You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
झोपेत असताना तोंड उघडं राहणं आजाराचं लक्षण आहे का? असं तोंड उघडं का राहतं?
- Author, चंदनकुमार जजवाडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
प्रत्येकाच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये जसा फरक असतो, तसंच प्रत्येकाच्या झोपण्याच्या सवयीदेखील वेगवेगळ्या असतात.
अनेकजण डोक्याखाली जाड उशी ठेवून झोपतात, तर काहींना झोपताना बारीक उशी हवी असते. काहींना कितीही कोणताही ऋतू असो, अंगावर चादर न घेता झोप लागत नाही किंवा अंगावर चादर न घेता झोपणं आवडत नाही. पण एकदा का झोप लागली की आपल्याला अनेक गोष्टींची जाणीवही होत नाही.
यात आणखी एक गोष्ट सामान्यत: दिसून येते, ती म्हणजे तोंड उघडून झोपणे.
झोपेत बऱ्याच जणांचं तोंड उघडं असतं. तुम्ही झोपेत असताना तुमचे तोंड उघडं राहतं का? तुम्ही झोपेत तोंड उघडं ठेवता, असं कुणी तुम्हाला कधी सांगितलं आहे का?
हे असं का होतं? यामागचं कारण काय, झोपेत तोंड उघडे राहणे नेमकं कशाचं संकेत आहे? हे आरोग्याशी संबंधित कोणत्या धोक्याचं लक्षण तर नाही ना? या लेखाच्या माध्यमातून आपण याच गोष्टींची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
झोपेत तोंड उघडं का राहतं?
बर्याच वेळा जेव्हा लोक जास्त मेहनतीचं किंवा अवजड काम करत असतात, तेव्हा त्यांना जास्त ऑक्सिजनची गरज भासते आणि त्यासाठी ते नाकासोबतच तोंडानेही श्वास घेतात.
धावणे किंवा फुटबॉलसारखे खेळ खेळताना अनेकदा लोक तोंडाद्वारे श्वास घेत धापा टाकताना दिसतात.
पण सहसा झोपेत आपल्या डोळ्यांसोबत आपले तोंडदेखील बंद असते.
झोपेत आपण नाकाने श्वास घेतो आणि कारण आपण विश्रांतीच्या स्थितीत असतो, त्यामुळे आपल्याला वेगाने किंवा तोंडावाटे श्वास घेण्याची गरज नसते. परंतु, काही लोकांच्या बाबतीत असं होत नाही.
काही जणांचे तोंड झोपेत उघडे राहते. ते या स्थितीत तोंडाने श्वास घेत असतात.
पण असं का होत असेल? यामागचं कारण जाणून घेण्यासाठी आम्ही दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) पल्मोनरी, क्रिटिकल केअर आणि स्लीप मेडिसिन विभागातील डॉक्टर विजय हड्डा यांच्याशी संवाद साधला.
डॉ. विजय हड्डा सांगतात, "तोंड उघडे ठेवून झोपणे खूप सामान्य आहे. बरेच लोक अशा प्रकारे झोपतात. परंतु, फक्त तोंड उघडं ठेवून झोपणं हे कोणत्याही आजाराचं लक्षण नाही."
"समजा नाकात काही समस्या असेल किंवा नाक बंद असेल, तर लोकं श्वास घेण्यासाठी तोंडाचा वापर करतात."
नाक बंद होण्यामागंचं एक सामान्य कारण म्हणजे तीव्र किंवा वारंवार होणारी सर्दी. काहीवेळा टॉन्सिल वाढल्यामुही नाक बंद होऊ शकतं. मुलांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात दिसते.
मुलांमध्ये अॅडेनॉइड्स किंवा टॉन्सिलचा आकार मोठा असतो, ज्यामुळे त्यांना संसर्गाशी लढायला मदत होते. यामुळे त्यांच्या नाकात ब्लॉकेज किंवा थोडासा अडथळा येतो. आणि म्हणूनच अनेकदा मुलं तोंड उघडं ठेवून झोपतात.
परंतु, वाढत्या वयासोबत टॉन्सिल लहान होत जातात आणि ही सवय हळूहळू नाहीशी होत जाते.
काय काळजी घ्यावी?
झोपेत तोंड उघडं राहण्यामागे सेप्टम कार्टिलेज देखील एक कारण असू शकते.
नाकातील सेप्टमचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे सेप्टम कार्टिलेज, ज्याला नेझल सेप्टम कार्टिलेज असंही म्हणतात. नाकातील हा सेप्टम नाकाच्या पोकळीला दोन भागांत विभागतो.
डॉ. विजय हड्डा सांगतात, "सेप्टम कार्टिलेज नैसर्गिकरित्या थोडासा वाकडा असतो, तो पूर्णपणे सरळ नसतो. पण जर तो खूप वाकडा झाला, तर नाकाच्या एका भागाला ब्लॉक करतो. म्हणजेच डेव्हिएटेड नेझल सेप्टम (डीएनएस) असल्यास लोक तोंडावाटे श्वास घेऊ लागतात."
ही समस्या जास्त वाढल्यास सेप्टोप्लास्टी (शस्त्रक्रिया) करून डीएनएस बरा करता येतो, असं डॉक्टर सांगतात.
पण जर एखादी व्यक्ती झोपेत तोंड उघडे ठेवत असेल आणि त्यासोबत मोठ्याने श्वास घेत असेल किंवा घोरत असेल तर अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे.
वैद्यकीय सल्ला कधी घ्यावा?
दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमधील पल्मोनरी, क्रिटिकल केअर अँड स्लीप मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. रोहित कुमार सांगतात, "तोंडातून श्वास घेतल्याने तोंडात कोरडेपणा येऊ शकतो आणि त्यामुळे तोंडाच्या स्वच्छतेवर (ओरल हायजिन) परिणाम होऊ शकतो."
डॉक्टरांच्या मते, जर एखादी व्यक्ती तोंड उघडं ठेवून झोप असेल किंवा तोंडाने श्वास घेत असेल आणि त्याच वेळेस घोरत ही असेल, तर हे एखाद्या समस्येचे लक्षण असू शकते.
अशावेळेस डॉक्टरांचा सल्ला घेऊन या समस्येमागचे खरे कारण शोधता येईल.
डॉ. रोहित कुमार सांगतात, "जर एखाद्याला खोकला, कफ किंवा इतर काही समस्या नसतानाही तो तोंड उघडं ठेवून झोपत असेल, तर सर्वप्रथम याची तपासणी ईएनटी (कान-नाक-घसा) विभागात केली जाते. त्यानंतरच पुढील तपासण्या करता येतात."
आरोग्याच्या दृष्टीने ही तपासणी महत्वाची असते. त्यामुळे आपल्या आसपासच्या लोकांना अशाप्रकारची समस्या येत असल्यास त्यांना वेळीच डॉक्टरांशी सल्ला साधण्याबाबत सांगण्याची गरज आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)