You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सिंधुदुर्गातील जंगलात आढळली साखळीला बांधलेली अमेरिकन महिला, जाणून घ्या सर्व घटनाक्रम
- Author, मुश्ताक खान
- Role, बीबीसी मराठीसाठी
मूळची अमेरिकेची असलेली महिला सिंधुदुर्गातील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या अवस्थेत आढळली होती.
सावंतवाडीतील कराडीच्या डोंगरातील घनदाट जंगलातून आसपासच्या शेतकरी आणि गुराख्यांना या महिलेच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यानंतर त्यांनी आवाजाच्या दिशेनं जात पाहिलं, तर तिथं ही महिला लोखंडी साखळीनं बांधलेल्या अवस्थेत आढळली.
तिला तिथून सोडवून या शेतकरी आणि गुराख्यांनी सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेलं. तिथं तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
अनेक दिवस अन्न-पाण्याविना राहिल्यानं या महिलेची अवस्था अत्यंत बिकट झाल्याची दिसून येत आहे. मात्र, उपचारानंतर तिची प्रकृती स्थिर आहे.
तिला नीट बोलता येत नसल्यानं कागदावर काही गोष्टी तिनं लिहून दिल्या. यातून तिच्याबद्दल आणि तिच्या या अवस्थेबद्दल काही गोष्टी पोलिसांना कळल्या.
या संपूर्ण घटनेबद्दल सविस्तरपणे आपण या बातमीतून जाणून घेऊया.
ही महिला नेमकी कशी सापडली?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमधील रोणापाल सोनुर्ली गावाच्या मध्यभागी कराडीचे डोंगर आहे.
या डोंगरातील जंगलाच्या परिसरात शनिवारी, 27 जुलै 2024 रोजी सकाळी काही गुराखी आणि शेतकरी गुरं चरण्यासाठी गेले होते. तिथं त्यांना या परिसरात महिलेच्या किंकाळ्या ऐकू आल्या. तो आवाज ऐकल्यानंतर त्या सर्वांनी त्या दिशेनं शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी जंगलामध्ये आत काही अंतरावर एका झाड्याच्या बुंध्याला एका महिलेच्या पायाला साखळदंड बांधून ठेवल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं.
महिलेची अवस्था अत्यंत वाईट होती. अशाप्रकारे तिला पाहिल्यानं ते घाबरून गेले. त्यांनी लगेचच पोलिसांसह जवळपासचे गावकरी आणि पोलीस यांना याबाबत माहिती दिली.
त्यानंतर पोलीस याठिकाणी पोहोचले. त्यांना संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली आणि महिलेच्या पायाची साखळी तोडून तिची सुटका केली.
अन्न-पाण्याविना राहिल्यामुळे या महिलेची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. त्यामुळे पोलिसांनी तिला तातडीने प्राथमिक उपचारासाठी सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेलं. त्यानंतर अधिकच्या उपचारांसाठी सिंधुदुर्गातीलच ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं.
ओरोसहूनही पुढील उपचारासाठी या महिलेला सिंधुदुर्ग पोलिसांनी गोवा राज्यातील बांबोलीमच्या गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले आहे. त्या ठिकाणी तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
जंगलामध्ये काही दिवसांपासून अन्न-पाण्याशिवाय ही महिला बांधलेल्या अवस्थेत होती, असं तिनं लेखी सांगितलं आहे. सदर महिला या अवस्थेत नेमकी किती दिवस होती हे स्पष्ट झालेलं नाही.
या महिलेकडे काय काय सापडलं?
ही महिला मूळची अमेरिकन आहे, पण अनेक वर्षांपासून ती तामिळनाडूतच राहते, असं प्राथमिक तपासात समोर आलंय.
जंगलात सापडलेली ही अमेरिकन महिला उच्चशिक्षित असून ती योगाचे पुढील शिक्षण घेण्यासाठी दहा वर्षांपूर्वी भारतात तामिळनाडू येथे आली होती. त्यापूर्वी ती अमेरिकेत प्रसिद्ध बॅले डान्सर व योग शिक्षक होती.
या महिलेकडे आधारकार्ड आणि पासपोर्ट सापडला. मात्र, यातील आधार कार्डवरील पत्ता तामिळनाडूतील आहे आणि पासपोर्ट अमेरिकेचं आहे.
आता पोलीस तपास सुरू झाल्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा होऊ लागला आहे. तिच्याकडे सापडलेला मोबाईल आणि टॅब माहिती मिळण्यासाठी सायबर विभागाकडे पाठवण्यात आला आहे.
तसंच, घटनास्थळी परदेशी महिलेकडे सॅक, मोबाईल, टॅब आणि 31 हजार रुपये रोख सापडले होते. त्यामुळे ही घटना चोरीच्या उद्देशाने झाली नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. तिची मोबाईलची बॅटरी उतरल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.
स्थानिक गुन्हे अन्वेक्षण शाखेने सर्व साहित्य जप्त केले असून मोबाईल व टॅब सायबर विभागाकडे वर्ग करण्यात आला. मोबाईलमधून तिने कोणाकोणाला कॉल केले तसेच या कालावधीत तिला कोणाकोणाचे कॉल आलेत हे उघड झाल्यानंतर या घटनेबाबत स्पष्टता येईल.
बोलता येत नसल्यानं कागदावर लिहून सांगितली आपबिती
ही महिला बोलण्याच्या स्थितीत नसल्यानं, नक्की काय घडलं आहे हे सध्या तरी सांगता येत नाही, असं पोलिसांनी म्हटलं आहे. पण महिलेनं स्वतः एका कागदावर लिहून तिच्याबरोबर काय घडलं हे सांगितलं.
तिने लिहून दिलेल्या माहितीनुसार, तिला कोणतं तरी इंजेक्शन देण्यात आलं होतं. त्यामुळं तिच्या जबड्याची हालचाल होत नव्हती. परिणामी तिला तोंडानं साधं पाणी पिणंही शक्य नव्हतं.
जंगलामध्ये अन्न पाण्याविना 40 दिवसांपासून अशा अवस्थेत आहोत, असा दावा या महिलेनं कागदावर लिहून केला आहे. मात्र, एवढे दिवस अन्न पाण्याविना ती कशी राहिली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
"माझ्या पतीनं मला झाडाला बांधून ठेवलं होतं. याच जंगलात तुझा अंत होईल. मी पीडित असून यातून बचावले. पण तो याठिकाणाहून पळून गेला," असं महिलेनं लिहून सांगितलं.
पतीनेच बांधून ठेवलं होतं?
या महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्यावर काही प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर महिलेची चौकशी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पण महिलेला नीट बोलता येत नसल्यानं तिनं लिहायला कागद पेन मागितला आणि लिहून तिच्याबरोबर काय घडले याबाबत माहिती दिली.
तिचा पती तामिळनाडूमधील असल्याचं तिनं सांगितलं.
तिनं पतीनंच तिच्याबरोबर अशाप्रकारचं कृत्य केलं असल्याचा लेखी दावा केला आहे. पण त्यानं तिच्यासोबत नेमकं असं का केलं? किंवा इतर काहीही माहिती अद्याप स्पष्टपणे समोर आलेली नाही.
अमेरिकन दूतावासाच्या विनंतीनंतर तपासाला वेग
जंगलात सापडलेली महिला ही अमेरिकन नागरिक असल्याने या घटनेची अमेरिकन दूतावासाने गंभीर दखल घेतली आहे.
या प्रकरणात अमेरिकन दूतावासाने जलदगतीने तपास करण्याची विनंती भारत सरकारला केल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. अधिक तपासासाठी सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेक्षणची 2 पोलीस पथके गोवा, तर सिंधुदुर्ग पोलिसांची 2 पथकं तामिळनाडू येथे सर्व कागदपत्रांची तपासणी करत आहेत.
या प्रकरणी महत्वाचा पुरावा ठरणाऱ्या मडुरा रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली आहे. पण त्यामध्ये ही महिला कुठेही आढळून आली नाही. त्यामुळे तिला मडुरा स्थानकातून जंगलात आणले नसेल तर नेमके कुठून आणले याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
याच स्थानकातील अन्य सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू असल्याचे समजते. त्याचबरोबर तिच्यासोबत जो मोबाईल होता, त्याद्वारे तिने कोणाशी संपर्क केला हे समोर आल्यावर सर्व प्रकार उघडकीस येणार आहे.
पोलिसांना आतापर्यंत तपासात काय सापडलं?
प्रथमदर्शनी महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं जाणवत आहे. पण त्याबद्दल काही नक्की बोलता येणार नाही, असं पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी म्हटलं.
या महिलेनं यापूर्वी दिल्ली, मुंबई, गोवा अशा ठिकाणी उपचाराच्या निमित्ताने डॉक्टरांच्या भेटी घेतल्या आहे. महिलेकडून मिळालेल्या कागदपत्रावरून ही माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.
महिलेनं तिचा नवरा तामिळनाडूमध्ये असतो असं सांगितलं आहे. त्याच्यावर आरोपही केले आहेत. त्यासाठी पोलिसांनी तामिळनाडूलाही एक पथक पाठवलं आहे.
या महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे. पण तिच्या बोलण्यात विरोधाभास जाणवत आहे. त्यामुळं पोलिसांनी पाठवलेल्या पथकांच्या चौकशीतून काही ठोस समोर आल्यानंतरच याबाबत माहिती देता येईल असंही पोलीस अधीक्षक म्हणाले आहेत.
तपासाला वेग, तपासासाठी पथकं रवाना
मात्र, ती तामिळनाडू येथून रोणापाल येथील जंगलात कशी पोहोचली याचा तपास करण्याचे आव्हान सिंधुदुर्ग पोलिसांसमोर आहे.
महिलेकडे सापडलेल्या आधारकार्डवर तामिळनाडू येथील रहिवासी पत्ता असल्याने बांदा पोलिसांचे दुसरे पथक हे तामिळनाडू येथे तपासासाठी रवाना झाले आहे. गोवा राज्यात परदेशी पर्यटकांची संख्या ही अधिक असल्याने गुन्हे अन्वेक्षण शाखेचे 2 पथक हे गोव्यात तपासासाठी आज पाठविण्यात आले.
गोव्यात अनेक अमेरिकन नागरिकांकडे चौकशी करण्यात आली. मुंबईतही एक पथक पोलिसांनी पाठवलं होतं. सिंधुदुर्गातही सायबर सेलची दोन पथकं घटनेचा तपास करत आहेत. त्याशिवाय स्थानिक पथक आणि पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारीही या प्रकरणाशी सर्व गोष्टींचा बारकाईने तपास करत आहेत
तामिळनाडू मध्ये नक्की काय सुरू आहे तिथे कागदपत्रांची चौकशी कुठपर्यंत पोहोचली आहे, काय निष्पन्न झालं आहे? याबद्दल मात्र पोलीस अद्यापही बोलण्यास नकार देत आहेत.