'व्हिसा एजंटला पैसे द्यायला 13 टक्के व्याजानी कर्ज काढलं', इंग्लंडला जाणारे भारतीय अडकले घोटाळ्यात

    • Author, निखिल इनामदार आणि जाल्टसन ए.सी
    • Role, बीबीसी न्यूज
    • Reporting from, केरळ

केरळमधील अरुण जॉर्ज यांना 15,000 पौंड (19,460 डॉलर) जमा करण्यासाठी आपलं अर्धं आयुष्य घालवावं लागलं. या बचतीचा उपयोग त्यांनी आपल्या पत्नीला ब्रिटनमध्ये (यूके) केअर वर्करची नोकरी मिळवण्यासाठी केला होता.

अरुण जॉर्ज, हे त्यांचं खरं नाव नाही. कारण ज्या छोट्या समाजातून आपण आलो आहोत, तिथं पैसे देऊनही नोकरी मिळाली नाही हे सर्वांना समजू नये, याखातर त्यांची पत्नी आपली ओळख लपवू इच्छितात.

जॉर्ज दाम्पत्यांनी 2023 च्या अखेरीस अलचिता केअरच्या व्यवस्थापकांना नोकरीसाठी पैसे दिले होते.

बीबीसीनं 'अलचिता केअर'ला जॉर्ज यांनी पैसे दिल्याचा पुरावा पाहिला आहे. ही ब्रॅडफोर्डमधील खासगी डोमिसिलरी केअर होम कंपनी आहे.

या कंपनीनं त्यांच्या कुटुंबाचा व्हिसा प्रायोजित केला होता. जॉर्ज यांनी केरळ राज्यातील त्यांच्या गावातील एक स्थानिक एजंटच्या सांगण्यावरून हे केलं होतं.

विशेष गरजा असलेल्या आपल्या मुलासाठी, त्याला चांगलं आयुष्य जगण्याचं वचन दिल्यामुळंच त्या दाम्पत्यानं पोटाला चिमटा देत पैशांची बचत केली आणि हा धोका पत्करला होता. पण जेव्हा ते यूकेला गेले, तेव्हा तिथं त्यांच्यासाठी कोणतंही काम नव्हतं.

जॉर्ज म्हणाले, "यासाठी आम्ही केअर होमकडे पाठपुरावा करत होतो, पण त्यांनी बहाणे केले. जेव्हा मी त्यांच्याकडे विनंती केली, तेव्हा त्यांनी आम्हाला विनावेतन प्रशिक्षण घेण्यास भाग पाडलं.

त्यानंतर त्यांनी माझ्या पत्नीला फक्त तीन दिवस काम दिलं. अशा परिस्थितीत आम्ही तिथे अधिक काळ राहू शकलो नाही. काही महिन्यांनंतर आम्ही भारतात परत आलो."

कंपनीने आमची फसवणूक केली आहे. या घटनेमुळं आम्ही आर्थिकदृष्ट्या किमान एक दशकभर मागे गेलो आहोत, असं जॉर्ज यांनी म्हटलं आहे.

केरळमधून ब्रिटनमध्ये काम शोधण्यासाठी जाणाऱ्या शेकडो लोकांपैकी त्यांचं एक कुटुंब आहे, ज्यांचं रिक्रूटर्स, केअर होम्स आणि दलालांनी (मध्यस्थ) शोषण केलं आहे.

यातील बहुतांश लोकांनी त्यांना न्याय मिळण्याची किंवा पैसे परत मिळण्याची आशा सोडून दिली आहे.

परदेशात चांगल्या आयुष्याच्या स्वप्नानं प्रेरित होऊन अनेक जण आपली जीवनभराची सर्व कमाई गुंतवतात.

परंतु, त्यांच्या अपेक्षांना धक्का देत, फसवणूक आणि आश्वासनांचं भ्रामक जाळं त्यांच्यावर कोसळतं. परिणामी, अशांना केवळ आर्थिक नुकसानच नाही तर मानसिक त्रासही सहन करावा लागतो.

'रुमचं भाडं देण्यासाठीही पैसे नाहीत, जेवणासाठीही संघर्ष सुरू'

ब्रॅडफोर्डमधील अलचिता केअरनं बीबीसीच्या प्रश्नांना उत्तर दिलं नाही. केअर होम्सना व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या परदेशी कामगारांना प्रायोजकत्व प्रमाणपत्र जारी करण्यास परवानगी देतो, तो त्यांचा प्रायोजकत्व परवाना गृह विभागानं मागील वर्षी काढून घेतला आहे.

किमान तीन इतर केअर वर्कर्सनी आम्हाला सांगितलं की, त्यांनी अलचिता केअरला हजारो पाउंड पाठवले आणि केरळ सोडलं. पण कंपनीने आम्हाला दिलेला नोकरीचा शब्द प्रत्यक्षात पूर्ण केला नाही.

त्यापैकी एक कामगार अजूनही यूकेमध्ये आहे. त्यानं त्याची परिस्थिती खूपच कठीण असून मागील काही महिन्यांपासून एक धर्मादाय संस्था देत असलेल्या 'ब्रेड आणि दुधावर' जगत असल्याचं सांगितलं.

जॉर्ज यांच्याप्रमाणेच श्रीदेवी (हे त्यांचं खरं नाव नाही) म्हणाल्या की, त्यांच्याकडून अलचिता केअरनं व्हिसा प्रायोजकत्वासाठी 15,000 पौंड शुल्क आकारले होते. त्यांनी 2023 मध्ये यूकेमध्ये जाण्यासाठी आणखी 3,000 पौंड खर्च केले.

त्या भारतात परत येऊ शकत नाहीत. कुटुंबातील सदस्य आणि मित्रांची त्यांना भीती वाटत आहे. कारण या लोकांकडून त्यांनी यूकेला येण्यासाठी कर्ज घेतलं होतं.

"रुमचं भाडं आणि जेवणाच्या पैशांसाठीही मला संघर्ष करावा लागत आहे," असं त्यांनी म्हटलं. जे काम देण्याचा शब्द दिला होता. त्यापेक्षा इथली परिस्थिती वेगळी आहे. आठ तासांचं एका ठिकाणीच काम असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण कामाचं ठिकाण खूप दूरवर असतं.

कधीकधी पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत कॉलवर राहावं लागतं. एका रुग्णाच्या घरी जाऊन दुसऱ्या रुग्णाकडे जावं लागतं. पण त्यांना फक्त काही तासांचेच पैसे दिले जातात. पूर्ण शिफ्टचे पैसे दिले जात नाहीत.

'त्यांच्यासाठी न्यायालयीन लढा कठीण'

दरवर्षी केरळमधून यूकेमध्ये स्थलांतरित होण्यासाठी हजारो नर्सेस उत्सुक असतात. परंतु, कोव्हिडदरम्यान सरकारनं केअर वर्कर्सना यूकेच्या शॉर्टेज ऑक्युपेशन (कमतरतेचा व्यवसाय) लिस्टमध्ये समाविष्ट केल्यानंतर त्यांचे शोषण झाल्याचा अंदाज आहे.

यामुळं लोकांना प्रायोजित केल्यास परदेशातून भरती करण्याची परवानगी मिळते.

अनेकांसाठी केअर वर्कर व्हिसा हे चांगलं जीवन जगण्यासाठीची सुवर्णसंधी होती. कारण ते कुटुंबासोबत तिथे जाऊ शकत होते.

मागील तीन वर्षांत अशा किमान 10 पीडितांची भेट घेतली असल्याचे लेबर पार्टीचे सदस्य आणि केंब्रिजचे महापौर बैजू थिट्टाला यांनी बीबीसीला सांगितलं.

परंतु, शोषण करणाऱ्या ही घटना आंतरराष्ट्रीय स्तरावरची असल्यामुळं न्याय मिळवणं अत्यंत कठीण झालं आहे. खूप वेळा पीडितांनी केअर होम्स किंवा मध्यस्थांना भारताबाहेर पैसे दिले आहेत. ज्यामुळं "न्यायक्षेत्रीय समस्या" (अधिकारक्षेत्रातील समस्या) निर्माण होतात, असं ते म्हणाले.

दुसरं म्हणजे, वकील महागडे आहेत आणि बहुतेक केअर वर्कर्स आधीच मोठ्या कर्जात बुडाले आहेत. त्यामुळं न्यायालयात लढणं त्यांना परवडणारं नाही.

केरळमधील किमान 1,000 ते 2,000 लोक याचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बळी पडलेले आणि अजूनही यूकेमध्ये आहेत असा थिट्टाला यांचा अंदाज आहे.

केरळच्या शहरांमध्ये असंख्य असे लोक आहेत ज्यांनी घर सोडण्याआधीच पैसे गमावले आहेत.

'अस्तित्त्वात नसलेल्या व्हिसासाठी 2500 किमी प्रवास'

कोट्मंगलम शहरात बीबीसीनं सुमारे 30 लोकांशी संवाद साधला ज्यांनी केअर व्हिसा मिळवण्यासाठी एकत्रितपणे लाखो डॉलर्स गमावले होते.

या व्हिसामुळं व्यावसायिकांना यूकेमध्ये सामाजिक देखभाल किंवा सेवा क्षेत्रात काम करण्यासाठी येण्याची किंवा तिथे राहण्याची परवानगी मिळते.

या सर्वांनी हेन्री पौलोस या एजंट आणि त्याची यूके आणि भारतातील एजन्सी ग्रेस इंटरनॅशनलवर बनावट नोकरीची ऑफर आणि प्रायोजकत्व पत्रांद्वारे फसवणूक केल्याचा आरोप केला. आमची आयुष्यभर साठवलेली बचत लुटल्याचेही त्यांनी म्हटलं.

पौलोसने त्यांच्यापैकी काही लोकांना अस्तित्वातच नसलेल्या व्हिसा अपॉइंटमेंटसाठी 2,500 किमीचा दिल्लीपर्यंतचा प्रवास करायला भाग पाडलं होतं.

पौलोसला पैसे देण्यासाठी 13 टक्के व्याजदरानं बँकेतून कर्ज घेतलं होतं. पौलोसने नंतर प्रायोजकत्वाचं एक बनावट प्रमाणपत्र दिलं, असं अलेप्पी येथे राहणाऱ्या शिल्पा यांनी बीबीसीला सांगितलं. हे सांगताना शिल्पा यांना अश्रू अनावर झाले होते.

"मला वाटलं होतं की, यूकेत माझ्या तीन मुलींचा भविष्यकाळ चांगला असेल. परंतु आता मला त्यांच्या शाळेची फी भरण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे," असं त्या बीबीसीला म्हणाल्या.

"मी तर सर्व काही गमावलं आहे. आम्ही यूकेला जाऊ शकू म्हणून माझ्या पत्नीने आपली इस्रायलमधील नोकरी सोडली होती," असे दुसरे पीडित बिनू म्हणाले.

इस्रायलमध्ये त्यांच्या चांगली कमाई होत होती. आपल्या पत्नीसह 1,500 पौंड कमावले होते. पण आता ते पैसे त्यांच्याजवळ नाहीत. त्यामुळं त्यांना आपल्या मुलांना केरळमधील खासगी शाळेतून काढावं लागलं आहे.

पौलोस किंवा ग्रेस इंटरनॅशनल या दोघांशीही बीबीसीनं संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला पण प्रतिसाद मिळाला नाही.

कोट्मंगलममधील पोलिसांनी सांगितलं की, पौलोस यूकेमध्ये पळून गेला आहे. त्यांच्याकडे सहा लोकांनी तक्रार आहेत. त्यानंतर पौलोसचे स्थानिक कार्यालय सील केले आहे.

यूकेमधील पूर्वीच्या कंझर्व्हेटिव्ह सरकारनं मागील वर्षी कबूल केलं होतं की, काळजीवाहू कामगारांना (केअर वर्कर) खोट्या सबबीखाली व्हिसा दिला जात होता आणि त्यांच्या कामासाठी आवश्यक असलेल्या किमान वेतनापेक्षा खूपच कमी वेतन दिले जात असल्याचे "स्पष्ट पुरावे" आढळून आले आहेत.

त्याचा गैरवापर कमी करण्यासाठी 2024 मध्ये नियम अधिक कडक केले गेले, ज्यामध्ये किमान वेतन वाढविण्यात आले.

तसेच, केअर वर्कर्सना आता आश्रित (डिपेंडन्ट्ंस) व्यक्तींना घेऊन जाण्याची परवानगी नाही, ज्यामुळं कुटुंबांसाठी हा एक कमी आकर्षक प्रस्ताव बनला आहे.

जुलै 2022 पासून, केअर सेक्टरमध्ये परदेशी कामगारांची भरती करण्याची परवानगी देणारे सुमारे 450 परवाने रद्द करण्यात आले आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीपासून, प्रायोजकांना आता प्रायोजक परवाना शुल्क किंवा संबंधित प्रशासकीय खर्चाचा संभाव्य खर्च कर्मचाऱ्यांना देण्यास गृह कार्यालयाने स्पष्टपणे प्रतिबंधित केले आहे.

दरम्यान, केरळमधील उच्च पोलीस अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं की, ते अजूनही भारतात या प्रकरणांचा तपास करत आहेत आणि आवश्यकतेनुसार एजंटांवर कारवाई करण्यासाठी इंटरपोल एजन्सींसोबत काम करतील.

परंतु, ज्यांचं आधीच शोषण झालं आहे अशा शेकडो लोकांना न्याय मिळणं कठीण आहे. अद्यापही त्यांच्यासाठी ते खूप दूरचं स्वप्न आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.