You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बाबा आढाव : वयाच्या नव्वदीतही रस्त्यावर उतरत सत्याग्रह करणाऱ्या वादळाची गोष्ट
- Author, प्राची कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठीसाठी
हमाल पंचायत, कागद काच पत्रा संघटना, रिक्षा पंचायत अशी नावं घेतली की त्याच्या बरोबरीनं आठवणारं नाव म्हणजे बाबा आढाव.
बाबांनी उभारलेल्या या संघटना. ज्यांच्या हक्कांसाठी बाबा आढावांनी अनेक वर्ष लढा दिला त्या या संघटना. पण त्यांचा लढा फक्त एवढ्या पुरताच मर्यादित नव्हता.
नोव्हेंबर 2024 मध्ये आजारपणातून उठलेल्या बाबा आढावांनी दिवसभराचा सत्याग्रह केला, मुद्दा होता निवडणुकीदरम्यान जाहीर झालेल्या योजनांचा.
ही प्रक्रिया 'लोकशाहीला नख' लावणारी आहे म्हणत नव्वदीतही रस्त्यावर उतरणारं बाबा आढाव नावाचं वादळ आता शांत झालंय.
पुण्यातल्या 'पुना हॉस्पिटल'मध्ये गेले काही दिवस उपचार घेत असलेल्या बाबा आढावांचं 8 डिसेंबर 2025 ला रात्री साडेआठ वाजता निधन झालं.
पुरोगामी विचारांचा वारसा
संघर्ष, आंदोलनं, चळवळ याचा वारसा बाबा आढावांना मिळाला तो लहानपणापासूनच. महात्मा फुलेंच्या वाड्याजवळ भवानी पेठेत बाबा आढावांचा जन्म झाला.
जन्म झाल्यानंतर काही महिन्यांमध्येच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. मग त्यांची आई आणि ते आईच्या घरी रहायला आले.
1925 साली महात्मा फुल्यांचा पुतळा उभा रहावा यासाठी जो ठराव पुण्याच्या तेव्हाच्या नगरपालिकेत मांडला गेला त्याचे अनुमोदक बाबा आढावांचे आजोबा. त्यामुळे आजोळी पुरोगामी विचारांचा वारसा होता.
छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणार्या या कुटुंबातले बाबा आढाव सेवा दलाच्या शाखेत जायला लागले.
पुढे 1941 मध्ये शिवाजी मराठा हायस्कूल मध्ये बाबा आढावांनी प्रवेश घेतला. तिथले त्यांचे सिनियर होते भाई वैद्य.
लहानपणीच स्वातंत्र्याचं बुलेटिन वाटणं वगैरे जी कामं लागायची ती करायला त्यांनी सुरुवात केली. अर्थात तेव्हा हे काही समजत नसल्याचं बाबा आढाव प्रांजळपणे कबूल करतात.
दरम्यान महात्मा गांधींचा उपवास दिनशॉ बंगल्यात सुरू झाला. त्यात सेवा दलाचा सहभाग होता.
त्यादरम्यान ही चळवळ रस्त्यावरच्या शाखांमध्ये रुपांतरीत झाली. यातल्या सेवादलाच्या काही शाखांचं नेतृत्व त्या काळी बाबा आढावांकडे होतं.
साने गुरुजींनी जेव्हा पंढरपूरचं विठोबाचं मंदिर खुलं व्हावं यासाठी जे आंदोलन झालं त्याची जनजागृती करण्यासाठी त्या काळी खेडोपाडी फिरत होते.
शिक्षण, आरोग्य ही सरकारची जबाबदारी
पुढे बाबा आढाव डॉक्टर झाले. 1955 साली बाबा आढावांचा दवाखाना हडपसर परिसरात सुरू झाला. त्याच वेळी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली होती.
बाबा विचार करत होते की सरकारी व्यवस्थेतून शिक्षण आरोग्य अशा सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत. यातूनच बाबा आढावांनी ठरवलं की, आपल्या दवाखान्यात येणार्या रुग्णांकडून गोळा होणार्या रकमेतून लोकोपयोगी काम झालं पाहिजे.
त्यामुळे थोडी रक्कम स्वत:साठी आणि उरलेली समाजकार्याला असं गणित ठरलं.
एका मुलाखतीत बाबा आढाव सांगतात," मी एस. एम. जोशींना विचारलं किती पैसा फी म्हणून घ्यायचा. आणि लोकांसाठी किती ठेवायचा? तर एस एम जोशी म्हणाले आमदारांच्या पगारा इतका पैसा स्वत: साठी ठेव.
"तेव्हा आमदारांचा पगार होता 250 रुपये. त्या रक्कमेतून दवाखाना चालवणं अवघड जात होतं. पुढे हाच दवाखाना मी महाराष्ट्र आरोग्य मंडळाला दिला," असं बाबांनी सांगितलं होतं.
डॉक्टरकी ते हमाल पंचायत
पुढे बाबा आढावांनी साक्षरतेसाठी वर्ग सुरू केले. या वर्गात शिकायला येणाऱ्या लोकांना बाबा आढावांना वचन दिलं की आम्ही पुढच्या वर्षापर्यंत साक्षर होऊ आणि आम्ही ज्या कागदांवर स्वाक्षरी करू त्याचा हार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित करू.
पुढच्या वर्षी साक्षर झालेल्या 14 जणांच्या सह्यांचा अर्ज घालत त्यांनी हे वचन पूर्ण केला.
घराजवळच नाना पेठ परिसरात बाबा आढावांचा दवाखाना सुरू होता. हा परिसर व्यापारी पेठा असलेला. त्यामुळे बाबांकडे येणारे पेशंट म्हणजे इथे काम करणारे कामगार आणि हमाल.
या हमालांना पुढे युनियन निर्माण करण्याची गरज वाटायला लागली. पण युनियन नाव नको, असं हमालांनी मांडलं.
त्यानंतर हमाल पंचायत हे नाव घेत संघटनेची स्थापना 1956 मध्ये झाली.
याचवर्षी हमाल पंचायतीच्या माध्यमातून पहिला लढा उभारला गेला. त्यामुळे मजुरांना किमान वेतन मिळाले आणि हमाल पंचायतीला अधिकृत श्रमिक संघ म्हणून मान्यता मिळाली.
कष्टाला मोलासह मान हवा ही डॉ. आढावांची मागणी आणि भूमिका राहिली.
एकीकडे कष्टकरी लोकांसाठी काम करत असतानाच बाबा आढाव पानशेत धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या लढ्यात उतरले.
अशा लढ्यातून पहिला प्रकल्पग्रस्तांसाठीचा कायदा संमत झाला. 1962 मध्ये डॉ. आढाव पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले.
एक गाव एक पाणवठा
या काळात बाबा आढावांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी काम सुरू केलं. 1971 ते 73 मध्ये 500 गावांमध्ये एक गाव एक पाणवठा चळवळीसाठी बाबा आढाव 500 गावं फिरले.
गावातले लोक त्यांना भेटायचे आणि विचारायचे जेव्हा तुम्ही डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत होता तेव्हा तर तुम्हाला खूप पैसे मिळत असतील? या गावकऱ्यांच्या प्रश्नांची आठवण बाबांना नेहमी व्हायची त्याचा ते उल्लेख करत असत.
सार्वजनिक विहिरी सर्वांसाठी खुल्या केल्या जाव्या यासाठी ही चळवळ काम करत होती.
दलितांसाठी लढत असतानाच 'देवदासी' आणि 'नंदीबैल'वाल्यांसाठीदेखील हा संघर्ष उभा केला.
आणीबाणी दरम्यान बाबा आढावांना 17 नोव्हेंबर 1975 ला अटक झाली. तेव्हा संजय गांधींनी 24 तासांत झोपडपट्टी पाडा असा हुकूम काढला होता.
यावर चर्चा करण्याची मागणी करत बाबा आढावांनी वेळ मागितली. चर्चा करण्यासाठी एकत्र जमायचं निमित्त करत त्यांनी सभा बोलावली.
25 हजार लोक जमा झाले. या निर्णयाचा धिक्कार करत बाबा आढावांनी भाषण केलं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांना अटक झाली.
येरवडा जेल मध्ये गेलेल्या बाबा आढावांच्या सोबत तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक होते. जेल मध्ये असताना बाबा आढावांनी 26 जानेवारीचा कार्यक्रमाचा आयोजित केला.
त्यावेळची आठवण सांगताना डॉ. आढाव म्हणतात, "आणि-बाणी अशी दोन कॅरॅक्टर घेत हा कार्यक्रम केला. कार्यक्रमात संघाचं नाव घेण्याला विरोध करण्यात आला.
"कार्यक्रम संपला तेव्हा राष्ट्रगीत अर्थात जन गण मन म्हणायचं ठरलं होतं. पण संघाच्या लोकांनी वंदे मातरम् म्हणायला सुरुवात केली. वाद झाला आणि जेल मध्ये कर्फ्यू लागला," असं बाबा आढाव सांगतात.
1 रुपयात कष्टाची भाकरी
बाबांच्या अनेक समाजकार्यांपैकी आणखी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे कष्टाची भाकरी.
हमाल, कामगार यांसारख्या कष्टकऱ्यांना राब राब राबूनही दोनवेळचं चांगलं खायला मिळत नाही. त्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण खावं लागतं याचं बाबा आढावांना वाईट वाटत होतं.
त्यामुळं यावर काहीतरी करायला हवं, या विचारातून त्यांनी सुमारे 50 वर्षांपूर्वी कष्टाची भाकरी हा उपक्रम हमाल पंचायतीच्या माध्यमातून सुरू केला होता.
एक रुपयांत जेवण अशी योजना असलेल्या या केंद्रांवर गरीब, कष्टकऱ्यांना पोटभर खायला मिळू लागलं. पुण्यात नंतरच्या काळात अनेक ठिकाणी हा उपक्रम राबवत कष्टाची भाकरीच्या अनेक शाखा उघडण्यात आल्या. आजही 50 वर्षांनंतर काहीठिकाणी हा उपक्रम सुरू आहे.
अखेरपर्यंत दिला लढा
नामांतर चळवळीत बाबा आढावांचा सहभाग होता. अण्णा हजारेंसोबतही सुरुवातीच्या आंदोलनांमध्ये बाबा आढाव उपस्थित होते.
पुढे वैचारिक मतभेद झाले आणि त्यानंतर हजारे आणि आढावांनी त्यांची साथ सोडली. कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत, रिक्षा पंचायत अशा अनेक प्रश्नांवर बाबा आढाव ताकदीने लढत राहिले.
महात्मा फुलेंच्या विचारांचा वारसा सांगणारे डॉ. आढाव फुलेंना, त्यांच्या विचारांना पुरोगामी वर्तुळानेही अनेक वर्ष डावललं असं मत ते परखडपणे मांडायचे.
डॉ. आढाव म्हणायचे की, "महात्मा फुलेंच्या विचारांची उपेक्षा झाली. महात्मा फुलेंनी स्वत: साठी काही मागितलं नाही. ते कोणासाठी मागत होते? आपल्यासाठी नाही. आजही त्यांची उपेक्षा सुरू आहे. आजही त्यांच्या आकारांची पूजा होते. विचाराचं काय?"
बाबा आढाव म्हणायचे, "तुमच्या पिढीला सांगतो की, आम्ही इतिहास नाही वर्तमान आहोत."
'सत्य सर्वांचे आदीघर' म्हणणारे बाबा आढाव 'सत्यमेव जयते' म्हणत अखेरपर्यंत वंचितांना हक्क मिळवून देण्यासाठी लढत राहिले.
बीबीसी मराठीला दिलेल्या शेवटच्या मुलाखतीत बाबा आढाव म्हणाले होते, " इथल्या विचारवंत जगताला सत्याग्रह करावा लागेल. रस्त्यावर येऊन त्यांना सांगावं लागेल की तुमचं चुकतंय."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.