You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे निधन
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे सोमवारी (8 डिसेंबर) रात्री 8.25 वाजता निधन झाले. ते कष्टकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जात. त्यांनी हमाल पंचायत या संघटनेची स्थापना करून आयुष्यभर असंघटित कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढा दिला.
डॉ. बाबा आढाव यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा खोलवर प्रभाव होता.
त्यातूनच त्यांनी जातीय भेदभावाला विरोध म्हणून त्यांनी महाराष्ट्रभर एक गाव एक पाणवठा ही चळवळ चालवली.
बाबा आढाव यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. वंचित आणि असंघटित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. त्यांचे आधारस्तंभ म्हणून काम केले. हमाल, रिक्षाचालक, बांधकाम मजुरांना न्याय देण्यासाठी त्यांनी संघटन उभे केले."
"हमाल पंचायत, एक गाव-एक पाणवठा असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. सामाजिक कुप्रथांविरोधात त्यांनी दिलेला लढा हा कायम स्मरणात राहील. महाराष्ट्राला समाजसेवकांची एक थोर परंपरा कायमच लाभली. त्या परंपरेतील एक मौलिक व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेले. ते कायम स्मरणात राहतील, त्यांचे विचार येणार्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील," अशा शब्दात फडणवीसांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांनीही बाबा आढाव ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय, "आपल्या महाराष्ट्रात प्रागतिक ,कृतीशील विचार मांडून ते आचरणात आणणाऱ्या शिलेदारांची एक मोठी फळी आहे. भूमिका घेताना परिणामांची, प्रस्थापित व्यवस्थेच्या रोषाची तमा न बाळगणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये ज्येष्ठ समाजसेवक, पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक डॉ. बाबा आढाव ह्यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल."
"आज जेव्हा त्यांच्या निधनाचं वृत्त समजलं तेव्हा त्यांचा संघर्षाचा आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याचा सारा पट डोळ्यासमोरून गेला. 'एकाकी मजदूर' चळवळ, कामगारांच्या हक्कांसाठीची त्यांची अखंड झुंज, समतेवर आधारित समाजरचनेचा त्यांचा ठाम निर्धार अशा सर्व भूमिकांमधून ते सतत प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देत राहिले."
आजच्या सामाजिक दृष्ट्या अस्थिर, विषमतेने, विद्वेषाने ग्रासलेल्या काळात बाबा आढाव ह्यांच्यासारख्या निडर, विचारांशी बांधिलकी ठेवून काम करणाऱ्या विभूतींची उणीव सदैव भासत राहील, असंही शरद पवारांनी नमूद केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार पक्ष) नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
एक्सवर पोस्ट करत त्या म्हणाल्या, "आदरणीय डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. बाबा, माझ्यासह अनेकांसाठी प्रेरणास्रोत होते. त्यांनी शिव-फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा, सत्यशोधकी विचारांचा मार्ग अधिक प्रशस्त केला. या विचारांची शिदोरी बाबांनी आम्हा सर्वांच्या ओंजळीत भरभरून टाकली. ते अखेरच्या क्षणापर्यंत अगदी आजारपणातही जनतेच्या हितासाठी विशेषतः हमाल, रिक्षाचालक, कामगार, कष्टकरी आणि वंचित समूहाच्या उत्थानासाठी कार्यरत होते. त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करीत होते."
"या सर्वांसाठी बाबा आढाव हे मोठा आधार होते. त्यांच्या जाण्यामुळे आज सामाजिक चळवळींच्या अवकाशात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाने देश एका वैचारीक, सत्वशील, व्रतस्थ आणि अखंड सेवाव्रती नेतृत्वाला मुकला," अशी भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
बाबा आढाव कोण होते?
बाबा आढाव क्रांतिकारक सत्यशोधक परंपरेचे मोठे पाईक होते. त्यांनी महाराष्ट्रात परिवर्तनाचा मोठा लढा चालवला. ते एक कृतिशील विचारवंत होते.
बाबा आढाव यांची एक सत्यशोधक विचारवंत म्हणून असलेली कारकीर्द जवळपास 70 वर्षांची होती. महिला, समता, कष्टकरी, जातीचा मुद्दा आणि इतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी आयुष्यभर लढा दिला. महाराष्ट्राच्या वाटचालीत त्यांच्या कामाचं योगदान मोठं होतं.
त्यांच्यावर राष्ट्र सेवा दल, साने गुरुजींच्या विचारांचादेखील प्रभाव होता. महात्मा फुल्यांनी सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून जो मूलभूत क्रांतीचा प्रयत्न केला, तो ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाद्वारे एकप्रकारे डावलला गेला, अशी खंतदेखील त्यांना होती.
महात्मा फुले यांचे विचार आजच्या काळातदेखील पुढे नेण्यासाठी बाबा आढाव आयुष्यभर कार्यरत राहिले.
समाजात मूलभूत स्वरूपाचे बदल करण्यासाठी संघर्ष करत असताना त्यांनी विज्ञानाची कास धरली. मात्र त्याचबरोबर गेल्या 100 वर्षात विज्ञानानं जी प्रचंड प्रगती केली त्याला परिवर्तनाच्या चळवळीशी जोडताना सुधारणावाद्यांकडून विज्ञानाकडे दुर्लक्ष झालं, असंही बाबा आढाव यांचं मत होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)