You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जंक फूड, इन्स्टंट फूडमुळं भारतीयांना सुटलेल्या पोटाचा वाढता धोका? चरबी कमी कशी करावी?
- Author, सौतिक बिस्वास
बदलती जीवनशैली, अनहेल्दी आहार आणि कमी शारीरिक हालचालीमुळे 'इंडियन पॉट बेली' ही एक सामान्य गोष्ट बनली आहे. याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.
सुटलेलं पोट म्हणजे एके काळी भारतीय समाजात समृद्धीचं चिन्ह मानलं जात असत, आता ते आरोग्याच्या गंभीर समस्येचं संकेत बनले आहे.
इंडियन पॉट बेली (सुटलेलं पोट) जे एकेकाळी समृद्धी, ऐशोरामचं प्रतीक मानलं जायचं. इंडियन पॉट बेली हा विनोद, व्यंगचित्रं आणि सामाजिक भाष्य करण्याचा विषय होता.
सुटलेलं पोट म्हणजे समृद्धीचं, प्रतिष्ठतेचं प्रतिक मानलं जाई.
साहित्यामध्ये या सुटलेल्या पोटाचं मजेशीर वर्णन केलं जातं. सुटलेलं पोट म्हणजे आराम किंवा आत्मतुष्टीचं प्रतिक आहे; तर चित्रपटांमध्ये पोट सुटलेला व्यक्ती दाखवला असेल, तर तो आळशी अधिकारी, खादाड माणूस किंवा भ्रष्ट पोलिसांची ती ओळख बनली होती.
व्यंगचित्रांमध्ये राजकारण्यांची खिल्ली उडवण्यासाठी पोटाचा अतिशयोक्त पद्धतीने उपयोग केला गेला. ग्रामीण भागात एकेकाळी पोट हे प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जात होतं. पोट सुटलेला माणूस पाहिला तर "हा माणूस भरपेट खातो" असं त्याचं वर्णन केलं जात.
एकेकाळी माणसाला पोट असणं चांगलं म्हणून आनंद साजरा केला जात. मात्र, आता त्याच पोटामुळं सर्वांची चिंता वाढली आहे.
भारतातील लठ्ठपणाचं संकट झपाट्यानं वाढत आहे. निरुपद्रवी वाटणाऱ्या या 'पॉट बेली'चं रूप खरंतर आपल्या अपेक्षेपेक्षा खूप अधिक धोकादायक ठरू शकतं.
2021 मध्ये भारतात 18 कोटी प्रौढ लठ्ठ किंवा ओव्हर वेट होते आणि या संख्येनुसार भारत चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर होता.
लॅन्सेटच्या नव्या अभ्यासानुसार 2050 पर्यंत भारतात लठ्ठ किंवा जास्त वजनाच्या प्रौढांची संख्या 45 कोटींवर जाऊ शकते. जी त्या वेळच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास एक तृतीयांश असेल, असा इशारा देण्यात आला आहे.
जागतिक स्तरावर अर्ध्यापेक्षा जास्त प्रौढ आणि एक तृतीयांश मुले व किशोरवयीन लवकरच लठ्ठपणाच्या समस्येला सामोरे जातील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भारतातील या समस्येच्या केंद्रस्थानी पोटाचा वाढलेला घेर (पॉट बेली) किंवा वैद्यकीय भाषेत त्याला पोटाभोवतीचा लठ्ठपणा म्हटलं जातं.
लठ्ठपणाचा हा प्रकार म्हणजे पोटाभोवती जास्त प्रमाणात चरबी साचणे आणि डॉक्टरांच्या मते सौंदर्यविषयक (कॉस्मेटिक) चिंतेपेक्षा ही एक खूप गंभीर बाब आहे.
1990 च्या दशकातच झालेल्या अभ्यासांमध्ये पोटाभोवती साचलेल्या चरबीचा आणि टाइप 2 मधुमेह तसेच हृदयविकारासारख्या दीर्घकालीन आजारांमधील संबंध स्पष्टपणे दिसून आला होता.
स्थूलपणा फक्त पोटाभोवतीच किंवा पोटातच नसतो. हे विविध प्रकारांमध्ये दिसून येते, ज्यात चरबीचं वितरण कसं आहे यावर ते अवलंबून असते.
पेरिफेरल ओबिसिटी हिप्स, मांडी आणि नितंबांवर परिणाम करते तर सामान्य ओबिसिटी शरीराच्या सर्व भागात अधिक समतोल पद्धतीने चरबी पसरवते.
भारतामधील पोटाच्या स्थूलतेची संख्या आधीच चिंताजनक आहे. ताज्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एनएफएचएस-5) नुसार - ज्यामध्ये पहिल्यांदाच कंबरेचे आणि नितंबाचे माप घेतले गेले. भारतातील सुमारे 40 टक्के महिला आणि 12 टक्के पुरुष पोटाच्या स्थूलतेने प्रभावित आहेत.
भारतीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पोटाची स्थूलता म्हणजे पुरुषांसाठी कंबरेचं माप 90 सेंटीमीटर (35 इंच) आणि महिलांसाठी 80 सेंटीमीटर (31 इंच) पेक्षा जास्त असणे.
30 ते 49 वयोगटातील महिलांमध्ये, जवळजवळ प्रत्येक दुसऱ्या महिलेमध्ये पोटाच्या स्थूलतेचे संकेत दिसतात. यामध्ये शहरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येच्या तुलनेत जास्त प्रभावित झाली आहे.
पोटाच्या चरबीचं एवढं महत्त्व का आहे?
एक कारण म्हणजे इन्सुलिन प्रतिकार - अशी स्थिती ज्यामध्ये शरीर इन्सुलिनला योग्य प्रकारे प्रतिसाद देणं थांबवतं, हा हार्मोन जे रक्तातील साखरेचे नियमन करण्यात मदत करतो.
पोटातील चरबी शरीराच्या इन्सुलिन वापरावर परिणाम करते, ज्यामुळं रक्तातील साखर नियंत्रित करणं अधिक कठीण होतं.
अभ्यासात असं आढळून आलं आहे की, भारतीयांसह दक्षिण आशियाई लोकांमध्ये समान बॉडी मास इंडेक्समध्ये (बीएमआय) पांढऱ्या कॉकेशियन लोकांपेक्षा शरीरात जास्त चरबी असते. (बीएमआय हे एक साधे परिमाण आहे, जे व्यक्तीच्या उंचीच्या तुलनेत त्याचं वजन मोजतं.)
हे फक्त तुमच्याकडे किती चरबी आहे यावर नाही, तर ती कुठे जमा होते यावरही अवलंबून आहे. दक्षिण आशियाई लोकांमध्ये, चरबी सामान्यतः शरीराच्या कंबरेभोवती आणि त्वचेखाली जमा होते, परंतु नेहमीच ती व्हिसेरल फॅट (चरबी) म्हणून पोटात जमा होत नसते.
दक्षिण आशियाई लोकांमध्ये यकृत आणि स्वादूपिंडासारख्या अवयवांभोवती अधिक हानिकारक पोटाची चरबी तुलनेने कमी असू शकते. अभ्यास असं दर्शवतो की, त्यांच्या शरीरातील चरबीच्या पेशी कमी कार्यक्षम असतात, त्यामुळं त्या त्वचेखाली चरबी साठवण्यासाठी अक्षम ठरतात.
यामुळं अतिरिक्त चरबी थेट चयापचय नियंत्रित (मेटाबॉलिज्म) करणाऱ्या महत्त्वाच्या अवयवांमध्ये, जसं की यकृत आणि स्वादूपिंडमध्ये साठवली जाते आणि त्यामुळं मधुमेह व हृदयरोगाचा धोका वाढतो.
शास्त्रज्ञ अजूनही चरबी वितरणाच्या पद्धतीमागील जैविक कारणं पूर्णपणे समजू शकलेले नाहीत. अनेक आनुवंशिक (जेनेटिक) अभ्यास झाले असले तरी, कोणताही एकमेव जनुक ही प्रवृत्ती स्पष्ट करू शकलेला नाही.
एक सिद्धांत असं सुचवतो की, या प्रवृत्तीचं मूळ उत्क्रांतीमध्ये आहे. भारताला अनेक शतकांपासून दुष्काळ आणि अन्नटंचाईचा सामना करावा लागला. त्यामुळं पिढ्यानपिढ्या लोकांना अत्यल्प पोषणावर जगावं लागलं.
अशा परिस्थितींमध्ये अत्यल्प उपलब्धतेतही टिकून राहण्यासाठी मानवी शरीरानं स्वतःला जुळवून घेतलं.
शरीराला उर्जेसाठी साठवणूक करणाऱ्या जागेची गरज होती आणि पोटाचा भाग सर्वाधिक विस्तारण्यास सक्षम असल्यामुळे तोच मुख्य साठवणूक केंद्र बनला. कालांतरानं अन्न मुबलक उपलब्ध होऊ लागलं, पण हा चरबीचा साठा वाढतच गेला आणि शेवटी तो हानिकारक पातळीपर्यंत पोहोचला.
"हा एक काल्पनिक पण शक्यतावादी उत्क्रांतीविषयीचा सिद्धांत आहे, जो सिद्ध करता येणार नाही, परंतु, तो अर्थपूर्ण वाटतो," असं दिल्लीतील फोर्टिस सी डीओसी सेंटर फॉर एक्सलन्स फॉर डायबिटीज, मेटबॉलिक डिसीजेस अँड एंडोक्राइनोलॉजीचे प्रमुख डॉ. अनुप मिश्रा म्हणतात.
मागील वर्षी, इंडियन ओबेसिटी कमिशनशी संबंधित डॉक्टरांनी एका शोधनिबंधात आशियाई भारतीयांसाठी लठ्ठपणाच्या मार्गदर्शक तत्त्वांची नव्याने व्याख्या केली.
त्यांनी बीएमआयवर आधारित मोजमापांपलीकडे जाऊन, शरीरातील चरबी आणि आरोग्य धोक्यांमधील सुरुवातीचा संबंध अधिक अचूकपणे दाखवण्यासाठी या मार्गदर्शक तत्त्वांचा पुनर्विचार केला.
त्यांनी दोन टप्प्यांची वैद्यकीय प्रणाली तयार केली, जी शरीरातील चरबीचे वितरण, संबंधित आजार आणि शारीरिक कार्यक्षमता या घटकांचा विचार करते.
पहिल्या टप्प्यात उच्च बीएमआय असलेले, परंतु पोटातील चरबी, चयापचय रोग किंवा शारीरिक कार्यक्षमता कमी असलेले लोक. अशा प्रकरणांमध्ये, आहार, व्यायाम आणि कधी कधी औषधोपचार यांसारख्या जीवनशैलीतील बदल सहसा पुरेसे असतात.
दुसरा टप्पा म्हणजे पोटातील चरबी - हानिकारक आंतरिक चरबी (व्हिसेरल फॅट) आणि यासह अनेक आरोग्य समस्यांनाही सामोरं जावं लागतं, जसं की मधुमेह, गुडघेदुखी किंवा धडधडणारं हृदय.
हा टप्पा उच्च धोका दर्शवतो किंवा उच्च जोखमीचे संकेत देतो आणि यासाठी अधिक तीव्र व्यवस्थापनाची गरज असते.
हे वर्गीकरण उपचारांच्या तीव्रतेचे मार्गदर्शन करतात. एकदा पोटाच्या चरबीचे प्रमाण दिसले की, लवकर क्रिया करणं महत्त्वाचं आहे. डॉक्टरांच्या मते, सेमॅग्लुटाइड आणि टिर्झेपाटाइड सारखी वजन कमी करण्याची नवीन औषधं त्यावर प्रभावी ठरत आहेत.
"सामान्य वजन असलेल्या लोकांमध्येही पोटाची चरबी अत्यंत धोकादायक पातळीवर असू शकते," असं डॉ. मिश्रा म्हणतात. हे जितके धक्कादायक वाटेल तितकंच सत्य आहे असंही ते म्हणाले.
भारतीय डॉक्टर म्हणतात की, पोटाची चरबी वाढण्याचं मुख्य कारण जीवनशैलीतील बदल आहेत. अधिक जंक फूड, टेकअवे, इन्स्टंट फूड आणि अति तेलाचा वापर करुन केलेला घरगुती स्वयंपाक यासाठी कारणीभूत आहे.
2009 ते 2019 दरम्यान, कॅमेरून, भारत आणि व्हिएतनाममध्ये अत्यधिक प्रक्रिया केलेले अन्न (अल्ट्रा प्रोसेस्ड फूड) आणि शीतपेयांच्या दरडोई विक्रीत सर्वाधिक वाढ झाली, असं अभ्यासांमध्ये आढळून आलं आहे.
मग काय करायला हवं?
तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, भारतीयांना पाश्चात्य नियमांपेक्षा कठोर जीवनशैली बदलांची आवश्यकता आहे.
युरोपीय पुरुषांसाठी 150 मिनिटांचा साप्ताहिक व्यायाम पुरेसा असू शकतो. परंतु, दक्षिण आशियाई लोकांना मंद मेटाबॉलिजम आणि कमी प्रभावी फॅट स्टोरेजसाठी 250-300 मिनिटांचा व्यायाम आवश्यक आहे, असं अभ्यासांमध्ये दिसून आलं आहे.
"आपलं शरीर अतिरिक्त चरबीला सांभाळण्यात तितकसं चांगलं किंवा सक्षम नाही," असं डॉ. मिश्रा म्हणतात.
थोडक्यात, पॉट बेली ही फक्त एक पंचलाइन नाही. तो एक इशारा आहे, आणि भारत 'हेल्थ टाइम बॉम्ब'वर बसला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)