'मी सर्वांत नशीबवान पण प्रचंड त्रासात देखील आहे', अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीची व्यथा

फोटो स्रोत, BBC/HINDUSTAN TIMES
- Author, नवतेज जोहल, मिडलँड प्रतिनिधी
- Author, कॅटी थॉम्पसन आणि सोफी वूडकॉक
जून महिन्यात एअर इंडियाच्या विमान अपघातात 241 जणांचा मृत्यू झाला होता. त्यातून एकमेव प्रवासी आश्चर्यकारकरीत्या बचावला होता. या प्रवाशानं म्हटलं आहे की तो जिवंत असल्यामुळे त्याला 'सर्वात नशीबवान माणूस' असल्यासारखं वाटतं होतं, मात्र त्याचबरोबर त्याला शारीरिक आणि मानसिक त्रासातूनदेखील जावं लागतं आहे.
विश्वासकुमार रमेश असं या प्रवाशाचं नाव आहे. ज्यावेळेस अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला आणि ते कोसळलं. त्यानंतर त्या विमानातून विश्वासकुमार रमेश चालत बाहेर पडले आणि ते दृश्य पाहून अवघं जग थक्क झालं होतं.
विश्वासकुमार म्हणाले की या अपघातातून ते जिवंत बचावले हा एक 'चमत्कार'च होता. मात्र आता त्यांनी सर्वकाही गमावलं आहे.
त्यांचा धाकटा भाऊ अजय हादेखील त्याच विमानात होता. तो विश्वासकुमार यांच्यापासून काही सीट पलीकडेच बसलेला होता. मात्र जून महिन्यात झालेल्या या विमान अपघातात अजयचा मृत्यू झाला.
विश्वासकुमार रमेश लेस्टरमधील त्यांच्या घरी परतल्यापासून त्यांना पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) या समस्येशी सामना करावा लागतो आहे. ते त्यांची पत्नी आणि चार वर्षांच्या मुलाशी बोलू शकत नाही, असं त्यांच्या सल्लागारांनी सांगितलं.
'तो एक चमत्कारच होता'
अहमदाबादमधून बोईंग 787 विमानानं उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच ते कोसळलं होतं आणि विमानानं पेट घेतला होता.
या दुर्घटनेच्या धक्कादायक व्हीडिओमध्ये दिसतं की विश्वासकुमार रमेश यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत आणि ते त्या दुर्घटनाग्रस्त विमानातून चालत निघून जात आहेत. अपघातस्थळी आजूबाजूला धूर पसरलेला होता.

विश्वास कुमार रमेश यांची मातृभाषा गुजराती आहे.
बीबीसीशी बोलताना भावूक झालेले विश्वासकुमार रमेश म्हणाले, "मी फक्त एकटाच त्यातून वाचलो आहे. अजूनही मला त्यावर विश्वास बसत नाही, तो एक चमत्कार होता."
"या अपघातात मी माझा भाऊदेखील गमावला. माझा भाऊ माझा कणा होता. गेल्या काही वर्षांपासून तो नेहमीच मला आधार देत होता."
या घटनेचा त्यांच्या कौटुंबिक आयुष्यावर झालेल्या विनाशकारी परिणामांबद्दल त्यांनी सांगितलं.
कोणाशीही बोलत नाहीत
"आता मी एकाकी आहे. मी माझ्या खोलीत एकटाच बसतो. माझ्या पत्नीशी , मुलाशी मी बोलत नाही. मला कुणासोबतच एकट्यातच आता बरं वाटतं," असं विश्वासकुमार रमेश म्हणाले.
त्यावेळेस भारतातील हॉस्पिटलमधील बेडवरून बोलताना त्यांनी सांगितलं होतं की विमानातून स्वत:ला बाहेर काढण्यात आणि विमानाच्या ढिगाऱ्यातून बाहेर पडण्यात ते कसे यशस्वी झाले.
त्यांनी दुखापतींवर उपचार करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.
या विमान अपघातात मारले गेलेल्या प्रवाशांपैकी 169 भारतीय नागरिक होते, तर 52 ब्रिटिश नागरिक होते. तर इतर 19 जण होते. ते अपघात स्थळीच मृत्यूमुखी पडले होते.
या अपघाताचा प्राथमिक अहवाल, भारताच्या विमान अपघात तपास विभागानं जुलै महिन्यात प्रसिद्ध केला होता. या अहवालात म्हटलं आहे की विमानानं उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच इंजिनांना होणारा इंधनाचा पुरवठा खंडित झाला होता.
दरम्यान या अपघाताचा सखोल तपास सुरू आहे.

एअर इंडियानं म्हटलं आहे की विश्वासकुमार रमेश आणि या अपघातातील सर्व पीडितांच्या कुटुंबाची काळजी घेणं याला आमचे प्राधान्य आहे.
39 वर्षांचे विश्वासकुमार रमेश अपघातानंतर युकेला परतल्यानंतर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. त्यांची मुलाखत घेण्यासाठी अनेक वृत्तसंस्थांना आमंत्रित करण्यात आलं होतं. खोलीत एका डॉक्युमेंट्रीचेही शुटिंग सुरू होते.
बीबीसीनं मुलाखतीपूर्वी त्यांच्या सल्लागारांशी त्यांची कशाप्रकारे काळजी घेतली जाते आहे, याबद्दल सविस्तर चर्चा केली.
त्यांना जेव्हा अपघाताच्या त्या दिवसाबद्दल विचारलं, तेव्हा ते म्हणाले की, "त्याबद्दल मी आता काहीही सांगू शकत नाही."
'मी खूप वेदनेतून जातो आहे'
विश्वासकुमार रमेश यांच्या शेजारी स्थानिक समुदायाचे नेते संजीव पटेल आणि कुटुंबाचे प्रवक्ते रॅड सीगर होते. रमेश म्हणाले, त्या अपघातातील घटना आठवणं ही खूप वेदनादायक गोष्ट आहे. मुलाखतीच्या दरम्यान ते अनेकवेळा रडले.
ही मुलाखत लेस्टर या ठिकाणी पटेल यांच्या घरी झाली.

फोटो स्रोत, Hindustan Times
विश्वासकुमार रमेश यांनी ते आणि त्यांचं कुटुंब आता ज्या वेदनेतून, त्रासातून जातं आहे, त्याचं वर्णन केलं.
"माझ्यासाठी, त्या अपघातानंतर... सर्वकाही खूप कठीण झालं आहे."
"शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, माझ्या कुटुंबालाही मानसिकदृष्ट्या खूप त्रासातून जावं लागतं आहे. माझी आई गेल्या चार महिन्यांपासून दररोज दाराबाहेर बसते आहे. ती काहीही बोलत नाही."
"मी कोणाशीही बोलत नाही. मला कोणाशीही बोलायला आवडत नाही."
"मी जास्त बोलू शकत नाही. मी रात्रभर विचार करत असतो. मी मानसिकदृष्ट्या खूप वेदनेतून जातो आहे."
"प्रत्येक दिवस संपूर्ण कुटुंबासाठीच अत्यंत वेदनादायी असतो."
विश्वासकुमार रमेश या अपघातात त्यांना झालेल्या शारीरिक दुखापतींबद्दल बोलले. विमानाच्या मुख्य भागात असणाऱ्या 11A या सीटवर बसलेले रमेश या अपघातातून कसेबसे बचावले होते.
विश्वासकुमार रमेश आणि त्यांच्या कुटुंबासमोरील संकट
विश्वासकुमार म्हणतात की त्यांना पाय, खांदा, गुडघा आणि पाठीत वेदना होत आहेत. या अपघातानंतर ते काम करू शकत नाही की गाडी चालवू शकत नाहीत.
"मी जेव्हा चालतो, तेव्हा मी व्यवस्थितरीत्या चालू शकत नाही. मी माझ्या पत्नीच्या मदतीनं हळूहळू चालतो," असं ते म्हणाले.
दुर्घटनेनंतर विश्वासकुमार रमेश भारतात उपचार घेत होते, तेव्हा त्यांना पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी) झाल्याचं निदान झालं होतं. मात्र ते घरी परतल्यापासून त्यांना कोणताही वैद्यकीय उपचार मिळालेले नाहीत, असं त्यांच्या सल्लागारांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी सांगितलं की विश्वासकुमार रमेश हे आतून खचले आहेत, ते धक्क्यात आहेत. त्यांना यातून सावरण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. ते एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांना भेटण्याची मागणी करत आहेत. त्यांचा दावा आहे की दुर्घटनेनंतर कंपनीनं त्यांना योग्य वागणूक दिलेली नाही, त्यांच्यावर पुरेसे उपचार केलेले नाहीत.
"ते मानसिक, शारीरिक आणि आर्थिक संकटात आहेत," असं पटेल म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "त्यांचं कुटुंब या अपघातानंतर उद्ध्वस्त झालं आहे."
"कंपनीतील व्यवस्थापकीय पदांवरील लोकांनी या दुर्दैवी घटनेतील पीडितांना भेटावं आणि त्यांच्या गरजा समजून घ्याव्या आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं."
'गोष्टी मार्गी लावा'
या दुर्घटनेनंतर एअर इंडियानं विश्वासकुमार रमेश यांना अंतरिम भरपाई म्हणून 21,500 पौंड (जवळपास 25 लाख रुपये) देऊ केले होते. ते त्यांनी स्वीकारले आहेत. मात्र त्यांच्या सल्लागारांचं म्हणणं आहे की त्यांच्या तत्काळ गरजांची पूर्तता करण्यासाठी ही रक्कम पुरेशी नाही.
विश्वासकुमार रमेश यांच्या कुटुंबाचा दीव येथे मासेमारीचा व्यवसाय आहे. या विमान अपघातापूर्वी विश्वासकुमार रमेश त्यांच्या भावासाह तो व्यवसाय चालवत होते. मात्र त्यानंतर तो व्यवसाय बंद पडला आहे, असं त्यांचे सल्लागार म्हणाले.
त्यांच्या कुटुंबाचे प्रवक्ते सीगर म्हणाले की त्यांनी तीन वेळा एअर इंडियाला बैठकीला आमंत्रित केलं होतं. मात्र तिन्ही वेळा एकतर "दुर्लक्ष करण्यात आलं किंवा भेट नाकारण्यात आली."
ते म्हणाले की, प्रसारमाध्यमांना देण्यात आलेल्या मुलाखती हा त्यांच्या टीमचा चौथ्यांदा आवाहन करण्याचा मार्ग आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सीगर पुढे म्हणाले, "आम्हाला आज इथे बसावं लागतं आहे आणि त्यांना या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागतं आहे, हे अत्यंत दु:खद आणि भयावह आहे."
"आज एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी इथे बसायला हवं होतं. या गोष्टी दुरुस्त करण्याची, मार्गी लावण्याची जबाबदारी त्यांची आहे."
ते म्हणाले, "कृपया आमच्यासोबत बसा, जेणेकरून आपण एकत्रितपणे या वेदनेतून त्यांची काही प्रमाणात सुटका करू शकू."
टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियानं दिलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे की मूळ कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पीडितांच्या कुटुंबांना भेटून त्यांची सांत्वना करत आहेत.
"विश्वासकुमार रमेश यांच्या प्रतिनिधींना अशी एक बैठक आयोजित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात राहू आणि त्यांच्याकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला आशा आहे," असं कंपनीनं म्हटलं आहे.
एअर इंडियानं बीबीसीला सांगितलं की विश्वासकुमार रमेश यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतींपूर्वी हा भेटीचा प्रस्ताव त्यांना देण्यात आला होता.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











