महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाचं एक वर्ष, भारतीय कुस्तीचं भविष्य नेमकं काय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, शारदा उगरा
- Role, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी
भारताच्या कुस्तीपटूंनी मागच्या काही महिन्यांत कुस्ती महासंघ आणि त्याच्या अध्यक्षांविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करायला सुरुवात केली होती.
आता बरोबर एक वर्षांनंतर, भारतीय कुस्ती स्वतःच बनवलेल्या एका चक्रव्यूहात अडकली आहे.
ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियनशिप विजेते साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन उभारलं होतं. मात्र अजूनही हे प्रकरण मिटलेलं नाही.
डब्ल्यूएफआयच्या (कुस्ती महासंघ) नवनिर्वाचित मंडळाला क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाने निलंबित केलं आहे. मात्र त्यांनी हे निलंबन स्वीकारण्यास नकार दिला आहे. शिवाय त्यांनी या आठवड्यात कार्यकारी परिषदेची बैठक देखील घेतली आहे.
सीनियर नॅशनलसाठी दोन तारखा जाहीर केल्या आहेत. निलंबित झालेल्या डब्ल्यूएफआयच्या मंडळाने पुण्यात, तर क्रीडा मंत्रालयाने नियुक्त केलेल्या Ad hoc (संबंंधित उद्दिष्टांसाठी तयार करण्यात आलेली) समितीद्वारे जयपूर मध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत.
आरोप-प्रत्यारोप सोडले तर गेल्या वर्षभरात सुरू असलेल्या आंदोलनामुळे संपूर्ण क्रीडा विश्व आणि सामान्य लोकांच्या नजरेत भारतीय खेळांच्या वास्तविकतेची धारणा बदलली आहे.
यातून काय संदेश गेला...
पदक विजेत्यांना रोख बक्षिसं, हार- तुरे घालून सन्मानांचा वर्षाव केला जातो. मात्र सत्ताधारी किंवा त्यांच्या क्रीडा संघटनांच्या नजरेत त्यांची फारशी किंमत नाही.
कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे हेही स्पष्ट दिसलंय की, क्रीडा प्रशासनात राजकारण्यांचा सहभाग असेल तर तो खेळ संचलित करण्याचा योग्य मार्ग नाहीये.
आपल्या महासंघाच्या प्रमुखाविरुद्ध गुंडगिरी, छळ, गैरव्यवस्थापन, वाईट वागणूक आणि आर्थिक अनियमिततेचे आरोप करून कुस्तीपटूंनी सत्ताधारी पक्ष आणि सरकारसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या राजकीय व्यक्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
प्रत्येकाने देशातील सर्वांत प्रतिष्ठित कुस्तीपटूंना त्यांनी कसं वागवलं हे पाहिलं आहे. हातात तिरंगा असणाऱ्या कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी जमिनीवर पाडलं, त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवलं. शेवटी भारताच्या एकमेव ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटूने तिचे बूट टेबलावर ठेवले आणि निवृत्तीची घोषणा केली.
ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेते आपल्या पारितोषिकं पंतप्रधान कार्यालयाकडे सुपूर्द करण्यासाठी जात असताना त्यांना थांबविण्यात आलं. शेवटी त्यांनी आपली पदकं, ट्रॉफी, सरकारी पुरस्कार मध्य दिल्लीतील फूटपाथवर ठेवले.
हा प्रकार घडला ते ठिकाण राष्ट्रपती भवनापासून फार दूर नव्हतं आणि याच ठिकाणी पुढच्या दहा दिवसांत 2023 साठी अर्जुन आणि खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्याचा आणखी एक सोहळा आयोजित करण्यात आला होता.
कुस्तीपटूंचे राजकीय हेतू आणि तथ्य
डब्ल्यूएफआय, मंत्रालय किंवा सरकारमधील उच्च पदांवर बसलेल्या लोकांनी पैलवानांच्या हेतूंवर प्रश्न उपस्थित केलेत की नाही हे महत्त्वाचं नाही.
पण प्रत्येक युवा खेळाडूने जेव्हा ही छायाचित्रं पाहिली तेव्हा त्यांना या गोष्टीची भीती वाटली की, क्रीडा क्षेत्रात करिअर करायचं असेल तर ते असं असेल का?

फोटो स्रोत, Getty Images
मला अशी माहिती मिळाली की, क्रीडा विकास कार्यक्रमांमध्ये काम करणाऱ्या लोकांना तरुण खेळाडूंच्या पालकांचे फोन आले होते.
त्यांनी विचारलं की, "माझ्या मुलासोबत असं घडलं तर? मग त्यांच्या महासंघाच्या पदाधिकाऱ्याचं काय होणार? आम्हाला कोण वाचवणार? तुम्ही कोणती कारवाई करणार?"
कुस्तीपटूंच्या आंदोलनामागे राजकीय हेतू दिसत असल्याचं बोललं जातंय.
कुस्तीपटूंचे राजकीय हेतू काहीही असले तरी गेल्या निवडणुकीपर्यंत डब्ल्यूएफआयचे कार्यालय बृजभूषण शरण सिंह यांच्या सरकारी बंगल्यात होते.
दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्ये सिंह यांच्या विरोधात देण्यात आलेला तपशील त्यांना 'पॉक्सो' कायद्यांतर्गत अटक करण्यासाठी पुरेसा आहे.
प्रत्येक भारतीय पालक आणि खेळाडूने हे तपशील वाचले असतील आणि चॅम्पियन खेळाडूंना दिलेली वागणूक पाहिली असेल.
खेळाडूंचं भविष्य
निलंबित संजय सिंह यांच्या नेतृत्वाखालील डब्ल्यूएफआयचं म्हणणं आहे की, कुस्तीपटूंच्या कामगिरीमुळे वर्षभरातील स्पर्धांमध्ये व्यत्यय आला आहे.
ऑगस्ट 2023 मध्ये कुस्तीची प्रशासकीय संस्था, युनायटेड वर्ल्ड ऑफ रेसलिंग (यूडब्ल्यूडब्ल्यू) ने निवडणुका वेळेवर न घेतल्यामुळे डब्ल्यूएफआयला आधीच निलंबित केलं होतं.
या निलंबनामुळे, नऊ भारतीय पदक विजेत्यांसह सर्व भारतीय कुस्तीपटूंनी ऑक्टोबरमध्ये अल्बेनिया येथे झालेल्या यूडब्ल्यूडब्ल्यू वर्ल्ड अंडर-23 चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताऐवजी यूडब्ल्यूडब्ल्यूच्या ध्वजाखाली सहभाग घेतला.

फोटो स्रोत, Getty Images
हा प्रश्न सुटला नाही तर भविष्यातही त्यांना असंच करावं लागेल.
हे ऑलिम्पिकचे वर्ष आहे. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावून अंतिम पंघाल या खेळाडूने पॅरिस ऑलिम्पिकसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
याशिवाय आशियाई आणि ऑलिम्पिक पात्रता स्पर्धाही आहेत. इथे भारताचे अव्वल कुस्तीपटू अधिकाधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न करतील.
यामध्ये टोकियो रौप्यपदक विजेता रवी दहिया किंवा 57 किलो वजनी गटातील 23 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद सुवर्णपदक विजेता अमन सेहरावत किंवा 86 किलो वजनी गटातील दीपक पुनिया यांचा समावेश असेल.
महिलांमध्ये 76 किलो वजनी गटात 23 वर्षांखालील विश्वचषक विजेती रितिका किंवा 62 किलो वजनी गटातील सोनम मलिक असू शकते.
2025 मध्ये प्रभाव दिसून येईल
पण या कामगिरीचा खरा परिणाम 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नव्हे तर 2025 मध्ये जाणवेल. कारण यावेळी कनिष्ठ खेळाडू पुढील आशियाई, ऑलिम्पिक आणि इतर जागतिक स्पर्धांसाठी पुढे येतील.
भारतातील अव्वल कुस्तीपटूंचं पोषण डब्ल्यूएफआयच्या थेट हस्तक्षेपाविना होतं.
पण व्यावहारिकदृष्ट्या बघायचं झालं तर अव्वल खेळाडूंच्या खराब कामगिरीनंतर भारताची कुस्ती आता कुठल्या टप्प्यावर आहे?
नेहमीप्रमाणे खेळापेक्षा राजकीय कट कारस्थानाचा वरचष्मा राहिला आहे. आंदोलक कुस्तीपटू अजूनही लढाईच्या भूमिकेत का दिसतात, याबाबत मंत्रालय आणि सत्ताधारी प्रशासनात वाद सुरू आहे.

शेवटी त्यांना हवं ते मिळालं. डब्ल्यूएफआयला निलंबित करून महासंघ चालवण्यात बृजभूषण शरण सिंह यांची कोणतीही भूमिका नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. आता हे प्रकरण न्यायालयात आहे.
हे सर्व खरं असलं तरी ज्या क्षणी निलंबित फेडरेशनने आपलं डोकं वर काढलं त्या क्षणी आंदोलक कुस्तीपटूंना समजलं की बृजभूषण हे अजूनही निर्णय प्रक्रियेत आहेत.
आंदोलक कुस्तीपटूंना भारतीय कुस्ती महासंघाच्या सर्वात तरुण आणि सर्वांत असुरक्षित खेळाडूंच्या संरक्षणासाठी असलेल्या पद्धतीत आमूलाग्र बदल हवा होता.
या मागणीचा फायदा घेऊन ते राजकीय कारकीर्द घडवत आहे का, याने काहीही फरक पडत नाही.
क्रीडापटूंना सुरक्षिततेची जाणीव करून दिल्यास हा प्रयत्न करणाऱ्यांचा विजय असेल.
जर आपल्या खेळाडूंना असुरक्षित वाटत असेल तर, ज्यांनी सुरक्षित खेळ हवा यासाठी लढा दिलाय त्या चॅम्पियन खेळाडूंचा काहीच दोष नाही.
दोष त्यांचा आहे जे चुकीच्या मार्गाने सत्तेला चिकटून आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








