You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी, कार्यालयात धमकीचे 3 फोन
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
अज्ञात व्यक्तीने तीन वेळा गडकरी यांच्या कार्यालयात निनावी फोन करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
नितीन गडकरी यांचं जनसंपर्क कार्यालय नागपूरच्या खामला परिसरात आहे. याच कार्यालयातील लँडलाईन फोनवर गडकरी यांना धमकीचा फोन आला.
यासंदर्भात नितीन गडकरी यांच्या कार्यालयाच्या वतीने नागपूर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नागपूरचे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी माध्यमांना यासंदर्भात माहिती दिली.
ते म्हणाले, “गडकरी यांच्या कार्यालयात आज (14 जानेवारी) सकाळी 11 वाजून 25 मिनिटे ते 11 वाजून 40 मिनिटांच्या दरम्यान 3 वेळा धमकीचा फोन आला. याप्रकरणी संबंधित फोन नंबरचा तपास सुरू आहे. सायबर पथक आणि इतर पथकांमार्फतही या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. यामागे कोण आहे, कुठला आहे, याची माहिती लवकरच मिळेल.”
नितीन गडकरी यांच्या सुरक्षासंदर्भात काय कार्यवाही करण्यात आली, या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, “गडकरी यांच्या सुरक्षेची काळजी आम्ही घेतच आहोत. शिवाय, आता त्यांची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.”
“तसंच, गडकरी यांचे आज काही कार्यक्रम आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची खबरदारी आम्ही घेणार आहोत, असंही मदने यांनी सांगितलं.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, “फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण आंतरराष्ट्रीय डॉन असल्याचं फोनवर सांगितलं. त्याने केंद्रीय मंत्री गडकरी यांना 100 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. ही रक्कम न दिल्यास बॉम्बस्फोट घडवून जीवे मारण्याची धमकी फोनवरून देण्यात आली.”
तसंच, गडकरी यांना धमकावण्यासाठी पाकिस्तानात आश्रयाला असल्याचा आरोप असलेला डॉन दाऊद इब्राहिम याच्या नावाचाही वापर पलिकडील व्यक्तीने केला. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात संबंधित फोन हा कर्नाटकच्या हुबळीमधून करण्यात आल्याचं आढळून आलं आहे, असंही या बातमीत म्हटलं आहे.
हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्यासह अनुराग जैन आणि इतर वरीष्ठ अधिकाऱ्यांनी गडकरी यांच्या संपर्क कार्यालयाकडे धाव घेतली.
सध्या नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे काही कामानिमित्त पुण्यात आहेत. मात्र, सदर घटनेची माहिती मिळताच तेसुद्धा नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.
नितीन गडकरी यांना केंद्र सरकारकडून झेड सुरक्षा प्राप्त आहे. त्यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणात पुढील तपासही सुरू केला आहे.
तर, नितीन गडकरी यांच्या स्वीय सहायकांकडून संबंधित प्रकरणाची अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला. मात्र, त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)