You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रोहिणी आचार्य यांचे गंभीर आरोप; लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात नेमकं काय सुरू आहे?
बिहार विधानसभा निवडणुकांनंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील यादवी चव्हाट्यावर आली आहे.
राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्या आणि लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी कुटुंबाशी संबंध तोडले असून राजकारणही सोडत असल्याचं जाहीर केलं.
कुटुंबात आणि पक्षात सुरू असलेल्या संघर्षाला तेजस्वी यादव आणि त्यांच्या अगदी जवळचे सहकारी संजय यादव हे जबाबदार असल्याचा आरोप रोहिणी आचार्य यांनी केलाय.
रोहिणी यांनीच लालू प्रसाद यादव यांना किडनी दान केली होती. मात्र, आता त्यांनी कुटुंबाशी सगळे संबंध तोडत असल्याचं म्हटलं आहे. 16 नोव्हेंबर रोजी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या.
यामुळे तेजस्वी यादव आणि त्यांच्या राष्ट्रीय जनता दलातील त्यांच्या जवळच्या लोकांसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र, आतापर्यंत तेजस्वी, लालू किंवा त्यांच्या कोणत्याही जवळच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणात प्रतिक्रिया दिलेली नाही.
हे नेमकं काय प्रकरण आहे? लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात नेमकं काय सुरु आहे? जाणून घेऊयात.
रोहिणी आचार्य काय म्हणाल्या?
रोहिणी आचार्य माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, "माझं कोणतंही कुटुंब उरलेलं नाही. याबाबत तुम्ही तेजस्वी यादव, संजय यादव आणि रमीझ यांनाच विचारा. त्यांनीच मला बाहेर कुटुंबातून काढलंय आणि ते कोणतीही जबाबदारी घेण्यास तयार नाहीत."
"पक्षाची ही अवस्था कशी झाली? असा प्रश्न देशभरातून उपस्थित केला जातोय. मात्र, जेव्हा तुम्ही संजय यादव आणि रमीझ यांची नावं घेता तेव्हा तुम्हाला घराबाहेर काढलं जातं, बदनाम केलं जातं. शिवीगाळ केली जाते", असंही रोहिणी म्हणाल्या.
संजय यादव हे तेजस्वी यादव यांचे जवळचे सहकारी असून राजदमध्ये त्यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. ते पक्षाचे रणनितीकार, सल्लागार मानले जातात.
रोहिणी यांनी माध्यमांशी बोलताना 'चाणक्य' शब्दप्रयोग करत संजय यादव यांच्यावर निशाणा साधला.
रोहिणी यांनी रविवारी (16 नोव्हेंबर) एक्सवर काही पोस्ट केल्या. त्यातही त्यांनी लिहिलं आहे की, "मला शिविगाळ करण्यात आली, माझ्यावर चप्पल उगारण्यात आली. घर सोडण्यास भाग पाडण्यात आलं, मला अनाथ केलं. मी रडत घर सोडलं. रोहिणीसारखी मुलगी किंवा बहीण कोणत्याही घरात जन्माला येऊ नये."
दरम्यान, यादव कुटुंबात आणि राजदमध्ये सुरू असलेल्या कलहावर बोलताना पक्षाचे प्रवक्ते मृत्यूंजय तिवारी म्हणाले, "ही एक कौटुंबिक बाब आहे आणि त्याबाबत कुटुंबातील सदस्यच काय ती प्रतिक्रिया देतील. बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या निकालामागील कारणांचा आढावा घेतल्यानंतरच प्रतिक्रिया देऊ.
बाकी रोहिणी यांचं कुटुंबाप्रती जे प्रेम समर्पण आहे त्याचा आदर आहेच. प्रत्येक आई-वडिलाला रोहिणीसारखी मुलगी आणि भावाला रोहिणीसारखी बहीण मिळावीशी वाटावी, असा आदर्श त्यांनी निर्माण केलाय."
प्रकरण काय?
वरिष्ठ पत्रकार नलिन वर्मा यांच्या मते "संजय यादव यांचा पक्षातला वाढता हस्तक्षेप आणि तेजस्वी यादव यांच्यावरील वाढतं नियंत्रण या वादामागचं एक प्रमुख कारण आहे.
सामान्य कार्यकर्त्यांपासून ते आमदार आणि खासदारांपर्यंत सर्वांनीच याबाबत तक्रारी केल्या आहेत. त्याला ते कसे सामोरे जातात हे पाहणं महत्वाचं ठरेल."
लालू यादव राजकारणात सक्रिय असताना ते कार्यकर्ते आणि समर्थकांसाठी वेळ काढायचे, त्यांचं ऐकून घ्यायचे. मात्र, तेजस्वी यादव यांना भेटणं किंवा त्यांच्याशी संपर्क साधणंही लोकांसाठी कठीण होऊन बसलंय, आणि यामुळे कार्यकर्त्यांमध्येही नाराजी आहे.
संजय यादव यांच्याशी संबंधित वाद याच वर्षी सप्टेंबर महिन्यात समोर आला होता.
तेजस्वी यादव यांनी 16 सप्टेंबरपासून जहानाबाद येथून 'बिहार अधिकार यात्रा' सुरू केली होती. या यात्रेदरम्यान सोशल मीडियावर एक फोटो समोर आला होता, ज्यात संजय यादव फ्रंट सीटवर बसलेले दिसले.
रोहिणी आचार्य यांनी या फोटोवरुन नाराजी व्यक्त केली होती.
रोहिणी यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, "फ्रंट सीट नेहमी शीर्ष नेत्यासाठी असते आणि ते उपस्थित नसल्यास कोणीही त्या सीटवर बसू नये. मात्र, जर कोणी स्वतःला वरिष्ठ नेतृत्वापेक्षा मोठं समजत असेल तर ती वेगळी गोष्ट आहे."
यावरुन रोहिणी आचार्य यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. 'राजकीय महत्त्वाकांक्षे'साठी असं करत असल्याचं म्हणत त्यांना ऑनलाइन ट्रोल करण्यात आलं.
यानंतर रोहिणी यांनी भाऊ तेजस्वी यादव आणि वडील लालू प्रसाद यादव या दोघांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर अनफॉलो केलं.
वडिलांना किडनी दान केल्यानंतर चर्चेत आल्या होत्या रोहिणी
गेल्यावर्षी रोहिणी आचार्य यांनी राजदच्या तिकीटावर सारण येथून लोकसभा निवडणूकही लढवली होती, परंतु यात त्यांनी यश आलं नाही. भाजपचे राजीव प्रताप रुडी यांनी त्यांचा पराभव केला होता.
रोहिणी या लालू प्रसाद यादव यांच्या द्वितीय कन्या आहेत. लालू प्रसाद यादव यांच्या 9 मुलांमध्ये रोहिणी या त्यांच्या द्वितीय कन्या आहेत.
46 वर्षीय रोहिणी यांचा जन्म 1979 साली पाटण्यात झाला होता. त्यांनी जमशेदपूरच्या एमजीएम मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचं शिक्षण घेतलंय.
24 मे 2002 साली रोहिणी यांचं समरेश सिंह यांच्याशी लग्न झालं. माहितीनिसार समरेश सिंह यांनी सिंगापूरमधून एमबीए पूर्ण केल्यानंतर त्यांना तेथेच नोकरी मिळाली.
रोहिणी यांचं सासर बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील दाउनगर येथील असून सासरच्यांया राजकारणाशी संबंध नाही.
रोहिणी यांनी 2002 मध्ये वडील लालू प्रसाद यादव यांना आजारपणात किडनी दान केली होती. किडनी दान करण्यापूर्वी रोहिणी यांनी सोशल मीडियावर बऱ्याच भावनिक पोस्ट केल्या होत्या. त्याची बरीच चर्चा झाली होती.
कोण आहेत संजय यादव?
संजय यादव यांचा जन्म 1984 साली हरियाणाच्या महेंद्रगढ जिल्ह्यातील नांगल सिरोही या गावात झाला. त्यांनी कंम्प्युटर सायन्समध्ये एमएससी केलंय. राज्यसभेच्या वेबसाईटनुसार त्यांचं घर दिल्लीतील नजफगढ येथे आहे.
संजय यादव आणि तेजस्वी यादव यांची मैत्री दोघेही राजकारणात येणाच्या फार आधीपासूनची आहे. दिल्लीमध्ये क्रिकेटच्या मैदानावर सुरू झालेली ही मैत्री अद्याप टिकून आहे.
संजय यादव यांनी या मैत्रीसाठी एमएनसीची (बहुराष्ट्रीय कंपनी) नोकरीदेखील सोडली आणि बिहारला आले.
चारा घोटाळा प्रकरणात 2013 साली लालू यादव यांना तुरुंगात जावं लागलं आणि राबडी देवी यांनी तेजस्वी यांना दिल्लीहुन बिहारला परत बोलावून घेतलं. तेजस्वी यांनी काही काळानंतर संजय यादव यांना बिहारला बोलावून घेतलं.
बिहारमध्ये आल्यावर त्यांनी काही वर्ष राज्यातील राजकारण समजून घेतलं, निवडणूक समीकरणं आणि आकड्यांवर काम केलं.
संजय यादव यांनी राजदमध्ये अनेक तांत्रिक आणि डिजिटल बदल केले.
संजय यादव यांनीच राजदमध्ये काळानुरूप अनेक बदल घडवून आणल्याचं मानलं जातं. त्यांनी मुस्लिम–यादव समीकरणाबरोबरच इतर जातींची समीकरणं आणि बिहारच्या युवकांना जोडण्याची रणनीती आखली.
वरिष्ठ पत्रकार फैजान अहमद सांगतात, "रोहिणी यांनी रमीझ आणि संजय यादव यांच्यावर आरोप केले आहेत. रमीझ यांच्याबाबत लोकांना सार्वजनिकरित्या अधिक माहिती नाही. ते मूळचे उत्तर प्रदेशातील असून संजय यादव यांच्याप्रमाणेच तेजस्वी यांच्या जवळचे मानले जातात."
त्यांच्या मते, "रमीझ राजकीय कुटुंबातून येतात. त्यांच्यावर पक्षाचा सोशल मीडिया आणि निवडणूक प्रचाराची जबाबदारी होती. मात्र, पक्षातील निर्णयांबाबत त्यांची काय भूमिका राहिलीय, याबाबत अधिक माहिती नाही."
संजय यादव यांच्याबाबत सांगायचं झाल्यास पक्षातील निर्णयांबाबत त्यांची भूमिका महत्वाची मानली जाते.
नलिन वर्मा यांच्या मते "रमीझ 2016 पासून तेजस्वी यांच्यासोबत आहे. पक्षातील त्यांची भूमिका नेमकी काय आहे, याबाबत लोकांना कल्पना नाही. त्यामुळे यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही. मात्र, संजय यादव यांचं तेजस्वी यांच्यावर असलेल्या नियंत्रणाबाबत पक्षातील लोकांच्या तक्रारी आहेत. लालू यादव यांच्या कार्यकाळात प्रेमचंद गुप्ता यांना घेऊनही लोकांच्या अशाच तक्रारी होत्या, मात्र त्यांनी ते सांभाळून घेतलं होतं."
तेजस्वी यादव आणि संजय यादव यांच्यातील मैत्री इतकी दाट आहे की, राजदने त्यांच्या अनेक जुन्या आणि ज्येष्ठ नेत्यांना बाजूला ठेवून गेल्या वर्षी संजय यादव यांना राज्यसभेवर पाठवलं.
2020 मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत राजदला मोठं यश मिळाले. निवडणूक प्रचारादरम्यान, तेजस्वी यादव यांनी राजदचं सरकार स्थापन झाल्यास 10 लाख नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं, यामागे संजय यादव यांची रणनिती असल्याचं मानलं जातं.
त्या निवडणुकांमध्ये, तेजस्वी यांच्या प्रचाराच्या बळावर, राजद राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आणि संजय यादव यांचे पक्षातील स्थान अधिक बळकट झाले.
सध्याच्या वादाबाबत नलिन वर्मा म्हणतात, "बिहारमध्ये राजदकडे अजूनही सर्वात मोठी व्होट बँक आहे.
आजही राजदकडे बिहारमधील सर्वात मोठी व्होट बँक आहे. त्यामुळे हा वाद आत्ताच्या क्षणी मोठा दिसत असला, तरी भविष्यात त्याचा फारसा परिणाम होईलच, असे निश्चितपणे म्हणता येणार नाही."
ते पुढे म्हणतात, "2010 मध्ये राजदला केवळ 22 जागा मिळाल्या होत्या, पण 2015 मध्ये पक्ष पुन्हा ताकदीनं उभा राहिला आणि 2020 मध्ये राजद बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष बनून समोर आला.
त्याचप्रमाणे 2014 मध्ये जदयूने लोकसभेत फक्त दोन जागा जिंकल्या आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना फक्त 43 जागा मिळाल्यावर नितीश यांचा पक्ष संपुष्टात येत असल्याचे म्हटले जात होते.
पण या निवडणुकीत नितीश कुमार आणि जदयूनं जोरदार पुनरागमन केलं आहे. वय आणि आरोग्याशी संबंधित आव्हानानंतरही नितीश कुमार पुन्हा एकदा चर्चेत आहेत.
अशा परिस्थितीत, तेजस्वी यादवदेखील राजदला पुन्हा रुळावर आणू शकतात. परंतु त्यांचा मार्ग काय असेल आणि तो त्यात किती यशस्वी होईल हे पाहणं महत्वाचं ठरेल."
तेजप्रताप यादव यांनी काय प्रतिक्रिया दिली?
रोहिणी यांच्याआधी तेजप्रताप यादव यांनाही कुटुंबातून आणि पक्षातून काढून टाकण्यात आलं होतं. याबाबतची बातमी तुम्ही येथे वाचू शकता.
तेजप्रताप यादव यांनी या प्रकरणावर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "माझ्याबरोबर जे घडलं ते मी सहन केलं. मात्र, माझ्या बहिणीचा अपमान मी सहन करणार नाही. कुटुंबावर वार करणाऱ्यांनो बिहारची जनता तुम्हाला माफ करणार नाही."
पुढे तेजप्रताप यादव लिहितात, "माझ्या बहिणीवर चप्पल उगारल्याचं कानावर पडलं तेव्हापासून मी अस्वस्थ आहे. याचे परिणाम वेळ आल्यावर दिसेलच.
राजदचे राष्ट्रीय अध्यक्ष, माझे वडील आणि गुरु लालू प्रसाद यादव यांना आग्रह करु इच्छितो की, तुम्ही फक्त एक इशारा द्या, बिहारची जनता या जयचंदांना योग्य उत्तर देईल.
ही काही एका पक्षाची लढाई नाही. तर, ही कुटुंबाच्या, मुलीच्या सन्मानाची आणि बिहारच्या स्वाभिमानाची लढाई आहे."
तेजप्रताप यादव यांच्या प्रतिक्रियेनंतर पुढे काय होतं याकडे लोकाचं लक्ष लागून आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.