अॅस्बेस्टस : एकेकाळी 'चमत्कारिक' समजल्या जाणाऱ्या जीवघेण्या खनिजाचा असा आहे इतिहास

फोटो स्रोत, Getty Images
- Author, झारिया गॉर्वेट
- Role, बीबीसी
लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये नक्षीदार खांब आणि मोठ्या खिडक्यांमध्ये काही लाकडी डिस्प्ले कॅबिनेट आहेत. त्यात एका लहान पारदर्शक प्लास्टिकचा बॉक्स ठेवलेला आहे. त्यावर 'डू नॉट ओपन' म्हणजे 'याला उघडू नका' असा इशारा लिहिण्यात आलेला आहे.
या बॉक्समध्ये काहीतरी ठेवलेलं असून ते ग्रे रंगाच्या चेंडूसारखं दिसतं. कपड्याचे धागे निघतात तशा प्रकारचं काहीतरी त्याच्या वरच्या भागावर असल्याचं दिसून येत होतं.
डिस्प्लेमध्ये चुकून काहीतरी ठेवण्यात आलं असावं असं वाटत होतं. पण ही वस्तू बॉक्समध्ये अत्यंत सुरक्षितपणे ठेवून त्याचा याठिकाणी येणाऱ्यांना धोका होणार नाही, अशाप्रकारे सील करण्यात आली होती. कारण ते काहीतरी अत्यंत धोकादायक आहे.
ती 'अॅस्बेस्टस'पासून तयार केलेली एक पर्स होती.
विशेष म्हणजे विचित्र अशी वाटणारी ही पर्स अमेरिकेचे संस्थापक बेंजामिन फ्रँकलिन यांची आहे.
अॅस्बेस्टसचा उच्चार करतानाही आज अगदी काळजीपूर्वक आणि पुटपुटल्यासारखा केला जातो. जणू एखाद्या मोठ्या दुर्घटनेची किंवा कारस्थानाशी त्याचा संबंध असावा.
पण काही शतकांपूर्वी त्याकडं अशाप्रकारचा धोका म्हणून पाहिलं जात नव्हतं. उलट त्याला अत्यंत आकर्षक किंवा खूप चांगले गुण असलेलं समजलं जात होतं.
अॅस्बेस्टसला आधीच्या काळात चमत्कारिक खनिज म्हणून ओळखलं जात होतं.
एकेकाळी तर राजांच्या कपड्यांमध्ये विणण्यासाठी त्याचा वापर केला जात होता. तसंच पार्ट्यांमध्येही ते वापरलं जात होतं.
18 व्या शतकातील एक विचारवंत रात्रीच्यावेळी यापासून तयार करण्यात आलेली टोपी परिधान करून झोपायचे.
मौल्यवान शोध
1725 मध्ये फ्रँकलिन हे आजच्या काळात समजले जातात तेवढे मोठे अभ्यासक किंवा राजकारणी नव्हते. त्यावेळी ते 19 वर्षांचे आर्थिक तंगीचा सामना करणारे एक तरुण होते.
त्यांना लंडनमध्ये ते काम करत असलेल्या मालकानं कठिण परिस्थितीत एकटं सोडलं होतं. पण सुदैवानं त्या तरुमाला एका प्रिंटीग शॉपमध्ये चांगली नोकरी मिळाली.
पण तरीही लवकर अधिक पैसे जमा करण्यासाठी त्यांना काहीतरी करणं गरजेचं होतं.
एक दिवस फ्रँकलिन यांना पर्यावरणवादी आणि विविध आकर्षक गोष्टी गोळा करण्याची आवड असलेले हॅन्स स्लोएन यांना पत्र लिहिण्याची कल्पना सुचली.
त्या पत्रात त्यांनी अटलांटिकहून रस असेल अशा काही गोष्टी आणल्याचं लिहिलं होतं. या गोष्टींमध्येच अॅस्बेस्टसपासून तयार करण्यात आलेल्या या प्रसिद्ध पर्सचा समावेश होता. या वस्तूवर आगीचा काहीही परिणाम होत नव्हता.
उलट ती जर घाण झाली आणि आगीच्या ज्वाळांमध्ये पकडली तर ती अगदी स्वच्छ होत होती.
स्लोएन यांनी लगेचच फ्रँकलिन यांना त्यांच्या घरी बोलावून घेतलं आणि त्या हानिकारक अशा वस्तूसाठी चांगली रक्कमही दिली. पुढे हीच वस्तू नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये जपून ठेवण्यात आली.

फोटो स्रोत, Getty Images
भौतिक चमत्कार
खरं म्हणजे अॅस्बेस्टसवर आगीचा काहीही परिणाम होत नसल्याचा शोध काही हजारो वर्षांपूर्वीच लागलेला होता. तसंच त्याचा वापर विविध परंपरा आणि मनोरंजनाच्या साधनांमध्ये केल्याचाही मोठा इतिहास आहे.
पहिल्या शतकामध्ये रोमन लेखक प्लिनी द एल्डर यांनी त्यांच्या वाचकांना एका नव्या प्रकारच्या लिननची ओळख करून दिली. त्याचा वापर विविध प्रकारच्या विचित्र वस्तू तयार करण्यासाठी केला जात होता. त्यांनी स्वतःदेखिल याची वैशिष्ट्ये तपासली होती. उदाहरणादाखल, यापासून तयार केलेले रुमाल धगधगत्या आगीत टाकल्यानंतर आधीच्या तुलनेत अधिक स्वच्छ आणि ताजे दिसू लागत होते.

फोटो स्रोत, Getty Images
याच घटकाचा वापर राजेशाही कुटुंबांच्या अत्यंविधीदरम्यान मृतदेहाभोवती केला जात होता. ते जळत नसल्यामुळं या सदस्यांची राख किंवा अस्थी इतरांपासून वेगळं ठेवणं शक्य होत होतं.
हा घटक म्हणजे अॅस्बेस्टस हाच होता. तोपर्यंत याच्या वैशिष्ट्याच्या कथा संपूर्ण जगात पसरल्या होत्या. इतर काही सुत्रांच्या मते याचा वापर टॉवेल, बूट आणि जाळ्या बनवण्यासाठीही केला जात होता.
प्राचीन ग्रीसच्या एका कथेत देवी अथेनासाठी तयार करण्यात आलेल्या एका सोनेरी दिव्याचा उल्लेख करण्यात आला होता. तो दिवा वर्षभर तेवत असायचा. कारण त्यात 'कार्पथियन फ्लॅक्स' पासून तयार केलेली वात होती. हे अॅस्बेस्टसचच दुसरं नाव होतं.
प्लिनी यांच्या मते, हा विशेष घटक किंवा खनिज भारतीय वाळवंटांमध्ये तयार झालेलं असल्यामुळं त्यावर आगीचा परिणाम होत नसावा. कारण या भागात आग ओकणारा सूर्य आणि कधीही पाऊस होत नसल्याची स्थिती यामुळं प्रचंड अशी उष्णता असते असं त्यांचं मत होतं.
तर नंतरच्या काळात हे सॅलामेंडरच्या कातडीपासून तयार झालेलं असावं असंही मत मांडण्यात आलं. कारण त्यालाही मध्ययुगाच्या काळात प्रचंड आगरोधक म्हणून ओळखलं जात होतं. या दोन्हीचा व्यापक स्तरावर प्रचार झालेला होता.
अॅसबेस्टस हे नैसर्गिक खनिज असून ते इटलीच्या आल्पस पर्वतरांगांपासून ते ऑस्ट्रेलियातील दुर्गम भागात असलेल्या अशा जगभरातील डोंगररांगांमध्ये आढळतं.
ते कुठं सापडतं आणि कशासाठी वापर केला जातो यानुसार विविध प्रकारच्या रुपात ते आढळू शकतं. मायक्रोस्कोपमधून पाहिलं असता हा एक लांब शेपटीसारखा किंवा सुईच्या आकाराचा दोऱ्यासारखा पदार्थ आढळतो. पण नाजूक दिसत असले तरीही, ते सहजपणे नष्ट करणं शक्य नसतं.
त्यात आगरोधक आणि रासायनिक घटक असतात. विशेष म्हणजे बॅक्टेरियाही त्याला नष्ट करू शकत नाहीत

फोटो स्रोत, Getty Images
.
आगरोधक असण्याबरोबरच अॅसबेस्टसमध्ये असलेल्या लवचिकपणामुळं ईसवीसनपूर्व 2500 मध्येच त्याचा वापर घरगुती वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला होता. 1930 मध्ये पुरातत्व अभ्यासकांना जुओजार्वीच्या किनाऱ्यावर पुरलेली काही प्राचीन भांडी मिळाली होती.
हा किनारा फिनलँडमधील सर्वात स्वच्छ किनाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जात होता. नंतर असं लक्षात आलं की, ही भांडी मजबूत बनवण्यासाठी त्यात अॅसबेस्टसचा वापर करण्यात आला होता.
अॅस्बेस्टॉसची लोकप्रियता तर कमी झालीच नाही, पण उलट मध्ययुगीन काळात या हानिकारक खनिजाचा व्यवसाय प्रचंड प्रमाणात वाढत गेला. ईसवीसन 800 मध्ये पवित्र रोमन साम्राज्याचे पहिले सम्राट बनलेले शार्लेमेन यांना मेजवानी देण्याची खूप आवड होती.
त्यांच्या राजकीय यशाशी त्याचा संबंधही जोडला जायचा. काही जुन्या जाणकारांच्या मते, अशा सोहळ्यांसाठी त्यांच्याकडं पांढऱ्या रंगाचा एक खास टेबल क्लॉथ होता. तो अॅसबेस्टसपासून विणलेला होता. मेजवानीदरम्यान अनेकदा ते हा कपडा आगीमध्ये फेकून पार्टी ट्रिकसारखा त्याचा वापर करायचे.
युद्धामध्येही अॅसबेस्टसचा वापर केला जात होता. ख्रिश्चन धर्म युद्धांमध्ये एका विशिष्ट प्रकारच्या शस्त्राचा किंवा मशीनचा वापर केला जात होता. गुलेर सारख्या या उपकरणाद्वारे शत्रूवर जळत्या डांबराचा हल्ला केला जात होता. त्याच्या पिशव्यांना अॅसबेस्ट गुंडाळलेलं असायचं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यामुळं शत्रूवर हल्ला होईपर्यंत या बॅग जळत नसायच्या. सैनिकांच्या कपड्यांमध्येही अॅसबेस्टसचा वापर केला जात होता. त्याच्या वैशिष्ट्यांमुळं सैनिकांच्या शरिरात उब राहण्यास मदत मिळत होती.
पुढं 12 व्या शतकामध्ये अॅसबेस्टसचा आणखी एक वापर झाल्याचं समोर आलं. 2014 मध्ये शास्त्रज्ञांना सायप्रसमध्ये बायझँटाइन काळातील एका भिंतीवरील चित्रांमध्ये याचा वापर केल्याचे संकेत मिळाले.
इतिहासामध्ये बहुतांश काळ अॅस्बेस्टसला अत्यंत उपयोगी वस्तूच समजण्यात आलं. उलट ते अत्यंत मौल्यवान समजलं जात होतं. ते महागही होतं. प्लिनी यांच्या मते, त्यांच्या काळात तरी ते मोत्यांपेक्षाही महाग होतं. पण 19 व्या शतकाच्या अखेरीपर्यंत कॅनडा आणि अमेरिकेत याचा मोठा सापडला. परिणामी त्याचा प्रचंड वापर केला जाऊ लागला.
सुरुवातीला ते ऊर्जा प्रकल्पांमध्ये आणि वाफेच्या इंजीनमध्ये वापरलं जाऊ लागलं. पण त्यानंतर लवकरच त्यानं लोकांच्या घरांमध्येही प्रवेश मिळवला.
ज्या वैशिष्टामुळं लोक याकडं आकर्षित झाले होते त्यामुळंच फायर प्रुफिंग, थर्मल इन्सुलेशन आणि आगीपासून बचावासाठी त्याचा वापर सुरू झाला होता. 20 व्या शतकाच्या अखेरीपर्यंत याचा एवढा जास्त वापर सुरू झाला की, पाण्याच्या नळातही ते वापरलं जाऊ लागलं.
विषारी असल्याचे संकेत
अगदी प्राचीन काळातही अॅसबेस्टस विषारी असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानंतर जसजशी शतकं पुढं जात होती, तसा हा धोका आणखी स्पष्ट होत गेला.
1988 मध्ये एका इंग्लिश डॉक्टरनं एका मृत्यूशी या घटकाचा संबंध असल्याची नोंद केली. एका 33 वर्षीय गिरणी कामगाराचा फुफ्फुसात फायब्रोसिस झाल्यानं मृत्यू झाला होता. अॅसबेस्टसचा संबंध जोडण्यात आलेला हा पहिला मृत्यू होता.
नंतर 1999 मध्ये युकेमध्ये अॅसबेस्टसवर बंदी घालण्यात आली. पण त्याआधी वापर करण्यात आलेलं मोठ्या प्रमाणातील अॅसबेस्टस होतं तिथंच कायम राहिलं. यापासून तयार करण्यात आलेल्या अनेक इमारतींमध्ये अजूनही ते तसंच आहे.

फोटो स्रोत, Getty Images
जसजशा इमारती कमकुवत होत जातील, तसं लोकांच्या आरोग्यासाठी ते घातक होत जाईल. त्यात जगभरात अनेक ठिकाणी अजूनही त्याचा वापर केला जातो. अमेरिका जगाच्या इतर भागांतून अॅस्बेस्टस आयात करतं.
तर पर्यावरण संरक्षणासाठी काम करणारी संस्था (EPA) याचा वापर थांबवण्यासाठीच्या उपाययोजनांवर काम करत आहे.
फ्रँकलिन यांची पर्स आजही आपल्याला आठवण करून देते की, अॅस्बेस्टसनं अजूनही आपला पिच्छा सोडलेला नाही. अगदी आपल्याला अपेक्षितही नसलेल्या ठिकाणीही ते आपल्याला सापडू शकतं.











