मुंबईतल्या या चौकात कम्युनिस्ट क्रांतीचा पहिला महानायक भेटतो...

    • Author, नामदेव काटकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

भारत आणि रशियाचं नातं हे आता व्यापारी संबंधांवर जोखलं जातं. मात्र, पूर्वी ते केवळ इतकंच नव्हतं. हे नातं वैचारिक, सांस्कृतिक धाग्यांनीही जोडलं होतं. आजही काहीअंशी तसं आहे म्हणा. अगदीच वीण उसवलीय असंही नाही.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, अभिनेते राज कपूर यांसारख्या भारतीय व्यक्तींची रशियात अमाप लोकप्रियता होती. हे नातं भारतानंही जोपासलं. द्विराष्ट्रीय संबंधांतूनही आणि प्रतिकांच्या बाबतीतही.

दिल्लीतल्या अवाढव्य भूभागावर पसरलेल्या नेहरू पार्कात आजही व्लादिमीर लेनिन यांचा पूर्णाकृती पुतळा दिमाखात उभा असलेला दिसतो. ‘नेहरू पार्कात लेनिन’ हे कॉम्बिनेशन म्हणजे भारत-रशिया संबंधांचं प्रतिक जणू!

हे नातं महाराष्ट्राशी तर अधिक जवळचं आहे. अगदी उदाहरणादाखल सांगायचं तर अण्णाभाऊ साठे. तुम्ही ‘माझा रशियाचा प्रवास’ पुस्तक वाचलं असाल, तर स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्योत्तर काळातही महाराष्ट्रातील साहित्य-सामाजिक क्षेत्रात रशिया, तिथले नेते यांचा किती प्रभाव होता, हे कळून यावं!

फ्योदर दस्तयेवस्कीच्या ‘क्राईम अँड पनिशमेंट’पासून मॅक्झिम गोर्कीच्या ‘मदर’पर्यंत अनेक अजरामर रशियन साहित्यकृती भारतीय वाचकांच्या किताबखान्यात आजही अढळ स्थान पटकावून आहेत.

रशियासोबतचं महाराष्ट्राचं-मुंबईचं नातं सांगणारं एक ठिकाण आजही एका चौकात का होईना, पण ओळख जोपासून आहे. ते ठिकाण म्हणजे – लेनिनग्राड चौक.

मुंबईतील दादर शहरातील एका चौकाचं नाव वाचल्यावर आजही अनेकांना आश्चर्य वाटतं.

रशियन राज्यक्रांतीचे प्रणेते व्लादिमीर लेनिन आणि या राज्यक्रांतीचं होमग्राऊंड ज्या शहराला मानलं गेलं, त्या ‘लेनिनग्राड’ शहरावरून 1980 च्या दशकात दादरमधील या चौकाचं नाव ठेवण्यात आलं.

पण विशेष म्हणजे, रशियातल्या ज्या ‘लेनिनग्राड’ शहरावरून या चौकाचं नाव ‘लेनिनग्राड चौक’ असं ठेवण्यात आलं, त्या शहराचंही नाव बदलून आता ‘सेंट पिटर्सबर्ग’ करण्यात आलंय. मात्र, मुंबईतल्या या चौकानं अजूनही रशियन क्रांतीसोबतचं आपलं नातं जपून ठेवलंय.

या लेनिनग्राड चौकाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

मुंबईतलं ‘लेनिनग्राड’

मुंबईतलं दादर शहर तसं महाराष्ट्र आणि भारतभर अनेकांना परिचित आहे. इथली काही ठिकाणं कायमच बातम्यांमध्ये, चर्चेत आणि भेटीगाठीची राहिली आहेत.

त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं घर राजगृह, स्मृतिस्थळ चैत्यभूमी, महाराष्ट्रातील दिग्गजांच्या भाषणांनी गाजलेलं शिवाजी पार्क मैदान, शिवसेना भवन इत्यादी ठिकाणांमुळे दादरचं नाव सर्वदूर पसरलंय.

याच दादरमधली सयानी मार्ग आणि अप्पासाहेब मराठे मार्ग जिथे एकमेकांना भेटतात, त्या चौकात ‘लेनिनग्राड चौक’ असं फलक दिसतं.

रशिया आणि मुंबईचं नातं सांगणाऱ्या या चौकाबद्दल अनेकांना कायमच उत्सुकता असते.

एकीकडून अप्पासाहेब मराठे मार्ग येतो आणि दुसरीकडे सयानी मार्ग. बरं या दोन्ही मार्गांचाही स्वतंत्र इतिहास आहे. त्यात खोलात न शिरता या दोन्ही मार्गांबद्दल थोडक्यात सांगायला हवंच.

अप्पासाहेब मराठे हे कराचीस्थित उद्योगपती. फाळणीनंतर भारतात आले. सखाराम पुरुषोत्तम मराठे असं त्यांचं पूर्ण नाव. मराठे उद्योगभवनाचे ते संस्थापक. मराठे उद्योगभवनाचे मुख्यालय या मार्गावर असल्यानं अप्पासाहेबांचं नाव या मार्गाला देण्यात आलं.

दुसरा मार्ग सयानी मार्ग. काँग्रेस नेते रहिमतुल्ला मोहम्मद सयानी यांच्या नावानं दादरमधील हा सयानी मार्ग आहे. परदेशातून वकिलीचं शिक्षण घेऊन आलेले सयानी मुंबई महापालिकेचे सदस्य होते. तसंच, 1885 साली मुंबईचे शेरीफही होते. 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात ते सहभागी झाले होते.

तर हे अप्पासाहेब मराठे मार्ग आणि सयानी मार्ग जिथे एकमेकांना भेटतात, तिथे ‘लेनिनग्राड चौक’ आहे. याच लेनिनग्राड चौकात कम्युनिस्टांची ओळख जपून असलेलं भुपेश गुप्ता भवन आहे. या चौकाला लेनिनग्राड चौक असं नाव देण्याआधीपासून भुपेश गुप्ता भवन तिथं आहे.

या चौकाला लेनिनग्राडचं नाव देण्यात आलं ते 1984 साली.

मुंबई महापालिकेतल्या नगरसेवकांनी एकमतानं या चौकाला ‘लेनिनग्राड चौक’ असं नाव देण्याचं ठरवलं.

त्यानंतर प्रत्यक्षात नामकरणाचा सोहळा 30 मार्च 1984 रोजी पार पडला.

या सोहळ्याला मुंबई महापालिकेचे तत्कालीन महापौर मनमोहनसिंह बेदी आणि सोव्हियत रशियाचे भारतातील तत्कालीन राजदूत वासिली ऱ्याकोव्ह यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसंच, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र शाखेचे चिटणीस माधवराव गायकवाड, बांधकाम समितीचे अध्यक्ष गोविंदराव शिर्के, स्थानिक नगरसेवक जयवंत पाटील हेही उपस्थित होते.

या चौकाच्या नामकरणावेळी वासिली ऱ्याकोव्ह म्हणाले की, “विविध क्षेत्रात भारत समर्थ आणि एकसंध राहावा म्हणून सोव्हियत कायमच सहकार्य देत असतो.”

या चौकाच्या नामकरण सोहळ्याच्या काहीच दिवसात म्हणजे 3 एप्रिल 1984 रोजी भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा आणि सोव्हियतच्या अंतराळवीरांसोबत अवकाश उड्डाण घेणार होते. त्याचाही उल्लेख वासिली ऱ्याकोव्ह यांनी इथं भाषणावेळी केला होता.

या चौकाला नाव ज्यांच्या कार्यकाळात दिला गेला, ते म्हणजे महापौर मनमोहनसिंह बेदी. ते स्वत: या सोहळ्याला उपस्थितही होते.

हे मनमोहनसिंह बेदी मुंबईचे पहिले शिख महापौर. त्यांची पार्श्वभूमीही महत्त्वाची आहे. ते मूळचे पाकिस्तानातील सारगोधाचे. फाळणीनंतर मुंबईत आले, मुंबईतच लहानाचे मोठे झाले. 1957 सालापासून ते मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून जात होते.

1984 साली जनता पार्टीकडून ते मुंबईचे महापौर म्हणून निवडले गेले. महापौरपदाच्या निवडणुकीत 100 हून अधिक मतं मिळवणारे ते पहिले महापौर ठरले.

मनमोहनसिंह बेदी यांची आणखी एक ओळख म्हणजे, ‘शेर-ए-पंजाब’ या रेस्टॉरंटचे मालकही तेच. या रेस्टॉरंटची मोठी साखळी मुंबईभर आहे.

तर एकूणच लेनिनग्राड चौक असं नामकरण करण्यात अशा अनेकांचा हातभार होता. मुंबई आणि रशियाचं नातं या चौकानं अधिक गहिरं केलं. आजही या चौकात ‘लेनिनग्राड चौक’ हे फलक ठळकपणे दिसतं.

भारत-रशिया संबंध आजही सुदृढ स्थितीत आहेत. सांस्कृतिक, वैचारिक संबंध किती उरलेत, याची पुनर्तपासणी करता येईल, मात्र व्यापारी संबंध अधिक दृढ झालेत, यात शंका नाही.

आता रशियातल्या ‘लेनिनग्राड’चा इतिहास आपण थोडक्यात जाणून घेऊ.

‘लेनिनग्राड’चं ‘सेंट पिटर्सबर्ग’ होताना...

सेंट पिटर्सबर्ग शहर बोल्शेव्हिक क्रांतीचं उगमस्थान होतं.

पहिल्या महायुद्धानंतर काही वर्षांतच व्लादिमीर लेनिन यांचं निधन झालं. लेनिन रशियन राज्यक्रांतीचे प्रणेते होते आणि सोव्हियत कम्युनिस्ट विचारधाराचे संस्थापक होते.

लेनिन यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 1924 साली ‘सेंट पिटर्सबर्ग’चं नामकरणं 'लेनिनग्राड' असं करण्यात आलं. हे नामकरण जितक्या सहजतेनं झालं, तितकं लेनिनग्राडचं पुन्हा सेंट पिटर्सबर्ग करणं सहज झालं नाही. त्यासाठी जनमत चाचणी घेण्यात आली होती.

1991 नंतर म्हणजे USSR च्या विघटनानंतर नव्या सुधारणावादी नेत्यांना लेनिन यांचं नाव कुठेच नको होतं. त्यांच्या दृष्टीने, लेनिन यांचं नाव नाकारण्याचा अर्थ होता की, एकाधिकारशाहीपासून दूर जाणं आणि युरोपच्या दिशेनं प्रवास करणं.

यातूनच जेव्हा लेनिनग्राडचं नाव बदलण्यासाठी जनमत चाचणीची घोषणा झाली, तेव्हा कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी या चाचणीला कडाडून विरोध केला. अनेकजण रस्त्यावर उतरले होते. कारण लेनिनग्राड हे लेनिनच्या वारशाचा आणि कम्युनिस्टांचा शेवटचा बालेकिल्ला होता.

दुसरीकडे, सोव्हियत रशियाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या शहराचं नाव ठरवण्याची संधी नागरिकांना मिळणार होती. यासाठी जनमत चाचणी होऊ घातली होती.

लेनिनग्राड शहराच्या नामांतरासाठी जनमत चाचणी होणार होती, तेव्हा अॅनाटोली सोबचाक हे या शहराचे महापौर होते. त्यांच्या पत्नी आणि इतिहासकार ल्युडमिल्ला नरुसोव्हा यांनी बीबीसीशी तत्कालीन स्थितीबद्दल बातचित केली होती.

ल्युडमिल्ला नरुसोव्हा यांच्या म्हणण्यानुसार, “आम्हाला वाटलंही नव्हतं की, आम्ही शहराचं नाव बदलण्यात यशस्वी होऊ. कारण विरोधक (कम्युनिस्ट) ताकदवान होते. मला आठवतंय, आमच्या घराबाहेर चोवीस तास पहारा दिला जायचा. कम्युनिस्ट घोषणा द्यायचे की, आम्ही तुम्हाला लेनिनचं नाव मिटवू देणार नाही.”

जनमत चाचणीचा निकाल आला, तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण ‘लेनिनग्राड’चं नाव बदलून ‘सेंट पिटर्सबर्ग’ करण्याच्या बाजूनं बहुमत होतं.

आणि अशा प्रकारे 1924 ते 1991 असा 67 वर्षे ‘लेनिनग्राड’ नावानं ओळखलं जाणारं ‘सेंट पिटर्सबर्ग’ त्याच्या मूळ नावावर परतलं.

युरोपाची खिडकी

सेंट पिटर्सबर्ग या नावाला सुद्धा इतिहास आहे.

सेंट पिटर्सबर्ग रशियाच्या वायव्य दिशेला असलेलं प्रमुख शहर आहे. नेव्हा नदीच्या काठावर वसलेलं हे शहर रशियाची दुसरी राजधानी म्हणून ओळखलं जातं. आर्थिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि भौगोलिकदृष्ट्या या शहराला रशियात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे.

पिटर द ग्रेटनं 27 मे 1703 रोजी या शहराची उभारणी केली. सेंट पिटर्सबर्गच्या भौगोलिक स्थानामुळे रशियातली युरोपची खिडकी म्हणूनही या शहराकडे पाहिलं जातं.

सेंट पिटर यांच्या नावानं या शहराला हे नाव देण्यात आलं. ख्रिश्चन धर्मात पिटर यांना संतपद बहाल करण्यात आलंय. त्यामुळे सेंट पिटर असंच त्यांचं संबोधन होतं. येशू ख्रिस्ताचे निकटवर्तीय आणि पहिल्या शिष्यांपैकी एक सेंट पिटर होते.

1914 पर्यंत सेंट पिटर्सबर्ग, 1914 ते 1924 पेट्रोग्राड, 1924 ते 1991 लेनिनग्राड आणि 1991 च्या जनमत चाचणीनंतर पुन्हा सेंट पटिर्सबर्ग असा या शहराच्या नावाचा प्रवास आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)