वसुंधरा राजे सिंधिया: राजस्थान भाजपच्या 'राणी' समोरचं आव्हान सोपं की कठीण?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, त्रिभूवन
- Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी
मार्च 2018 मधली गोष्ट. राजस्थानमधील झुंझुनू इथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्यांच्यासोबत तत्कालीन मुख्यमंत्री वसुंधरा राजेही मंचावर उपस्थित होत्या.
या कार्यक्रमानंतरचा एक फोटो व्हायरल झाला होता. यात पंतप्रधान मोदी सावधान दिल्यासारखे उभे होते तर वसुंधरा राजे त्यांच्यासमोर मानी अविर्भावात उभ्या होत्या. त्या एका बोटानं समोर निर्देश करत होत्या.
देशाच्या राजकारणातील सर्वात ताकदवान नेत्यासमोर भारतीय जनता पक्षाच्या एका प्रादेशिक नेत्याचा हा पवित्रा त्यांच्या आंतरिक शक्तीचे, निर्भय वृत्तीचे आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब असल्यासारखे दिसले.
पण आता हे चित्र बदललं आहे. आता त्या पंतप्रधान मोदींच्या सभांमध्ये मंचावर उपस्थित असतात मात्र एकदम विनम्र पद्धतीने. पण तरीही अजिंक्य असल्याची भावना त्याच्या देहबोलीतून झळकतेच.
ग्वाल्हेर राजघराण्यातील राजकन्या आणि धौलपूर राजघराण्याची सून, पाच वेळा आमदार आणि पाच वेळा लोकसभा खासदार राहिलेल्या वसुंधरा राजे यांच्या लोकप्रियतेचं प्रमुख कारण म्हणजे पाच जातींसोबत असलेला त्यांचा थेट संपर्क.
त्या स्वतः मराठा राजपूत आहेत. जाट राजघराण्यात त्यांचं लग्न झालं आहे. त्यांच्या पतीचा जन्म शीख राजघराण्यात झाला होता आणि जाट राजघराण्यातील आजोबांनी त्यांना दत्तक घेतलं.
त्यामुळे राजस्थानच्या राजकारणात वसुंधरा राजे यांना या सगळ्यांचं समर्थन मिळवून आपलं स्थान भक्कम करण्याची संधी मिळाली.
वसुंधरा राजे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री आणि कार्मिक मंत्रालयाच्या मंत्री म्हणून काम केलं होतं.
2003 साली राजस्थानच्या रणांगणात त्यांना उतरवण्यात आलं, तेव्हा वसुंधरा यांनी भाजपच्या ‘उदास आणि कलह माजलेल्या’ राजकीय स्थितीतही 200 पैकी 120 जागा जिंकून इतिहास रचला.
वसुंधरा राजेंनी असं बदललं राजस्थानचं राजकारण
त्यापूर्वी भाजपला कधीही राजस्थानच्या राजकारणात बहुमत आणता आलं नव्हतं.
1977 मध्ये जनता पक्षाने 152 जागा जिंकल्या तेव्हा पक्षाचे नेते भैरोसिंग शेखावत हे कसेबसे मुख्यमंत्री बनले होते. मात्र त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला 95 चा आकडाही पार करता आला नाही.
वसुंधरा राजे यांच्या आधी भाजपच्या भैरोसिंह शेखावत आणि इतर नेत्यांच्या कारकिर्दीत राजस्थान विधानसभा निवडणुकीतील कामगिरीवर एकदा नजर टाका.

मोदी लाटेचा परिणाम
शेखावत तीन वेळा मुख्यमंत्री झाले. एकदा जनता पक्षाच्या काळात 152 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर, भाजपचे नेते म्हणून ते दोनदा मुख्यमंत्री झाले.
1990 मध्ये ते मुख्यमंत्री झाले, तेव्हा भाजपला 85 जागा मिळाल्या होत्या. 1993 मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा भाजपला 95 जागा मिळाल्या होत्या.
त्यावेळी बहुमतासाठी 101 जागा आवश्यक होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
वसुंधरा राजेही दोन वेळा भाजपकडून राजस्थानच्या मुख्यमंत्री झाल्या. 2003 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली 120 जागा निवडून आल्या आणि 2013 मध्ये त्यांनी 163 जागा मिळवून विक्रम रचला.
पण 2013 साली एवढ्या जागा मिळण्यामागे त्यावेळची मोदी लाटही कारणीभूत होती, असं काही राजकीय तज्ञ म्हणतात.
त्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी राज्यातील विविध भागात जाहीर सभा घेतल्या होत्या. या सभांना प्रचंड गर्दी होती.
त्या निवडणुकीत वसुंधरा राजे यांनी तत्कालीन गेहलोत सरकारविरोधात मोठा मोर्चा काढला होता. या मोर्चात भाजप नेते भूपेंद्र यादव त्यांच्यासोबत होते असंही तज्ञ सांगतात.
पण यावेळी मात्र पक्षाच्या नेतृत्वाने त्यांना सध्याच्या गेहलोत सरकारविरोधात राजकीय मोर्चा काढण्याची परवानगी दिलेली नाही.
त्याऐवजी यावेळी चार वेगवेगळ्या टीम्सनी राज्याच्या चार वेगवेगळ्या दिशांना राजकीय दौरे काढले. पण वसुंधरा राजे यांच्या दौऱ्यांसारखा प्रभाव त्यांना निर्माण करता आला नाही.
'मेरी डोली राजस्थान आई थी, अब अर्थी ही जाएगी'
साहजिकच आता राजस्थान मधील भाजपचं राजकारण नवं रूप धारण करतंय, तेव्हा अनेक नवे चेहरे राजकीय वर्तुळात येत आहेत आणि यात वसुंधरा राजे काहीशा बाजूला झाल्यासारख्या दिसत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
खरं तर पाच वर्षांपूर्वीच या बदलाचे संकेत मिळाले होते. त्यावेळी वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेतून पायउतार होऊन अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं होतं.
काही दिवसांनंतर म्हणजेच 10 जानेवारी 2019 रोजी वसुंधरा यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या टीममध्ये उपाध्यक्षपद दिलं गेलं. त्यामुळे त्यांना राजस्थानात विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही हे तर निश्चित झालं होतं.
त्याऐवजी पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाबचंद कटारिया विरोधी पक्षनेते झाले.
कटारिया यांची नंतर आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आणि त्यांच्या जागी राजेंद्रसिंह राठोड हे विरोधी पक्षनेते बनले. याआधी सी पी जोशी यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं होतं.
त्यामुळे वसुंधरा राजे यांचं राष्ट्रीय राजकारणातील स्थान काय आहे, हे आता पक्षाचं नेतृत्व ठरवणार हे तरी निश्चित झालं.
वसुंधरा राजे 20 जानेवारी 2019 रोजी झालरापाटन मतदारसंघातील सभेत म्हणाल्या होत्या की, "मी आधीही सांगून झालंय, 'मेरी डोली राजस्थान आई थी. अब अर्थी ही यहाँ से जाएगी' माझं संपूर्ण आयुष्य माझ्या राजस्थान कुटुंबासाठी समर्पित असेल. मी राजस्थानची सेवा करण्यापासून कधीही मागे हटणार नाही."

फोटो स्रोत, Getty Images
ज्येष्ठ पत्रकार संजीव श्रीवास्तव सांगतात, "वसुंधरा राजे 2013 ते 2018 या काळात अनेकवेळा पक्षनेतृत्वासमोर पाय रोवून उभ्या राहिल्या आहेत. यापूर्वीही अनेकदा असं घडलंय. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत. 2003 मध्ये राजकीयदृष्ट्या परिपक्व नसलेल्या वसुंधरा राजे 2023 मध्ये चाणाक्ष राजकारणी झाल्या आहेत. ही त्यांची वाटचाल चढउतारांनी आणि अनुभवांनी भरलेली आहे."
संजीव श्रीवास्तव पुढे म्हणतात, "भैरोसिंह शेखावत आणि जसवंत सिंह यांच्या सावलीतून बाहेर पडलेल्या वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्याच्या प्रशासकीय आणि राजकीय परिस्थितीवर जे नियंत्रण ठेवलं, त्यातून त्यांचं व्यक्तिमत्व भावना आणि प्रभाव स्पष्टपणे दिसतो."
स्वतःची ओळख निर्माण केली
वसुंधरा राजे यांच्या पहिल्या कार्यकाळात काम केलेले एक उच्च अधिकारी सांगतात, "त्यांची निर्णय घेण्याची क्षमता आश्चर्यकारक आहे. त्या केवळ हो किंवा नाही या शब्दांवर विश्वास ठेवतात."
संजीव श्रीवास्तव यांच्या मते, "वसुंधरा राजे यांची सौंदर्यदृष्टी अप्रतिम आहे. त्या राजस्थानच्या ब्रँड अॅम्बेसेडर असल्याचं दिसतं. त्यांची दृष्टी राज्यातील पारंपरिक नेत्यांपेक्षा खूप वेगळी आहे."
ते पुढे सांगतात की, "त्यांच्या नेतृत्वाखाली जो औद्योगिक विकास झाला तो पूर्वीपेक्षा खूप वेगळा होता. पण पहिल्या कार्यकाळात ललित मोदी हा विषय त्यांना जड गेला होता. तर दुसऱ्या कार्यकाळात 'मोदी तुझसे बैर नही, वसुंधरा तेरी खैर नही' या घोषणेमुळे त्यांचं खूप नुकसान झालं होतं."
पण विशेष म्हणजे वसुंधरा राजे यांच्या दोन्ही कार्यकाळात त्यांना बाहेरूनही झाला नसेल एवढा विरोध पक्षातूनच झाला.

फोटो स्रोत, Getty Images
काँग्रेसचे एक रणनीतीकार सांगतात, "पहिल्या कार्यकाळात जेव्हा त्यांच्या सरकारवर आरोपांच्या फैरी झडल्या तेव्हा आरोप करणारे बहुतांश नेते भाजपचेच होते. त्याचाच आधार घेत काँग्रेसने त्यांच्या विरोधात निवडणूक प्रचार सुरू केला."
वसुंधरा राजेंचा उदय झाला तेव्हा वयाची श्याहत्तरी ओलांडलेल्या भैरोसिंग शेखावत यांना राजस्थानच्या राजकारणातून बाजूला काढून नवं नेतृत्व तयार केलं जात होतं.
राजस्थानच्या राजकारणात वसुंधरा राजे मध्यवर्ती भूमिकेत आल्या, त्या दिवसांची आठवण करून देताना संजीव श्रीवास्तव सांगतात, "2003 मध्ये त्यांचं वय आजच्या दीयाकुमारीं इतकंच होतं. खरं तर त्या त्यांच्यापेक्षा फक्त दोन वर्षांनी लहान होत्या. वसुंधरा राजे आज भले ही 71 वर्षांच्या असतील, पण त्या तंदुरुस्त आहेत. नियमितपणे योगा, जिम-ट्रेडमिल करतात. त्या त्यांच्या आरोग्याबाबत खूप जागरूक आहेत आणि खाण्याच्या सवयींची खूप काळजी घेतात.
त्यांना ओळखणाऱ्या कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा केल्याशिवाय त्या कोणाचीही भेट घेत नाहीत किंवा काही खात नाही.
मुख्यमंत्री बनण्याची शक्यता किती?
राज्यातील निवडणुकीच्या राजकारणावर करडी नजर ठेवणाऱ्या तज्ञांच्या मते, "यावेळी भाजपची सत्ता आल्यास वसुंधरा राजे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत असं गृहीत धरलं जातंय. पण त्यांना हे लक्षात येत नाही की निवडणुकीच्या निकालानं जर असा संकेत दिला की वसुंधरा यांच्याशिवाय 2024 ची लोकसभा निवडणुक लढवण्यास भाजपवर परिणाम होईल, तर वसुंधरा पुन्हा मुख्यमंत्री बनू शकतात. कारण राज्यातील सर्व 25 जागांवर वादळी वातावरण निर्माण करण्यात मोदींना केवळ त्याच मदत करू शकतात."

फोटो स्रोत, Getty Images
पण जर त्या इतक्या यशस्वी आणि प्रभावशाली आहेत तर मग पक्षाचं नेतृत्व त्यांच्यावर नाराज का आहे?
भारतीय जनता पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांकडून आम्ही हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की, त्या मुख्यमंत्री असताना पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला राजस्थानमध्ये त्यांच्या पसंतीचा प्रदेशाध्यक्ष बनवायचा होता. पण त्यांना त्यात यश आलं नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना केंद्रीय मंत्री आणि संघाचे दीर्घकालीन सहकारी असलेल्या गजेंद्रसिंह शेखावत यांना प्रदेशाध्यक्ष बनवायचं होतं. गजेंद्रसिंह यांनी राज्याच्या काही भागांचा दौराही केला हा. पण त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्याचा प्रस्तावर तत्कालीन मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी मान्य केला नाही. त्यांनी शेखावत यांचे पायही राजस्थानला लागू दिले नाहीत.
त्यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक परनामी यांनी राजीनामा दिला होता. मात्र शेखावत यांना प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होता आलं नाही आणि पक्ष दीर्घकाळ प्रदेशाध्यक्षाविना राहिला. यामुळे पक्षाची केवळ राज्यातच नव्हे, तर देशाच्या राजकारणातही बदनामी झाली. सोबतच मोदी-शहा यांच्या ताकदवान अशा प्रतिमेलाही धक्का बसला.
पक्ष नेतृत्वाशी संघर्षांची मालिका
मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यापासूनच पक्ष नेतृत्वाशी त्यांचा संघर्ष झाला. राज्यातील अनेक खासदारांना घेऊन त्या बिकानेर हाऊसमध्ये गेल्या होत्या. त्यांचे खासदार पुत्र दुष्यंत सिंह यांना मंत्री बनवण्यासाठी दबाव टाकण्याचा हा प्रयत्न होता, असं सांगितलं जातं. तर त्यांचे समर्थक हा निव्वळ किस्सा असल्याचं म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या तेव्हा वसुंधरा यांचा पक्षाचे संघटन सरचिटणीस प्रकाशचंद्र यांच्याशी वाद झाला. त्यानंतर बराच काळ त्यांनी संघाच्या एकाही स्वयंसेवकाला संघटनेचे सरचिटणीस म्हणून पक्षात येऊ दिलं नाही.
मात्र, पक्षाने निर्णय घेतलाच नसल्यामुळे हे घडल्याचं त्यांच्या बाजूच्या जाणकारांचं म्हणणं आहे. वसुंधरा राजे यांचा याच्याशी काहीही संबंध नव्हता.
देशातील भाजपच्या प्रादेशिक नेत्यांमध्ये वसुंधरा राजे या एकमेव होत्या ज्या केंद्रीय नेतृत्वासमोर शक्ती म्हणून उदयास आल्या. याआधी त्या राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्यासमोरही झुकल्या नव्हत्या.
भाजपच्या धार्मिक विभाजनवादी राजकारणातही त्या फिट बसत नाहीत. त्यांचं राजकारण जवळून पाहणारे सिराकस विद्यापीठाचे अभ्यासक प्राध्यापक मोहम्मद हसन यांच्या मते, वसुंधरा राजे यांच्याकडून अल्पसंख्याक कधीही न्यायाची अपेक्षा करू शकतात. आजचे भाजपचे नेते जेवढे 'कट्टर' दिसतात तेवढ्या त्या नाहीत.
वसुंधरा राजे यांची जुनी विधानं आणि मुलाखतींचा अभ्यास केला तर असं दिसतं की, त्या त्यांच्या आईने दिलेला कानमंत्र राजकारणात वापरतात. त्या म्हणाल्या होत्या की, "माझ्या आईने मला एक मंत्र दिला होता की राजकारणात जाशील तर एक गोष्ट लक्षात ठेव - लोकांना प्रेमाने जोड. जात, धर्म आणि मतांसाठी लोकांना कधीही तोडू नकोस."
भाजपच्या कट्टरतावादापेक्षा वेगळी ओळख
वसुंधरा यांना पुस्तकं वाचण्याची आवड आहे. त्यांना इतिहास आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारण्यांविषयी त्यांनी भरपूर वाचन केलंय. त्या अध्यात्म, तत्त्वज्ञान, चांगल्या चरित्रांपासून रहस्यकथांपर्यंत सर्व काही वाचतात.
राजवाड्यापासून ते राजकारण असा प्रवास करणाऱ्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक रंजक पैलू आहेत.
वसुंधरा राजे यांचं बालपण जहाजांवर प्रवास करण्यात, शर्यती पाहण्यात, राजवाड्यांमध्ये राहण्यात, चांदीच्या भांड्यांमध्ये जेवण्यात गेलंय. नोकरचाकर त्यांचे लाड करायचे. पण जितकं हे जगणं सुखासीन होतं, त्याउलट त्यांचं राजकीय जीवन बऱ्याच चढ-उतारांनी भरलेलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
वसुंधरा यांची आई विजयाराजे सिंधिया भाजपच्या राष्ट्रीय नेता होत्या. वसुंधरा यांचं शिक्षण तामिळनाडूतलं हिल स्टेशन कोडाईकनाल इथे एका बोर्डिंग स्कूलमध्ये झालं. त्या तिथे हाऊस कॅप्टन बनल्या आणि स्पर्धेला तोंड देत पुढे जायला शिकल्या.
12 वी पर्यंत शिक्षण तिथे पूर्ण केल्यावर वसुंधरा यांनी मुंबईतील सोफिया कॉलेजमधून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयात ऑनर्ससह पदवी घेतली.
कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांचं लग्न झालं आणि लग्नानंतर त्यांनी पदवी प्राप्त केली. त्या काळात त्यांनी खूप परदेश प्रवास केला आणि याच काळात त्यांचे भाऊ माधव राव सिंधिया त्यांच्यासोबत असायचे.
मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्या कार्यकाळात वसुंधरा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. पुढे अशोक गेहलोत यांनी त्यांच्याविरोधात चौकशी समिती स्थापन केली. पण ही समिती कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचू शकली नाही.
भ्रष्टाचाराच्या आरोपांवर त्या म्हणाल्या होत्या, "मला हसू येतं कारण माझ्या कुटुंबात कधीही कशाचीही कमतरता नव्हती आणि या कुटुंबाने नेहमीच द्यायला शिकवलं आहे, घ्यायला नाही."
वसुंधरा राजे आपल्या आई विजया राजे यांना प्रेरणास्थान मानत असल्या तरी त्या गायत्री देवी यांना त्यांच्या काळातील सर्वात सुंदर स्त्री मानतात.
नेहमी साडी नेसणाऱ्या आणि अतिशय शालीनतेने राहणाऱ्या वसुंधरा राजे यांच्या फॅशनच्या प्रेमाबाबत वादही निर्माण झाले आहेत.
साडीवरील प्रेम आणि त्यावरून वाद
मुख्यमंत्री असताना त्यांनी पहिल्यांदा खादीसाठी रॅम्प वॉक केलं होतं, ज्यावर राज्यात बरीच चर्चा झाली. काँग्रेस आणि संघाने त्यांना यावरून जोरदार विरोध केला होता.
त्यांना चित्रपट पाहण्याचीही आवड असून विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्या पक्षाच्या आणि विरोधी पक्षाच्या आमदारांसह कोणत्या ना कोणत्या चित्रपटगृहात भव्य कार्यक्रमांचे आयोजन करत.
वाळवंट, शेळ्या, मेंढ्या आणि उंट असलेल्या राजस्थानला आयटी, बीपीओ, औद्योगिकीकरण आणि पर्यटनाचे केंद्र बनवण्यासाठी वसुंधरा राजे यांनी खूप प्रयत्न केले.
त्या त्यांच्या आरोग्याची खूप काळजी घेतात आणि नियमित व्यायाम करतात. त्यांचा स्वतःचा ट्रेनर आहे आणि घरी व्यायामाची यंत्र देखील आहेत.

फोटो स्रोत, VASUNDHARA RAJE TWITTER
त्यांना बागकामाची इतकी आवड आहे की, मुख्यमंत्री असतानाही त्या दुर्गापुराजवळील एका सुंदर रोपवाटिकेत रोपं निवडण्यासाठी वेळ काढायच्या
बाजरीची भाकरी, गरमागरम चण्याची भाजी आणि लसूण चटणीच्या शौकीन वसुंधरा राजे यांना लता मंगेशकर आणि आशा भोसले यांची गाणी आवडतात.
वसुंधरा राजे यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात 1984 मध्ये झाली. याचवेळी त्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष बनल्या होत्या.
1985 ते 90 मध्ये त्या धौलपूरमधून आमदार बनल्या. यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री भैरोसिंह शेखावत या जागेवर निवडून आले. पण 1993 मध्ये काँग्रेसच्या बनवारीलाल शर्मा यांच्याकडून त्यांना ही विधानसभेची जागा गमवावी लागली.
यानंतर त्यांनी आपला मतदारसंघ बदलला आणि 2003 पासून त्या सातत्याने झालावाड जिल्ह्यातील झालरापाटणमधून निवडून आल्या.
1989-91 मध्ये त्या 9 व्या लोकसभेवर निवडून गेल्या. यानंतर 1991-96, 96-98, 98-99 आणि 99-03 मध्ये त्या झालावाडमधून लोकसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या.
त्या अतिशय धार्मिक आणि श्रद्धाळू आहेत. त्या दतिया पीठाच्या अनुयायी आहेत तसंच त्रिपुरा सुंदर आणि चारभुजाजी यांच्यावरही त्यांची प्रचंड श्रद्धा आहे.
शत्रूलाही मित्र करण्याची क्षमता
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात विशेष पैलू म्हणजे त्या कशाचीही पर्वा न करता मित्राला शत्रू आणि शत्रूला मित्र बनवू शकतात.
माजी मुख्यमंत्री भैरोसिंग शेखावत आणि जसवंत सिंग हे त्यांचे सर्वात मोठे समर्थक होते, पण नंतर त्यांचे संबंध बिघडले.
देवीसिंह भाटी, कैलाश मेघवाल, प्रल्हाद गुंजाळ, गुलाबचंद कटारिया, नरपत सिंग राजवी अशा अनेकांशी त्यांचे संबंध बिघडले होते, पण एक वेळ अशीही आली की हे सर्वजण सुखाने नांदू लागले.
वसुंधरा यांनीच गजेंद्रसिंग शेखावत, दियाकुमारी, अर्जुनराम मेघवाल यांसारख्या नेत्यांना पक्षात आणलं, पण आज हेच लोक त्यांचे मोठे प्रतिस्पर्धी बनले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
केंद्रात मोदी-शहा यांच्या उदयानंतर वसुंधरा राजे त्यांच्याशी कसा तरी ताळमेळ राखतील आणि राजस्थान मधील भाजप नव्या रूपात येईल असं वाटत होतं. पण राजकारण आणि चेहरे बदलण्याच्या मार्गावर धावणारं भाजप आता नव्या रंगात रंगलं आहे.
राजस्थानमध्ये शेखावती असो वा धुंधार, ब्रज-डांग असो की मेवाड-मारवाड, वागद, वसुंधरा राजेंची कमी लोकांना कमतरता जाणवत आहे.
आज त्यांच्या केंद्राशी असलेल्या संबंधांवर प्रश्नचिन्ह आहेत, परंतु त्यांनी अद्याप पक्ष किंवा केंद्रीय नेतृत्वाबद्दल नाराजी असल्याचे कोणतेही संकेत जाहीरपणे दिलेले नाहीत.
शेखावती येथील त्यांच्या एका समर्थकाने असं म्हटलंय की,
ये दाग़-दाग़ उजाला, ये शबगज़ीदा सहर.
वो इंतज़ार था जिसका, ये वो सहर तो नहीं.
(या प्रकाशावरही डाग आहेत, ही सकाळही रात्रीनं वेढलेली आहे. ज्याची वाट पाहात होतो, ती ही सकाळ नाही.)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








