You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानी लष्करप्रमुखांचे हिंदू आणि काश्मीरविषयी वादग्रस्त वक्तव्य, भारतीयांनी धरलं धारेवर
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी नुकताच दिलेल्या एका भाषणात हिंदू धर्म आणि काश्मीर संदर्भात काही वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. त्यांच्या या विधानानंतर पाकिस्तान आणि भारत दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे.
जनरल मुनीर यांनी बुधवारी काश्मीर आणि हिंदूंबाबत वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक राजकीय आणि लष्करी अधिकारी प्रतिक्रिया देत आहेत, ज्यामुळं ही गोष्ट आता चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे.
जनरल असीम मुनीर हे बुधवारी (दि.16) इस्लामाबादमध्ये आयोजित ओव्हरसीज पाकिस्तानी कन्व्हेन्शन 2025 च्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफही सहभागी झाले होते. या समारंभात परदेशी पाकिस्तानींना संबोधित करताना जनरल मुनीर यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले.
त्यांनी टू-नेशन थिअरी (द्विराष्ट्र सिद्धांत), बलुचिस्तान, भारतीय लष्कर, काश्मीर आणि हिंदूंबाबतही वक्तव्ये केली.
पाकिस्तानी लष्करप्रमुखांच्या वक्तव्यावर भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
याशिवाय अनेक मोठे नेते, पत्रकार आणि सर्वसामान्य नागरिकांनीही सोशल मीडियावर यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दुसरीकडे, पाकिस्तानमध्ये त्यांच्या लष्करप्रमुखांच्या वक्तव्याची चर्चा जोरात सुरू आहे. बलुचिस्तानवर त्यांनी केलेल्या वक्तव्यावर बलूच अमेरिकन काँग्रेसनेही टीका केली आहे.
काय म्हणाले पाकिस्तानचे लष्करप्रमुख?
जनरल मुनीर यांनी 'ओव्हरसीज पाकिस्तानी कन्व्हेन्शन 2025' मध्ये म्हटलं की, पाकिस्तानच्या लोकांनी त्यांचा देश कसा घडला हे त्यांच्या मुलांना अवश्य सांगितलं पाहिजे. असं केल्यास ही मुलं पाकिस्तानची कहाणी विसरणार नाहीत.
हिंदूंचा संदर्भ देताना ते म्हणाले, "आपल्या पूर्वजांना वाटत होतं की, आपण जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात हिंदूंपेक्षा वेगळे आहोत. आपला धर्म वेगळा आहे, आपल्या चालीरीती वेगळ्या आहेत.
आपली संस्कृती वेगळी आहे आणि आपली विचारसरणी पण वेगळी आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा वेगळ्या आहेत. हा द्विराष्ट्र सिद्धांताचा पाया होता."
मुस्लिम लीग द्वि-राष्ट्र सिद्धांताचे समर्थन करत होती, त्यानुसार भारतीय उपखंडातील हिंदू आणि मुस्लिम हे दोन वेगळे 'लोक' आहेत. याच आधारावर पाकिस्तानची मागणी करण्यात आली होती.
परंतु, पूर्व पाकिस्तानातील मुक्ती संग्राम आणि 1971 मध्ये बांगलादेश देश म्हणून अस्तित्वात आल्यानंतर या सिद्धांतावर प्रश्न उपस्थित होऊ लागले होते.
जनरल मुनीर म्हणाले, "आम्ही दोन देश आहोत, आम्ही एक देश नाही. आमच्या पूर्वजांनी या देशासाठी बलिदान दिलं आहे. या देशाच्या उभारणीसाठी त्यांनी खूप त्याग केला आहे. त्याचं संरक्षण कसं करायचं ते आम्हाला माहीत आहे."
जनरल मुनीर यांनी आपल्या भाषणात भारतीय लष्कराचाही उल्लेख केला.
ते म्हणाले, "देशात काही ठिकाणी ज्या दहशतवादाच्या घटना घडत आहेत आणि जे लोक यातून पाकिस्तानात कोणतीही गुंतवणूक होणार नाही, असा अपप्रचार करत आहेत, त्यांनी आता माझं बोलणं स्पष्टपणे ऐकावं."
"तुम्हाला असं वाटतं का की, दहशतवादी आपल्याकडून आपल्या देशाचं भविष्य हिरावून घेऊ शकतात?
जर या महान पाकिस्तानी राष्ट्र आणि पाकिस्तानी सशस्त्र बलाला 13 लाख भारतीय सैन्य घाबरवू शकले नाहीत, हरवू शकले नाहीत. तर हे दहशतवादी पाकिस्तानी सशस्त्र बलांना आपल्या ताब्यात ठेवू शकतात का?", असा सवाल त्यांनी केला.
"बलुचिस्तान हे पाकिस्तानचं भविष्य आहे, पाकिस्तानचा मुकुट आहे. तुम्ही 1500 लोक (बीएल, बीएलएफ आणि बीआरएचे सदस्य) म्हणाल की, आम्ही ते घेऊ? तुमच्या पुढच्या 10 पिढ्याही ते घेऊ शकणार नाहीत. तुम्हाला दिसेल की, आम्ही लवकरच या दहशतवाद्यांचा पराभव करू."
काश्मीरचा उल्लेख करत जनरल मुनीर म्हणाले की, काश्मीरबाबत पाकिस्तानी लष्कर आणि सरकारची भूमिका स्पष्ट आहे.
ते म्हणाले, "आमची (पाकिस्तानी लष्कर) आणि सरकारची काश्मीरबाबतची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. आम्ही ते विसरणार नाही. भारताच्या कब्जाविरुद्ध आम्ही लढणार आहोत, आम्ही आमच्या काश्मिरी बांधवांना सोडणार नाही."
वक्तव्यावर पाकिस्तानात काय चर्चा सुरू?
पाकिस्तानी लष्करानं बलुचिस्तानला सन्मानपूर्वक सोडावं, असं बलूच अमेरिकन काँग्रेसनं म्हटलं आहे. जनरल मुनीर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे भाष्य केलं.
"बलूच राष्ट्र तुम्हाला (पाकिस्तानी सैन्याला) बांगलादेशात अनुभवलेल्या अपमानाची पुनरावृत्ती करण्याऐवजी बलुचिस्तानमधून सन्मानाने माघार घेण्याची संधी देत आहे," असे बलूच अमेरिकन काँग्रेसने एक्सवर पोस्ट केले आहे.
"जर तुम्ही लोकांवर अत्याचार करत राहिलात तर त्याचे भूतकाळापेक्षाही गंभीर परिणाम होतील," असा इशाराही त्यांनी पाकिस्तानी लष्कराला दिला आहे.
पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी आपल्या भाषणात सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांना 'फॉरवर्डेड ॲज रिसिव्ह' म्हणत टीका केली आहे.
यावर एका यूझरने 'फॉरवर्डेड ॲज रिसीव्ह' चा हॅशटॅग वापरून काही छायाचित्रं शेअर केली आणि जनरल मुनीर यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.
त्या यूझरनं लिहिलं की, "महिलांना त्यांची कॉलर पकडून ओढलं गेलं, प्लास्टिकच्या पिशव्यांनी त्यांचे चेहरे झाकले, त्यांच्यावर थेट गोळीबार केला, सहा महिन्यांच्या मुलाच्या आईला देखील त्यांनी सोडलं नाही."
दरम्यान, पाकिस्तानातील काही लोकांनीही जनरल मुनीर यांना पाठिंबा दिला आहे.
पाकिस्तानचे पत्रकार गुलाम अब्बास शाह यांनी जनरल असीम मुनीर यांचा एक व्हीडिओ शेअर केला आणि सांगितलं की, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी बलुचिस्तानप्रती पाकिस्तानची वचनबद्धता पुन्हा स्पष्ट केली आहे आणि बलुचिस्तानला देशाचं भविष्य (नियती) असल्याचं म्हटलं.
आनुम फातिमा नावाच्या एका युजरने जनरल असीम मुनीर यांच्या भाषणाचा व्हीडिओ शेअर केला आणि लिहिलं, "लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी म्हटलं आहे की, बलुचिस्तान हा पाकिस्तानचा मुकुट आहे. तुम्हाला वाटतं का की 1,500 लोक तो हिसकावून घेऊ शकतात? तुमच्या पुढच्या 10 पिढ्याही यात यशस्वी होणार नाहीत."
एका एक्स यूझरनं लिहिलं आहे की, "लष्करप्रमुखांनी दहशतवाद्यांविरोधात निर्णायक कारवाईची शपथ घेतली आहे आणि लवकरच देशातून दहशतवाद्यांचा पूर्ण नायनाट केला जाईल, असं सांगितलं आहे."
मुनीर यांच्या वक्तव्यावरील प्रतिक्रिया
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या वक्तव्यानंतर भारतीय मीडियामध्ये त्यांच्या भाषणाला ठळक स्थान दिलं जात आहे. यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
शिवसेनाच्या (उद्धव ठाकरे गट) राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी जनरल असीम मुनीर यांचा व्हीडिओ शेअर करताना म्हटलं की, पाकिस्तानचे लष्करप्रमुख बरोबर बोलत आहेत की, भारत आणि पाकिस्तान वेगवेगळे देश आहेत आणि आपली महत्त्वाकांक्षा देखील वेगळी आहे.
प्रियंका चतुर्वेदी यांनी एक्सवर लिहिलं आहे की, "होय, पाकिस्तानी लष्करप्रमुख बरोबर बोलत आहेत. भारत आणि पाकिस्तान हे दोन वेगळे राष्ट्र आहेत, ज्यांच्या महत्त्वाकांक्षा देखील पूर्णपणे वेगळ्या आहेत."
त्यांनी लिहिलं, "आपलं ध्येय जागतिक नेता बनणं आणि देशांमधील सेतू, पुल उभारणं आहे, तर त्यांचं (पाकिस्तानचं) ध्येय दहशतवाद्यांचं जागतिक नेतृत्व करणं आणि त्या पुलांवर बॉम्बफेक करणं आहे."
भारतीय सैन्याचे माजी अधिकारी मेजर मदन कुमार यांनी म्हटलं, "पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, त्यांना हिंदूंविषयी आणि भारताविषयी द्वेष आहे."
पाकिस्तानी लष्करप्रमुखांच्या विधानामुळे आपण निराशा झालो असल्याचे भारतीय लष्कराचे एक निवृत्त अधिकारी प्रवीण साहनी यांनी म्हटलं आहे.
त्यांनी एक्सवर लिहिलं आहे की, "जनरल मुनीर यांच्याबाबत मी खूप निराश झालो आहे. हो, भारत आणि पाकिस्तान हे दोन वेगवेगळे राष्ट्र आहेत. पण आपण एकच सभ्यता शेअर करतो, एक अशी ओळख, जी धर्मापेक्षा मोठी असायला हवी."
प्रवीण साहनी यांनी लिहिलं, "आपल्या मुलांना दुसऱ्याच्या धर्माविषयी द्वेष करून मैत्रीचे पूल तोडायला शिकवू नका. त्यांना पुढे जाणं, प्रगती करणं शिकवा. माफ करा जनरल, मला तुमच्याकडून असं काही अपेक्षित नव्हतं, कारण तुम्ही पाकिस्तानचं भविष्य घडवत आहात."
पत्रकार ताहा सिद्दीकी यांनी जनरल मुनीर यांच्या वक्तव्याला लाजीरवाणं म्हटलं आहे.
त्या म्हणाल्या, "पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर हिंदूंविरुद्ध द्वेष पसरवतात आणि द्विराष्ट्र सिद्धांताचा प्रचार करतात, पण तो 1971 मध्ये बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळाल्यावर अपयशी ठरला होता."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.