चक्रीवादळापाठोपाठ भूकंपाने फिलीपिन्स हादरले; मोठ्या प्रमाणात जीवितहानी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

चक्रीवादळापाठोपाठ भूकंपाने फिलीपिन्स हादरले

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, विरमा सिमोनेट, जोनाथन हेड, जारोस्लाव लुकिव्ह
    • Role, बीबीसी न्यूज

फिलीपिन्सला आधी चक्रीवादळांचा तडाखा बसल्यानंतर आता भूकंपानेही मोठं संकट ओढावलं आहे. मंगळवारी (30 सप्टेंबर) रात्री आलेल्या 6.9 तीव्रतेच्या भूकंपात किमान 69 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत.

सेबू प्रांताला सर्वाधिक फटका बसला असून रस्ते, पूल आणि वीजपुरवठा खंडित झाला आहे. प्रशासनाने आपत्कालीन स्थिती जाहीर करून बचावकार्य सुरू केलं आहे. सततच्या धक्क्यांमुळे हजारो लोकांनी आपली संपूर्ण रात्र रस्त्यावरच घालवली.

सेबूतील एका रहिवाशाने बीबीसीला सांगितलं की, तोही रात्रभर रस्त्यावरच होता. संपूर्ण रात्र आमच्या भागातील वीज आणि पाणी पुरवठा बंद होता. आजूबाजूला केवळ लहान मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता. अनेक लोकांना तर मोठा मानसिक धक्का बसल्याचं त्यानं सांगितलं.

काही दिवसांपूर्वी फिलीपिन्सला मोठ्या चक्रीवादळाचा सामना करावा लागला होता. सलगच्या चक्रीवादळामुळे 12 पेक्षा जास्त लोकांचा त्यात मृत्यू झाला. हे चक्रीवादळ शमून आठवडाही होत नाही, तोवर लगेचच भूकंपाच्या धक्क्याने देश हादरला.

बचावकार्याला अडथळे

या भूकंपाच्या धक्क्यातील बहुतांश जखमी आणि मृत लोक हे बोगो शहरातील आहेत. हे शहर फिलीपिन्सच्या मध्यभागी असलेल्या व्हिसायस बेटांमधील मोठ्या बेटांपैकी एका बेटावर असलेलं एक छोटंसं शहर आहे. भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून हे शहर जवळ आहे.

बोगो शहरातील छायाचित्रं आता समोर येत आहेत. यामध्ये रस्त्यावर मृतदेह ठेवण्यात आलेल्या बॅग्ज आणि तंबूतील रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले शेकडो लोक दिसत आहेत. अधिकार्‍यांनी भूकंपामुळे 'खूप नुकसान' झाल्याचं सांगितलं आहे.

चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या फिलीपिन्सला भूकंपाचा तीव्र धक्का

फोटो स्रोत, Anadolu via Getty Images

स्थानिक प्रशासनाने जखमींना मदत करण्यासाठी वैद्यकीय अनुभव असलेल्या स्वयंसेवकांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

उद्ध्वस्त झालेले रस्ते, पडलेल्या पुलांमुळे आपत्कालीन सेवांना मोठा अडथळा येत आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठा बंद असल्यामुळे प्रभावित क्षेत्रातील लोकांशी संपर्क साधनंही कठीण झालं आहे.

मंगळवारी बोगोमध्ये झालेल्या भूकंपात ज्या भागातील सात लोकांचा मृत्यू झाला, तो परिसर 12 वर्षांपूर्वी 'हायन' या चक्रीवादळातील पीडितांसाठी नव्याने उभारण्यात आला होता. त्यावेळी या वादळात 6 हजारहून अधिक जणांचा बळी गेला होता.

सॅन रेमिगिओ महापालिकेत भूकंप झाला तेव्हा एक बास्केटबॉलचा सामना सुरू होता, असं आपत्कालीन अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं. यावेळी उपस्थित असलेल्या सुमारे 20 लोकांना रुग्णालयात पाठवण्यात आलं. त्यातील एकाचा नंतर मृत्यू झाला.

नागरिकांना जुन्या चर्चपासून दूर राहण्याचा सल्ला

शोध आणि बचाव कार्याला प्राधान्य देत असल्याचे पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. वीज पुन्हा सुरू करण्यासाठी धावपळ सुरू आहे. भूकंपाचा धक्का बसलेल्या लोकांपर्यंत मदत पोहोचवली जात आहे.

बुधवारी सायंकाळी बोगोला आणखी एक धक्का बसला. त्याची तीव्रता 4.7 इतकी होती. हे धक्के बोगो शहरासह शेजारील लेयटे बेटांनाही जाणवले. या धक्क्यात कोणतीही हानी झाल्याची माहिती नाही.

भूकंपानंतर रस्त्यांना मधोमध पडलेल्या भेगा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भूकंपानंतर रस्त्यांना मधोमध पडलेल्या भेगा

सेबूचे आर्चबिशप यांनी लोकांना चर्चपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. कारण इमारतीच्या बांधकामाची तपासणी प्रलंबित आहे. त्यांचा हा सल्ला खूप महत्त्वाचा आहे, कारण सेबू हे 1500च्या काळात स्पेनने वसाहत केलेल्या पहिल्या फिलीपिन्समधील बेटांपैकी एक आहे आणि येथे अनेक जुने चर्च आहेत.

पूर्वीच्या फुटेजमध्ये एका जुन्या कॅथोलिक चर्चचा टॉवर हलताना आणि नंतर अंशतः कोसळताना दिसला होता.

नैसर्गिक आपत्तीसाठी फिलीपिन्स संवेदनशील

फिलीपिन्समध्ये हजारो बेटे आहेत. राजधानी मनिलामधील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभाग चक्रीवादळ आणि भूकंपांसाठी अधिकृत मृत्यू व जखमींची संख्या जाहीर करण्याचं काम करतं.

परंतु, मृतांच्या संख्येची तपासणी केली जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा नंतर वाढूही शकतो.

भूकंपात जखमी झालेल्या लोकांवर तसेच इतर रुग्णांवर रुग्णालयाच्या इमारतींबाहेर उपचार सुरू आहेत.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, भूकंपात जखमी झालेल्या लोकांवर तसेच इतर रुग्णांवर रुग्णालयाच्या इमारतींबाहेर उपचार सुरू आहेत.

फिलीपिन्स नैसर्गिक आपत्तींसाठी खूप संवेदनशील आहे. हे भौगोलिकदृष्ट्या अस्थिर 'रिंग ऑफ फायर' वर स्थित आहे. येथे भूकंप आणि ज्वालामुखी फारच जास्त होतात.

पॅसिफिक प्रदेशातील पृथ्वीच्या वरच्या थरांना वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये विभागली आहे, ज्याला टेक्टोनिक प्लेट्स किंवा भूपट्ट म्हणतात. हे सर्व एकमेकांच्या तुलनेत वेगवेगळ्या दिशेने हलत असतात.

आग्नेय आशियातील हा देश दरवर्षी पॅसिफिक महासागरातून येणाऱ्या वादळांना सामोरे जातो.

गेल्या महिन्याच्या सुरुवातीला बुआलोई आणि रागासा या चक्रीवादळांनी फिलीपिन्सला धडक दिल्याने 12 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे अनेक लोकं अद्याप बेपत्ता आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.