वर्ल्ड स्टार्टअप कन्व्हेंशनचा फज्जा, गुंतवणूकदार आलेच नाहीत, पोलिसांत तक्रार

फोटो स्रोत, WORLD STARTUP CONVENTION
- Author, मेरिल सेबेस्टियन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
दिल्लीजवळच्या नोएडामध्ये गेल्या महिन्यात (मार्च 2023) शेकडो नवउद्योजक जमले होते. तीन दिवसीय संमेलनात सहभागी होण्यासाठी ते इथे आले होते. हे संमेलन म्हणजे स्टार्टअप कंपन्यांसाठी सर्वात मोठा ‘फंडिंग प्रोग्राम’ आहे, असा प्रचार करण्यात आला होता.
या संमेलनात (वर्ल्ड स्टार्टअप कन्व्हेंशन) आलेले नवउद्योजक मोठ्या व्यावसायिकांना भेटण्यासाठी उत्सुक होते.
मोठ्या व्यावसायिकांसमोर आपल्या उद्योगांबद्दल 15-20 मिनिटं जरी बोलण्याची संधी मिळाली, तरी आपल्याला गुंतवणूक किंवा भांडवल मिळता येईल, असं नवउद्योजकांना वाटलं होतं.
2021 आणि 2022 या दोन वर्षात भारतातल्या स्टार्टअप इकोसिस्टममध्ये भरपूर पैसा खेळत होता. अनेक स्टार्टअप कंपन्यांनी विक्रमी संख्येत पैसा जमवला होता. यातून अनेक कंपन्या रातोरात कोट्यधीश बनल्या.
मात्र, जगभरात अर्थव्यवस्था मंदावत जात असल्यानं या स्टार्टअप कंपन्यांमध्ये पैसे लावणारे गुंतवणूकदार अधिक सावध बनले आहेत. परिणामी स्टार्टअप कंपन्यांना पैसे जमवणं कठीण होऊन बसलं आहे.
यामुळेच नोएडात होणाऱ्या स्टार्टअप कन्व्हेंशनकडून (WSC) नवउद्योजकांना अधिक आशा-अपेक्षा होत्या. मात्र, 24 मार्चला हे संमेलन सुरू होण्याच्या काही तास आधीच हे संमेल गोंधळाच्या कचाट्यात अडकलं.
अनेक भागीदार आणि प्रायोजकांनी आरोप केलाय की, आम्हाला खोट्या आश्वासनांद्वारे फसवलं गेलंय, धोका दिला गेलाय. संमेलनाचे आयोजक मात्र हे आरोप फेटाळतात. संमेलनात आडकाठी आणल्याचा आरोप आयोजक काही उद्योजकांवर करतायेत.
वर्ल्ड स्टार्टअप कन्व्हेंशनच्या पहिल्या दिवशी सचिन चौहान आणि त्यांच्या टीम मोठ्या उत्साहात कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. सचिन चौहान हरियाणातील उद्योजक आहेत. फेब्रुवारीत सोशल मीडियावर या स्टार्टअप कन्व्हेंशनची जाहिरात पाहिल्यानंतर तिकीट खरेदी केलं होतं.
वर्ल्ड स्टार्टअप कन्व्हेंशनच्या वेबसाईटनुसार, या संमेलनाचे प्रमुख पाहुण्यांमध्ये केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांचाही समावेश होता.

फोटो स्रोत, WORLD STARTUP CONVENTION
कार्यक्रमाच्या इतर पाहुण्यांमध्ये राज्यांचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचीही नावं होती. हे सर्व लोक सत्ताधारी भाजपचे नेते होते. नितीन गडकरींनी ट्विटर आणि इन्स्टाग्राम पेजवरही त्यांच्या भाषणात या कार्यक्रमाचा उल्लेख केला होता.
या संमेलनाच्या प्रचारासाठी अंकुर वारिकू, प्रफुल्ल बिल्लोरे, राज शमानी आणि लेखक चेतन भगत यांच्या आवाहानाचे छोटे-छोटे व्हीडिओही तयार करून प्रसारित करण्यात आले होते.
WSC च्या प्रचारांमधून दावा करण्यात आला होता की, या संमेलनात 1500 व्हेंचर कॅपिटॅलिस्ट (जोखीम पत्कारणारे गुंतवणूकदार), 9 हजार एंजेल इन्व्हेस्टर (शेअरच्या बदल्यात कंपनीत गुंतवणूक करणारे) आणि 75 हजार स्टार्टअप कंपन्या भाग घेण्याचा दावा करण्यात आला होता.
संभाव्य ग्राहकांशी थेट मुलाखत, नेटवर्किंग आणि थेट गुंतवणूक अशा हेतूनं या संमेलनाचा प्रचार करण्यात आला होता.
‘अपना मेकॅनिक’ या बाईक सर्व्हिस आणि दुरुस्तीचं अॅप बनवणाऱ्या कंपनीचे सहसंस्थापक सचिन चौहन यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 20 हजार रुपयांचं तिकीट खरेदी केलं होतं. या तिकिटाद्वारे सचिन चौहान आणि त्यांचे चार साथीदार सहभागी होऊ शकणार होते.

फोटो स्रोत, WORLD STARTUP CONVENTION
सचिन चौहान संभाव्य गुंतवणूकदारांसाठी एक प्रेझेंटेशन तयार करूनच नोएडात पोहोचले होते. मात्र, त्यांचा हा उत्साह फार काळ टिकला नाही.
सचिन चौहान यांनी बीबीसीला सांगितलं की, बरेच तास उलटल्यानंतरही आम्हाला एकही गुंतवणूकदार नजरेस पडला नाही.
रिप्रॉक या स्टार्टअप कंपनीचे संस्थापक भैरव जैन हे हजारो किलोमीटरचा अंतर पार करून तामिळनाडूतून या संमेलनात सहभागी होण्यासाठी आले होते. भैरव जैन म्हणतात की, “संमेलनात स्टार्टअप कंपन्यांचे संस्थापकांची गर्दी जमली होती. मला नाही वाटत, या गर्दीत कुणी गुंतवणूकदार होता.”
दुपारी दीड वाजेपर्यंत प्रमुख पाहुणे नितीन गडकरींच नियोजित व्हर्चुअल भाषण स्थगित करण्यात आलं. यामुळे संमेलनात सहभागी होण्यासाठी आलेल्यांमध्ये संतापाचा भडका उडाला.
मुख्य व्यासपीठाच्या आवतीभोवती गर्दी जमण्यास सुरुवात झाली आणि आयोजकांना प्रश्न विचारण्यास सुरुवात करण्यात आली.
सचिन चौहान म्हणतात की, “लोक विचारत होते की, गुंतवणूकदार कुठे आहेत? आणि लवकरच तिथे गदारोळ माजण्यास सुरुवात झाली. कारण आयोजकांकडे या प्रश्नांची उत्तरंच नव्हती.”

फोटो स्रोत, SACHIN CHAUHAN
संध्याकाळ होता होता सचिन चौहान आणि भैरव जैन यांच्यासह 19 उद्योजकांनी आयोजकांवर विश्वासघात करण्याचा आणि फसवणुकीचा आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
वर्ल्ड स्टार्टअप कन्व्हेंशनचं आयोजन क्यूओफाऊंडर प्रायव्हेट लिमिटेड नामक कंपनीने केलं होतं. या कंपनीचे संस्थापक ल्युक तलवार आणि अर्जुन चौधरी आहेत. या दोघांनीही हे आरोप फेटाळले आहेत. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले की, “आडकाठी करणाऱ्यांच्या एका गटाने” त्यांच्या “भाजपविरोधी अजेंड्यानुसार” आयोजनात गोंधळ घातला, ज्यामुळे आयोजकांना पोलिसांना बोलावण्याची वेळ आली.
या प्रकरणी संबंधित मंत्री आणि भाजपनं अद्याप कोणतंही पत्रक जारी केलं नाहीय.
आयोजकांचं म्हणणं काय आहे?
आयोजक अर्जुन चौधरी म्हणतात की, कार्यक्रमात काहीजणांनी गोंधळ घातल्यानं नितीन गडकरींचं भाषण रद्द करावं लागलं. बाकी संमेलन नियोजित कार्यक्रमाप्रमाणेच झाला. त्यासाठी पोलिसांनी सुरक्षा पुरवली होती.
अर्जुन चौधरींनी दावा केलाय की, “कार्यक्रमात गुंतवणूकदार आले होते. त्यांची संख्या कमी असू शकते.”
अर्जुन चौधरी यांच्यानुसार, “WSC मध्ये आलेल्या गुंतवणूकदारांमध्ये खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेली ICICI बँक, यूनिकॉर्न इंडिया व्हेंचर्स, बजाज फिनसर्वसारखी वित्तपुरवठा संस्था आणि अझीम प्रेमजींची खासगी गुंतवणूक कंपनी प्रेमजी इन्व्हेस्टचा समावेश होता.”
मात्र, सचिन चौहान म्हणतात की, या कार्यक्रमात जास्तीत जास्त स्टार्टअप कंपन्यांचे मालकच होते. स्टार्टअप कंपन्यांचे मालक स्टार्टअप कंपन्यांच्या संस्थापकांसमोरच प्रेझेंटेशन देत होते.
या संमेलनात सहभागी झालेल्या भागीदारांनी आपापले अनुभव सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मांडण्यास सुरुवात केलीय. तसंच, गूगलवर निगेटिव्ह रेटिंग देणारे रिव्ह्यू लिहिण्यास सुरुवात केलीय.
काही कंपन्यांनीही असंही सांगितलं की, या कार्यक्रमाचं प्रायोजक बनण्यासाठी त्यांना फसवण्यात आलं.
सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असणाऱ्या अंकुर वारिकू आणि राज शमानी यांनी आरोप केलाय की, वर्ल्ड स्टार्टअप कन्व्हेंशनने परवानगीविना त्यांच्या प्रचारासाठी व्हीडिओचा वापर केला. मात्र, आयोजकांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

फोटो स्रोत, WORLD STARTUP CONVENTION
पोलिसांचं म्हणणं आहे की, आम्ही या प्रकाराची चौकशी करतोय. आतापर्यंत कुणालाही ताब्यात घेण्यात किंवा अटक करण्यात आली नाहीय.
बंगळुरूस्थित टिकाऊ पॅकेजिंग करणाऱ्या बँब्र्यू या ब्रँडसाठी तर हा कार्यक्रमा अत्यंत निराशाजनक ठरला. बँब्र्यूचे संस्थापक वैभव अनंत म्हणतात की, या संमेलनाचं प्रायोजक म्हणून 45 हजार डॉलरची रक्कम खर्च केली होती.
वैभव अनंत पुढे सांगतात की, आम्ही जाळ्यात अडकलो आणि आम्हाला केवळ प्रायोजक म्हणूनच नव्हे, तर कार्यक्रमाच्या सेटअप, तसंच लोकांमध्ये वाटप करण्यासाठी नमुने तयार करण्यातही पैसा खर्च केला.
वर्ल्ड स्टार्टअप कन्व्हेंशनच्या आणखी एक प्रायोजक, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी Builder.ai म्हणते की, या संमेलनातील घटनांमुळे अत्यंत निराशा झालीय.
या कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, “आम्ही जेव्हा आयोजकांशी संपर्क करून या वादावर स्पष्टीकरण मागितलं आणि पैसे परत मागितले, तर त्यांनी कुठलंच उत्तर दिलं नाही.”
वर्ल्ड स्टार्टअप कन्व्हेंशनच्या वेबसाईटवर आताही Builder.ai चं नाव आणि लोगो दर्शन भागात दिसतं.
आणखी एका प्रायोजकानं अशाच प्रेकारचा अनुभव ट्वीट केलाय.
मात्र, संमेलनाच्या आयोजकांनी प्रायोजक आणि इन्फ्लुएंसर्सच्या नाराजीला उद्योजकांना जबाबदार ठरवलंय.
अर्जुन चौधरी म्हणतात की, या घटनेमुळे माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात कव्हरेजं झालं आणि परिणामी याचा आमचं आयुष्य बरबाद झालंय.
काही प्रायोजक आणि उद्योजकांना वाटलं होतं की, या कन्व्हेंशनमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई आणि ट्विटरचे मालक इलॉन मस्क हेही हजेरी लावतील.
मात्र, आयोजकांनी म्हटलं की, या सगळ्यांचे फोटो जानेवारीत होऊ घातलेल्या एका कार्यक्रमासाठीचे होते, जो कार्यक्रम काही कारणास्तव होऊ शकला नाही.
आयोजकांवर कायदेशीर कारवाईचे प्रयत्न
वकील रघुमन्यू तनेजा हे लोकांशी नेटवर्किंग वाढवण्याच्या आशेनं वर्ल्ड स्टार्टअप कन्व्हेंशनमध्ये सहभागी झाले होते.
या कन्व्हेंशनमधील गोंधळामुळे त्रस्त झालेल्यांचे आता ते वकील बनले आहेत. रघुमन्यू म्हणतात की, अंकुर वारिकूंसारख्यांचे फोटो पाहून या कार्यक्रमाबद्दल विश्वास वाढला होता.
रघुमन्यू यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, भारतातल्या प्रचाराच्या नियमांनुसार यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते.
मात्र, अंकुर वारिकू मात्र या आरोपांना फेटाळतात. त्यांनी आम्हाला एक मेसेज पाठवून उत्तर दिलं की, “जे लोक या कार्यक्रमाबद्दल लिहितायेत, त्यांच्यापैकी प्रत्येकाला मी वैयक्तिकरित्या उत्तरं देतोय. माध्यमांमध्येही माझी औपचारिक प्रतिक्रिया देत आहे.”

फोटो स्रोत, WORLD STARTUP CONVENTION
उद्योजकांनी आयोजकांविरोधात पोलीस तक्रार केलीय, त्यात म्हटलंय क, आयोजकांवर 1.2 कोटी डॉलरचा घोटाळा केलाय. तक्रार दाखल करणाऱ्यांनी या रकमेचा अंदाज कार्यक्रमात सहभाग झालेले लोक आणि स्टार्टअप कंपन्यांच्या संख्येवरून लावलाय.
मात्र, आयोजकांमधील अर्जुन चौधरी म्हणतात की, वर्ल्ड स्टार्टअप कन्व्हेंशनमधून जमलेली रक्कम ही आरोप करणाऱ्या आलेल्या रकमेच्या अगदी कणभर आहे.
अर्जुन चौधरी प्रश्न विचारतात की, “जर घोटाळा झाला होता, तर आम्ही असा कार्यक्रम केलाच का असता, जिथे कार्यक्रमाच्या काही तासातच तो कळून यावा. घोटाळा असता तर ही रक्कम घेऊन पळून नसतो का गेलो?”
ल्यूक तलवार यांच्या मते, या संमेलनात जवळपास चार हजार लोक सहभागी झाले होते. वर्ल्ड स्टार्टअप कन्व्हेंशनने त्यांच्या वेबसाईटवर या कार्यक्रमाचं कौतुक करणाऱ्या गोष्टी शेअर केल्या आहेत. त्यांनी बीबीसीलाही त्या गोष्टी दाखवल्या. मात्र, या संमेलनातून नेमकी किती रक्कम जमा केली गेली, हे सांगितलं गेलं नाही.
तक्रार करणारे म्हणतात की, एका व्हॉट्सअप ग्रुपद्वारे पुढचं पाऊल काय उचलायचं, याचं नियोजन केलं जात आहे. दुसरीकडे, वर्ल्ड स्टार्टअप कन्व्हेंशनचे आयोजक म्हणतात की, कायदेशीर कारवाईला तोंड देण्यास आम्ही तयार आहोत.











