150 वर्षांपूर्वी लुटून नेलेला ऐवज ब्रिटिशांनी केला परत

    • Author, फेवर नुनू आणि थॉमस नादी
    • Role, बीबीसी न्यूज, कुमासी

घानाच्या असांते साम्राज्यातून सुमारे 150 वर्षांपूर्वी ब्रिटिश वसाहतवाद्यांनी काही कलाकृती लुटून नेल्या होत्या. या कलाकृती आता घानाला परत मिळाल्या असून त्या प्रदर्शनासाठी ठेवल्या आहेत.

असांते प्रदेशाची राजधानी कुमासीमधील मनहिया पॅलेस संग्रहालयात घानाचे नागरिक गर्दी करत आहेत. लुटलेल्या 32 वस्तूंचे प्रदर्शन त्याठिकाणी लावण्यात आलेलं आहे.

असांतेचे राजे ओतुम्फो ओसेई टुटू द्वितीय यावेळी म्हणाले की,"असांतेसाठी हा एक विशेष दिवस आहे. संपूर्ण कृष्णवर्णीय आफ्रिकन खंडासाठी तो खास आहे. आपल्या सर्वांमध्ये जो आत्मा आहे तो आता परतला आहे."

घानाकडे या कलाकृती केवळ तीन वर्षांसाठी असतील. मात्र, हे दिवस आणखी वाढवले जाऊ शकतात.

दोन ब्रिटिश संग्रहालयं (व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय तसंच ब्रिटिश संग्रहालय) आणि असांतेचे महाराज यांच्यात हा करार झालेला आहे. घाना सरकारशी त्याचा काही संबंध नाही.

असांतेचे महाराज किंवा जनता ही पारंपरिक सत्तेचे प्रतीक मानले जातात. त्यांच्यात पूर्वजांच्या आत्म्यांचा वास असतो, असं म्हणतात.

पण आता हे राज्य घानाच्या आधुनिक लोकशाहीचा भाग आहे.

निवृत्त पोलीस आयुक्त आणि असांतेचे रहिवासी असलेले हेन्री अमनकवाटिया यांनी, "आम्हाला आमचा सन्मान परत मिळाला," असं आनंदानं सांगितलं.

19 व्या शतकाच्या सुरुवातीला सोनेरी विणकाम असलेली प्रतिकृती (वरील डाव्या बाजूस) ब्रिटिश संग्रहालयाला भेट म्हणून देण्यात आली होती. तर सोनेरी गोफ (उजव्या बाजूस) आणि राज दरबारातील तलवार लुटलेल्या कलाकृतींपैकी होत्या.

व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाने 17 वस्तू तर ब्रिटिश संग्रहालयाने 15 वस्तू दिल्या आहेत.

या कलाकृती राज्यात परत येणं इतकं महत्त्वाचं मानलं जात आहे की, त्याची तुलना रौप्य महोत्सवाशी केली जात आहे.

19 व्या शतकातील युद्धांदरम्यान, काहीं वस्तू लुटल्या गेल्या होत्या. काही जण त्याचं 'घानाच्या शाही परिवाराचे दागिने' असं वर्णन करतात. या वस्तूंमध्ये 1874 च्या प्रसिद्ध सार्जेंटी युद्धातील लुटलेल्या वस्तूही समाविष्ट आहेत.

यापैकी सोन्याचं वाद्य (सांकुओ) आणि इतर काही वस्तू 1817 मध्ये एका ब्रिटिश राजनैतिकाला भेट म्हणून देण्यात आलेल्या होत्या.

व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाचे संचालक डॉ. ट्रिस्ट्राम हंट खास या समारंभासाठी कुमासीला पोहोचले. "या वस्तूंचा सांभाळ करत असताना त्याच्याशी संलग्न असलेल्या वेदनादायी इतिहासाची आम्हाला जाण आहे. हा इतिहास साम्राज्यवादी संघर्ष आणि वसाहतवादाच्या जखमांनी डागाळलेला आहे," असं ते म्हणाले.

या कलाकृतींमध्ये राज्याची तलवार, सोन्याचा पीस पाईप आणि काही सोनेरी बॅजेसचा (बिल्ले) समावेश आहे.

डॉ. हंट म्हणाले, "ही संपत्ती महान राज्याच्या विजयाची साक्षीदार आहे. ती कुमासीमध्ये परतणं सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे."

परत केलेल्या वस्तूंपैकी राज्याच्या तलवारीला "मपोम्पोन्सुओ तलवार" असंही म्हणतात. असांतेच्या लोकांसाठी ती फार मौल्यवान तलवार आहे.

पदाची शपथ देण्याकरिता राज्याचे प्रमुख आणि स्वतः राजा ती वापरतात.

इतिहासकार ओसेई-बोन्सू साफो-कंटाका यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं की, जेव्हा या कलाकृती असांतेकडून लुटण्यात आल्या तेव्हा आमचं मन, आमच्या भावना, संपूर्ण अस्तित्वाचा एक भाग हिरावून घेतला गेला होता.

पण, कलाकृती परत येणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच वादग्रस्तदेखील आहे.

युनायटेड किंगडमच्या कायद्यानुसार, व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय आणि ब्रिटिश संग्रहालयसारख्या राष्ट्रीय संग्रहालयांना त्यांच्या संग्रहालयातील वादग्रस्त वस्तू कायमस्वरूपी परत देण्यावर बंदी आहे. अशाप्रकारचे करार मूळ देशांना त्यांच्या वस्तू परत देण्यासाठी केले जातात.

पण, मर्यादीत कालावधीसाठी किंवा उधारीवर तात्पुरत्या स्वरुपात या कलाकृती देऊन ब्रिटनच्या स्वामित्वाबाबत स्वीकृती घेण्याचा हा प्रकार असल्याचं या कलाकृतींवर दावा करणाऱ्या काही देशांचं मत आहे.

घानाच्या नागरिकांना मात्र या कलाकृती त्यांच्या देशात कायमस्वरूपी राहिल्या पाहिजे, असं वाटत आहे. पण, हा करार म्हणजे ब्रिटिश कायदेशीर निर्बंधांवर मात करण्याचा एक मार्ग आहे.

आफ्रिकन देशांच्या लुटून नेलेल्या वस्तू परत मिळाव्या म्हणून त्यांनी वारंवार आवाज उठवला आहे.

2022 मध्ये जर्मनीनं नायजेरियाला 1000 ऐतिहासिक शिल्पं (बेनिन ब्राँझ) परत केले होते. त्यावेळी जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अंधकारमय "वसाहतवादी" इतिहास बदलण्यासाठीचं ते पाऊल असल्याचं म्हटलं होतं.