FIFA वर्ल्डकपसाठी इमारती बांधताना त्यांचा मृत्यू झाला, कतारने कुटुंबियांकडे पाठ फिरवली

- Author, रजनी वैद्यनाथन
- Role, बीबीसी न्यूज नेपाळ
या रविवारपासून सुरू होणाऱ्या फुटबॉलच्या विश्वचषकासाठी कतारने पायाभूत सुविधांमध्ये परिवर्तन घडवून आणले आहे.
बांधकाम प्रकल्पांमध्ये दक्षिण आशियातील तब्बल 50 लाख लोक काम करत होते. यात नेपाळमधील मुजरांचाही समावेश आहे.
त्यांच्या कुटुंबियांनी बीबीसीला सांगितले की, सुरक्षेसंदर्भातील निष्काळजीपणामुळे त्यांच्या आप्तेष्टांचा मृत्यू झाला.
10 नोव्हेंबर रोजी पहाटे कतार एअरलाइन्सचे विमान क्यूआर 644 नेपाळच्या काठमांडू विमानतळावर उतरलं या विमानातून उतरवलेल्या मालामध्ये पांढऱ्या रंगाचा लाकडी खोका होता. या खोक्याच्या बाहेर उमेश कुमार यादव, 32 वर्षीय पुरुष, नेपाळी असंं लिहिलं होतं.
काठमांडूच्या आग्नेयेला 250 किमी अंतरावर त्याचे वडील आपल्या विटांच्या घराबाहेर म्हैस बांधत आहेत.
जगातील एका अत्यंत गरीब देशातील अत्यंत गरीब गावात ते राहतात. तिथे रोजगारसंधी अगदीच तुरळक आहेत.
जेव्हा त्यांच्या मुलाला म्हणजेच उमेशला कतार या जगातील एका सर्वांत श्रीमंत देशात काम करण्याची संधी मिळाली तेव्हा लक्ष्मण यादव यांनी त्यांची म्हैस 1,500 डॉलरला विकून एजंटला ती रक्कम देऊ केली. उमेशला नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन त्या एजंटने दिलं होतं.
उमेशचे आई-वडील

आपल्या मुलाला कतारमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी उमेशच्या आई-वडिलांनी गोधन विकलं.
केवळ नेपाळच नव्हे तर बांगलादेश, भारत या देशांमधील अत्यंत गरीब गावांमध्ये हे एजंट जाणं नेहमीचेच आहे.
तेथील तरुणांना ते परदेशातील भरपूर पगार देणाऱ्या नोकऱ्या देऊ करतात. त्या बदल्यात त्यांचा व्हिसा काढण्यासाठी त्यांच्याकडून भरपूर रक्कम घेतात.
हे कामगार कंत्राटी असतात, त्यांचे एक कंत्राट संपलं की दुसरे कंत्राट चालू केलं जातं. त्यामुळे आपले आप्तेष्ट नक्की कुठे काम करत आहेत आणि कुणासाठी करत आहेत, हे कुटुंबांना कळणं कठीण होऊन जातं.
धनुषा जिल्ह्यापासून 2 तासांच्या अंतरावर कृष्णा मंडलचं घर आहे. त्याचे वडील सितेश चार वर्षांपूर्वीच कतारमधील कामासाठी गेले होते.
सितेश मंडल

कतारला चार वर्षांपूर्वी गेलेले सितेश त्यांच्या कामाच्या ठिकाणाचे सेल्फी त्यांच्या मुलांना पाठवत असत.
काही वेळा सितेश काम करतानाचे फोटो त्यांच्या मुलाला पाठवत असत. “त्यांनी मला सांगितलं होतं की, पाण्याच्या टाकीवर काम करतात, पण ते नक्की काय काम करतात याविषयी विस्तृतपणे सांगितलं नाही.”, असं कृष्णानं सांगितलं.
12 ऑक्टोबर रोजी सितेश परतणं अपेक्षित होतं. पण काही दिवसांपूर्वी कृष्णाला फोन आला की, त्याच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला.
सितेशच्या एका परिचिताने सांगितले की, सितेश सांडपाण्याच्या वाहिन्यांवर काम करत होता, ज्या दोहा या राजधानीच्या शहरात जमिनीपासून सात फुट खोल होत्या.
त्यावेळी मातीचा ढिगारा त्याच्या अंगावर पडला. सितेशच्या शरीरावर अवजड वस्तूच्या आघातामुळे झालेल्या जखमा होत्या, असं त्याच्या मृत्यूच्या प्रमाणपत्रात नमूद करण्यात आलं होतं.
कृष्णा म्हणतो की, त्याच्या वडिलांच्या एम्प्लॉयरने साधा एकही फोन केला नाही किंवा नुकसानभरपाईची काही ऑफरही दिली नाही.
सितेश काम करत असलेल्या कंपनीशी बीबीसीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
गोलबाजारमध्ये लक्ष्मणना त्यांच्या मुलाच्या कतारमधील आयुष्याबद्दल फार माहिती नव्हती. लक्ष्मणकडे स्मार्टफोन नाही. आणि त्यांचा मुलगा रोज टिकटॉकवर टाकत असलेले अपडेट्स त्यांना मिळत नव्हते.
त्याच्या व्हीडिओंमध्ये कतारच्या चकाकणाऱ्या क्षितिजाच्या पार्श्वभूमीवर नृत्य करताना तो दिसतो किंवा त्याच्या सामूहिक खोलीमध्ये इतर कामगारांसह त्याचे व्हीडियो आहेत.
उमेशने बांधकामाच्या साइटवरील त्याच्या क्लिप्सही पोस्ट केल्या आहेत. त्यात तो शिडीवर उभा राहून हसताना दिसतो किंवा अगदी टिकटॉकच्या फॅशनप्रमाणे काँक्रिटचे जड ब्लॉक एक चॅलेंज म्हणून उचलताना दिसतो.
26 ऑक्टोबर रोजी उमेशने त्याचा एका गगनचुंबी इमारतीच्या समोर रात्री नाचतानाचा व्हीडिओ पोस्ट केला होता. त्या इमारतीवर आगामी विश्वचषकाची जाहिरात झळकत होती.
ती त्याची शेवटची पोस्ट होती.
उमेशच्या चुलत भावाचं नावही लक्ष्मण आहे. तोही कतारमध्येच काम करतो. त्याला 27 ऑक्टोबर रोजी फोन आला की, लक्ष्मणचा मृत्यू झाला आहे. हे कसे घडले हे जाणून घेण्यासाठी तो बांधकामाच्या साइटवर गेला.
“ते म्हणाले की, उमेश परांची लिफ्ट वर नेत होता, लिफ्टचा कशाला तरी स्पर्श झाला आणि ती तुटली आणि उमेश खाली पडला”, असं त्याने सांगितलं.
अपघात झालेलं ठिकाण

फोटोनमध्ये लटकणारी परांची दिसत आहे.
लक्ष्मण म्हणतो की, त्यांनी कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना केल्या पाहिजेत.
“त्यांनी आधी सर्व तपासणी करून मगच कामगारांना तिथे काम करण्यास परवानगी दिली पाहिजे.”
उमेश काम करत असलेल्या कंपनीशी बीबीसीने संपर्क साधला. पण सुरक्षेत निष्काळजीपणा झाल्याने मृत्यू झाल हे मान्य करण्यास ते तयार नाहीत.
निष्काळजीपणा आणि अनागोंदीपणामुळे हा अपघात झाला, असं त्यांच्या स्टेटमेंटमध्ये नमूद केलं आहे.
“मृत झालेला कामगार साइटवर निष्काळजीपणे वागत होता आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांप्रमाणे त्यानेही सुरक्षेच्या नियमांचे पालन करावं, असं त्याला अनेकदा सांगण्यात आलं. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही," असं कंपनीचं म्हणणं आहे
कतारमध्ये विश्वचषकाच्या संदर्भात बांधकाम सुरू झाल्यानंतर तेथील कठीण परिस्थिती आणि स्थलांतरित मजुरांच्या मृत्यूचे अनेक दाखले समोर आलेत.
“आमच्या प्रकल्पांच्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांचं आरोग्य, सुरक्षितता आणि प्रतिष्ठेची खातरजमा करण्याचा निर्धार आहे”, असे कतार सरकारचे म्हणणे आहे.
आरोग्य आणि सुरक्षा नियमांमध्ये सुधारण केल्याचं त्यांच्यातर्फे बीबीसीला सांगण्यात आलं.
चिता

नेपाळमध्ये पार्थिव आणल्यानंतर उमेश कुमार यादववर अंत्यसंस्कार केले गेले.
पण बिझनेस अँड ह्युमन राइट्स रिसोर्स सेंटरने बीबीसीला दिलेल्या नव्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षात कामगारंच्या हक्कांच्या उल्लंघनाची 140 प्रकरणं घडली आहेत.
च्यापैकी सुमारे निम्मी प्रकरणे आरोग्य आणि सुरक्षेशी संबंधित समस्यांविषयी आहेत. त्यांच्या मते खरा आकडा त्याहूनही अधिक असेल. गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत बीबीसीने आग्नेय आशियातील 12 हून अधिक कामगारांच्या मृत्यूची प्रमाणपत्रं पाहिली आहेत.
बहुतेकांमध्ये मृत्यूचे कारण हे आघात झाल्यामुळे झालेल्या जखमा हेच होेतं कुटुंबिय याचा जाब विचारत आहेत आणि त्यांना उत्तर हवं आहे.
उमेशचे पार्थिव विमानतळावरून गोलबाजारला येईपर्यंत त्याचे वडील लक्ष्मण आणि इतर गावकऱ्यांनी अंत्यसंस्कारांची तयारी केली.
सर्वांत मोठ्या मुलाने चितेला अग्नि द्यायचा असतो, अशी नेपाळमध्ये परंपरा आहे.
लक्ष्मण यांनी उमेशच्या 13 महिन्यांच्या मुलाला म्हणजेच सुशांतला धरलं, त्या बाळाच्या हाती काठी दिली, जेणेकरून तो चितेला अग्नि देऊ शकेल. “तो आम्हाला मदत करायचा. आम्हाला कर्ज फेडायचं आहे आणि त्याच्या लहान मुलांना सांभाळायचं आहे”, उमेशची आई सुमित्रा पाणावलेल्या डोळ्यांनी सांगत होती. “तो माझा हिरो होता.”
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








