेय आणि औषधी वनस्पती यांच्यातील परस्परसंवाद औषधांची परिणामकारकता उपयुक्त ठरेल अशा पद्धतीनं नियंत्रित करता येईल.
उदाहरणार्थ, काही कर्करोग तज्ज्ञ काही विशिष्ट उपचारांवर अन्नाचा कसा परिणाम होतो, याचा वापर करून कर्करोगावरील उपचार अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
योग्य आहाराद्वारे औषधांची परिणामकारकता वाढवण्यासाठी प्रयत्न
लुईस कॅन्टली, सध्या मॅसेच्युसेट्सच्या बोस्टनमधील हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये पेशी जीवशास्त्रज्ञ आहेत. त्यांना एक असा मार्ग सापडला आहे की जो पेशींच्या वाढीचं नियमन करतो आणि कर्करोगाच्या काही औषधांसाठी लक्ष्य करत असलेला हा मार्ग साखरेचं प्रमाण कमी असलेल्या पदार्थांचा समावेश केल्यास उपचारांना चांगला प्रतिसाद देतो.
"हजारो वर्षांपूर्वी मानवाची उत्क्रांती मांस आणि कच्च्या भाज्या खाण्यासाठी झाली. या अन्नाच्या सेवनानंतर शरीरातील ग्लुकोजचं प्रमाण वेगानं वाढत नाही," असं कॅन्टली म्हणतात.
हजारो वर्षांपूर्वी कर्करोगानं क्वचितच मृत्यू होत असत. गेल्या पाच दशकांच्या कालावधीत कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत झालेल्या वाढीचा बहुधा कार्बोहायड्रेट्स प्रमाण अधिक असलेल्या अन्नपदार्थांच्या आपल्या आहारातील नाट्यमय 'वाढीशी' आहे, असं ते म्हणतात.
कॅन्टली यांनी 2018 मध्ये प्रयोग केले होते. ज्यात उंदरांना किटोजेनिक आहार देण्यात आला होता. म्हणजेच असा आहार ज्यात कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी होतं, मांस आणि भाजीपाल्याचं प्रमाण अधिक होतं.

फोटो स्रोत, Getty Images
या अभ्यासातून आशादायक प्राथमिक निष्कर्ष समोर आले. त्यात या प्रकारचा आहार घेणाऱ्या उंदरांवर अँटी-कॅन्सर औषधं अधिक प्रभावी ठरत होती.
कॅन्टली यांचं फेथ थेरेप्युटिक्स नावाचं स्टार्टअप आहे. ते म्हणतात की हे स्टार्टअप म्हणजे "चयापचयाचा वापर करून कर्करोगाच्या विज्ञानाचा पुनर्विचार" करण्याचा प्रयत्न आहे. या स्टार्टअपद्वारे त्यांची टीम काही मानवी रुग्णांवर या परिणामांची चाचणी करत आहेत.
कॅन्टली यांच्या या आहाराशी संबंधित काही चाचण्या न्यूयॉर्कच्या मेमोरियल स्लोन केटेरिंग कॅन्सर सेंटरमध्ये सुरू आहेत. एंडोमेट्रियल कॅन्सर असलेल्या महिलांवर त्या होत आहेत.
मात्र यातील मोठं आव्हान म्हणजे अन्नाचा औषधांवर होणारा परिणाम खूप जास्त आहे. त्यामुळेच पोषण संशोधक मिलेसेविक यांनी संगणकीय जीवशास्त्रज्ञांच्या टीमला सोबत घेतलं आहे.
ते अन्नाचा औषधांवर होणाऱ्या परिणामांबद्दलची वैज्ञानिक साहित्यात उपलब्ध असलेली सर्व माहिती एका सुव्यवस्थित डेटाबेसमध्ये एकत्र करत आहेत. त्यांना आशा आहे की यामुळे अन्न आणि औषधांच्या परस्परसंबंधाचा अधिक चांगल्या प्रकारे मागोवा घेता येईल.
"आम्हाला वाटलं होतं की हे सोपं झालं असतं. मात्र ते इतकं सोपं नव्हतं. आम्हाला सुरुवातीपासूनच त्याची सुरूवात करावी लागली," असं एनरिक कॅरिलो डी सांता पाऊ म्हणतात. ते स्पेनच्या माद्रिदमधील आयएमडीईए फूड इन्स्टिट्यूटमध्ये कम्प्युटेशनल बायोलॉजिस्ट म्हणजे संगणकीय जीवशास्त्रज्ञ आहेत. ते या प्रकल्पावर काम करत आहेत.
याबाबतीत फार थोडा डेटाबेस उपलब्ध होता आणि त्यातील एकही सुसंगतपणे जुळत नव्हता. त्यांनी लाखो अन्न आणि औषध यांच्या परस्परसंवादातून एका नवीन व्यासपीठावर डेटा एकत्र केला. हा डेटा डॉक्टरांसाठी उपलब्ध असेल.
हे एक गुंतागुंतीचं चित्र आहे. ते अजूनही उलगडतं आहे. मात्र यामुळे भविष्यात डॉक्टर रुग्णांना असा आहार सुचवू शकतील जो ते घेत असलेल्या औषधांसाठी पूरक असेल. दरम्यानच्या काळात व्हायग्रा आणि डाळिंबाचा रस घेणं बंद करणंच बहुधा चांगलं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











