वसुंधरा राजे या अमित शाहांच्या दौऱ्याआधी भाजप नेतृत्वावर दबाव आणत होत्या?

फोटो स्रोत, HINDUSTAN TIMES/GETTYIMAGES
- Author, मोहर सिंह मीणा
- Role, जयपूरहून, बीबीसी हिंदीसाठी
राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा वसुंधरा राजे मोठ्या कालावधीनंतर राजस्थानात सक्रीय होताना दिसतायेत.
गेल्या महिन्यात वसुंधरा राजे यांनी 23 ते 25 नोव्हेंबर या दरम्यान राजस्थानातील सहा जिल्ह्यांमध्ये यात्रा काढली. या यात्रेला त्यांनी 'देवदर्शन यात्रा' असं नाव दिलं आणि या यात्रेला त्यांनी वैयक्तिक दौरा असल्याचं म्हटलं.
मात्र, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला दिलेला संदेश म्हणून या यात्रेकडे पाहिलं जातंय.
याआधी जेव्हा त्यांनी राजस्थानात दोनवेळा सत्ता सांभाळली होती, तेव्हा त्यांनी मेवाडपासूनच सुरुवात केली होती आणि आताही मेवाडमधील चित्तौडगडपासून 'देवदर्शन यात्रा' सुरू केली.
वसुंधरा राजे आणि त्यांच्या सक्रीयतेबाबत बोलण्यास भाजपचे पदाधिकारी सुद्धा टाळाटाळ करतायेत आणि जे बोलतायेत ते या यात्रेला धार्मिक यात्रा संबोधित आहेत.
मात्र, असं म्हटलं जातंय की, वसुंधरा राजे यांची सक्रीयता राजस्थानपासून दिल्लीपर्यंत चर्चेचं केंद्र बनलंय.
5 डिसेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा जयपूरमध्ये कार्यक्रम होता आणि कार्यसमितीच्या बैठकीतही ते सहभाग होणार आहेत. या कार्यक्रमाशी वसुंधरा राजेंच्या यात्रेला जोडलं गेलं
केंद्रीय नेतृत्वाला वसुंधरा राजे संदेश देऊ पाहतायेत?
वसुंधरा राजे यांच्या सहा जिल्ह्यांमधील यात्रेकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भलेही पाठ फिरवली असेल, पण या यात्रेत मोठ्या संख्येत वसुंधरा समर्थक आणि आमदार सहभागी होते.
पोटनिवडणुकीत भाजपमध्ये बंडखोरी करणारे उमेदवारही वसुंधरा राजे यांच्या यात्रेत दिसून आले.

फोटो स्रोत, NURPHOTO/GETTYIMAGES
राजस्थानात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या आठ जागांकडे वसुंधरा राजे यांनी अंतर राखलं आणि यातल्या सात जागांवर भाजपचा पराभव झाला. धरियावदमध्ये तर भाजप तिसऱ्या आणि वल्लभनगरमध्ये चौथ्या स्थानावर गेला.
राजस्थानत जिथं जिथं वसुंधरा राजे यांचं वर्चस्व आहे, तिथं भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांना विरोध होताना दिसतो. असं असताना वसुंधरा राजे या सक्रीयतेतून हे सांगू पाहत आहेत की, माझ्याशिवाय राजस्थानात सरकार बनणं कठीण आहे.
वरिष्ठ पत्रकार अवधेश अकोदिया म्हणतात की, "स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोटनिवडणुकीकडे वसुंधरा राजे संधीच्या रूपात पाहत आहेत. त्या केंद्रीय नेतृत्वाला सांगू पाहतायेत की, इथं चेहऱ्याविना लोकांमध्ये जाणं धोक्यापेक्षा कमी नाहीय."
"आगामी दिवसात वसुंधरा राजे आणखी सक्रीय होताना दिसतील आणि हे दाखवण्याचा प्रयत्न करतील की, केंद्रीय नेतृत्व ज्यांच्यावर विश्वास ठेवतंय ते त्या योग्यतेचे नाहीत," असंही अवधेश अकोदिया म्हणाले.
वसुंधरा राजे यांच्या यात्रेबाबत भाजपचे प्रवक्ते आणि आमदार राम लाला शर्मा म्हणाले की, "राजकारणातून धर्म काढल्यास काहीच उरणार नाही. ही त्यांची धार्मिक यात्रा होती. त्यांनी आधीही सांगितलं की ही धार्मिक यात्रा आहे."
राजस्थानात 'टीम वसुंधरा' आणि 'वसुंधरा समर्थक मंच'
एवढंच नव्हे, तर वसुंधरा राजे यांनी आपल्या समर्थकांच्या दोन टीमही तयार केल्यात. या टीम राजस्थानातील सर्व 33 जिल्हे आणि 200 विधानसभा जागांवर काम करत आहेत.
यातली एक टीम आहे 'टीम वसुंधरा' आणि दुसरी आहे 'वसुंधरा समर्थक मंच'. या दोन्ही टीम वसुंधरा राजे यांच्या प्रचारासाठी राज्यभर काम करत आहेत. या टीममध्ये महिला मोर्चा, युवा मोर्चा, किसान मोर्चा, ओबीसी मोर्चासह अनेक वेगवेगळ्या विंग आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
टीम वसुंधराचे प्रदेशाध्यक्ष गौरव जिंगड म्हणतात की, "सर्व 33 जिल्हे आणि 200 जागांवर वसुंधरा राजे समर्थक कार्यकर्त्यांसह काम सुरू करणार आहेत. लोकांना तयार करत आहेत की, आम्ही वसुंधरा राजे यांना आदर्श मानतो."
वसुंधरा समर्थक मंचाचे प्रदेशाध्यक्ष विजय भारद्वाज सांगतात की, "वसुंधरा राजे पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी राजस्थानात भाजपचं पूर्ण सरकार आणलं. आम्ही त्यांच्या कार्यकाळातील योजना, धोरणं आणि संधी जनतेपर्यंत पोहोचवत आहोत."
भारद्वाज सांगतात की, प्रत्येक वर्गाला हेच वाटतंय की, 2023 मध्ये राजस्थानची धुरा वसुंधरा राजे यांनीच सांभाळावी.
राजस्थानात मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या अनेक नेत्यांना वसुंधरा राजेंच्या नावानं चालवल्या जाणाऱ्या संघटनांबद्दल आक्षेप सुद्धा आहेत. कारण भाजपपासून वेगळं राहून या संघटना काम करत आहेत.
वसुंधरा राजे वेगळ्या मार्गानं जाऊ शकतात का?
राजस्थानमध्ये भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा भैरोसिंह शेखावत यांच्यानंतर वसुंधरा राजे याच राहिल्या आहेत.
राजस्थानच्या राजकारणाचा अभ्यास असणाऱ्यांचं मानल्यास, केंद्रात नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं नेतृत्व तयार झाल्यानंतर स्थिती फार बदललीय.
आता जोरात चर्चा आहे की, वसुंधरा राजे नवीन पक्ष स्थापन करून आगामी विधानसभा निवडणुका लढवू शकतात. वरिष्ठ पत्रकार अवधेश अकोदिया म्हणतात की, "नाही, तसा पक्ष तर नाही स्थापन करणार आणि त्या भाजपही सोडणार नाहीत."

फोटो स्रोत, NURPHOTO
अकोदिया पुढे म्हणतात की, "त्या भाजपला हे पटवून देतील की, त्यांच्याविना राजस्थानात विजय मिळू शकत नाही. जर भाजप तरीही तयार नसेल, तर त्यांच्या समर्थकांना जास्तीत जास्त तिकिटं मिळावी."
राजस्थानातल्या भाजप पदाधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितलं की, "वसुंधरा राजे नवीन पक्ष स्थापन करणार नाहीत. त्या भाजपमध्येच राहतील. मात्र, त्या समर्थकांच्या माध्यमातून नवीन पक्ष नक्कीच बनवून केंद्रीय नेतृत्वावर दबाव नक्कीच आणू शकतात."
वसुंधरा राजे नवीन पक्ष बनवण्यावर विचार करत आहेत का? राजस्थानात त्यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा न बनवल्यास त्या बंडखोरी करू शकतात का?
या प्रश्नावर वसुंधरा राजे या मुख्यमंत्री असताना मंत्री राहिलेले आणि त्यांचे समर्थक युनूस खान म्हणतात की, "ज्यांच्या आईनं पक्षाला उभं करण्यास मदत केली, ज्यांना राजस्थानात पक्ष उभा केला, त्या या स्तरावर आल्यानंतर असा विचार का करतील?"
"वसुंधरा राजे मॅडमसोबत पक्षासाठी आम्ही याआधीही काम केलंय आणि पुढेही करू. नेतृत्व ज्यांना कुणाला चेहरा बनवेल, त्यांना आमचं समर्थन असेल," असंही ते पुढे म्हणाले.
वसुंधरा राजे दबावाचं राजकारण करत आहेत?
'हमारी मुख्यमंत्री कैसी हों, वसुंधरा राजे जैसी हो' ही घोषणा वसुंधरा राजेंच्या यात्रेदरम्यान अजमेरमध्ये दिले जात होते. याच दिवशी अजमेरमध्ये एक जाहिरातही छापण्यात आली होती. त्यात म्हटलं होतं की, 'पूनिया को भगाना है, भाजप को बचाना है'.

फोटो स्रोत, @BJP4RAJASTHAN
चर्चा अशीय की, या घोषणा आणि जाहिराती जाणीवपूर्वक छापण्यात आल्या होत्या.
वरिष्ठ पत्रकार अवधेश अकोदिया म्हणतात की, "वसुंधरा राजे स्वत:ला राजकीयदृष्ट्या सक्रीय असल्याचंही दाखवतायेत आणि कुठला राजकीय कार्यक्रमही करू पाहत नाहीत. त्यामुळे त्यांनी वेगळा मार्ग निवडलाय."
अकोदिया पुढे सांगतात की, वसुंधरा राजेंवर त्यांच्याच गटाचाही दबाव आहे. त्यामुळे त्या जर अशाच शांत राहिल्या, तर त्यांचे समर्थक दुसरा पर्याय शोधतील.
अमित शाह यांची बैठक ठरणार महत्वपूर्ण
राजस्थान भाजपसाठी 5 डिसेंबरला होणारा अमित शाह यांचा दौरा महत्त्वाचा आहे. पक्षातील नेत्यांच्या मनात काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठीच अमित शाह राजस्थानात येत असल्याची चर्चा होती.

फोटो स्रोत, DIPRRAJASTHAN/BBC
जैसलमेर बीएसएफमध्ये त्यांचा नियोजित कार्यक्रम होता. मात्र, त्याचसोबत भाजप कार्यसमितीच्या बैठकीत सहभागी होण्याचा कार्यक्रमही ठरवला गेला.
उत्तर प्रदेश निवडणूक ठरवेल राजस्थानातील रणनिती
राजस्थान विधानसभा निवडणूक 2023 मध्ये आहे. मात्र, त्याआधी उत्तर प्रदेशात निवडणूक आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकीचे परिणाम राजस्थानात भाजप आणि वसुंधरा राजे यांची रणनिती ठरवतील.
असंही म्हटलं जातंय की, जर उत्तर प्रदेशात भाजप बहुमतात जिंकली, तर राजस्थानात चेहऱ्याविना भाजप निवडणुकीच्या मैदानात उतरू शकते किंवा पक्षाला वाटेल त्याला चेहरा बनवला जाईल.
जर उत्तर प्रदेशात भाजपला पराभवाचा सामना करावा लागल्यास निश्चितपणे राजस्थानात वसुंधरा राजे यांचं पारडं जड होईल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








