'या' गावात शेकडो पुरुषांची हत्या त्यांच्याच पत्नींनी केली, हे भयंकर हत्याकांड उघड कसं झालं?

सुरुवातीला 20 महिलांवर त्यांच्या पतीला विष देण्याचा खटला चालवण्यात आला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुरुवातीला 20 महिलांवर त्यांच्या पतीला विष देण्याचा खटला चालवण्यात आला

'द न्यूयॉर्क टाइम्स' या अमेरिकन वृत्तपत्रात 14 डिसेंबर 1929 ला एक अशी बातमी छापून आली होती की, ज्यामुळे फक्त अमेरिकाच नाही तर तिथून हजारो किलोमीटर दूर अंतरावरील हंगेरी या देशातील लोकदेखील आश्चर्यचकित झाले होते.

या वृत्तानुसार, जवळपास 50 महिलांविरोधात एक खटला सुरू झाला होता.

या सर्व महिलांवर आरोप होता की, त्यांनी युरोपातील हंगेरी देशातील एका गावात राहणाऱ्या बहुतांश पुरुषांची विष देऊन हत्या केली आहे.

अर्थात, ही बातमी छोटी होती मात्र त्यात बरीच माहिती होती.

यात म्हटलं होतं की, 1911 ते 1929 दरम्यान हंगेरीची राजधानी असलेल्या बुडापेस्टपासून जवळपास 130 किलोमीटर दक्षिणेला नाग्यरेव नावाच्या भागात अनेक महिलांनी 50 हून अधिक पुरुषांची विष देऊन हत्या केली होती.

या महिलांना 'देवदूत बनवणाऱ्या' महिला म्हटलं जायचं. त्यांनी विषामध्ये आर्सेनिकचं सोल्युशन मिसळून पुरुषांची हत्या केली होती.

अनेक वर्षांनी सुरू झाला तपास

काहीजणांनी या घटनेला आधुनिक इतिहास काळात महिलांनी पुरुषांची केलेली सर्वात मोठी सामूहिक हत्या म्हटलं आहे.

नंतर महिलांवर खटला सुरू असताना एक नाव वारंवार समोर आलं. ते होतं, जोजसाना फाजकास यांचं. त्या या गावातील सुईण होत्या.

त्याकाळी हे गाव ऑस्ट्रो-हंगेरी साम्राज्यात होतं. तिथे कोणताही स्थानिक डॉक्टर नव्हता. सुईणच लोकांना औषधं द्यायची, त्यांच्यावर उपचार करायची.

2004 मध्ये बीबीसीच्या एका रेडिओ माहितीपट कार्यक्रमात गावात राहणाऱ्या मारिया गुनया यांनी सांगितलं होतं की फाजकास यांना विष देणारी मुख्य आरोपी म्हणून सादर करण्यात आलं. कारण गावातील महिला त्यांच्या वैयक्तिक समस्या, अडचणींबद्दल फाजकास यांच्याशी मोकळेपणानं बोलत असत.


गावातील सुईणींकडून महिला विषाबद्दल सल्ला घेत असत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गावातील सुईणींकडून महिला विषाबद्दल सल्ला घेत असत

गुनया यांनी सांगितलं की फाजकास यांनी त्या महिलांना समजावलं की जर त्यांना त्यांच्या पतींकडून काही त्रास होत असेल तर त्या त्यावर सोपा उपाय सांगू शकतात.

फाजकास यांना जरी सामूहिक हत्येतील मुख्य आरोपी ठरवण्यात आलं होतं, तरी खटल्याच्या कागदपत्रांमधील गावातील महिलांच्या जबाबातून अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. गावातील पुरुषांनी महिलांना दिलेला त्रास, गैरवर्तणूक, बलात्कार आणि हिंसाचाराच्या भयानक कहाण्या त्यातून समोर आल्या.

मात्र ही बाब अनेक वर्षे समोर आली नाही. पोलिसांच्या अहवालानुसार, सुरुवातीच्या हत्या 1911 मध्ये झाल्या. मात्र 1929 पर्यंत त्यांच्या तपासाला सुरूवात झाली नाही.

शेवटी या हत्या उघड कशा झाल्या?

सुरुवातीच्या घटना

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

1911 मध्ये फाजकास नाग्यरेव गावात आल्या होत्या.

गुनया आणि खटल्यातील इतर साक्षीदारांनुसार, दोन कारणांमुळे फाजकास यांच्यावर सर्वांचं लक्ष गेलं.

पहिलं कारण म्हणजे सुईणचं काम करण्याबरोबरच फाजकास यांना औषधांचीदेखील माहिती होती. त्यांच्या काही उपचारांमध्ये रसायनांचा देखील समावेश असायचा. त्या भागात ही गोष्ट नवीनच होती.

दुसरं कारण म्हणजे त्यांच्या पतीचा काहीच ठावठिकाणा नव्हता.

गुनया यांनी दिलेल्या माहितीनुसार, "नाग्यरेव गावात कोणताही पाद्री नव्हता तसंच डॉक्टरदेखील नव्हता. त्यामुळे फाजकास यांना असलेल्या ज्ञानामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले, तसंच त्यांच्यावर विश्वास देखील ठेवू लागले."

त्यांनी सांगितलं की त्यांना महिलांच्या घरातील अनेक गोष्टींची माहिती होऊ लागली. उदाहरणार्थ पुरुषांनी पत्नीला मारहाण करणं, त्यांच्यावर बलात्कार करणं आणि विवाहबाह्य संबंध ठेवणं.

त्यामुळे फाजकास यांनी असं काम करण्यास सुरूवात केली जे त्या काळात निषिद्ध होतं. म्हणजेच त्यांनी गर्भपात करण्यास सुरूवात केली. त्यामुळे त्यांना न्यायालयासमोर देखील सादर करण्यात आलं. मात्र त्यांना कधीही शिक्षा झाली नाही.

गुनया यांच्या मते, खरी समस्या अशी होती की त्याकाळी विवाह बहुतांशपणे कुटुंबाच्या इच्छेनंच व्हायचे. बऱ्याचशा लहान वयाच्या मुलींचं लग्न वयानं त्यांच्यापेक्षा बरंच मोठे असणाऱ्या पुरुषांशी केलं जायचं.

ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्याच्या अस्ताच्या काळात या घटना घडल्या होत्या

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्याच्या अस्ताच्या काळात या घटना घडल्या होत्या

गुनया यांनी सांगितलं की त्याकाळी घटस्फोट घेणं अशक्य होतं. महिलांवर कितीही अत्याचार झाले, त्यांचं कितीही शोषण झालं तरी त्या विभक्त होऊ शकत नव्हत्या.

मात्र त्या काळातील या बातम्यांमधून हे देखील समोर येतं की कुटुंबीयांनी ठरवलेल्या विवाहात (अरेंज्ड मॅरेज) एकप्रकारचा करारदेखील व्हायचा. त्यात जमीन, वारसा आणि कायदेशीर जबाबदाऱ्यांचा समावेश असायचा.

गुनया यांनी बीबीसीला सांगितलं की फाजकास यांनी महिलांना विश्वास देण्यास सुरूवात केली त्या त्यांच्या समस्या सोडवू शकतात.

फाजकास गावात आल्यानंतर 1911 मध्ये एखाद्या पुरुषाची विष देऊन हत्या करण्याची पहिली घटना घडली होती. त्यानंतर पहिल्या महायुद्धाच्या काळात आणि ऑस्ट्रो-हंगेरी साम्राज्याचा अस्त होण्याबरोबरच या प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत गेली. पुरुषांच्या हत्येचं प्रमाण वाढत गेलं.

अशाप्रकारे 18 वर्षांमध्ये 45 ते 50 पुरुषांचा मृत्यू झाला. मरणारे पुरुष कोणाचे पती होते किंवा कोणाचे वडील होते. या सर्वांना गावातील कब्रस्तानातच दफन करण्यात आलं होतं.

अनेकजण नाग्यरेव गावाला 'खुन्यांचं शहर' म्हणू लागले होते.

या गोष्टींवर पोलिसांचं लक्ष गेलं. 1929 च्या सुरुवातीला हे मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आले. त्यांची तपासणी करण्यात आली. त्या सर्व मृतदेहांमधून एकच पुरावा मिळाला, तो म्हणजे - 'आर्सेनिक'.

महिलांविरोधात खटला

फाजकास त्यावेळेस गावातील एक साधारण एक मजली घरात राहत होत्या. त्याचा दरवाजा रस्त्याच्या दिशेनं उघडायचा. या घरात त्यांनी अनेक विषारी द्रावण तयार केले होते. त्यांचा वापर त्या पुरुषांची हत्या करण्यासाठी झाला होता.

शेवटी 19 जुलै 1929 ला पोलीस त्यांना अटक करण्यासाठी गेले.

पोलीस त्यांच्याकडे येत आहेत, हे पाहताच त्यांच्या लक्षात आलं की त्यांचा खेळ संपला आहे. पोलीस त्यांच्या घरात पोहोचेपर्यंत त्यांनी आत्महत्या केली होती. स्वत:च तयार केलेलं विष त्या प्यायल्या होत्या.

मात्र ही सुईण एकटीच गुन्हेगार नव्हती.

इतर महिलांबद्दल माहिती मिळाल्यानंतर, 1929 मध्येच जवळच्या सोजनोक शहरात 26 महिलांवर खटला चालवण्यात आला.

यातील 8 जणींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली, तर उर्वरित जणांना तुरुंगवास झाला. यातील 7 जणींना जन्मठेपेची शिक्षा झाली. यातील फार थोड्या महिलांनी त्यांचा गुन्हा कबूल केला. त्यामुळे त्यांचा नेमका हेतू काय होता, हे स्पष्टपणे समोर येऊ शकलं नाही.

या शहराच्या संग्रहाचे इतिहासकार डॉक्टर गीजा चेख यांनी न्यायालयीन कागदपत्रांच्या आधारे बीबीसीला सांगितलं की आजदेखील बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत.

काही अंदाजांनुसार, आर्सेनिकमुळे मरणाऱ्यांची एकूण संख्या 300 होती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, काही अंदाजांनुसार, आर्सेनिकमुळे मरणाऱ्यांची एकूण संख्या 300 होती

गीजा चेख यांनी सांगितलं की त्या महिलांनी कोणत्या कारणांमुळे हत्या केल्या, याबद्दल अनेक मतं आहेत. त्यांनी दारिद्र्य, मोह आणि त्रासून हत्या केल्या असं मानलं जातं.

त्यांनी सांगितलं की काही बातम्यांमधून ही गोष्ट देखील समोर आली की अनेक महिलांचे रशियन युद्धकैद्यांशी संबंध निर्माण झाले होते. या युद्धकैद्यांकडून शेतांमध्ये मजूरी करून घेतली जात असे.

या महिलांचे पती परतल्यावर त्या महिलांना अचानक त्यांचं स्वातंत्र्य गेल्याची जाणीव झाली आणि त्यामुळे त्यांनी या हत्या केल्या.

1950 च्या दशकात इतिहासकार फेरेनेक गेरोगेव यांनी कम्युनिस्ट राजवटीत अटकेत असताना गावातील एका वृद्धाची भेट घेतली होती.

त्या वृद्ध शेतकऱ्यानं दावा केला होता की नाग्यरेवच्या महिला जुन्या काळापासूनच त्यांच्या पतींची हत्या करत आल्या होत्या.

जवळच्याच तिस्जाकुर्त शहरातून देखील काही मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आले. त्यामध्येदेखील आर्सेनिक सापडलं. मात्र त्यांच्या मृत्यूसाठी कोणालाही शिक्षा करण्यात आली आहे.

काही अंदाजांनुसार, त्या भागात आर्सेनिकनं मरणाऱ्यांची एकूण संख्या 300 वर पोहोचली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)