न्या. डी. वाय. चंद्रचूड: या दोन मराठी कुटुंबांनी देशाला दिले तीन सरन्यायाधीश

- Author, सिद्धनाथ गानू
- Role, प्रतिनिधी
- Reporting from, नवी दिल्ली
देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश म्हणून न्या. धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी सूत्रं हाती घेतली आहेत. वडील आणि मुलगा दोघेही सरन्यायाधीश होण्याचा बहुमान चंद्रचूड कुटुंबाला मिळाला आहे. त्यांच्याआधी सरन्यायाधीश असलेले न्या. लळित हेदेखील मराठीच.
या दोन कुटुंबांमधून देशाला तीन सरन्यायाधीश मिळाले. वकिली व्यवसायात प्रस्थापित अशा या दोन कुटुंबांचे संबंध खूप जुने आहेत, अगदी या दोन सरन्यायाधीशांच्या जन्मापूर्वीपासूनचे. वाचा त्यांची ही गोष्ट त्यांनीच सांगितलेल्या किश्श्यांमधून.
सरन्यायाधीश म्हणून कोर्ट नंबर एकमधील आपल्या शेवटच्या दिवशी न्या. लळित यांनी सवर्ण आरक्षणावर निकाल दिला. दिवसाअखेरीस प्रथेप्रमाणे कोर्ट क्र. 1 मध्ये मावळते सरन्यायाधीश आणि आगामी सरन्यायाधीश पीठासीन होते.
सर्वोच्च न्यायालयात आधी वकील आणि त्यानंतर न्यायमूर्ती अशी एकूण 37 वर्षांची कारकीर्द असलेल्या न्यायमूर्ती लळितांना कोर्टात उपस्थित वकिलांनी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी बोलताना न्या. लळितांनी एक आठवण सांगितली.
न्या. उदय लळितांची सुप्रीम कोर्टातली पहिली केस
“मी सुप्रीम कोर्टातील माझी प्रॅक्टिस याच एक नंबर कोर्टातून सुरू केली. मी मुंबईतून आलो होतो आणि मला तत्कालीन सरन्यायाधीशांसमोर एक मॅटर मेन्शन करून दाखल करून घ्यायचं होतं. ज्या सरन्यायाधीशांसमोर मी ते प्रकरण मेन्शन केलं त्यांचं नाव होतं न्या. यशवंत चंद्रचूड. त्यांच्याकडून आलेली सरन्यायाधीशपदाची धुरा विविध सरन्यायाधीशांकडून माझ्यापर्यंत आली आणि ता मी ती त्यांच्या मुलाकडे सुपूर्द करणार आहे.”
न्या. उदय उमेश लळित केवळ 74 दिवस सरन्यायाधीश होते. सरन्यायाधीशपदाच्या सर्वांत लहान कार्यकाळांमध्ये याची गणना होते.
उलटपक्षी न्या. चंद्रचूड यांना सरन्यायाधीशपदावर दोन वर्षांचा अवधी मिळेल. गेल्या दशकभरात कोणत्याही सरन्यायाधीशांना मिळालेला हा सर्वांत मोठा कार्यकाळ आहे.

लळितांच्या निरोप समारंभात बोलताना न्या. चंद्रचूडांनी आपल्या काही आठवणी सांगितल्या.
ते म्हणाले, “आमच्या कुटुंबांचे संबंध खूप मागेपर्यंत जातात. अगदी आमच्या जन्मापूर्वीपर्यंत. न्या. लळित यांचे वडील श्री. उमेश लळित फौजदारी वकिलीतलं एक मोठं नाव होतं. ते सोलापूरमधून मुंबईत आले आणि त्यांनी हायकोर्टात माझ्या वडिलांकडे ज्युनिअर म्हणून काम सुरू केलं.”

न्या. यशवंत चंद्रचूडांची कारकीर्द अनेक अर्थाने महत्त्वाची आहे. पुण्यात जन्मलेले आणि शिकलेले यशवंत चंद्रचूड 1961 साली बॉम्बे हाय कोर्टात न्यायाधीश झाले.
1972 साली त्यांना सुप्रीम कोर्टात न्यायाधीशपदी नियुक्ती मिळाली. सर्वाधिक काळ सरन्यायाधीशपदी राहिलेले न्यायमूर्ती म्हणून त्यांची नोंद आहे. 1978 ते 1985 अशी सात वर्षं ते या पदावर होते.
न्या. यशवंत चंद्रचूड यांची कारकीर्द
दीन दयाल उपाध्याय यांच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या आयोगाची स्थापना त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. 1997 साली जेव्हा भारतीय क्रिकेट संघावर मॅच फिक्सिंगचे आरोप झाले तेव्हा BCCI ने निवृत्त न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगाची स्थापना केली.

सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने आयोजित केलेल्या निरोप समारंभात न्या. चंद्रचूड यांनी लळितांचा आणखीन एक किस्सा सांगितला, ‘काही दिवसांपूर्वी आम्ही त्यांच्या कार्यालयात बसलो होतो. लळित वकील असताना त्यांचं तेव्हाच्या एका न्यायाधीशांबरोबर झालेलं एक संभाषण त्यांनी मला सांगितलं.
या संभाषणाचा त्यांच्या मनावर अमिट ठसा उमटला होता. न्यायाधीशाने समोर आलेला खटला कसा वाचावा याबद्दल ते बोलत होते. खटला वाचण्याचा उद्देश वकिलाला भेटण्याचा असावा, त्याला हरवण्याचा नाही (purpose of reading the brief should be to meet the lawyer, not beat the lawyer.) हे भेटणं वैचारिक पातळीवरचं असतं, वकिलांशी काही वैर नसतं त्यामुळे आक्रमक असण्याची गरज नाही.’
ज्या न्यायाधीशांशी लळितांचं बोलणं झालं होतं ते दुसरे तिसरे कुणी नसून साक्षात यशवंत चंद्रचूड होते असं त्याच कार्यक्रमात पुढे न्या. लळितांनी सांगितलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Facebook पोस्ट समाप्त
मराठीतूनच संभाषण
सुप्रीम कोर्टात जेव्हा समभाषिक न्यायाधीश एकत्र येतात तेव्हा ते अनेकदा आपल्याच भाषेत आपापसांत बोलतात. एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान लळित आणि चंद्रचूड यांच्यात असंच घडलं.
जम्मू-काश्मीरच्या इंजिनिअर्सची केस लळित आणि चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर होती. ते अपील होतं पण निर्णय याचिकाकर्त्यांच्या विरोधात गेला.
न्या. चंद्रचूड सांगतात, “त्यांना काहीतरी दिलासा मिळावा अशी आमचीही इच्छा होती पण कायदा त्यांच्या बाजूने नव्हता. त्यांचं अपील फेटाळल्यानंतर त्यांनी एक संकीर्ण याचिका दाखल केली. एखाद्या न्यायाधीशाने म्हटलं असतं की तुम्ही परत कशाला आलात? पण न्या. लळित आणि मी न्यायपीठावर बसलेलो असताना ते मला मराठीत म्हणाले, ‘यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे’ आणि आम्ही त्यांना काही दिलासा देता येतो का यासाठी विचार केला.”

न्या. लळितांनी 1986 साली सुप्रीम कोर्टात वकिली केली जवळपास तीन दशकं वकिलीनंतर ते न्यायाधीशपदी आले आणि अखेर सरन्यायाधीश म्हणून निवृत्त झाले. पण या सगळ्याची सुरुवात कुठे झाली? न्या. लळित हे वकिलांच्या कुटुंबातून येतात. त्यांचे वडील उमेश लळित फौजदारी वकील म्हणून नामांकित होते. पुढे मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशही झाले. लळितांच्या शपथविधी समारंभाला ते स्वतः राष्ट्रपती भवनात उपस्थित होते.
'वडिलांच्या ठिकाणी पोहचायचंय'
आपल्या वडिलांच्या कार्यकाळाची आठवण सांगताना न्या. लळित म्हणतात, “माझ्या वडिलांना न्यायाधीश म्हणून साधारण दोन वर्षांचा काळ मिळाला. मी त्यांना याआधी कधीच न्यायाधीश म्हणून कोर्टात पाहिलं नव्हतं, त्यांच्या शपथविधीलाही मी उपस्थित नव्हतो. त्यांचा कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी मी कोर्टात आलो आणि मी ते सगळं वातावरण पाहिलं आणि माझ्या मनात विचार आला की मला याच ठिकाणी पोहोचायचं आहे.”
2019 सालापासून देशाला चार सरन्यायाधीश मिळाले, योगायोग असा की त्यातील तीन न्यायाधीश मराठी आहेत. नोव्हेंबर 2019 मध्ये न्या. शरद बोबडे यांनी, ऑगस्ट 2022 मध्ये न्या. लळित यांनी तर नोव्हेंबर 2022 मध्ये न्या. चंद्रचूड यांनी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. 2024 सालापर्यंत न्या. चंद्रचूड सरन्यायाधीश पदावर असतील.











