100 वर्षांपूर्वी स्वर्गाच्या शोधात 'या' बेटावर आलेले लोक एकेक करत गायब कसे झाले? नक्की काय घडलं या बेटावर?

फोटो स्रोत, Vertical
- Author, कॅरीन जेम्स
- Role, बीबीसी प्रतिनिधी
युरोपियन वसाहतवाद्यांचा एक गट गॅलापागोस द्वीपसमूहातील एका बेटावर राहू लागला, तेव्हा त्यांना वाटलं होतं की ते तिथे एखाद्या स्वर्गासारख्या जागेत राहतील. त्यांना वाटलं होतं तो त्यांच्यासाठी स्वर्ग असेल.
मात्र तसं होण्याऐवजी ते एक दु:स्वप्न ठरलं. या सत्यघटनेवर आधारित एक नवीन चित्रपट आला आहे, त्याचं नाव आहे ईडन. ज्यूड लॉ आणि ॲना डी आर्मास यांनी या चित्रपटात अभिनय केला आहे.
"मॉडर्न ॲडम अँड इव्ह इन पॅसिफिक ईडन", 'मॅड एम्प्रेस इन द गार्डन ऑफ ईडन', ' द इनसॅटिएबल बॅरनेस हू क्रिएटेड अ प्रायव्हेट पॅराडाईस', हे आणि यांच्यासारखे अनेक मथळे 1930 च्या दशकात युरोप आणि अमेरिकेतील वृत्तपत्रं आणि मासिकांमध्ये प्रसिद्ध झाले होते.
तरीदेखील एरवी निर्जन असलेल्या गॅलापागोस बेटावरील काही मोजक्या लोकांनी व्यापलेला तो 'खासगी स्वर्ग' एक फसवणुकीचं, हेराफेरीचं आणि शेवटी रहस्यमयरित्या गायब होण्याचं ठिकाण बनलं.
रॉन हॉवर्ड यांच्या ईडन नवीन चित्रपटात या विचित्र मात्र सत्यकथेचं नाट्यमय चित्रण करण्यात आलं आहे. चित्रपटात अनेक रंजक पात्रं आहेत.
'ईडन'ची मांडणी
त्यात माणूसघाण्या किंवा माणसांचा द्वेष करणारा डॉक्टर-तत्वज्ञ, एक अतिशय प्रामाणिक आणि नम्र विवाहित जोडपं, तसंच एक स्वत:ला उच्चभ्रू, सरंजामदार म्हणवणारी, भडक आणि आपण कोणी विशेष आहोत असं दाखवू पाहणारी महिला यांचा समावेश आहे.
'द गॅलापागोस अफेअर: सेटन केम टू ईडन' या 2012 च्या डोळे उघडणाऱ्या माहितीपटात तुम्हाला वेगवेगळ्या छटांची खरी माणसं दिसतात. चित्रपट निर्माते डायना गोल्फाईन आणि डॅन गेलर यांचा हा माहितीपट आहे.
"जे वाचले त्यांच्या कहाण्यांनी प्रेरित" या शब्दांनी ईडनची सुरुवात होते. अर्थात त्यातील काहीजण वाचले नाहीत. हॉवर्ड यांनी बीबीसीला सांगितलं की चित्रपटाच्या गूढ कथानकापलीकडे, त्यांना वास्तविक जीवनातील मानवी स्वभावाचे एक रंजक सूक्ष्म जग त्यात दिसलं.

फोटो स्रोत, Doheny Library Collection at USC
"या लोकांमुळे आम्हाला एक मजेदार, आकर्षक अभ्यास करता आला. त्यामध्ये सस्पेन्स, विश्वासघात आणि हिंसा आहे. त्यात शोकांतिका आहे तसंच विनोददेखील आहे. शिवाय खानदानीपणादेखील आहे. हे सर्व डार्विनच्या गॅलापोगसमध्ये घडलं आहे," असं ते म्हणतात.
खरोखरंच चित्रपट त्या विषयानुसार आहे. अर्थात 19 व्या शतकातील चार्लस डार्विन यांच्या गॅलापागोसमधील अभ्यासावर आधारित असलेला त्यांचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत कदाचित बेटावरील या माणसांच्या गटाच्या जाणूनबुजून केलेल्या दुष्कृत्यांपुढे सौम्य वाटू शकतो.
बेटावरची कहाणी
वास्तविक जीवनात आणि चित्रपटात, फ्लोरेआना बेटावर येणारी पहिली व्यक्ती म्हणजे फ्रेडरिक रिटर (चित्रपटात अभिनेते ज्यूड लॉ).
ते 1929 मध्ये त्यांची प्रेयसी आणि सहाय्यक डोरे स्ट्रॉच (चित्रपटात अभिनेत्री वेनेसा कर्बी) बरोबर जर्मनीतून तिथे आले होते. त्यांनी तिथे संपूर्ण मानवजातीसाठी एक नवीन भविष्य निर्माण करणारं तत्वज्ञान लिहिण्याचं भव्य नियोजन केलं होतं.
तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी भौतिक जग मागे सोडलं आहे. त्यांचं वागणं तसं विचित्र होतं. त्यांचे सर्व दात निकामी झाले होते.

फोटो स्रोत, Doheny Library Collection at USC
त्यामागचं कारण डोरे यांनी नंतर त्यांच्या चरित्रात दिलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की "फ्रेडरिक प्रत्येक घास खूप चावून खायचे", त्यामुळे "त्यांचे दात घासले गेले होते."
काही वर्षांनी विटमर कुटुंब तिथे आल्यानंतर या जोडप्याचा एकांतवास संपला. हेन्झ (डॅनिएल ब्रुल), त्यांची गरोदर पत्नी मार्गरेट (ग्लॅमरस नसलेली सिडनी स्वीनी) आणि त्यांचा किशोरवयीन मुलगा, असं हे विटमर कुटुंब होतं.
हेन्झ यांनी जर्मनीतील वृत्तपत्रांमध्ये फ्रेडरिक रिटर यांच्या प्रयोगाबद्दल ऐकलं होतं. फ्रेडरिक आणि डोरे यांनी घरी पाठवलेली पत्रं आणि फ्रेडरिक यांनी केलेलं लिखाण, यातून ही माहिती बातम्यांमध्ये आली होती. त्यामुळे हेन्झ, फ्रेडरिकचे चाहते होते.
तसंच त्यांच्या आजारी मुलाची तब्येत या बेटावरील हवामानात सुधारेल, अशी आशाही हेन्झ यांना वाटत होती.
बेटावरचा तणाव कसा वाढला?
फ्रेडरिक आणि डोरे यांनी बेटावरील या नव्या शेजाऱ्यांकडे एक आक्रमण करणारे लोक म्हणून पाहिलं. तसंच बेटावर स्वत:ला उच्चभ्रू म्हणवणारी ऑस्ट्रियन एलोईस वेहरबॉर्न डी वॅग्नर-बॉस्केट (ॲना डी आर्मास) आणि तिचे दोन प्रियकर येतात.
त्यातील एकाची सरशी होण्याची अधिक शक्यता होती. ते दोघेही तिच्यावर मोहित झाले. हे तिघेजण आल्यानंतर बेटावरील सर्वांमधील तणाव, शत्रूत्व अधिक वाढलं. एलोईसचा भूतकाळ अफवांमध्ये गुरफटलेला होता.
त्यामध्ये ती एकेकाळी कॉन्स्टँटिनोपलमध्ये नर्तकी होती आणि तसंच फ्लोरेआनामध्ये पर्यटकांसाठी आलिशान हॉटेल बांधण्याची तिची योजना होती.
अलिप्त किंवा एकांतात राहण्याची इच्छा असणाऱ्या रिटर यांना याबद्दल काय वाटलं असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता.
या खडकाळ बेटावर आलिशानपणा तर दूरच राहिला, एलोईसनं कल्पना तरी कशी केली की ती हॉटेलमध्ये वीज आणि प्लंबिंगची व्यवस्था आणेल, हा एक संपूर्ण वेगळाच प्रश्न आहे.

हॉवर्ड यांच्या चित्रपटात सरंजामदार महिला एका लांब रेशमी झग्यात समुद्र किनाऱ्यावर येते. तिला दोन्ही पुरुषांच्या खांद्यावर बसवून आणलं जातं, जणूकाही ती देवता असते.
या चित्रपटातील पात्रं आणि त्यांची पार्श्वभूमी अतिशय प्रामाणिकपणे, खऱ्या लोकांसारखीच पुन्हा उभी करण्यात आली आहे.
मात्र तरीदेखील हॉवर्ड म्हणतात, "किंबहुना, काही ठिकाणी तर आम्ही या पात्रांना थोडं मवाळ किंवा सौम्य केलं आहे. जर ॲना डी आर्मासनं ती महिला स्वत:ला ज्याप्रमाणे सादर करत होती, त्याप्रमाणे पूर्णपणे आणि नाट्यमयपणे भूमिका केली असती, तर आम्हाला काळजी वाटत होती आपण काही मर्यादा ओलांडत आहोत."
गोल्डफाईन यांनी बीबीसीला सांगितलं, "आपण या पात्रांचा साहित्यिक संदर्भ किंवा उपमा द्यायचा ठरवला तर विटमर्स कुटुंब स्विस फॅमिली रॉबिन्सनसारखं होतं, डॉ. रिटर रॉबिन्सन क्रुसोसारखे होते आणि उच्चभ्रू महिला तिच्यासारखं कोणीही नाही."
बेटावरील माणसांमधील शत्रूत्व
ती खरोखरंच एक कलाकृती होती. ईडनमध्ये पडद्यावर ती जसं करतं, तसंच तिनं प्रत्यक्षातदेखील तिचा कॅम्प विटमर्स कुटुंबाच्या खूपच जवळ उभा केला होता. तसंच पिण्याच्या पाण्याच्या त्यांच्या एका स्त्रोतात तिनं आंघोळ केली. ती दोन्ही कुटुंबांमधून अन्न चोरत असे.
ती (एलोईस वेहरबॉर्न डी वॅग्नर-बॉस्केट) आणि तिचे प्रियकर छोट्या मात्र मोठ्या आवाजातील पार्ट्या करत असतं. या पार्ट्या विटमर कुटुंबाला आवाज ऐकू जाईल इतक्या अंतरावर व्हायच्या.
रिटर आणि विटमर कुटुंबांविरोधात कट करून लवकरच त्यांना एकमेकांविरोधात उभं करण्याची तिची योजना होती. त्यासाठी काही वेगळं नाट्य निर्माण करण्याची आवश्यकता नव्हती.

फोटो स्रोत, Getty Images
"रिटर आणि विटमर कुटुंबीय एकमेकांचा द्वेष करायचे," असं गोल्डफाईन म्हणतात. यात कोणतंही आश्चर्य नाही. मुक्तपणे वावरणारी डोरे मार्गारेटला एक गृहिणी, घरकाम करणारी महिला म्हणून तुच्छ लेखत होती.
वास्तविक डोरे स्वत:देखील फ्रेडरिक यांच्या नियंत्रणाखाली होती. त्यांच्या नात्यातील तेढ, तणाव वाढत चालला होता.
मार्गरेट गरोदर होत्या आणि त्यांची बाळंतपणाची तारीख जवळ येत असताना, प्रसूतीसाठी मदत करण्याची त्यांची विनंती डॉ रिटर यांनी स्पष्टपणे नाकारली.
हॉवर्ड यांच्या चित्रपटात विटमर कुटुंब घर बांधण्यापूर्वी एका गुहेत राहत असतं. स्वीनी त्याच गुहेत एकट्यानं प्रसूत होतात. बाळंतपणाच्या वेळेस जंगली कुत्र्यांकडून धोका असल्यानं मार्गारेट ओरडत असतात.
माहितीपटाची निर्मिती
'द गॅलापागोस अफेअर' मधील वास्तविक लोकांकडे पाहा आणि तुम्हाला दिसेल की लॉ थोडासे किंवा अस्पष्टपणे रिटर यांच्यासारखे दिसतात. तसंच डी आर्मास यांनी साकारलेल्या उच्चभ्रू महिलेला (एलोईस वेहरबॉर्न डी वॅग्नर-बॉस्केट) हॉलीवूडसारखा चांगला लूक देण्यात आला होता.
माहितीपटात संग्रहात असलेलं फुटेज मोठ्या प्रमाणात आहे. त्यातील बहुतांश फुटेज ॲलन हँकॉक यांनी फ्लोरेआना बेटाला दिलेल्या भेटींमधून चित्रित करण्यात आलेलं आहे.
ॲलन हँकॉक हे कॅलिफोर्नियातील एक आघाडीचे बांधकाम व्यावसायिक होते. त्यांनी संशोधनासाठी, शोध मोहिमांसाठी येणाऱ्या वैज्ञानिकांनी भरलेल्या जहाजाला नियमितपणे पैसा पुरवला होता.
हँकॉक यांच्या टीममधील एका सदस्यानं बनवलेल्या एका चित्रपटात उच्चभ्रू, सरंजामदार महिला आणि एका कठोर टिप्पणीचा समावेश आहे. ती टिप्पणी म्हणजे, "ती सुंदर नाही, मात्र दोन युरोपियन पुरुषांना, स्वत:चं घर सोडून तिच्याबरोबर दुसऱ्या देशात जाण्यास मोहात पाडण्याऐवजी ती आकर्षक आहे."

हँकॉक यांनी स्वत:देखील एक शॉर्ट फिल्म बनवली होती. त्याचं पटकथालेखन त्यांनी त्या उच्चभ्रू महिलेसोबत (एलोईस वेहरबॉर्न डी वॅग्नर-बॉस्केट) केलं होतं.
'द एम्प्रेस ऑफ फ्लोरेआना' नावाची ती एक मूर्ख शॉर्ट फिल्म आहे. माहितीपटात तिचा समावेश आहे. यात ती उच्चभ्रू महिला 'द पायरेट्स' नावाच्या स्वत:च्या जवळ जाणाऱ्या व्यक्तीरेखेची भूमिका साकारते.
खऱ्या आयुष्यातील प्रियकरांपैकी एक रॉबर्ट फिलिप्सन यांनी हर स्वेनची भूमिका केली आहे. मात्र ती लवकरच त्याला नाकारते आणि समुद्रकिनाऱ्यावर अडकलेल्या एका नुकत्याच विवाह झालेल्या पुरुषाला मोहात पाडते (ही भूमिका चित्रपटाचे दिग्दर्शक आणि हँकॉक यांच्या शोधमोहिमेतील एक सदस्य असलेल्या एमेरी जॉन्सन यांनी केली आहे).
"त्या सरंजामदार महिलेनं ते खूप गांभीर्यानं घेतलं आणि तिला वाटलं की कदाचित एका मोठ्या, चांगल्या कल्पनेसाठीची ही एक ऑडिशन आहे."
गोल्डफाईन आणि गेलर यांचा माहितीपट त्या काळातील पत्र आणि लेखांवर आधारलेला होता.
तसंच तो डोरे यांच्या 'सेटन केम टू ईडन' (1936) या संस्मरणांवर आणि मार्गारेट यांच्या फ्लोरेआना: अ वुमन्स पिलग्रिमेज टू द गॅलापागोस (1959) यावर आधारित होता. ज्यात केट ब्लँचेट, डोरे यांचे शब्द बोलत होत्या तर डाएन क्रुगर, मार्गरेटचे शब्द बोलत होत्या.
यात कोणतंही आश्चर्य नाही की त्या पुस्तकांमध्ये काही महत्त्वाच्या घटनांचं परस्परविरोधी वर्णन आहे. यात मृत्यूशय्येवरील एक दृश्य आहे. ज्याला एक महिला गौरवशाली शांततापूर्ण मृत्यू म्हणते. तर दुसरी म्हणते की, "मृत्यू होत असतानाच्या माझ्या प्रत्येक श्वासातून मी तुला शाप देते."
एक न सुटणारं रहस्य
जे लोक फ्लोरेआना बेटावरून गायब झाले त्यांचं खरोखरंच काय झालं याची कोणालाही माहिती नाही.
मात्र हॉवर्ड कबूल करतात की, "हे एक रहस्य आहे. अशा काही गोष्टी आहेत, ज्या कोणालाही कधीच कळणार नाहीत." ते आणि ईडनचे पटकथालेखक नोआ पिंक यांनी चित्रपटाचा एक निश्चित शेवट तयार केला होता.
"जेव्हा तुम्ही सत्यघटनेवर आधारित चित्रपट तयार करता, तेव्हा त्यात चित्रपटालाही न्याय द्यावा लागतो. मला वाटतं की चित्रपटाला त्या कथानकाच्या मांडणीच्या बाततीत काही भूमिका घ्यावी लागते," असं हॉवर्ड म्हणतात.
नेमकं काय घडतं, याबद्दल कोणतीही माहिती नाही, मात्र चित्रपटाच्या ट्रेलरमधून काही गोष्टींचे संकेत मिळतात.

फोटो स्रोत, Vertical
कोणीतरी बंदूक काढतो, कोणीतरी चाकू काढतो आणि ती सरंजामदार महिला म्हणते, "माझ्यावर विश्वास ठेवा, पुढील वर्षी या वेळेपर्यंत आपल्यापैकी एकजण गेलेला असेल."
दिग्दर्शक, पटकथालेखक यांच्या संशोधनावर आधारित शेवट तयार करण्याबद्दल हॉवर्ड म्हणतात, "आम्हाला असं वाटलं की चित्रपटाचा आम्ही केलेला शेवट हा एक अतिशय संभाव्य परिस्थितीसारखा, रंजक आणि अतिशय गंभीर स्वरुपाचा होता."
"कदाचित आम्हाला अधिक कंटाळवाणा शेवट निवडता आला असता. मात्र अनेक पर्यायांमधून आम्ही पुढे जाण्याचा आणि प्रेक्षकांना एक आंतरिक अनुभव देण्याचा निर्णय घेतला."
ते पुढे म्हणतात, "काय घडलं याबद्दल अंदाज बांधणं खूप सोपं आहे."
मात्र ते थोड्या लोकांचं मत आहे. बहुतांश लेखनात या घटनांना 'एक न सोडवता येणारं रहस्य' म्हटलं आहे. गोल्डफाईन आणि गेलर म्हणतात की त्यांनी त्यांचा माहितीपट बनवल्यापासून कोणताही नवीन पुरावा समोर आलेला नाही.
मार्गरेट यांच्या वागण्यामागचं कोडं
त्या बेटावरून वाचलेले सर्वजण आता हयात नाहीत. मात्र मार्गरेट फ्लोरेआना बेटावर वृद्धापकाळापर्यंत राहिल्या. गोल्डफाईन आणि गेलर 1997 मध्ये एक वेगळ्याच प्रकल्पासाठी योगायोगानं गॅलापागोस बेटावर गेले होते.
त्यावेळेस ते मार्गरेट यांना भेटले होते. त्यानंतर तीन वर्षांनी मार्गरेट यांचा मृत्यू झाला. त्यांना बेटावरून माणसं गायब होण्याची कहाणी माहित होती. मात्र त्यावर त्यांनी माहितीपट बनवायला अजून बरीच वर्षे होती.
कारण त्यांना अद्याप हँकॉक यांच्या चित्रपटांबद्दल माहित नव्हतं. ते चित्रपट दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संग्रहात होते. त्यावेळेस मार्गरेट त्यांच्या नव्वदीमध्ये होत्या.
गोल्डफाईन आणि गेलर यांच्या बेटावरील फिक्सरनं सांगितलं की तो त्यांना या अटीवर ओळख करून देईल की 1930 च्या दशकात वृत्तपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात छापून आलेल्या घटनांचा ते उल्लेख करणार नाहीत.
गोल्डफाईन मार्गरेटबद्दल म्हणतात की, "त्या एक छान म्हाताऱ्या बाईसारख्या होत्या," ज्यांना त्यांच्या आयुष्यातील मोठ्या घटनांबद्दल बोलायचं होतं. उदाहरणार्थ फ्रॅंकलिन रुझवेल्ट यांनी त्या बेटाला भेट दिली होती त्याबद्दल बोलायचं होतं.

फोटो स्रोत, Doheny Library Collection at USC
मात्र असं दिसतं की त्या दिसत होत्या त्यापेक्षा अधिक धूर्त, चलाख होत्या. गोल्डफाईन आणि गेलर यांनी चहा आणि कुकीज घेतल्यानंतर ते तिथून निघत असताना, अचानक मार्गरेट त्यांना म्हणाल्या, "अडचण ओढवून घेण्यापेक्षा गप्प राहणं योग्य असतं."
गेलर म्हणतात, "मला माहित नाही की पर्यटक केव्हा त्या बेटावर येतील यासाठीच्या त्यांच्या युक्तीचा हा एक भाग होता की नाही."
ते पुढे म्हणतात, "जे घडलं त्याबद्दल चित्रपट बनवण्याचा आम्ही विचार करत नव्हतो. त्यामुळे आम्ही तिथे काही शोधत असल्याचं सूचित करेल असं त्यांना काहीही सांगण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे मला वाटतं की त्या यासंदर्भात तिथे अनेक गोष्टी चाचपत होत्या."
पर्यटकांचं लक्ष वेधून घेणं, त्यांना आकर्षित करणं हेच अखेर हेन्झ आणि मार्गरेट यांनी केलं. त्यांनी पर्यटकांसाठी एक हॉटेल सुरू केलं होतं. त्यांचे वंशज अजूनही फ्लोरेआनामध्ये ते हॉटेल चालवतात. मात्र त्यांच्या जुन्या शत्रूनं म्हणजे त्या सरंजामदार महिलेनं कल्पना केल्याप्रमाणे ते आलिशान हॉटेल नाही.
ईडन हा चित्रपट 22 ऑगस्टला अमेरिकेत प्रदर्शित झाला आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











