'क्रोनोवर्किंग' : आपल्या आवडीच्या वेळी काम करण्याची पद्धत नेमकी आहे काय? वाचा

एलोईस स्किनर या अनेकदा मध्यरात्रीपर्यंत काम करत असतात. स्किनर या लेखिका, फिटनेस इन्स्ट्रक्टर आणि थेरपिस्टही आहेत.

दैनंदिन कामाचा विचार करता, त्या सुमारे 11 वाजता ईमेल चेक करण्यासाठी कंप्युटर सुरू करतात. त्यानंतर लंडनच्या एका जिममध्ये दुपारच्या किंवा सायंकाळच्या शिफ्टमध्ये त्या वर्कआऊटचे क्लासेस घेतात. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजेनंतर ठरलेल्या प्रोजेक्टचा सखोल अभ्यास करायला लागतात.

त्यावेळी जवळपास सगळं जग शांत व्हायला सुरुवात झालेली असते. तीच वेळ एकाग्रपणे काम करण्यासाठी योग्य ठरते, असं त्यांना वाटतं.

23 वर्षीय स्किनर स्वतःचं वर्णन रात्री जागणारं घुबड असं करतात. अनेक वर्षांपासून त्यांनी विविध भागांमध्ये नोकऱ्या केल्या. पण तरीही त्यांच्या सवडीनं काम कसं करता येईल, याचं नियोजन त्यांना करता येत नव्हतं.

"माझं बोलणं कदाचित काहीसं अतिरेकी वाटू शकतं. पण खरंच मला रात्री 8, 9 किंवा 10 वाजता अधिक एकाग्रपणे काम करता येतं. त्याचवेळी माझ्याकडून अधिक चांगलं काम होतं," असंही स्किनर यांनी म्हटलं.

कोव्हिडनंतर लोकांची त्यांच्या वेळेनुसार काम करण्याची इच्छा वाढू लागली आहे. त्यामुळं असा सर्वांनाच स्किनर यांच्यासारखं स्वतःच्या आवडीच्या वेळी किंवा वेळेच्या नियोजनानुसार काम करावं वाटत आहे.

याचा परिणाम म्हणजे, सध्या अनेक जण अधिक उत्पादक (दर्जेदार) काम करता यावं म्हणून कंपन्यांकडं त्यांच्या इच्छेनुसार कामाचे तास नेमून देण्यासाठी दबाव आणत आहेत. त्याला 'क्रोनोवर्किंग' असं म्हटलं जात आहे.

'क्रोनोवर्किंग' ही संकल्पना सर्वात आधी पत्रकार एलेन सी स्कॉट यांनी मांडली. 'क्रोनोवर्किंग' मुळं कर्मचाऱ्यांना ठरलेल्या कामाच्या तासांच्या ऐवजी त्यांना क्रोनोटाइपनुसार सोयीचे ठरणारे कामाचे तास निवडण्याची संधी मिळते. क्रोनोटाइप म्हणजे व्यक्तीच्या शरिराला नैसर्गिकरित्या झोपायचं असतं ती वेळ.

अमेरिकेतील मानसोपचारतज्ज्ञ आणि स्लीप डॉक्टर मायकल ब्रूस यांच्या मते, चार क्रोनोटाइप असतात. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार 55% कर्मचाऱ्यांना त्यांची सर्वाधिक उत्पादकता दिवसाच्या मधल्या वेळेत (10.00 ते 14.00) जाणवत असते. तर 15% कर्मचाऱ्यांना सकाळी लवकर काम सुरू करणं योग्य वाटतं आणि 15% लोकांना रात्री उशिरापर्यंत काम करणं आवडतं. तर 10% कर्मचाऱ्यांमध्ये हा कालावधी बदलत जाणारा असा असतो.

लोकांच्या कामाच्या तासाच्या आवडीमध्ये फरक आढळत असला तरी, सध्या 9 ते 5 हीच आठ तासांची वेळ कामाची आदर्श आणि पारंपरिक वेळ ठरली आहे. प्रत्यक्षात कामाची ही वेळ सन 1800 मध्ये अमेरिकेतील कामगार संघटनांची ठरवली होती.

याचा परिणाम म्हणजे अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवडीच्या किंवा सर्वाधिक कामाची क्षमता असलेल्या वेळेऐवजी या ठरलेल्या वेळेतच काम करावं लागतं.

याबाबत जानेवारीमध्ये एक छोटंसं सर्वेक्षणही करण्यात आलं. अमेरिकेतील 1500 कर्मचाऱ्यांवरील या सर्वेक्षणात 94% लोकांनी त्यांच्याबरोबर असं घडत असल्याचं सांगितलं. तर 77% कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठरावीक अनिवार्य तासांमुळं त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचं म्हटलं.

यापैकी अर्ध्या लोकांनी कामाच्या दरम्यान डुलकी (झोप) घेत असल्याचं सांगितलं. 42% कर्मचारी शरिरात ऊर्जा राहावी म्हणून कॅफेनचं सेवन करतात आणि 43% कर्मचारी तणाव दूर घालवण्याच्या पद्धतींचा अवलंब करतात.

क्रोनोवर्किंग ही काही नवी संकल्पना नाही. पण कोव्हिडच्या साथीनंतर घरून किंवा हायब्रिड काम करण्याचं चलन अधिक वाढलं त्यामुळं, याकडं लोकांचं अधिक लक्ष वेधलं गेलं, असं मत ब्रसेल्सच्या व्लेरिक बिझनेस स्कूलमधील एचआर मॅनेजमेंटचे प्राध्यापक डर्क बुयेन्स यांनी व्यक्त केलं.

"आपण सर्वाधिक चांगलं काम कधी करू शकतो आणि त्यातून अधिकाधिक उत्पादकता कशी मिळवू शकतो हे आपल्याला माहित असतं."

बुयेन्स यांच्या मते, कर्मचाऱ्यांना आणि विशेषतः तरुण कर्मचाऱ्यांना अधिक चांगलं काम करता येईल, अशा वेळी काम करण्याची संकल्पना अधिक भावत असते. पण क्रोनोवर्किंगमुळं कंपन्यांनाही फायदा होऊ शकतो असं बुयेन्स म्हणाले.

कर्मचाऱ्यांना ज्यावेळी ते सर्वोत्तम काम करू शकतात असं वाटतं, तेव्हा काम करण्याची परवानगी दिल्यामुळं त्यांची कार्यक्षमता वाढू शकते. त्याचबरोबर कर्मचारी कंपनी सोडून जाण्याचं प्रमाणही कमी होऊ शकतं.

"कर्मचारी आनंदी असतील आणि मॅनेजरनं त्यांना आवडीच्या वेळेनुसार काम करण्याची परवानगी दिली तर ते कंपनीत जास्तीत जास्त काळ राहण्याची शक्यता वाढते," असंही ते म्हणाले.

पण ही पद्धत सगळीकडं प्रचलित नाही. अनेक कंपन्यांना अजूनही हे फार सोयीचं वाटत नाही. तसंच अनेक ठिकाणी हे व्यवहार्य ठरू शकत नाही. ग्राहक केंद्रीत व्यवसाय, बाह्य गोष्टींशी संबंध असलेल्या कंपनी किंवा शेअर मार्केटसारख्या ठिकाणी कदाचित हे फारसं योग्य ठरू शकणार नाही.

पण असं असलं तरी मर्यादा नसलेल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या ठिकाणी कर्मचारी असलेल्या कंपन्या मात्र याचा अवलंब करत आहेत.

लंडनमधील जॉब फर्म फ्लेक्सामधील 17 कर्मचाऱ्यांपैकी एकही कर्मचारी, कामासाठी एका ठरावीक वेळेचं पालन करत नाही. त्याऐवजी त्यांना सर्वोत्तम काम करण्यास सक्षम असेल असं वाटतं तेव्हा काम करायचं स्वातंत्र्य असतं, असं सीईओ मॉली जॉन्सन-जोन्स यांनी सांगितलं.

काही जण सकाळी लवकर साडेसातच्या सुमारास काम सुरू करतात तर काही 11 वाजता आणि काही अगदी संध्याकाळनंतर काम सुरू करतात, असंही त्यांनी सांगितलं.

रिमोट ऑर्गनायझेशनसाठी ही अगदी योग्य संकल्पना असल्याचं त्या म्हणाल्या. "सगळ्यांनी सोबत आणि एकाचवेळी काम करायला हवं हे गरजेचं नसल्याचं ते म्हणाले. तुम्ही वेगवेगळ्या वेळेला काम केलं तर तुम्हाला अधिक मोबदला मिळू शकतो," असंही त्यांनी म्हटलं.

यामुळं मुलांची जबाबदारी असलेले पालक आणि इतर जबाबदारी असलेल्यांसाठी अशाप्रकारचं कामाचं शिथिल वेळापत्रक फायद्याचं ठरू शकतं. कारण जबाबदाऱ्यांमुळं त्यांना 9-5 दरम्यान कामात अडकून राहणं कठिण ठरत असतं, असं मॉली म्हणाल्या.

पण त्याचबरोबर क्रोनोवर्किंगमुळं काही आव्हानांचाही सामना करावा लागू शकतो, असा इशाराही बुयेन्स यांनी दिला.

या प्रकारामुळं कर्मचाऱ्यांना त्यांच्या पद्धतीनं स्वतंत्रपणे काम करण्याची संधी मिळत असली तरी एकत्र काम करणाऱ्यांना बैठका किंवा इतर गोष्टींसाठी किमान काही काळ एकत्र असणं गरजेचं असतं. कारण काही प्रोजेक्टवर ते एकत्र काम करत असतात.

तसंच एका टीममधील लोकांना एकमेकांच्या कामाच्या वेळांबाबत माहिती असणंही गरजेचं असतं. मॅनेजर्सना कर्मचाऱ्यांचं काम व्यवस्थित होत आहे किंवा नाही यावर लक्ष ठेवणं कठिण ठरू शकतं. तसंच प्रत्येकवेळी मार्गदर्शन करणारे उपस्थित असतील याची काळजीही त्यांना घ्यावी लागू शकते.

पण क्रोनोवर्किंगचा अवलंब करणाऱ्या कंपन्या यावर मार्गही शोधू शकतात. उदाहरण द्यायचं झाल्यास, फ्लेक्सामधील सर्व कर्मचाऱ्यांनी 11:00 ते 15:00 या महत्त्वाच्या वेळेत ऑनलाईन राहणं आवश्यक असतं. त्यामुळं त्यांना एकत्रितपणे करायची कामं पूर्ण करायला मदत मिळते.

इतर कंपन्या मिटींगचं रेकॉर्डींग करण्यासाठी आणि उपस्थित नसलेल्या कर्मचाऱ्यांबरोबर शेअर करण्यासाठी सॉफ्टवेअरची मदत घेतात.

जॉन्सन-जोन्स यांच्या मते, आव्हानांच्या तुलनेत यामुळं मिळणारे फायदे अधिक आहेत. "आपल्याला लोकांकडून अधिक काम मिळू शकतं आणि त्यांनाही त्यांच्या वेळेनुसार काम करता येऊ शकतं," असंही त्या म्हणाल्या.

"काही कर्मचारी सकाळी काम करणारे असतात, काहींना संध्याकाळी काम करायला आवडतं तर काही मधल्या वेळेत काम करतात. आपण सगळे वेगवेगळे आहोत. त्यामुळं सर्वांनी एकाच प्रकारच्या वातावरणात काम करण्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे," असं मत त्यांनी व्यक्त केलं.