You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'पुरुषांना मासिक पाळी असती, तर समजले असते', असे म्हणण्याची वेळ कोर्टावर का आली?
- Author, अॅड. रंजना गवांदे
- Role, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या
महिलांच्या मासिक पाळीमुळं किती अडचणींचा सामना करावा लागतो, यावर भाष्य करणाऱ्या एका चित्रपटाचा ट्रेलर रविवारी (19 ऑक्टोबर 2025) रिलीज झाला. शिक्षणाच्या मुद्द्याचा आधार घेत मासिक पाळीला महिलांसाठी पायातली बेडी कशी बनवली जाते, या पद्धतीनं चित्रपटाचा विषय मांडण्यात आला आहे. त्यानिमित्ताने अॅड. रंजना गवांदे याचा प्रकाशित झालेला लेख पुन्हा देत आहोत.
"पुण्यातलं एक उच्चशिक्षित जोडपं. दोघंही इंजिनीअर. कुटुंबही तसं सुशिक्षित. जोडप्यातील महिलेनं एकदा मासिक पाळी आलेली वाळत घातलेले कपडे काढून आणले, तर कुटुंबीयांनी पावित्र्याशी त्याचा संबंध जोडत तिला परत ते कपढे धुवायला लावले.
"पुढं या महिलेला मासिक पाळीत असे अनेक अनुभव आले. पण गमतीचा भाग म्हणजे, पावित्र्याच्या नावाखाली किंवा पाळी आली म्हणून काही कामं वर्ज्य करत असतानाच तिच्याकडून अंगमेहनतीची कामं मात्र करून घेतली जात होती."
आजच्याही काळात मासिक पाळीबाबत समाजात गैरसमज आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण असं करणाऱ्यांमध्ये सुशिक्षितांचं प्रमाणही कमी नाही.
या सगळ्याचा उल्लेख करावं लागण्याचं कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं केलेलं एक विधान.
"पुरुषांना मासिक पाळी आली असती, तर त्यांना समजलं असतं.." असं विधान सर्वोच्च न्यायालयानं मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या एका निर्णयावर टिपण्णी करताना केलं.
जस्टीस बी.व्ही नागरत्ना यांनी सुप्रीम कोर्टानं दखल घेतलेल्या प्रकरणाच्या सुनावणीत हे मत मांडलं. जस्टीस एन. के. सिंह यांचाही सुनावणी सुरू असलेल्या पीठात समावेश होता.
मध्य प्रदेशात महिला दिवाणी न्यायाधीशांना कामगिरीचं कारण देत बडतर्फ केल्याचं हे प्रकरण होतं.
त्यामुळं एकूणच महिलांना मासिक पाळीच्या काळात तोंड द्याव्या लागणाऱ्या शारीरिक आणि मानसिक समस्या, कुटुंब आणि समाजाकडून त्याबाबत होणारं दुर्लक्ष आणि एकूणच याविषयीची अनास्था यावर चर्चा होणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
'निम्म्या जगाला पर्वाच नाही'
जस्टीस नागरत्ना यांचं "If men menstruated, they would understand," हे वाक्य खूप महत्त्वपूर्ण आणि बोलकं आहे.
हे वाक्य सूचक आणि स्त्रियांच्या शारीरिक, मानसिक वेदना मांडणारं आणि पुरुषांच्या संवेदनशीलतेला हात घालणारं आहे.
आपलं निम्मं जग स्त्रियांनी व्यापलेलं आहे. याच स्त्रिया मासिक पाळीच्या निसर्गचक्राला, समस्यांना, त्रासाला सामोरे जात असताना उरलेले निम्मं जग (काही अपवाद वगळता) मात्र, या सर्वांपासून जणू अनभिज्ञ आहे असं वाटतं.
एक तर या उरलेल्या निम्म्या जगाला म्हणजे पुरुष आणि मुले यांना मासिक पाळी विषयी जाणून घेण्याची उत्सुकता नाही.
मानववंशाच्या पुनरुत्पादन प्रक्रियेची सुरुवात किंवा त्याचं मूळ जाणून घेण्याची त्यांची इच्छा नाही. किंबहुना हे समजून घेण्याची त्यांना गरजही वाटत नसावी.
एकंदरीतच मासिक पाळी ही स्त्रियांच्या शरीरात घडणारी नैसर्गिक घटना आहे.
बहुतांश स्त्रियांना यादरम्यान वेदना, नैराश्य, चिंता तणाव आणि इतर शारीरिक त्रास होतात. शिवाय त्याचे मानसिक परिणामही फार त्रासदायक असतात. यावर मात्र फारसं बोललं जात नाही.
त्यामुळे मासिक पाळीच्या त्रासाचा स्त्रियांच्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होतो, हे प्रकाशात येतच नाही. अनेकदा पाळीदरम्यान नैराश्य, पॅनिक अटॅकपासून ते आत्महत्येपर्यंतचे विचारही महिलांच्या डोक्याभोवती घिरट्या घालत असतात.
सोनेरी आवरणामागचं खरं कारण 'विटाळ'?
आपल्याकडे शालेय स्तरावर, कौटुंबिक पातळीवर लैंगिक शिक्षणाचा अभाव आहे.
लैंगिक शिक्षण म्हणजे काहीतरी अश्लील, संस्कृतीभंजक अशा दृष्टीकोनातून पाहिले जाते. त्यामुळे पाळीसारख्या नैसर्गिक गोष्टींची योग्य माहिती मुले, पुरुषांना नसतेच. उलट पाळीविषयीचे अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धाही समाजात सर्वच जाती धर्मामध्ये आहेत.
अशा गैरसमजांमुळे मासिक पाळी सुरू असणाऱ्या स्त्रीचे देवकार्य, धर्मकार्य, मंदिर प्रवेश, घरातील ठराविक गोष्टींचा स्पर्श निषिद्ध मानले जाते.
त्याचसाठी वेळोवेळी म्हणजे मंदिर प्रवेशासाठी, दर्गा प्रवेशासाठी किंवा अन्य बाबतीत (शनीशिंगणापूर, हाजीअली, शबरीमाला) न्यायालयाची मदत घ्यावी लागली आहे.
मासिक पाळी म्हणजे अपवित्र, कलंक अशा समजुतीमुळे अनेकदा स्त्रियांचे आरोग्यही धोक्यात येते. काही समाज, काही कुटुंब पाळी आलेल्या स्त्रीला गोठ्यात किंवा घराच्या अस्वच्छ कोपऱ्यात बसवतात.
एका समाजात तर गावातील पाळी आलेल्या स्त्रियांसाठी गावाबाहेर झोपडी वजा निवाऱ्याची व्यवस्था केलेली असते. गावातील प्रत्येक पाळी आलेल्या स्त्रीने 4 दिवस तिथेच राहावे असा नियम आहे.
पाळी म्हणजे काहीतरी अमंगल, अपवित्र ही भावना समाजात रुजली आहे. त्यामुळे पाळी आलेल्या स्त्रीचे प्रश्न समजावून घेणे, त्या स्त्रीचे आरोग्य, तिला सहन कराव्या लागणाऱ्या शारीरिक, मानसिक वेदना याकडे संवेदनशीलपणे पाहाण्याची दृष्टी पुरुष वर्गात कशी निर्माण होणार?
स्त्रियांच्या बाबतीतील निसर्ग नियमाने येणाऱ्या या चक्राला धार्मिक, वैयक्तिक, कौटुंबिक समस्या म्हणून पहाण्याची मानसिकता निर्माण झाली आहे. या कल्पना अगदी लहानपणापासून मनावर बिंबवल्या गेल्या आहेत.
घराघरात मासिक पाळीला 'प्रॉब्लेम' संबोधणाऱ्या मुली दिसतात. घराघरात मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना घरकोपऱ्यात बाजूला बसवले जाते, त्याचे समर्थन करताना मात्र त्याला 'चार दिवस विश्रांतीचे' असे सोनेरी आवरण चढवले जाते.
'स्त्रीला विश्रांती, सुख..' असेही बोलले जाते. पण अपावित्र्य व नकारात्मकतेच्या भावनेतून ही विश्रांती मिळते. त्यात स्त्रीप्रती आदर, प्रेम, संवेदनशीलता दिसत नाही. तर विटाळाच्या भावनेतून ते लादलेपण असते.
महिलांच्या जीवनात गरोदरपणा, गर्भपात, बाळंतपण या सर्व चक्रामध्येही अशा अनेक गोष्टी घडत असतात. शिवाय रजोनिवृत्ती सारखा टप्पाही महत्वाचा असतो. पाळी बंद होतांना होणारे शारीरिक, हार्मोनल बदल, त्यामुळं येणारी चिंता, उदासीनता, चिडचीड, मूड स्विंग, कामजीवनातील बदलही स्त्रीमध्ये घडत असतात. पण या नैसर्गिक प्रक्रियांची चर्चाच होत नाही.
अज्ञान हेच समस्यांचे मूळ
उल्हासनगरमध्ये काही महिन्यांपूर्वी एक घटना घडली होती. एका 12 वर्षाच्या मुलीला पहिल्यांदाच पाळी आली. तिच्या कपड्यांवर रक्तामुळं लाल डाग पडलेले होते. ते पाहून, तिच्या मोठ्या भावाला वाटले की, तिने कुणाबरोबर तरी लैंगिक संबंध ठेवले आणि त्यातून तिच्या कपड्यांवर डाग पडले.
या विचारानंतर त्यानं काहीही चौकशी न करता तिला प्रचंड मारहाण केली व त्या मारहाणीत मुलीचा जीव गेला. केवळ मासिक पाळी विषयीच्या अज्ञानातून एका मुलीचा जीव तिच्याच भावाने घेतला.
या प्रकरणाचा विचार अनेक अंगांनी करावा लागेल. योनीसुचितेची भावना, पुरुषी वर्चस्वाची भावना, स्त्री म्हणजे-खानदानाची इज्जत समजण्याचा प्रकार अशा अनेक गोष्टी आहेत. पण या लेखाच्या विषयाच्या अंगाने मासिक पाळी विषयीचे अज्ञान हाच मुद्दा प्रामुख्याने विचारात घेऊया.
नैसर्गिक प्रक्रियेचा भाग असलेलं हे चक्र सर्व मुले पुरुषांना माहिती असावे. मासिक पाळी कशी येते, स्त्रिया आणि मुलींना वेगवेगळ्या टप्प्यांवर कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो, त्यावेळी त्यांच्या भावना काय असतात हे पुरुष आणि मुलांनी समजून घेतल्यास ते संवेदशील बनू शकतील. त्यातूनच ते माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतील.
तसं झालं तरच पुरुष किंवा मुले स्त्रियांना भावनिक, आर्थिक व इतर मदत करू शकतील. मासिक पाळीदरम्यान स्त्रियांना होणारे त्रास, बाळाच्या जन्मादरम्यान येणाऱ्या समस्या याबाबतही पुरुषांना समजावणे, ज्ञान देणे आवश्यक आहे.
या ज्ञानामुळे केवळ पत्नी, मुली यांच्यासाठीच नाहीतर बाहेरच्या जगातील स्त्रियांसाठीही त्यांना एक प्रकारची जाणीव निर्माण होईल.
मासिक पाळीच्या काही दिवस आधी महिलांना शारीरिक आणि भावनिक बदल जाणवू लागतात त्याला पीएमएस (PMS-premenstrual syndrome) असे म्हणतात.
अनेक पुरुषांना तर पीएमएमबाबत काहीच माहिती नसतं. या दिवसांत बायकोचं डोकं फिरतं, एवढंच त्यांना कळतं. त्यामुळं पुरुष (कुटुंब) शिक्षण हेही महत्त्वाचं आहे.
दिवंगत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शंतनू अभ्यंकर पीएमएस विषयी लिहितांना म्हणतात, "खरंतर या आजारासाठी डॉक्टर गाठण्याइतकी तीव्रता फार कमी महिलांमध्ये असते. पण ते हिमनगाचं टोक आहे. किरकोळ तक्रारी आणि 'आजारपण' हे या दिवसांत नेहमीचंच असतं. या दिवसांमध्ये कुटुंबीयांनी स्त्रीला समजून घ्यावं, सहानुभूती आणि शक्य ती मदत हे महत्वाचं आहे. याची जाणीव बाळगली तरी निम्म्याहून अधिक काम भागतं.
"माझ्या परिचयाच्या एक अधिकारी मॅडम आहेत. त्यांना पीएमएसचा प्रचंड त्रास होता. त्यांच्या मुलाला शाळेत मासिक पाळीबद्दल शिकवताना, "असा प्रकार तुमच्या आईत होत असतो, अशा आशयाची माहिती सायन्स टीचरने दिली होती. ते सगळं शिकून त्या मुलाच्या वर्तनात एवढा फरक पडला की, शालेय वयातील तो मुलगा आईला मासिक पाळीच्या दिवसांत काही मदत करू का? पाय चेपून देऊ का? असे स्वतः विचारू लागला. त्यामुळं त्या बाईचा पीएमएस जणू पळाला," डॉ. शंतनू अभ्यंकरांनी दिलेले हे उदाहरण पुरेसं बोलकं आहे.
संवेदनशीलता असणं गरजेचं
पाळी, गरोदरपण, बाळंतपण या काळात स्त्रीची अवस्था ही सामान्य स्त्रियांसारखीही नसते. पुरुषांचा तर विषयच नाही.
मागच्याच वर्षी एप्रिल महिन्यात भरदुपारी एका शासकीय कार्यालयात गेले होते. एका तरुण क्लर्क मुलीच्या टेबलजवळ गेले, तर ती भर उन्हाळ्यात स्वेटर घालून बसली होती. विचारले तर ती म्हणाली की, पाळीचे चार दिवस मला अंग कसकसतं, थंडी वाजते, कामावर यायचीही इच्छा होत नाही.
मी तिला, 'रजा का घेतली नाही?' असं विचारलं. तर ती म्हणाली, 'साहेबाला काय कळणार माझा त्रास? ते म्हणतात बायकांची नाटकं असतात'. हे फक्त एक उदाहरण आहे.
आणखी एक उदाहरण मी स्वतः व्यवसायाने वकील आहे. माझ्या एका सहकारी महिलेला नऊ महिन्यांची गरोदर असतानाही कोर्टात यावं लागत होतं. न्यायाधीश पुढची तारीख द्यायला तयार नसायचे.
बाळंतपणाची तारीख सोडून पुढच्या तारखा मागितल्या तरीही अडवणूक व्हायची. बाळांतपणानंतर पक्षकारांनी डिलिव्हरी झाल्यामुळे वकील येऊ शकत नाही, असं सांगितलं तर न्यायाधीशांनी पक्षकारांना धारेवर धरले. परिणामी वकील असलेल्या महिलेला बाळ तीन आठवड्याचे होताच कोर्टात कामासाठी यावे लागले.
महिलांना सामना करावा लागलेल्या असंवेदनशीलतेमुळेच कोरिया सारख्या देशात 'फोर बी' ही चळवळ उभी राहिली आहे. म्हणजे स्त्रिया लग्न, डेटिंग, शरीर संबंध आणि मूल जन्माला घालणं या सर्वच बाबी नाकारत आहेत. ही चळवळ अमेरिकेसारख्या देशातही पसरली आहे.
केवळ स्त्री म्हणून काही विशेष सवलत नको. पण मासिक पाळी हे स्त्रीमध्ये असलेलं नैसर्गिक वैशिष्ट्य आहे. त्यामुळं त्यांना होणाऱ्या त्रासाचा संवेदनशीलपणे विचार होणं गरजेचं आहे. पाच दहा टक्के स्त्रियांना तर पीएमएसमुळे रोजचं कामही करता येणं अशक्य असतं. या त्रासामुळेच 'पाळीच्या काळातील रजा' ही संकल्पना पुढे आली आणि चर्चिली जात आहे.
स्त्रियांचं गरोदरपण बाळंतपण हा अडथळा म्हणून अनेक खासगी क्षेत्रात स्त्रियांना नोकरी कामाच्या चांगल्या संधी नाकारल्या जातात. त्यामुळे अनेक स्त्रिया जास्तीत जास्त निमुटपणे त्रास सहन करत काम पुढे रेटण्याचा प्रयत्न करतात.
एकीकडे स्त्रीच्या प्रजनन क्षमतेवर हक्क सांगायचा, तिच्या मातृत्वाचे गोडवे गायचे आणि त्याच वेळी तिच्या नैसर्गिक चक्राविषयी तिच्या नैसर्गिक वैशिष्ट्यांबद्दल त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांबद्दल दुटप्पीपणे विचार करायचा हे वर्तन योग्य नाही.
हे सर्व लिहित असताना मला महाराष्ट्रातील समाजसेवक,व्यसनमुक्तीवर मोठे काम करणारे डॉ. अनिल अवचट यांचा आवर्जून उल्लेख करावा वाटतो. डॉ. सुनंदा अवचट कॅन्सरसारख्या आजाराने गेल्यानंतर त्यांनी 'सुनंदाला आठवताना' हा लेख लिहिला होता.
त्यात डॉ. सुनंदा यांची मासिक पाळीच्या चक्रात वेळोवेळी घेतलेली काळजी, उपचार या विषयी त्यांनी सविस्तर लिहिलं होतं.
संवेदनशील मनाच्या डॉ. अनिल अवचटांप्रमाणेच स्त्रीची मासिक पाळी या संबंधाने सर्वच पुरुषांनी पाळीबद्दलची वैज्ञानिक माहिती, लिंगभेद विरहीत विचार, स्त्री बद्दलचा आदरभाव या बाबतची विचारांची पेरणी, रुजवनी प्रत्येक पुरुषात झाली तरच स्त्रियांचे भावविश्व त्यांना समजू शकेल.
तसं झालं तरच त्यांना मासिक पाळीच्या काळातील प्रश्न कळतील आणि 'पुरुषांनाही मासिक पाळी आली असती तर..' 'किंवा पुरुषांनाही मासिक पाळी यायला हवी' असं उद्वेगजनक उद्गार कुणाला काढावे लागणार नाहीत.
(लेखिका वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. लेखातील मते लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.