सेक्स व्हीडिओ स्कँडलने हादरला आफ्रिकेतील देश, सत्तेचा खेळ की आणखी काही?

    • Author, इनेस लिव्हा आणि डामियन झाने
    • Role, बीबीसी न्यूज

पृथ्वीच्या भूमध्यरेषेला चिकटून असणाऱ्या ‘इक्वेटोरियल गिनी’ या मध्य आफ्रिकेतल्या देशातून समोर आलेल्या सेक्स स्कँडलनं जगभरातल्या लोकांना धक्का बसलाय.

इक्वेटोरियल गिनीचे पुढचे राष्ट्राध्यक्ष कोण होणार, हे या प्रकरणाचं पुढे काय होणार, यावरून ठरेल, असं म्हटलं जातंय.

इक्वेटोरियल गिनीतल्या नागरी सेवेतील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याचे ऑफिसमध्ये आणि इतरत्र घडलेल्या लैंगिक संबंधांचे साधारण 400 पेक्षा जास्त व्हीडिओ गेल्या 15 दिवसांत लीक करण्यात आलेत.

लीक झालेल्या या व्हीडिओमध्ये सत्तेत असलेल्या लोकांचे नातेवाईक, तर काहींच्या पत्नींचाही समावेश आहे.

या व्हीडिओतले अधिकारी बाल्टासार एबांग एंगोंगा हे त्यांच्या हँडसम दिसण्यामुळे ‘बेलो’ या नावानेही प्रसिद्ध आहेत. त्यांच्यासोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या आणि व्हीडिओत दिसणाऱ्या काही महिलांना त्यांचं चित्रीकरण होत असल्याचं माहीत आहे, असं जाणवतंय.

त्यात इक्वेटोरियल गिनीमध्ये माध्यमांवर खूप निर्बंध आहेत. तिथे माध्यमांचं स्वातंत्र्य मान्य केलेलं नसल्याने या व्हीडिओची सत्यता तपासणं फार अवघड आहे. पण देशात राजकीय वादळ सुरू करणाऱ्या एंगोंगा यांची बदनामी करण्यासाठी रचलेला हा सापळा असल्याचंही काहींचं म्हणणं आहे.

एंगोंगा इक्वेटोरियल गिनीचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष तियोडोरो ओबियांग एन्गेमा यांचे भाचे आहेत. ओबियांग यांच्यानंतर त्यांची राजकीय गादी एंगोंगा चालवतील असं अनेकांना वाटतं.

सगळ्यात जास्त काळासाठी राष्ट्राध्यक्ष पद सांभाळणारे म्हणून ओबियांग जगप्रसिद्ध आहेत. 1979 पासून ते सत्तेत आहेत.

82 वर्षांचे ओबियांग सत्तेत आले, तेव्हा देशातल्या तेलाच्या खाणींमुळे अर्थव्यवस्था अतिशय वेगाने विकसित होत होती. पण आता तेलाचा साठा संपत आलाय तशी अर्थव्यवस्थाही खचत चालली आहे.

देशात उच्चभ्रू, अतिश्रीमंत लोकांची एक फळीच निर्माण झालीय. पण 17 लाख लोकसंख्येपैकी उरलेले बहुतांश लोक अत्यंत गरिबीत जगतायत.

अमेरिकेच्या एका शासकीय अहवालानुसार, मानवी हक्कांचं उल्लंघन केल्याबद्दल, मनमानी पद्धतीने लोकांना त्रास दिल्याबद्दल आणि त्यांचे खून केल्याबद्दल ओबियांग यांच्या प्रशासनावर कडवी टीका होत असते.

त्यांच्याबाबतीतले इतरही अनेक घोटाळे याआधी उघडकीस आले आहेत. त्यांच्या एका मुलाच्या चकमकीत राहणीमानाबद्दल अनेक खुलासे झाले आहेत.

सध्या उपराष्ट्राध्यक्ष पदावर काम करणाऱ्या या मुलाकडे 275,000 डॉलर इतक्या किंमतीचा हातमोजा असल्याचं समोर आलं होतं. हा हातमोजा मायकल जॅकसन घालत होता आणि तो हिऱ्यांनी जडलेला होता.

तसं पाहायला गेलं तर इक्वेटोरियल गिनीमध्ये निवडणुका फक्त नावालाच होतात.

सरकारविरोधात बोलणाऱ्या कार्यकर्त्यांना एकतर तुरूंगवासाची शिक्षा दिली जाते किंवा देशातून बाहेर काढलं जातं. इतर संशयीत सक्त नजरकैदेत असतात.

सत्ताधारी पक्षातल्या लोकांमध्येच आपसात पडद्यामागे होणाऱ्या सत्तेच्या वादातूनच देशात राजकारण होत असतं.

एंगोंगा यांचं हे सेक्स स्कँडल अशाच छुप्या राजकीय खेळीत बसतंय.

एंगोंगा राष्ट्रीय आर्थिक तपास संस्थेचे प्रमुख होते. आर्थिक गैरव्यवहारांवर कारवाई करण्याचे काम ते करत होते. पण आता आर्थिक गैरव्यवहाराच्या एका खटल्यातंर्गत ते स्वतःच अडकले.

देशाच्या तिजोरीतून मोठ्या रकमेची अफरातफरी करण्याच्या आरोपाखाली त्यांना 25 ऑक्टोबरला अटकही करण्यात आली होती. या आरोपांवर त्यांनी आजपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सरकारविरोधात बोलणाऱ्या लोकांचा क्रूर छळ करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या देशाच्या राजधानीतल्या ब्लॅक बेंच या कारागृहात एंगोंगा यांना नेण्यात आलं.

त्यांचा मोबाईल आणि संगणक जप्त करण्यात आला. त्यानंतर काही दिवसांतच त्यांचे हे खासगी व्हीडियो इंटरनेटवर दिसण्यास सुरुवात झाली.

याचा सगळ्यात पहिला उल्लेख बीबीसीला डायरीओ रोम्बे या वेबसाईटच्या फेसबुक पेजवर दिसला. देशातून हकलून लावल्यावर स्पेनमध्ये आश्रय घेणाऱ्या एका पत्रकाराकडून चालवली जाणारी डायरीओ रोम्बे ही वेबसाईट देशातल्या बातम्या देते.

‘सोशल मीडिया अशा खासगी फोटो आणि व्हीडिओंनी भरून गेलं आहे,’ असं डायरिओ रोम्बे या वेबसाईटवर म्हटलं होतं.

दुसऱ्याच दिवशी एक्स (पूर्वीचं ट्विटर) वरच्या एका पोस्टमध्येही “सत्ता हलवून टाकणारा महत्त्वाचा घोटाळा” असं याला म्हटलं गेलं. हे पोर्नोग्राफिक व्हीडिओ सोशल मीडियावर सगळीकडे दिसत आहेत, असंही त्यात लिहिलं होतं.

पण याचा मूळ स्त्रोत पॉर्न व्हीडिओ पब्लिश करणारं एक टेलिग्राम चॅनल असल्याचं म्हटलं जातंय.

या चॅनेलवर हे व्हीडिओ एक एक करून येत होते. इक्वेटोरियल गिनीमधल्या लोकांनी ते डाऊनलोड करून व्हॉट्सअपवर एकमेकांना पाठवायला सुरुवात केली, तेव्हा प्रकरण फारच गंभीर झालं.

या सगळ्या व्हीडिओंमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या नात्यातल्या महिलांसोबतच वेगवेगळ्या मंत्र्यांच्या आणि वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांच्या लग्नाच्या बायकांसोबत एंगोंगा दिसतायत.

30 ऑक्टोबरपर्यंत प्रकरण इतकं हाताबाहेर गेलं की त्याकडे दुर्लक्ष करणं सरकारला अवघड झालं. तेव्हा उप-राष्ट्राध्यक्ष तियोडोरो ओबियांग मॅन्गू यांनी सगळ्या टेलिकॉम कंपन्यांना सगळे व्हीडिओ 24 तासांत काढून टाकायला सांगितलं.

“अनेक कुुटुंबं उद्ध्वस्त होत असताना आम्ही फक्त एका जागी बघत बसू शकत नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी एक्सवर व्यक्त केली.

“हे सगळे व्हीडिओ व्हायरल करण्यामागे कोण व्यक्ती आहे किंवा व्यक्तींचा गट आहे ते शोधून त्याला जाब विचारण्यात येईल,” ते पुढे म्हणाले.

संगणक आणि मोबाईल हे तिथल्या सुरक्षा दलाच्या हातात असल्याने संशयाची सुई अर्थातच त्यांच्यावर रोखली गेलीय. खटला सुरू होण्याआधी एंगोंगा यांची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी केलेल्या या कारस्थानाचा सुत्रधार कोण असू शकतं याचा शोध सुरू आहे.

संमतीविना खासगी फोटो शेअर केल्याबद्दल एंगोंगा यांच्याविरोधात केस करण्यासाठी व्हीडिओत दिसणाऱ्या महिलांना पोलिस पुढे येण्याचं आव्हान करत आहेत. त्यातल्या एकीने खटला भरणार असल्याचं आधीच जाहीर केलं आहे.

एंगोंगा यांनी हे व्हीडिओ कशासाठी बनवले हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण ते इतक्या संख्येनं लीक का झाले यामागचं कारण कार्यकर्ते शोधण्याचा प्रयत्न करतायत.

एंगोंगा राष्ट्राध्यक्षांचे नातलग आहेतच. पण त्याशिवाय, त्यांचे वडील बाल्टासार एंगोंगा एडजो हे प्रादेशिक आर्थिक आणि आर्थिक संघाचे प्रमुख आहेत. देशातल्या प्रभावशाली व्यक्तींपैकी ते एक आहेत.

”एका युगाचा अंत होताना आम्हाला दिसतोय. सध्याच्या राष्ट्राध्यक्षांची कारकीर्द लवकरच संपेल असं वाटतंय. त्यामुळे आता त्यांच्यानंतर कोण हा प्रश्न निर्माण झालाय आणि त्यातून अंतर्गत वादविवाद सुरू होताना दिसतायत,” असं नसांग ख्रिच्शिया इस्मी क्रुझ हे गिनी देशातले कार्यकर्ते सांगतात. सध्या ते लंडनमध्ये राहतात.

त्यांना राजकीय उत्तराधिकारी होण्यापासून थांबवू शकणाऱ्यांना बाजुला सारण्याचा प्रयत्न करत उप-राष्ट्राध्यक्ष ओबियांग असल्याचं क्रुझ यांनी बीबीसीच्या ‘फोकस ऑन आफ्रिका’ या पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितलं.

राष्ट्राध्यक्ष बनण्याच्या त्यांच्या मार्गात अडथळा म्हणून येणाऱ्या सगळ्यांचाच हे उप-राष्ट्राध्यक्ष, त्यांच्या आईसोबत मिळून काटा काढतायत. त्यात त्यांनी गेल्या 10 वर्षांपासून तेल मंत्री म्हणून काम करणाऱ्या गॅबरियल ओबियांग लिमा (राष्ट्राध्यक्षांना दुसऱ्या पत्नीकडून झालेला मुलगा) यांनाही सोडलेलं नाही.

उच्चभ्रू वर्गातले लोक एकमेकांची खासगी माहिती अशा प्रकारे गोपनीय ठेवतात. आणि आपल्या राजकीय शत्रूचं नुकसान करण्यासाठी आणि त्यांची बेआब्रू करण्यासाठी असे व्हीडियो वापरतात असं क्रुझ सांगतात. याआधीही असं अनेकदा झालं आहे.

देशातली सत्ता उलथवून टाकण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे आरोपही याआधी अनेकदा करण्यात आलेत. त्यातून लोकांच्या मनात भीती आणि काळजी निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलाय.

या अशा घोटाळ्याचा वापर अधिकारी सोशल मीडियावर जास्त निर्बंध लावायला हवेत हे दाखवून देण्यासाठी करतात, असं क्रुझ यांना वाटतं. कारण, देशात खरंच काय सुरू आहे हे बाहेर काढण्याचा सोशल मीडिया एकमेव मार्ग आहे. देशातल्या ॲनोबोन या भागात जुलै महिन्यात आंदोलन उसळलं तेव्हाही इंटरनेटवर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती याचीही ते आठवण करून देतात.

एका मोठ्या अधिकाऱ्याने लग्नबाह्य संबंध ठेवणं ही इतकी आश्चर्यकारक गोष्ट नव्हती असं क्रुझ यांना वाटतं. उच्चभ्रू लोकांच्या जीवनशैलीचा तो भाग आहे हे सगळ्याच लोकांना माहीत असतं.

उप-राष्ट्राध्यक्षांनाही एकदा फ्रान्समध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यांच्या इतर अनेक देशातल्या चैनी मालमत्ता अनेकदा जप्त झाल्यात. पण स्वतःच्या देशात मात्र त्यांना चुकीच्या गोष्टींविरोधात आणि भ्रष्टाचाराविरोधात लढणारा अशी स्वतःची प्रतिमा उभी करायची आहे.

उदाहरण द्यायचं झालं तर, देशाच्या विमान सेेवेतलं एक विमान विकण्याच्या आरोपाखाली उप-राष्ट्राध्यक्षांनी स्वतःच्या सावत्र भावाला मागच्या वर्षी अटक केली होती.

पण यावेळी व्हीडिओ व्हायरल होणं थांबावं यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. तरीही ते मोठ्या प्रमाणावर पाहिले गेले.

असभ्य आणि बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी सरकारी कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेणार असल्याचं उप-राष्ट्राध्यक्षांनी गेल्या आठवड्यात सांगितलं.

अधिकृत वृत्त संस्थेने दिलेल्या बातमीनुसार या स्कँडलने देशाची प्रतिमा खराब झाली आहे, असं उप-राष्ट्राध्यक्ष म्हणाले.

कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी कार्यालयात कोणत्याही प्रकारच्या लैंगिक संबंधांत सामील असलेला सापडला तर नियमांचं उल्लंघन केलं म्हणून त्याचं तातडीने निलंबन करण्यात येईल, असा आदेश त्यांनी दिलाय.

या गोष्टीने जगातल्या अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय, असंही उप-राष्ट्राध्यक्ष म्हणालेत. हे प्रकरण सुरू झाल्यापासून देशाचं नाव सतत शोधलं जातंय, असं गुगलच्या डेटावरून लक्षात येतंय.

गेल्या आठवड्यात केनिया, नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिकन देशांतल्या ट्विटरमध्ये इक्वेटोरियल गिना हे ट्रेंडिंगवर होतं. अनेकदा तर अमेरिकन निवडणुकीपेक्षाही हा ट्रेंड पुढे होता.

या सगळ्या प्रकरणामुळे देशातल्या हुकूमशाहीकडे जगाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही कार्यकर्त्यांच्या पदरी निराशा आलीय.

“या सेक्स स्कँडलपेक्षा फार मोठे प्रश्न इक्वेटोरियल गिनामध्ये आहेत,” क्रुझ. सांगतात. ते जीई नुसेत्रा या हक्कासाठी लढणाऱ्या संघटनेत काम करतात.

“हे सेक्स स्कंँडल म्हणजे फक्त रोगाचं एक लक्षण आहे; मूळ रोग नाही. व्यवस्था किती भ्रष्ट आहे हेच यातून दिसतं,” क्रुझ म्हणतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)