शुभमन गिलनं मोडला गावसकरांचा 50 वर्षांपूर्वीचा विक्रम, इंग्लिश गोलंदाजांची धुलाई

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अनुपम प्रतिहारी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील एक युवा आणि अनुभव कमी असलेला संघ, तरीही या संघानं 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात तब्बल 835 धावा केल्या.
धावांचा एवढा मोठा डोंगर रचूनही, पाच फलंदाजांनी शतकं झळकावली तरी टीम इंडियाला इंग्लंडकडून पाच गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.
क्रिकेटच्या इतिहासात पाच शतकं झाल्यानंतर एखादा संघ पराभूत होतो, असं फारच कमी वेळा घडलं आहे. पण इंग्लंडनं हेडिंग्लेच्या मैदानावर हे करून दाखवलं होतं.
कोणताही दुसरा संघ असता, तर हेडिंग्ले येथे झालेल्या मोठ्या पराभवानंतर गडबडला असता, डळमळीत झाला असता. पण हा संघ तसा नाही. इतकंच नाही तर जसप्रीत बुमराहसारखा प्रमुख गोलंदाज संघात नसतानाही नाही!
कर्णधार शुभमन गिलने आपल्या बॅटनं जोरदार प्रत्युत्तर देत भारताच्या पुनरागमनाची कहाणी लिहिली.
त्यानं खेळलेली 269 धावांची वैयक्तिक खेळी ही भारताच्या 93 वर्षांच्या कसोटी इतिहासात कोणत्याही भारतीय कर्णधारानं केलेली सर्वोच्च खेळी ठरली आहे.
ही खेळी गिलच्या कसोटी कारकीर्दीतील त्याची सर्वात मोठी वैयक्तिक कामगिरी होती आणि दुसऱ्या सामन्यात त्याचं पहिलं द्विशतकही ठरलं.
पण हे स्पष्ट दिसत होतं की, तो स्वतःसाठी नव्हे, तर संघासाठी खेळत होता. नवीन संघाला आकार देण्यासाठी त्याचं एक अनोखं आणि महत्त्वाचं पाऊल होतं.

हेडिंग्लेतील पराभवाने टीम इंडियाला कल्पनाही न करता येईल इतकं बळकट केल्याचं दिसतं. दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात भारतानं 587 धावांची भलीमोठा धावसंख्या उभारली आणि या खेळीचं नेतृत्व शुभमन गिलने केलं.
याव्यतिरिक्त, दुसऱ्या दिवशी भारताने इंग्लंडला केवळ 3 गडी गमावून 77 धावांवर रोखलं. या दरम्यान बेन डकेट शून्यावर (डक) आणि ओली पोप पहिल्याच चेंडूवर (गोल्डन डक) बाद झाले.
हे दोन्ही फलंदाजांना अवघ्या दोन चेंडूंमध्ये आकाश दीपने माघारी पाठवलं.
गिलने रचले विक्रमांचे इमले
भारताचा कर्णधार शुभमन गिलनं इंग्लंडविरुद्धच्या बर्मिंगहम कसोटीत 387 चेंडूंमध्ये 30 चौकार आणि 6 षटकारांसह 269 धावांची खेळी केली.
गिलची ही कसोटी कारकीर्दीतली सर्वोत्तम खेळी असून यादरम्यान त्यानं विराट कोहली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावसकर यांच्यासारख्या दिग्गजांना मागे टाकत अनेक विक्रम मोडले.
पुरुषांच्या कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही भारतीय कर्णधारानं केलेली ही सर्वोत्तम खेळी ठरली आहे. याआधी विराट कोहलीनं 2019 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 254 धावांची खेळी केली होती.
परदेशात द्विशतक ठोकणारा गिल हा कोहलीनंतरचा दुसराच भारतीय कर्णधार आहे. तसंच कर्णधार म्हणून शतक ठोकणारा तो सर्वात तरूण भारतीय आहे.

आशिया खंडाबाहेर कोणत्याही भारतीय पुरुष फलंदाजानं रचलेली ही सर्वोत्तम खेळी आहे. याआधी सचिननं 2004 साली सिडनी कसोटीत नाबाद 241 धावा केल्या होत्या.
तसंच इंग्लंडमध्ये कोणत्याही भारतीयानं ठोकलेलं हे सर्वोत्तम द्विशतक आहे. इंग्लंडमध्ये खेळताना याआधी सुनील गावसकर यांनी 1979 साली 221 तर राहुल द्रविडनं 2002 मध्ये 217 धावांची खेळी केली होती.
पुरुषांच्या कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही भारतीयानं परदेशात केलेली ही तिसरी सर्वोत्तम खेळी ठरली.
याआधी पाकिस्तानात 2004 साली वीरेंद्र सहवागनं 309 तर राहुल द्रविडनं 270 धावा केल्या होत्या.
कसोटी आणि वन डे या दोन्ही फॉरमॅटमध्ये द्विशतक ठोकणारा गिल हा सहवाग, सचिन, रोहित आणि ख्रिस गेलनंतरचा पाचवाच फलंदाज ठरला.
कर्णधार गिलसमोर इंग्लंडचे गोलंदाज हतबल
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने गिलला रोखण्यासाठी तब्बल सात गोलंदाजांचा वापर केला. परंतु, 25 वर्षांच्या शुभमन गिलने प्रचंड दृढनिश्चय, धैर्य, संयम आणि कौशल्य दाखवत द्विशतक झळकावलं.
त्याचं हे द्विशतक अलीकडच्या काळात पाहायला मिळालेल्या सर्वोत्कृष्ट द्विशतकांपैकी एक ठरलं.
या भव्य खेळीचा परिणाम तात्काळ जाणवेल किंवा नाही, पण ही खेळी संघ आणि त्याच्या कर्णधाराच्या प्रवासाची दिशा निश्चित करणार आहे.

विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विनसारखे अनुभवी खेळाडू सहा महिन्यांच्या आत निवृत्ती घेतात, तेव्हा नव्या संघासाठी हा बदलाचा काळ थोडासा भीतीदायक असू शकतो. अचानक ड्रेसिंग रूममधून नेतृत्वाची भावना जणू कुठेतरी हरवल्यासारखी वाटते.
नवीन सुरुवात करण्यासाठी असामान्य आत्मविश्वास आणि धाडस लागतं. गिलने ही जबाबदारी उचलली आहे आणि संघासाठी तो एक मार्गदर्शक ठरला आहे.
युवा टीमकडून संयमी सुरुवात
सामन्याच्या पहिल्या दिवशी लंचपूर्वी भारताची धावसंख्या 95 धावांवर 2 गडी बाद अशी होती. तेव्हा शुभमन गिल फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याआधी, हेडिंग्ले कसोटीत 137 धावांची शानदार खेळी करणारा के.एल. राहुल यावेळी फक्त 2 धावांवर बाद झाला होता, आणि करुण नायर 31 धावा करून माघारी परतला होता.
अशा परिस्थितीत संघाला आपल्या कर्णधाराकडूनच पुनरागमनाची आशा होती.
गिलने सावध सुरुवात केली. ब्रायडन कार्सच्या चेंडूवर एलबीडब्ल्यूचे जोरदार अपील झाले होते. त्यानंतर ख्रिस वोक्सच्या चेंडूवर एज लागूनही तो बचावला.
पण जेव्हा त्यानं चेंडू व्यवस्थित मिडल करायला सुरुवात केली, तेव्हा त्याचा आत्मविश्वासही वाढल्याचे दिसून आले. वोक्सला मारलेला फ्लिक ड्राइव्ह, जो शॉर्ट मिडविकेट आणि मिड ऑनच्या मधून गेला, या शॉटमुळे त्याचा हेतू स्पष्ट झाला.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानं आपलं अर्धशतक आपल्या खास शैलीत पूर्ण केलं, ऑफस्पिनर शोएब बशीरच्या चेंडूवर क्रीजच्या बाहेर येत सरळ चौकार मारून. यानंतर त्यांच्या बॅटमधून सातत्यानं धावा निघू लागल्या.
तरीही दुसऱ्या बाजुला सतत विकेट्स पडत राहिल्या आणि एकही भक्कम भागीदारी तयार होऊ शकली नाही. भारताची धावसंख्या 211 धावांवर पाच गडी बाद झाली होती.
एकापाठोपाठ दोन विकेट्स झटपट पडल्या. मागच्या कसोटीत दोन शतकं झळकवणारा ऋषभ पंत फक्त 25 धावा काढून बशीरच्या चेंडूवर डीपमध्ये झेलबाद झाला.
त्याच्यानंतर लगेचच, संघाची मधली फळी मजबूत करण्यासाठी टीममध्ये घेतलेला नितीश रेड्डी वोक्सच्या फिरणाऱ्या चेंडूवर फक्त 1 धाव काढून क्लीन बोल्ड झाला.
अन् तिहेरी शतक हुकलं
स्टेडियममध्ये आता प्रेक्षक गिलच्या त्रिशतकाची उत्सुकतेने वाट पाहू लागले होते, पण ते स्वप्न अपूर्णच राहिलं. इंग्लंडच्या जोश टंगने टाकलेल्या बाऊन्सरवर गिल बाद झाला.
शॉर्ट स्क्वेअर लेगवर उभ्या असलेल्या ओली पोपकडे त्याचा सोपा झेल गेला.
भारतीय कर्णधाराची ही जादुई खेळी कदाचित त्याच्या सहकाऱ्यांना या मालिकेत काहीतरी खास करून दाखवण्यासाठी प्रेरणा देऊ शकेल.
जडेजाचं शतक थोडक्यात हुकलं
अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या मनात मागच्या सामन्यातील चुका सुधारायच्या हे एक स्पष्ट लक्ष्य होतं. त्यानं क्रिजवर ठाम उभं राहत आपल्या युवा कर्णधाराला संपूर्ण साथ दिली.
दुसऱ्या बाजूला, गिल आक्रमकता आणि संयमाचं प्रतीक ठरत होता. त्याने पार्टटाइम ऑफस्पिनर जो रूटच्या एका ओव्हरमध्ये दोनदा स्वीप मारत फाइन लेगला चौकार ठोकले आणि आपलं सातवं शतक दिमाखात पूर्ण केलं.
गिल आणि जडेजा यांच्या जोडीने आणखी विकेट पडणार नाही याची काळजी घेतली. दिवसाचा शेवट भारताने 5 बाद 310 धावा अशा स्थितीत केला.
दुसऱ्या दिवसाची सुरुवातही गिलने संयमानेच केली. वोक्सच्या चेंडूवर लागलेला एक एज पुन्हा एकदा स्लिपमध्ये असलेल्या फिल्डरपासून थोडक्यात वाचला. यावेळी सुरुवातीला जडेजा जरा जास्त आक्रमक वाटत होता.
त्याने दोन्ही बाजूंना काही आकर्षक फटके खेळले, विशेषतः स्टोक्सच्या चेंडूंवर मारलेले बॅकफूट पंच जे थेट चौकारात बदलले.

फोटो स्रोत, Getty Images
जसा सूर्य वर आला, तसं एजबेस्टनची खेळपट्टी इंग्लंडच्या गोलंदाजांसाठी अनुकूल राहिली नाही. चतुर कर्णधार बेन स्टोक्सने बाऊन्सरचा वापर करून गिल आणि जडेजाची भागीदारी तोडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु त्याची ही रणनीती यशस्वी ठरली नाही.
सुरुवातीला दोघा फलंदाजांनी बचावात्मक खेळ केला, पण नंतर त्यांनी वेगाने पलटवार केला. लेग साइडवर मजबूत क्षेत्ररक्षण असतानाही चौकारांचा वेग काही कमी झाला नाही.
दोन्ही फलंदाजांकडून चुका घडाव्यात, यासाठी बशीरला आणण्यात आलं. पण गिलने संधीचा फायदा घेत त्याला तीन षटकार ठोकले आणि दोन रिव्हर्स स्वीप मारून थर्ड मॅन बाऊंड्रीकडे चेंडू धाडला.
शेवटी बाऊन्सरनं काम केलंच, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता, कारण दोघांनी मिळून सहाव्या विकेटसाठी 203 धावांची भागीदारी केली होती.
जोश टंगच्या एक वेगवान बाऊन्सरनं जडेजाला चकीत केलं. त्याने बचावासाठी बॅट पुढे केली, पण चेंडू बॅटची कड घेऊन थेट यष्टिरक्षक जेमी स्मिथच्या हातात विसावला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











