'सासू सासरे नको असतील, तर अनाथ मुलाशी लग्न कर', अशा मानसिकतेवर उपाय काय?

    • Author, लक्ष्मी यादव
    • Role, बीबीसी मराठीसाठी

एका मैत्रिणीची नुकतीच डिलिव्हरी झालेली, माहेरी. सासू सासरे एक दिवस आले आणि बघून गेले (तेही बाळाला.) मैत्रीण वैतागूनच म्हणाली, “यांच्या खानदानाचं मूल जन्माला घालायचं, मात्र डिलिव्हरी माहेरी करायची. यांना खर्चही करायला नको आणि जबाबदारी पण नको. काय कामाचं हे सासर?”

ओळखीतला एक मुलगा इंजिनीयर, मुलगीही इंजिनीयर. मुलाची आई आजारी असते म्हणून लग्न झाले की लागलीच नवरी मुलीला गावी राहायला पाठवलं. त्याला आता दोन वर्षे झाली आणि नवरा मुंबईत. “तसं लग्नाआधी मुलीला आणि मुलीच्या घरच्यांना बजावूनच लग्न जमवलं होतं,” मुलगा म्हणाला.

आणखी एक पुण्यातील मुलगी. प्रेमातून विवाह जमलेला. लग्नाआधी तिने मुलासमोर एक विचार ठेवला “आपण ना माझ्या घरी राहायचं, ना तुझ्या. आपण स्वतंत्र राहून अधूनमधून दोन्ही घरी जायचं.”

लग्नानंतर आपण त्याच्या आई वडिलांसोबत नीटपणे अ‍ॅडजस्ट करू शकू का? आपल्या स्वातंत्र्यावर बंधने तर येणार नाहीत ना? अशा शंका तिच्या मनात होत्या. मुलगा आई वडिलांपासून दूर राहायला तयार नव्हता. लग्न मोडलं.

ही उदाहरणं पाहिली तर लक्षात येतं की, लग्नं आता सरळ रेषेत होत नाहीत. वैवाहिक नात्यात प्रचंड उलथापालथ होत आहे. भारतात लग्न भन्नाट पद्धतीने होतात. इथे लग्नाचे निकष वेगळे आहेत.

एका मुलाने मुलीला लग्नासाठी प्रपोज केले. तिने विचारले, ”मी तुझ्याशी का लग्न करावे?” तो म्हणाला, “माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझी पीएचडीसुद्धा मी तुला समर्पित केली आहे. काही दिवसात मी परदेशात जाईन. गावी घर, शेती आहे. मी तुला काहीही कमी पडू देणार नाही. आनंदात ठेवेन.”

ती म्हणाली, “मी स्वत: आनंदी राहिन. मला हवं तेवढं मी कमावू शकते. मला तुझ्याबद्दल प्रेम वाटत नाही. माझ्यासाठी तू सांगितलेल्या गोष्टी लग्नाचे निकष होऊ शकत नाहीत. माझ्यासाठी नात्यात प्रेम, विश्वास, बांधिलकी हवी.” काही दिवसात त्या मुलाने दुसर्‍या मुलीशी सामाजिक निकषात बसणारं लग्न केलं.

इतर देशांमध्ये लग्न हे एकमेकांवर प्रेम असणार्‍या दोन व्यक्तीत होते; तर भारतात ते दोन कुटुंबे (एकाच लेव्हलची पाहिजे हां), दोन समाज, दोन समान जाती (अककरमाशी नको!), धर्म (आंतरधर्मीय जातीय लग्न नको नको!), दोन संस्कृती आणि त्यापुढेही जाऊन एकाच देशात होत असते (परदेशी जोडीदार नकोच!) आणि राहिलंच तर दोन विषमलिंगी व्यक्तीत होते (समलिंगी विवाह कायदेशीर झाले तर सगळीच मुले मुली तसली लग्ने करतील ना!).

गंमत म्हणजे हे सगळं जे ‘दोन’ आहे ते फक्त मुलीने सांभाळावे अशी अपेक्षा त्यात असते. त्यामुळे मुलीला लग्न करायचे असेल, तर तिने सासू सासर्‍यांना सांभाळावे, नवर्‍याची सेवा करावी, नोकरी करून घर, मुले सांभाळावीत (नोकरी, मुले तिलाच तर पाहिजेत!) ही अपेक्षा असतेच असते (ती घरीच तर असते. काय काम असते घरी एवढे!). त्यातूनच ‘आमची सूनबाई लई गुणाची किंवा सुपर वुमन’ या संकल्पना उदयास आल्या.

याच धर्तीवर ‘सासू सासरे नकोत, तर अनाथ मुलाशी लग्न करा’ अशा आशयाची पोस्ट गेले काही दिवस समाजमाध्यमांवर फिरते आहे. आता हे सासू सासरे म्हणजे नवरा आणि बायको या दोघांचे सासू सासरे नव्हेत बरं का. हे फक्त मुलीचे सासू सासरे आहेत कारण ‘लग्नानंतर सासू सासरे सांभाळावे लागतील,’ ही अट लग्न जमवताना मुलगा मुलीला घालतो. फक्तच मुलींसाठी लग्न म्हणजे ‘अटी व शर्ती लागू’ अशी भानगड असते. मुलीने होणार्‍या नवर्‍याला अशी अट घालण्याचा विषयच नाही.

भारतातील मुळातच लग्नसंस्था असमानतेच्या तत्वावर आधारलेली आहे. म्हणजे कसं तर स्त्रीनेच नांदायला जायचे, घरातील सगळी कामे करायची, आलेले गेलले पाहुणे रावळे, मुले, नवरा यांच्या भावनिक जबाबदार्‍या एकट्या स्त्रीनेच पेलाव्यात.

याउलट तिच्या नावावर संपत्ती नाही, निर्णय प्रक्रियेत सहभाग नाही, नात्यात सन्मान नाही ही वास्तविकता गुपचुप स्वीकारायची. ग्रामीण भागात तर “तुला काय कळतं, मोठी शहाणी लागून गेलीस, तू आपलं गुमान भाकरी थापायच्या,” असं नवरा उघडपणे म्हणतो.

खरं तर अशाने कुटुंबसंस्था मजबूत बनत नाही, तर ती कमकुवत राहते, घरातील स्त्री त्रासात असेल, एकटीनेच घराच्या जबाबदार्‍या पार पाडाव्या लागत असतील, तर तिला समान संधी, आनंद, सन्मान कसा मिळेल? सासू सासरे हे आधी मुलांचे आई वडील असतात आणि मुलांनी त्यांची जबाबदारी घ्यायला हवी असते.

हे आई वडील मुलगा किंवा मुलगी दोघांचेपण असू शकतात. दोघांनी आपआपल्या पालकांची जबाबदारी घ्यावी. मुळात सगळ्याच ज्येष्ठ नागरिकांची काळजी सर्वांनी घ्यावी. प्रत्यक्षात मात्र जबाबदारी सूनेवर पडते. घरात सासू सासरे आहेत म्हणून कित्येक महिलांना निम्मे आयुष्य गेलं तरी एखादा दिवसही निवांत घराबाहेर पडता आलेले नाही.

मुलींनाही लहानपणापासून लग्नासाठीच तयार केले जाते. मुलीसाठी लग्न न करणं ही निवड दिली जात नाही. त्यामुळं जर सासरच्या लोकांनी किंवा नवर्‍याने माझ्या बायकोने माझ्या आई वडिलांना सांभाळावेच लागेल, तरच मी लग्न करेन असे म्हणणे मुलीला, तिच्या घरच्यांना आणि समाजालाही बरोबर वाटते.

भारतीय समाजात एक चांगली/आदर्श स्त्री, एक चांगली मुलगी, किंवा एक चांगली सून याचे काही ठोकताळे तयार केले आहेत. जया बच्चन यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, ऐश्वर्या चांगली सून आहे. ती स्टार असली तरी ती सासरी सगळ्यांचं ऐकून घेते. सगळ्यांच्या मागे उभी राहते. शांत राहते. सगळ्यांच्या हा मध्ये हा मिसळते वगैरे वगैरे. मात्र त्याचवेळी जया बच्चन यांना मुलगी मात्र आत्मविश्वासू, अन्यायाविरुद्ध बोलणारी, स्वत:ची मते मांडणारी, आपले अस्तित्व दाखवणारी हवी असते.

थोडक्यात, महिलांच्याही प्रतवार्‍या/उतरंड आहेत आणि समाजाने प्रत्येक महिलेला त्या त्या पद्धतीने भूमिका आणि सोबतच वेगेवेगळ्या सत्ता/पावर दिल्या आहेत. सासूची सत्ता वेगळी, सुनेची आणि मुलीची कामे वेगळी.

ग्रामीण भागात तर मुलगी आणि सुनेतील फरक प्रकर्षाने दिसून येतो. मुलीला आणि सुनेला मिळणार्‍या स्वातंत्र्यात जमीन आसमानाचा फरक आहे. सुनेवर जेवढी लैंगिक आणि इतर बंधने असतात, मुलीवर त्या मानाने कमी असतात. सून ही बाहेरून आलेली, लग्नसंस्थेत बांधली गेलेली असल्याने घरात कमीत कमी आवाज असलेली व्यक्ती असते.

सासूही सून घरात येण्याअगोदर कदाचित तिच्याच जागी असते. मात्र सून आल्यावर नवरा, मुलासमोर काहीच किंमत नसणाऱ्या सासूची किंमत वाढते. तिच्या हाती बाहेरून आलेल्या सुनेला कंट्रोल करण्याची पावर येते. मग सासू सुनांचे खटके उडतात.

खरं तर हा संघर्ष सासू आणि सुनेचा नसतो, हे पितृसत्तेनं दोघींच्या अस्तित्वासाठी लावून दिलेलं भांडण असतं. नवरा आणि सासर्‍यांना दोघींच्या संघर्षात फायदे मिळतात. मात्र, ते दोघींना विवाहसंस्थेत खलनायक म्हणून एकमेकींसमोर आणतात.

विवाह, कुटुंब संस्थेचे लाभधारक असल्याने पुरुषांना या संस्था जशा कार्यरत आहेत, तशाच राहाव्यात असे वाटते आणि त्यासाठी त्यांचे तसे प्रयत्न असतात. ही स्त्री पुरुष समता अस्तित्वात येण्यातील मुख्य अडचण आहे.

स्त्रीवर बंधने घालणे हे भारतीय समाजव्यवस्थेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. अशी बंधने मुलगी म्हणूनही असतात, शिवाय सून, बायको म्हणून ती जास्त असतात. गावाकडे बहुतांश ठिकाणी अजूनही सून चुडीदार काय, साधा गाऊनदेखील घालू शकत नाही. दुसरीकडे माहेरी आलेल्या मुलीने घातलं तर चालतं.

मुलीला सासरी यायचे असेल, तर आधी अनेक अटी घातल्या जातात. एका मैत्रिणीचे लग्न जमल्यात जमा होते. मुलाने एक अट घातली, “माझ्या घरी रोज देवपूजा करावी लागेल.” मुलगी नास्तिक. लग्न मोडलं.

आपल्याकडे मुलींना नेहमी असुरक्षित, कमकुवत वाटेल अशी वातावरणनिर्मिती समाजात केली जाते. तिचे आयुष्य सतत कुणावर तरी अवलंबून ठेवले जाते. तिच्या आयुष्यातील निर्णय आधी वडील, भाऊ घेतात आणि लग्नानंतर नवरा, सासू सासरे. तिला सतत भयाखाली ठेवले जाते.

आपले लग्न मोडले, तर हे सर्वात मोठे भय असते. त्या नेहमी नवरा, सासू सासरे यांच्यावर अवलंबून असतात, असायला हव्या हे मिथक समाजभर पसरवण्यात येतं. त्यामुळे असे ‘सासू सासरे नको असतील’ पद्धतीचे मेसेज पसरवले जातात.

मुलाने आपल्या आई वडिलांना वार्‍यावर सोडलं किंवा स्वत:हून वेगळं राहिला तरी त्याचा दोषही त्यांच्या बायकोला दिला जातो. दोन भावांचे पटत नसेल, तर ‘लग्नाआधी भाऊ कसे राम-लक्ष्मणसारखे प्रेमाने राहत असत, बायका आल्या आणि त्यांनी घर फोडलं,’ असं बोललं जातं.

मुळात आई वडिलांची जबाबदारी किंवा भावांचे न पटणे ही त्या घरच्या मुलाचीच जबाबदारी किंवा निर्णय असतो. भारतातील नवरे बायकांचं एवढं ऐकत असते, तर महिलांवर अत्याचार झालेच नसते की. मुळात महिलांबद्दल किंवा एकुणात वंचित किंवा आवाजहीन घटकाबद्दल विविध अफवा किंवा स्टेरिओटाईप तयार करणं हा त्यांना अंकित करण्याचा, दाबण्याचा एक मार्ग म्हणून वापरला जातो.

बायका भांडकुदळ, घरफोडया असतात, रेल्वे रुळावरदेखील त्या बोलत राहतात, त्या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या मॉडर्न मम्मा असतात, बायांना अक्कल नसते, बायका बलात्काराच्या खोट्या केस करतात, कायदा बायांच्या बाजूने असतो म्हणून बायका कायद्याचा गैरवापर करतात’ अशी दूषित, सेक्सीस्ट मांडणी केली जाते.

युनायटेड नेशन्सच्या 2019 साली केलेल्या एका अभ्यासानुसार 40 टक्के पुरुषांना पुरुषाने कमवावे आणि स्त्रीने घर सांभाळावे असे वाटते. जगाच्या 53 टक्केच्या तुलनेत भारतात 23 टक्के महिला कामगार आहेत. स्त्री पुरुष समतेत 162 देशांमध्ये 123 व्या क्रमांकावर भारत आहे.

थोडक्यात काय तर मुलीने लग्न झाल्यावर नोकरी न करता सासू सासरे सांभाळावेत, नोकरी करू नये, घराबाहेर पडू नये. अनेक मुले मात्र आयुष्यभर शहरात, बाहेर राहतात (उदा. आर्मी, नेव्ही) आणि गावात आपल्या आई वडिलांना सांभाळायला बायकोला ठेवतात. असा एक तरी पुरुष या धर्तीवर आहे का ज्याने बायको कामासाठी बाहेर आहे म्हणून बायकोच्या आई वडिलांसोबत राहून त्यांची सेवा केली, मुले मोठी केली? नाहीच.

एका अभ्यासानुसार 34 टक्के भारतीय प्रौढ म्हणतात की, आई वडिलांचा अंत्यविधी मुलाच्या हातून करावा, तर फक्त 2 टक्के मुलीच्या हातून करावा म्हणतात. म्हणजे आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी स्त्रीने घ्यावी, मात्र अंतिम विधी पुरुषाने करावा.

नागपुरात प्रिया फुके नामक सुनेला मुलाच्या मृत्यूनंतर नातवंडांसकट संपत्तीतील काहीही न देता सासरच्या लोकांनी घराबाहेर काढल्याचे वाचनात आले. म्हणजे सासू सासरे सांभाळण्यासाठी सून हवी, मात्र तिचा हक्क तिला देण्यात येणार नाही अशी परिस्थिती आहे.

भारतातच नव्हे, तर जगातील बहुतांश देशांमध्ये मुलीच्या नवर्‍याने तिच्या आईवडिलांची काळजी घेणं, सासरी जाऊन राहणं तर अजिबात अभिप्रेत नाही. घरजावई हा शब्द, तर शिवीसारखा वापरला जातो. जावयाने सासरी दोन दिवसापेक्षा अधिक राहू नये आणि राहिलं तर त्याची किंमत कमी होते असंही सांगितलं जातं. मग सून आयुष्यभर सासरी राहते, तिला काही किंमत नसते का?

विवाहात नवरा बायको दोघांनीही एकमेकांच्या आई वडिलांची काळजी घेणं, देखभाल करणं गृहीत असायला हवं. लग्नानंतर मुलीने स्वत:चे आई वडील सांभाळावे, आई वडिल भावंडांचा खर्च उचलावा, आईवडिलांची सेवा शुश्रूषा करावी हेही अपेक्षित नाही.

मुलगी एकदा का सासरी गेली, की माहेरच्या लोकांशी तिचं नातं फक्त दिवाळी आणि रक्षाबंधनापुरतं मर्यादित राहतं. शिवाय मुलींना वारसा हक्काने माहेरची संपत्ती वाटणीला येत असली, तरी ‘हक्क सोडपत्र’ या हत्याराचा वापर करून तिचा हा हक्कही हिरावून घेतला जातो. असा एक तरी भाऊ आहे का ज्याने आपल्या हिश्याची संपत्ती बहिणीला दिली. जगभरात फक्त १ टक्के संपत्ती स्त्रियांच्या नावावर आहे. त्यामुळे मुलगी शिकली, मिळवती झाली, तरी ती आई वडिलांचा आधार बनत नाही. हे गरीब किंवा कमी शिकलेल्या घरातीलच चित्र नाही, तर सुशिक्षित, श्रीमंत घरातीलही चित्र हेच आहे.

अशा रीतीने अजूनही मुलगी ‘नकोशी’ आहे. मुलगी ना माहेरची राहते, ना सासरची बनते. सासरी नवरा म्हणतोच, "तुझ्या काय बापाचं आहे हितं?" ती कायम उपरी राहते. “माझं नेमकं घर कोणतं?” या प्रश्नाचं उत्तर तिला कधीच मिळत नाही.

खरं तर मुलगी जेव्हा सासरी येते तेव्हा ती स्वत:चं घर, ओळख, आई वडील सोडून येते. नोकरी सोडते. नाव बदलते. मुलींच्या बाजूने विचार केल्यास ही प्रथा अन्यायकारक आहे. ती नवीन ठिकाणी स्वत:ला सामावून घेते, त्या घरातील माणसांच्या सगळ्या जबाबदार्‍या घेते. 20-25 वर्षे ज्या नावाने आपण ओळखले जातो, ते नाव बदललं जातं. ज्या घरात आई वडिलांबरोबर जवळपास निम्मे आयुष्य घालवतो, त्या सगळ्या गोष्टींना झटक्यात कायमचं सोडून येणं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्रासाचं असतं.

तिची ही अवस्था नवरा आणि सासरच्या लोकांनी समजून घ्यायला हवी. ती आपली संस्कृती आहे, सगळ्याच बायका हे करतात असं म्हटल्याने त्रास होत नाही असं नसतं. लोकसंख्येच्या 50 टक्के असणार्‍या महिलांवर अन्याय होत असेल, तर त्या संस्कृतीची उपयोगिता संपत आली आहे असे समजावे. अशी संस्कृती बायकांना विचारून बनवली का? असा प्रश्न उरतोच.

पितृसत्तेत महिलांनी त्याग करावा, स्वत:ची ओळख पुसावी हे गृहीतक अतिशय घातक आहे. याउलट पुरूषांना घरजावई होणे प्रचंड अपमानास्पद वाटणे हेदेखील पुरुषसत्तेचे विषारी फळ आहे. सासरी तिला आनंदी, सुरक्षित वाटावं असं वातावरण पुरवण्याची जबाबदारी नवरा आणि सासू सासरे यांची असते. मात्र असे होताना दिसत नाही.

लग्न केल्याने स्त्रीच्या आयुष्यात जास्त नकारात्मक बदल किंवा उलथापालथ होते. मात्र, पुरुषांना लग्नसंस्थेचे फायदे मिळतात. त्यांना घर, नोकरी, आई वडील, ओळख, परिसर सोडण्याची, सासरच्या लोकांची सेवा करण्याची गरज भासत नाही.

थोडक्यात, भारतीय लग्नसंस्था मालक आणि नोकर/सेवा देणारी अशी विषमतेवर आधारित रचना तयार करते. लग्नानंतर स्त्रीने कशा पद्धतीने वागावे, नवर्‍याला देव मानून सेवा करावी (रात्रीही खुश करावे, नाही तर नवरा लगेच दुसरीकडे जाऊ शकतो), चूल आणि मूल हेच आयुष्य जगावं हे सांगण्याचं काम आपल्या देशातील विविध धर्मग्रंथांनी केलं आहे.

एकविसाव्या शतकातही ते आपल्याला चुकीचं वाटत नाही ही आणखी गंभीर बाब आहे. स्त्री सबलीकरण झाले आहे हे गोड मिथक आहे. आपल्या अर्थमंत्र्यांनी नुकतेच पितृसत्ताकता अस्तित्वात नसल्याचे सांगितले. सोबतच महिलांसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत असंही म्हणाल्या. हा किती विरोधाभास हा!

सासू सासरे नको असतील, तर मुलीने अनाथ मुलाशी लग्न करावे या पोस्टवरील कमेंट पाहिल्या तर जवळजवळ सगळ्या पुरुषांचा या विचारसरणीला पाठिंबा दिसतो आणि काही महिलांचाही. ही पोस्ट एका महिलेनं लिहिली आहे हीसुद्धा नमूद करण्याची बाब.

पितृसत्तेचे वाहक फक्त पुरुष नसतात, तर त्या स्त्रियाही असतात (स्त्रीच स्त्रीची दुश्मन असते टाईप). त्यांनाही अशाच विचारात वाढवले जाते ज्यात स्त्रीला कमीपणा असतो आणि पुरुषाला देव मानले जाते. त्याही आदर्श स्त्रीच्या कोषाच्या कचाट्यात सापडलेल्या असतात आणि इतर स्त्रियांकडून तशीच अपेक्षा करतात. त्यामुळे स्त्रियांनाही हा संघर्ष स्त्रियांस्त्रियांमधील नसून स्त्रिया आणि पितृसत्ता यामधील आहे हे लक्षात येत नाही.

राहता राहिली बाब पुरुषांनी लाईक आणि वाईट कमेंट करण्याची, तर त्यांना तसे वाढवले गेले आहे. शिवाय यात असेही पुरुष असणार आहेत ज्यांची लग्ने झालेली नाहीत, (मुलींचे घटते प्रमाण आणि वाढती पुरुषी मानसिकता पाहता होण्याची शक्यताही नसावी), जे पुरुष आपल्या घरातील स्त्रियांना, बायकोला माणूस म्हणून समजून न घेता अपमानास्पद वागणूक देत असतील, वस्तूसारखं वागवत असतील असेच पुरुष अशा पोस्टवर अतिशय हीन दर्जाच्या कमेंट्स करतात, मुलींना अवदसा म्हणतात. मुली शिकून सक्षम झाल्या तरी त्यांचा समाजाकडून स्वीकार होत नाही, त्यांच्या कर्तृत्वाला कमी लेखले जाते. मॉलमधील मॉडर्न मम्मा म्हणून स्त्रियांना हिणवणारे मेंदू असेच घडलेले असतात.

आणखी एक कायदेशीर मुद्दा म्हणजे आजकाल सोशल मीडिया किंवा इतर ठिकाणीही स्त्रियांवर वाईट पद्धतीने लिहिले किंवा बोलले तरी त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. जिथे स्त्रीकडे नुसते वाकड्या नजरेने पाहिले तरी पुरुषावर विनयभंगाची केस होते, तिथे स्त्रियांच्या लैंगिक अवयवांना उद्देशून शिव्या देणे, काहीही बोलणे स्वीकारले जाते.

सोशल मीडियावर स्त्रियांना ‘तुझ्यावर बलात्कार करायला हवा किंवा बलात्कार करेन’ अशी धमकी दिली, तरी संबंधित यंत्रणा त्यावर काहीही कारवाई करत नसल्याने सोशल मीडियावर स्त्रियांबाबत काहीही अश्लील, अश्लाघ्य लिहिण्याचे धाडस केले जाते. आपल्याकडे सायबर कायदा, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ, भारतीय न्याय संहिता (IPC), द इंडिसेंट रिप्रेजेंटेशन ऑफ विमेन लॉ असे कडक कायदे असूनही त्याचा वापर होत नाही.

यंत्रणा, व्यवस्थासुद्धा पितृसत्ताक असतात. सासूसासरे नको असतील, तर अनाथ मुलाशी लग्न करावे (अनाथ मुलाबद्दल असे लिहिणेही चुकीचेच) किंवा मॉडर्न मम्मा किंवा तत्सम पोस्ट या स्त्रियांच्या सन्मानाच्या विरोधातील, सेक्सीस्ट असल्याने कायद्याच्या अंतर्गत आणल्या गेल्या पाहिजेत.

सध्याची लग्नं अनेक कारणांनी अडचणीत आहेत. विवाहाच्या नात्याला समजून न घेणं, बिघडलेले लैंगिक संबंध, सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर, वैचारिक मतभेद या कारणांसोबत मुलांचा घरकामात सहभाग नसणं, मुलांनी मुलींना सन्मानाची वागणूक न देणं हीसुद्धा कारणं आहेत.

आजकाल मुलींचे शिक्षण, नोकरी याबाबतीत पालक, मुली सजग झाल्या आहेत. याच सक्षम मुली कुणाच्यातरी सुना होत असतात. मग मुलगी सक्षम हवी, पण सून नको किंवा बहिणीने करियर करावे आणि बायकोने गावी आई वडिलांची सेवा करत आयुष्य काढावे, असे होणार नाही.

याआधीच्या अनेक स्त्रियांच्या पिढ्यांनी घरादाराची सेवा करण्यात, अपमान सहन करण्यात आयुष्य घालवले. आता मुली सहन करत नाहीत. का सहन करावे, असाही मुद्दा आहे.

आजकाल मुली “मीच एकटीनं घरकाम का करावं? मी लग्नानंतर आईवडिलांना पैसे का देऊ नये? मीच सासरी नांदायला का जावे? मीच एकटीनं संस्कृती का पाळावी? लग्नाच्या नात्यात सन्मान मिळण्याऐवजी अन्याय होत असेल, तर घटस्फोट का घेऊ नये?” असे अनेक प्रश्न विचारतात.

या प्रश्नांना आपल्याकडे तर्कशुद्ध, योग्य उत्तरे नाहीत. केवळ ‘ही आपली संस्कृती आहे, याआधीच्या स्त्रियांच्या पिढ्यांनी हेच गपगुमान केलं, तुम्हीही करा’ हे पालुपद आता चालणार नाही.

पुढील काळात स्त्री-पुरुष संघर्ष वाढत जाणार आहे. त्यातल्या त्यात कौटुंबिक, वैवाहिक पातळीवर हा संघर्ष जास्त वाढेल. याचे महत्त्वाचे कारण आहे, स्त्रिया विचाराने आणि कृतीने बदलत आहेत. गेल्या अनेक वर्षातील अन्याय सहन करून झाल्यावर, उंबर्‍याबाहेर पाऊल टाकलेल्या स्त्रियांच्या पिढ्या शिक्षणामुळे नुसत्याच कमावत्या झालेल्या नाहीत, तर त्या सुज्ञ, शहाण्या, विचारी झालेल्या आहेत.

स्त्रियांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूकता आणण्यासाठी गेली अनेक दशके जगभर काम झालेले आहे. सरसकट जाणीवजागृती झाली नसली, तरी किमान पहिल्यापेक्षा जास्त सजगता आलेली आहे. याउलट या सक्षम झालेल्या स्त्रियांशी कसे वागावे, समजून घ्यावे, बोलावे, त्यांच्या यशाला, अपयशाला कसे हाताळावे याबाबतीतील संवाद पुरुषांसोबत फारसा होत नसल्याने आधीच पितृसत्ताक असलेले पुरुष आणखीनच पुरुषी बनत चालले आहेत. त्यांना सजग, सक्षम स्त्रिया पेलवेनाशा झाल्या आहेत.

याची परिणीती स्त्रियांप्रती असूया, तिरस्कार, दमन अशा भावनेत झाली आहे. त्यांच्या या भावनेला स्त्रियांकडून ‘तुलाही सासू सासरे नको असतील, तर अनाथ मुलीशी लग्न कर’ असे प्रत्युत्तर दिले जाते आहे. स्त्रिया पुरूषांना सोडून जात आहेत, मुलींना सासरी राहण्याची इच्छा होत नाही. घरात रोज संघर्ष सुरू आहे.

पुरूषांना वाटते की, त्याने स्त्रीला दाबून ठेवले तर ती त्याच्यासोबत राहील आणि संसार सुखाचा होईल. पण त्याच्या हे लक्षात येत नाही की, एक तर स्त्रिया आता दबणार नाहीत. त्या हिंसेविरुद्ध बोलत आहेत. त्या एक तर लग्न संस्थाच नाकारत आहेत, अविवाहित राहत आहेत, घटस्फोट घेत आहेत किंवा प्रस्थापित पारंपारिक विवाहसंस्था बदलवू पाहत आहेत. विवाहसंस्था लवचिक झाली, पुरुषांनी ती केली किंवा करू दिली तरच हा संघर्ष कमी होईल. नाही तर विवाहसंस्था टिकणे अवघड आहे.

यातील आणखी एक मुद्दा म्हणजे या स्त्रियांसोबत वाढणारी मुलेही अन्यायाच्या विरोधात आणि आईसोबत आहेत, असणार आहेत. स्त्रियांच्या उतरंडीत वेगवेगळ्या सत्ता असणार्‍या आई, मुलगी, सासू, विहीण, नणंद, भावजय या सगळ्या कालांतराने एकत्रित येऊन या पुरुषसत्तेच्या विरोधात उभ्या ठाकणार आहेत. पर्यायाने पितृसत्ता जोपासणारा पुरुष एकटा पडण्याची शक्यता आहे. ही वाटचाल मातृसत्ताक समाजव्यवस्थेकडे असणार नाही. मात्र याने पितृसत्तेची शकले उडून एक समंजस समाज तयार होण्याची ती सुरुवात आहे हे नक्की.

यासाठी स्त्रियांनी पुरूषांना समजून घेऊन त्यांना बदलाच्या प्रक्रियेत येण्यासाठी हात पुढे करावा लागेल. स्त्रियांसाठी ही प्रक्रिया जास्त वेदनादायी आहे. पुरुषही पितृसत्तेचा बळी आहे, गोंधळलेला आहे हे समजून घेणार्‍या स्त्रियांच्या वाट्याला जोडीदाराचा समजूतदारपणा येत नाही. त्याच पुरुषाला बायकोच्या मासिक पाळीत तिच्या अंगावरून मायेनं हात फिरवणं जमत नाही.

स्वत:च्या हक्कांबद्दल जागरूक असणार्‍या बायकोनं नवर्‍याच्या भावनिक, वैचारिक बाबीवर काम करणं जिकिरीचं आहे. एकीकडून स्वत:च्या अपेक्षा पूर्ण होत नसताना “नवर्‍यांना सुधारण्यासाठी”केलेल्या लग्नात अनेक जणी अडकलेल्या आहेत.

इतर कुणाहीपेक्षा पुरुषाला स्व:वर जास्त काम करावं लागेल. पुरूषांना जसे जुने सोडून द्यावं लागेल, तसं नवं शिकावं लागेल. आपला अहं बाजूला ठेवून एवढी वर्षे उपभोगलेली सत्ता सोडावी लागेल, स्त्रियांसोबत वाटून घ्यावी लागेल. करुणा, आत्मियता, अशा भावना आत्मसात कराव्या लागतील.

पुरूषांना हे समजून घ्यावं लागेल की, विकेंद्रीत सत्ता जास्त आरोग्यदायी समाज घडवते. आपण पाऊल मागे घेत आहोत अशी भावना येऊ शकते, मात्र ते पाऊल पुढे घेऊन जाणारे आहे. पुरूषांना सजग करण्याची, पुरुष म्हणून वाढवण्यापेक्षा माणूस म्हणून वाढवण्याची जबाबदारी जशी स्त्रिया आणि समाजाची आहे तशी ती पुरुषांची अधिक आहे.

आपल्या घरात वाढणार्‍या मुलग्यांना माणूस म्हणून वाढवलं नाही, तर त्याचा त्याच्या आयुष्यात येणार्‍या स्त्रियांसोबत संघर्ष होणारच आहे. तो टाळायचा असेल, तर त्याला त्याच्या आयुष्यात सक्षम स्त्रिया येणार आहेत हे जसं सांगावं लागेल. त्याला घरकामापासून मूल सांभाळण्यापर्यंत सगळं करावं लागेल आणि हे करणं आनंददायी असतं हेही सांगावं लागेल.

स्त्रीला मोलकरीण न समजता जोडीदार समजावं लागेल. न्यायालयांनी देखील ‘पत्नीला नोकर समजू नये, पत्नी फक्त स्वयंपाक करण्यासाठी किंवा इतर सेवा करण्यासाठी हवी असेल, तर लग्न करण्यापेक्षा घरात स्वयंपाकी ठेवावा. पत्नीला सन्मानाने वागवावे’ असे सुनावले आहे.

मुलाची अपेक्षा मुलीने तिचे घर सोडून सासरी नांदायला यावं, अशी असेल तर घर, संपत्ती स्वत:सोबत तिच्याही नावावर करावी लागेल. कदाचित काही पुरूषांनाही आपलं घर सोडून तिच्या घरी जावं लागेल. तिने त्याच्या आईवडिलांची काळजी घ्यावी अशी अपेक्षा असेल, तर त्यानेही बायकोच्या आई वडिलांची सेवा शुश्रूषा करण्याची तयारी ठेवावी लागेल.

आपले आई वडीलही चुकू शकतात हे स्वीकारून तसा संवाद त्याला घरात करावा लागेल. दोन्ही दगडांवर पाय ठेवून चालणार नाही. तिच्याही आईवडिलांनी तिला शिकवण्यासाठी कष्ट घेतले आहेत, तिचाही वेळ अभ्यास करण्यात गेल्याने तिलाही स्वयंपाक येणार नाही असं होऊ शकतं, तुला जसं तुझ्या आई वडिलांसोबत राहावं वाटतं, तसं तिलाही तिच्या आई वडिलांसोबत राहण्याची, बोलण्याची इच्छा होऊ शकते. म्हणून मुलीची आई मुलीच्या संसारात ढवळाढवळ करते म्हणणे योग्य ठरणार नाही.

तिचीही तुझ्यासारखीच आई वडिलांप्रती काही कर्तव्ये आहेत, तिनेही आपल्या पगारातील ठराविक रक्कम आपल्या आई वडिलांना देणं गैर नाही. उलट अशी ठराविक रक्कम द्यायला हवी हे धोरण स्वीकारणे योग्य असेल. इथे पुरुषांनी आणि समाजाने हे विसरून चालणार नाही की, हे फक्त सुनेला लागू असणार नाही, मुलाच्या बहिणीला, मुलीलाही लागू असेल. जे मुलीला लागू असेल तेच सुनेला हाच नैसर्गिक न्याय आहे.

“एवढी नाटकं असतील तर, राहा तुझ्या आई वडिलांच्याच घरी, कशाला लग्न करतेस?” असं म्हणणं पुरूषांना परवडणारं नाही. त्यांची बहिणही अशाने लग्न न करता घरात राहिल. तिची चॉइस असेल तर राहिलसुद्धा. आधीच लग्नासाठी पोरी मिळत नाहीत, अशात असा तोरा दाखवला, तर बिनलग्नाचं राहावं लागेल. सगळी कुटुंबव्यवस्था स्त्रियांमुळे भक्कमपणे उभी आहे. पुरूषांना संसारात त्यातल्या त्यात मध्यम मार्ग काढावा लागेल.

स्त्रियांनी आजवर संसार, विवाह टिकवण्यासाठी मार्ग काढले आहेत. आता पुरूषांना पुढाकार घ्यावा लागेल. सासुला किडनी दान करणारी सून आहे, तसं सासू सासर्‍यांना दरमहा पैसे पाठवणारा, त्यांचा वैद्यकीय आणि इतर खर्च करणारा, त्यांच्यासाठी अंथरूण टाकणारा, बायकोच्या आईला आपल्या आई वडिलांसोबत ठेवून एका घरात सांभाळणारा जावईसुद्धा आहे. अशांची संख्या वाढायला हवी.

‘सुनेने मुलगी बनावे/सासूने आई किंवा जावयाने मुलगा बनावे,’ असं कधी होत नसतं. हे आदर्शवत आणि अनैसर्गिक आहे. सासूने आपल्या मुलीला तिच्या सासूने जसे वागवावे अशी अपेक्षा असेल, तसे सुनेशी वागावे आणि सुनेने सासुची मैत्रीण बनावे. त्यापेक्षा सगळ्यांनी आपआपल्या ठिकाणी राहून, एकमेकांना समजून घेतलं, तरी आपोआप एकमेकांची काळजी घेतली जाईल.

पुरूषांना स्त्रियांना पुरुष बनून जिंकण्याचा विचार सोडून द्यावा लागेल, माणूस म्हणून जोडीदार बनणं हेच जास्त योग्य आहे. लग्न हे मुलांसाठी जशी चॉईस आहे, तशीच मुलींसाठीही चॉईस बनावी यासाठी लग्नसंस्था लवचिक बनवावी लागेल. त्यासाठी पुरुषांसोबत काम करावे लागेल. त्यामुळे पुरुष कमी पुरुष बनणार नाहीत, तर अधिक समृद्ध माणूस बनतील.

वर्तमान आणि भविष्यातील बदलत्या विवाह, कुटुंब संस्थेसाठी मनाची तयारी ठेवावी लागेल आणि काही गोष्टी लवचिक बनून स्वीकाराव्या लागतील. काहींचे सुवर्णमध्य शोधावे लागतील. निसर्गात स्त्री पुरुष एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी नव्हे, तर एकमेकांस पूरक, एकमेकांवर, जगावर प्रेम करण्यासाठी जन्माला आलेले आहेत. त्यांना आपण तसंच नैसर्गिक चेतनेत ठेवायला हवं. या ढासळत्या काळात सर्वांनी एकेमकांना साथ द्यायची गरज आहे. सासू सासरे नको असतील, तर असं म्हणण्यापेक्षा नवरा बायको दोघे मिळून आई वडील, सासू सासर्‍यांना सांभाळू असं म्हणणं जास्त योग्य आहे, नाही का?

(या लेखातील मते लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)