चंद्रयान 3 : चंद्रावर उतरलेल्या लँडर आणि रोव्हरसोबत संपर्क कुठून साधला जातोय?

अँटेना

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, संकेत सबनीस
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

चंद्रयान-3 मोहिमेतलं लँडर चंद्रावर उतरलं असून त्यातून रोव्हर देखील बाहेर आलंय. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरलाय.

भारताची ऐतिहासिक कामगिरी म्हणून सध्या जग याकडे पाहतंय. ही चांद्रमोहिम यशस्वी होण्यात इस्रोच्या वैज्ञानिकांसह दोन मोठ्या सेंटर्सचा प्रमुख वाटा आहे.

ही दोन सेंटर्स म्हणजेच इस्ट्रेक आणि आयडीएसएन (ISTRAC & IDSN). इस्रो टेलीमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क असं यातल्या प्रमुख सेंटरचं नाव आणि इंडियन डीप स्पेस नेटवर्क असं त्या अंतर्गत येणाऱ्या दुसऱ्या सेंटरचं नाव.

ही दोन्ही सेंटर्स काय आणि कसं काम करतात हे आपण जाणून घेऊयात.

चंद्रयानची प्रत्येक माहिती कुठून मिळते?

चंद्रयान-3 चं लँडर चंद्रावर उतरत असताना आपण सगळ्यांनीच इस्रोच्या एका सेंटरमधल्या काही मोठ्या स्क्रीन्स पाहिल्या असतील.

यातल्या प्रत्येक स्क्रीनवर काही आकडे, यान उतरत असतानाचे अनिमेशन्स, यानाची नेमकी स्थिती आणि ते किती खाली आलंय, कुठे आहे या सगळ्याची माहिती दिसत होती.

पण, पृथ्वी आणि चंद्रामधलं अंतर हे 3 लाख 84 हजार किलोमीटर इतकं आहे. त्यामुळे इतक्या दूर चंद्राजवळ आपलं यान नेमकं काय करतंय? आणि सेकंदा-सेकंदाला त्याच्यात काय बदल होतोय? याची माहिती भारतातल्या शास्त्रज्ञांना कशी काय मिळाली?

तर, ही माहिती देण्याचं काम करणारी संस्था म्हणजेच इस्ट्रेक. आता हे काम थेट इस्ट्रेक करत नाही. तर, इस्ट्रेक अंतर्गत येणाऱ्या इंडियन डीप स्पेस नेटवर्क म्हणजेच IDSN अंतराळ मोहिमांशी संपर्काचं काम करतं.

आता, ISTRAC आणि IDSN यांच्यात तुमची गल्लत होऊ शकते. त्यामुळे दोन्ही सेंटर्सची कार्य आपण जाणून घेऊ. कारण, ही दोन्ही सेंटर्स एकमेकांना पूरक असं काम करतात.

इस्ट्रेक काय करतं?

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, इस्ट्रेक हे सेंटर इस्रोच्यावतीने मोठ्या अंतराळ मोहिमांमध्ये उपग्रह, यान, लँडर यांच्या उड्डाणापासून त्यांच्या अंतराळ जाण्यापर्यंतच्या प्रवासतल्या प्रमुख संपर्क यंत्रणेचं काम करतं.

अँटेना

फोटो स्रोत, Getty Images

पण, यासाठी अनेक पातळ्यांमध्ये टप्प्यांमध्ये काम चालतं. बंगळुरू इथल्या पीन्य औद्योगिक क्षेत्रामधून इस्ट्रेकचं काम चालतं. इस्रोतर्फे पाठवल्या जाणाऱ्या उपग्रहांकडे लक्ष देण्याचं काम इस्ट्रेक करतं.

म्हणजेच, त्या उपग्रहाचं काम योग्य चालतंय का ते पाहणं, त्याच्यावर नियंत्रण ठेवणं, त्या उपग्रहांना कमांड देणं, त्यांचं ट्रॅकिंग ठेवणं, त्यांच्याकडून आलेला डेटा प्रोसेस करणं आणि कायम संपर्क ठेवण्याचं काम इथून चालतं. आजवर इस्रोने पाठवलेल्या सगळ्या उपग्रहांचं नियंत्रण इस्ट्रेककडे आहे.

संपर्क कसा केला जातो?

उपग्रहाच्या रॉकेटच्या उड्डाणापासून तो आपल्या कक्षेत स्थापित होईपर्यंत मिळणाऱ्या डेटाला टेलिमेट्री डेटा म्हटलं जातं. या डेटाचा अभ्यास करूनच उपग्रहाचं पुढचं दिशादर्शन शास्त्रज्ञ करत असतात.

अँटेना

फोटो स्रोत, Getty Images

पण, यासाठी मोठ-मोठे गोलाकार अँटेना आणि रडार यंत्रणा लागते. यामार्फतच वर उल्लेख केलेली सगळी कामं केली जातात. अशा अँटेनाचं इस्ट्रेकने केवळ भारतातचं नव्हे तर भारताबाहेरही जाळं विणलंय.

हैदराबाद, बंगळुरू, लखनौ, पोर्ट ब्लेअर, श्रीहरिकोटा, तिरुअनंतपुरम इथे इस्ट्रेकची ग्राऊंड स्टेशन्स आहेत.

तर, भारताबाहेर पोर्ट लुईस मॉरिशस, बीअर लेक्स रशिया, बियाका इंडोनेशिया, ब्रुनेई, स्वालबार्ड नॉर्वे, ट्रोल अंटार्क्टिका, व्हिएतनाम या देशांमध्ये ग्राऊंड स्टेशन्स आहेत. त्याचबरोबर वेळप्रसंगी नासा, युरोपियन स्पेस एंजसी यांचीही मदत घेतली जाते.

आयडीएसन काय करतं?

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, आता आपण आधी उल्लेख केल्या प्रमाणे इस्ट्रेककडे अनेक मोठे गोलाकार अँटेना संपर्काचं काम करतात.

अँटेना

फोटो स्रोत, Empics

यापैकी, 32 मीटर व्यासाचा, 18 मीटर व्यासाचा आणि 11 मीटर व्यासाचा असे 3 अँटेना फक्त मोठ्या अंतराळ मोहिमांशी संपर्क साधण्याचं काम करतात.

2008 मध्ये चंद्रयान-1 मोहिमेपूर्वी यांची बंगळुरूमधल्या ब्यालाळू इथे स्थापना करण्यात आली. यापूर्वी इस्रोच्या मंगळयान मोहिमेसाठी या 3 अँटेनांच्या नेटवर्कचा वापर करतात.

आताच्या चंद्रयान-3 मोहिमेत याचाच वापर होतोय आणि पुढच्या सूर्याच्या दिशेने जाणाऱ्या आदित्य L1 मोहिमेतही याचा वापर केला जाईल.

लँडरशी संपर्काचं काम

आता चंद्रावर उतरलेलं लँडर पृथ्वीशी संदेशवहनाचं काम याच नेटवर्कमार्फत करतं. लँडरतर्फे आलेले संदेश IDSN मध्ये येतात आणि त्याचा डेटा प्रोसेस करण्याचा काम वैज्ञानिक करतात.

नेटवर्क

फोटो स्रोत, Getty Images

या लँडरमधून बाहेर पडलेलं रोव्हर हे लँडरशी संपर्क करतं. रोव्हरचे संदेश लँडर IDSN कडे पाठवतं.

आता सध्या चंद्राभोवती चंद्रयान-3 चं प्रपल्शन मॉड्युल आणि चंद्रयान-2 मोहिमेचं प्रपल्शन मॉड्युल फिरतायत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचं कामही IDSN तर्फे केलं जातं.

त्यामुळे इथून पुढे चंद्रयान-3 मोहिमेबद्दलची फोटो, व्हीडिओंसह येणारी सगळी माहिती आपल्याला इस्ट्रेक आणि IDSN तर्फेच होणार आहे.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)