जमिनीचा वन विभागानं ताबा घेतल्याने शेतकऱ्याने केली आत्महत्या, जाणून घ्या पूर्ण प्रकरण

फोटो स्रोत, NAVEEN
- Author, शाहबाझ अन्वर
- Role, मेरठहून बीबीसी हिंदीसाठी
मेरठच्या मवाना तहसीलमध्ये शुक्रवारी 5 जानेवारीला, दुपारी अलिपूर मोरना गावातील रहिवासी असलेले एक शेतकरी जगबीर गुर्जर यांनी पेट्रोल ओतून घेत स्वतःला जाळून घेतलं होतं.
त्याच ते चांगलेच होरपळले. शनिवारी, 6 तारखेला रात्री मेरठच्या एका रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रविवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जगबीर यांच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपांनुसार त्यांच्या जमिनीचा वन विभागानं अवैधरित्या ताबा घेतला होता. 4 जानेवारीला त्यांचं गव्हाचं पिकही नष्ट करण्यात आलं. त्यामुळं नाराज झालेल्या जगबीर यांनी जाळून घेत आत्महत्या केली.
मेरठचे एसपी कमलेश बहादूर याबाबत बीबीसीबरोबर बोलताना म्हणाले की, "जगबीर गुर्जर यांनी आत्महत्या केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी सध्या प्रशासकीय चर्चा सुरू आहे.
शेतकऱ्यानं असं पाऊल का उचललं हादेखील तपासाचा विषय आहे. या प्रकरणी पोलिसांना अजून तक्रार मिळालेली नाही."
मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाचं म्हणणं काय आहे?
जगबीर गुर्जर यांची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये दोन मुलं आहेत. मोठा मुलगा प्रिन्स गुर्जर जवळपास 24 वर्षांचा आहे तर लहान मुलगा आकाश गुर्जर पदवीचं शिक्षण घेत आहे.
प्रिन्स गुर्जर बुलंदशहरमध्ये पाईपलाइन टाकण्याचं काम करतात. त्यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं की, "घटना घडली त्यादिवशी मी घरी नव्हतो. मला गावातील एकाने फोन करून वडिलांनी जाळून घेतल्याचं सांगितलं."
"मी रात्री घरी पोहोचलो तेव्हा वडिलांना रुग्णालयात दाखल केलेलं होतं. पण शनिवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला."
"आमच्याकडे गावापासून जवळपास 4 किलोमीटर अंतरावर कालव्याच्या जवळ अंदाजे 10 बिघे एवढी जमीन आहे. ही जमीन आमच्या पूर्वजांची आहे. इथं आमचे वडील अनेक वर्षांपासून शेती करत आहे. 4 जानेवारीला वन आणि महसूल विभागाचे अधिकारी त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी आमच्या भूमीवर कब्जा केला."
"त्यानंतर शेतीमधील पिक नष्ट केलं. वडील 5 जानेवारीला तक्रार घेऊन उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडं गेले होते. तिथं काय झालं माहिती नाही, आणि त्यांनी असं पाऊल उचललं," असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, NAVEEN
प्रिन्स म्हणाले की, "आमच्या वडिलांचे दोन भाऊ आहेत. दोघांनी सुमारे 5 वर्षांपूर्वी आमच्या वडिलांनाच त्यांची जमीन विकली होती."
जगबीर गुर्जर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबानं आर्थिक मदतीशिवाय कुटुंबातील एका सदस्याला कायमस्वरुपी नोकरी देण्याची मागणी केली आहे.
अधिकाऱ्यांचं म्हणणं काय आहे?
जगबीर यांच्या कुटुंबाच्या आरोपांवर मवानाचे दंडाधिकारी अखिलेश यादव यांनी बीबीसीबरोबर बोलताना म्हटलं की,"वन विभाग आणि महसूल विभागाच्या संयुक्त पथकाकडून वन विभगाच्या भूमीवरील अवैध ताबा हटवला जात आहे. जगबीर जी जमीन त्यांची असल्याचा दावा करत होते, ती वन विभागाची जमीन आहे."
"वन विभागानंच ती जमीन रिकामी करून घेतली होती. गावातील काही लोकांनी जगबीरला चुकीचं पाऊल उचलण्यासाठी चिथावणी दिली. त्यामुळं जगबीर यांनी हे पाऊल उचललं."
जमीन रिकामी करण्यापूर्वी किंवा पिक नष्ट करण्यापूर्वी नोटीस देण्यात आली होती का? असा प्रश्नही दंडाधिकाऱ्यांना विचारण्यात आला.
त्यावर, "अवैध ताबा हटवला तिथं जमीन खूप जास्त होती. बहुतांश जमीन रिकामीच पडलेली होती. पण लोकांनी त्यावर अतिक्रमण केलं होतं. पिकंही अगदी लहान लहान होती. वन विभागानं जेव्हा ही पिकं असलेली जमीन नांगरली त्यात जगबीर यांचं पिकही होतं. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना अवैध ताबा कोणी घेतला हे माहिती नव्हतं. मग अशा परिस्थितीत नोटीस कुणाला पाठवणार?
कागदोपत्री ही जमीन वन विभागाचीच आहे असा दावा त्यांनी केला.
मेरठचे जिल्हा वनाधिकारी (डीएफओ) राजेश कुमार बीबीसीबरोबर बोलताना म्हणाले की, "मुख्यमंत्री पोर्टलवर जगबीर यांच्या गावातील एका व्यक्तीनंच सरकारी जमिनीचा अवैध ताबा घेऊन त्यावर शेती केली जात असल्याची तक्रार करण्यात आली होती."
ते पुढे म्हणाले, "याबाबत वन आणि महसूल विभागाचं पथक तयार करून त्याठिकाणी पाठवण्यात आलं होतं. जमीन वनविभागाचीच असल्यानं त्याठिकाणी सीमांकन करण्यात आलं होतं. शेतकऱ्यानं असं पाऊल का उचललं, हा चौकशीचा विषय आहे. विभागानं याबाबत एका पथकाची स्थापना केली आहे."
भारतीय किसान युनियनचा इशारा
जगबीर गुर्जर यांच्या मृत्यूनंतर भारतीय किसान युनियन सक्रिय झाली आहे. संघटनेचे मेरठचे जिल्हाध्यक्ष अनुराग चौधरी बीबीसीबरोबर बोलताना म्हणाले की, "शेतकऱ्याचा जीव तर गेला, पण त्यानं असं पाऊल उचलण्यामागं नेमकं काय कारण होतं, याची चौकशी करायला हवी."
"मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला उदर्निर्वाहासाठी कायमस्वरुपी नोकरी दिली जावी. आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो आहोत. यावर 10 दिवसांत पावलं उचलली नाही तर, संघटनेला आंदोलन करावं लागेल," असंही ते म्हणाले.

फोटो स्रोत, NAVEEN
भारतीय किसान युनियनशिवाय समाजवादी पार्टी आणि इतर पक्षांचे नेते जगबीर यांच्या कुटुंबाशी संपर्क करत आहेत.
घटनेच्या दिवशी एसडीएम आणि वकिलांनी काय पाहिले?
जगबीर गुर्जर यांनी शुक्रवारी दुपारी एसडीएम कोर्ट परिसरात पेट्रोल ओतून घेत जाळून घेतलं होतं. या घटनेचा एक व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे. त्यात शेतकरी आगीत होरपळत असल्याचं दिसत आहे.
काही पोलिस आणि इतर लोकही आग विझवताना दिसले. आग विझवणाऱ्यांमध्ये एसडीएम अखिलेश यादव यांचाही समावेश होता.
"मी कार्यालयात बसलेलो होतो तेव्हा अचानक बाहेर गदारोळ झाला. मी बाहेर निघालो तेव्हा जगबीर यांच्या शरिराला आग लागलेली होती. मी लगेचच धावलो आणि जॅकेट काढून त्यांची आग विझवण्याचा प्रयत्न केला. यात माझं जॅकेटही बरंच जळालं. हातही भाजले. लगेचच त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, सोबत मीही होतो," असं ते म्हणाले.
मवाना एसडीएम कोर्टात प्रॅक्टिस करणारे वकील इक्बाल सिंह म्हणाले की, "गोंधळ झाला तेव्हा आम्हीही त्याठिकाणी पोहोचलो. मी जेव्हा चेंबरमधून त्याठिकाणी गेलो तेव्हा पोलिस त्यांना रुग्णालयात दाखल करायला नेत होते. त्याठिकाणी लोकांची गर्दी होती. "
अलिपूर मोरना गावाचे प्रमुख, सरवन कुमार म्हणाले की, "मृत जगबीर यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. ते ज्या जमिनीवर शेती करायचे ती त्यांचीच असल्याचं सांगायचे. पण 4 जानेवारीला वन विभागानं पिक नष्ट केलं होतं. त्यामुळं जगबीर तणावात होते."
महत्वाची माहिती -
मानसिक समस्यांवर औषध आणि थेरपीनं उपचार शक्य आहे. त्यासाठी मानसोपचारतज्ज्ञाची मदत घ्यायला हवी. तुम्ही खालील हेल्पलाइनशीही संपर्क करू शकता -
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची हेल्पलाइन- 1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन बिहेवियर अँड अलाइड सायंसेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
हितगुज हेल्पलाइन, मुंबई- 022- 24131212
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








