IND vs AUS : वर्ल्ड कप फायनलचा तो टर्निंग पॉइंट जेव्हा भारताच्या हातातून सामना निसटला

    • Author, अभिजीत श्रीवास्तव
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताचा सहा गडी राखून पराभव करत ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा चॅम्पियन ठरली.

अंतिम सामन्यात भारतीय संघाने 240 धावा केल्या आणि ट्रॅव्हिस हेडच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 43 षटकांत विजय मिळवला.

या सामन्याच्या सुरुवातीला सर्वकाही व्यवस्थित चाललेलं. रोहित शर्मा आपल्या स्फोटक शैलीत फलंदाजी करत होता.

चार षटकांत तीस धावा केल्या आणि सलामीचा जोडीदार शुभमन गिल पाचव्या षटकात बाद होऊनही त्याने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला.

रोहितने 10 व्या षटकाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर एक षटकार आणि एक चौकार मारलेला. इथवर की 76 धावा झालेल्या आणि धावांची सरासरी आठच्या वर होती.

ग्लेन मॅक्सवेल गोलंदाजी करत होता आणि हे पॉवरप्लेचं शेवटचं षटकही होतं, त्यामुळे रोहितला पुन्हा मोठा फटका खेळायचा होता. मात्र, रनरेटचा विचार करता त्या शॉटची अजिबात गरज नव्हती, असं अनेकांचं म्हणणं आहे.

जेव्हा स्टेडियममध्ये शांतता पसरली

रोहितचा तो शॉट सामन्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला जो शेवटी संघाच्या हातातून विश्वचषक निसटण्याचं सर्वात मोठं कारण ठरला.

मॅक्सवेलने रोहितला चांगला लेन्थ बॉल टाकला. ज्यावर रोहितला लाँग ऑफवर शॉट मारायचा होता, पण चेंडू त्याच्या बॅटच्या कडेला लागून कव्हर एरियात हवेत उसळला.

पॉइंटवर उभ्या असलेल्या ट्रॅव्हिस हेडने तिथून उलट धावायला सुरुवात केली आणि अशक्य वाटणारा झेल घेत रोहितला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवलं.

ट्रॅव्हिस हेड या विश्वचषकाच्या सुरुवातीला दुखापतग्रस्त झालेला. तंदुरुस्त झाल्यानंतर तो जेव्हा संघात परतला तेव्हा त्याने 59 चेंडूत शतक झळकावलं आणि संघाला न्यूझीलंडवर विजय मिळवून दिला.

या झेलनंतर उपांत्य फेरीत आणि आता अंतिम फेरीत त्यानं आपल्या संघाला सामना जिंकून दिला. विक्रमी शतक झळकावून तो 'प्लेअर ऑफ द मॅच’सुद्धा ठरला.

रोहित बाद झाल्यानंतर समालोचक आणि क्रिकेट तज्ज्ञ हर्ष भोगले यांनी एक्सवर पोस्ट केलं की, "ऑस्ट्रेलिया दाखवून देतंय की महत्त्वाच्या दिवशी क्षेत्ररक्षणात कसा बदल करता येऊ शकतो.”

सामन्यानंतर माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि संजय मांजरेकर यांनीही रोहित शर्माचा झेल हा या अंतिम फेरीचा टर्निंग पॉइंट होता हे मान्य केलं.

रोहित शर्माने 151.61 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि जोपर्यंत तो खेळपट्टीवर होता तोपर्यंत संघाच्या एकूण धावसंख्येपैकी 62 टक्के धावा त्याच्या बॅटमधून आल्या.

अंतिम फेरीच्या सामन्याच्या एक दिवस आधी ऑस्ट्रेलियन कर्णधाराने सांगितलेलं की, आपल्या संघाने अहमदाबादमधील प्रेक्षकांना आपल्या कामगिरीने शांत ठेवावं आणि रोहित शर्मा बाद झाल्यानंतर नेमकं हेच घडलं.

सामन्यानंतर भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाला की, “रोहितची विकेट जाणं दुर्दैवी होतं.”

जेव्हा सामना हातातून निसटू लागला...

आम्ही सतत विकेट्स गमावत राहिलो आणि चांगली फलंदाजी केली नाही, असंही प्रशिक्षक द्रविड म्हणाला.

राहुल द्रविड रोहितनंतर लगेचच श्रेयस अय्यर बाद होण्याबद्दल आणि विराट कोहलीच्या विकेटनंतर रवींद्र जडेजा आणि केएल राहुलला बाद होण्याबद्दल बोलत होता.

खरंतर विराट कोहलीने 63 चेंडूत 54 धावांची खेळी केली, तर केएल राहुलने 66 धावा करण्यासाठी 107 चेंडू खर्च केले. या दरम्यान त्यांचा स्ट्राइक रेट फक्त 61.68 होता.

इतकंच नाही तर रोहित आणि श्रेयस बाद झाल्यानंतर भारतीय संघाला पुढच्या 16 षटकात एकही चौकार मारता आला नाही आणि 8 च्या वर असलेला रनरेट प्रति षटकात जवळपास पाच धावांवर घसरला.

विराट आऊट झाला तेव्हा सूर्यकुमारच्या जागी आलेल्या रवींद्र जडेजाने 22 चेंडूत केवळ 40.90 च्या स्ट्राईक रेटने केवळ 9 धावा करून धावांचा वेग खाली आणला त्यामुळे मोठ्या धावसंख्येच्या आशा धुळीस मिळाल्या. अखेर संघाला धावफलकावर केवळ 240 धावाच नोंदवता आल्या.

प्रशिक्षक राहुल द्रविड काय म्हणाला?

सामन्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रशिक्षक द्रविडने या सामन्यातील संथ फलंदाजीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की,

"या स्पर्धेत आम्ही घाबरून खेळलो नाही. या सामन्यातही आम्ही 10 षटकांमध्ये 80 धावा केल्या.

तुम्हाला फ्रंटफूटवर खेळावंच लागतं. पण या सामन्यामध्ये जेव्हा आम्ही थोडा आक्रमक खेळ करण्याचा विचार केला, तेव्हा विकेट पडल्या. जर तुम्ही मध्येच विकेट गमावल्या तर तुम्हाला थोडं बचावात्मक खेळ करावा लागतो.”

तो म्हणाला, "आम्ही 30-40 धावा कमी केल्या हे आम्हाला माहीत होतं. पण आम्ही सतत विकेट गमावत राहिलो. जेव्हा विराट, जड्डू आणि नंतर राहुलची विकेट पडली तेव्हा आम्ही 30-40 धावा कमी करून बाद झालेलो. आम्ही जर 280 च्या आसपास धावा केल्या असत्या तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.

कर्णधार रोहित शर्मा काय म्हणाला?

सामना गमावल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने देखील पुनरुच्चार केला की आम्हाला किमान 280च्या आसपास धावसंख्येची अपेक्षा होती.

तो म्हणाला, "आज आम्ही चांगलं खेळलो नाही. खरं सांगायचं तर, विराट आणि राहुल जेव्हा खेळपट्टीवर होते, तेव्हा आमचे लक्ष्य 270-280 धावांचं होतं पण आम्ही लवकर विकेट गमावल्या. आम्ही किमान 20-30 धावा गमावल्या. "

कमिन्सला भारतीय संघाकडून किती धावांची अपेक्षा होती?

राहुल द्रविड किंवा रोहित शर्मा काहीही म्हणोत, ऑस्ट्रेलियच्या कर्णधाराचा हेतू वेगळा होता. पॅट कमिन्सने सामन्यानंतर जे सांगितले त्यावरून प्रथम गोलंदाजी करण्यापूर्वी तो काय विचार करत होता आणि किती धावसंख्येची अपेक्षा करत होता हे स्पष्टपणे समजू शकतं.

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने सांगितलं की, आम्हाला 300 धावांची अपेक्षा होती.

यावरून कांगारूंचा हा संघ किती लढवय्या आहे आणि मोठ्या सामन्यापूर्वी त्यांच्या तयारीची पातळी काय आहे याचा अंदाज बांधता येतो.

ते आपल्या विरोधी संघाला कमी लेखत नाहीत आणि म्हणूनच या विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिकेकडून पहिले दोन सामने गमावल्यानंतर सलग सात सामने जिंकून त्यांनी उपांत्य फेरी गाठली.

जेव्हा अंतिम फेरी आली तेव्हा पुन्हा तोच संघ समोर होता ज्यांच्या विरुद्ध त्यांनी स्पर्धेतील पहिला साखळी सामना गमावला होता.

म्हणजेच भारताने सलग 10 सामने जिंकले असले तरी ऑस्ट्रेलियन संघानेही सर्व संघांना पराभूत करत सहाव्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरत वर्चस्व प्रस्थापित केलंय.

भारतीय संघ फायनलमध्ये हरला असला तरी या विश्वचषकातून त्याने नक्कीच खूप काही साध्य केलंय.

हे वाचलंत का?

हा व्हीडिओ पाहिलात का?

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता