पाकिस्तानात एक्सप्रेस ट्रेनवर हल्ला, नेमकं प्रकरण काय?

पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील सिब्बी जिल्ह्यात मंगळवारी दुपारी सशस्त्र अतिरेक्यांनी क्वेट्टाहून पेशावरकडे जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसवर हल्ला करून अनेक प्रवाशांना ओलीस ठेवलं आहे.

बंदी घालण्यात आलेल्या बलुच लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

पाकिस्तानच्या लष्कराने बीबीसी उर्दूला दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 104 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून बलुच लिबरेशन आर्मीचे 27 कट्टरतावादी सदस्य मारले गेले आहेत.

दुसरीकडे, बलुच लिबरेशन आर्मीने असा दावा केला आहे की त्यांनी अनेक सुरक्षा जवानांना ठार केलं असून 35 लोकांना ओलीस ठेवलं आहे.

27 अतिरेक्यांचा मृत्यू झाल्याचा दावा, अनेक प्रवाशांची सुटका

पाकिस्तानमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बलूचिस्तान प्रांतामध्ये ट्रेन हायजॅक झाल्यानंतर त्यातील प्रवाशांना वाचवण्याची मोहिम सध्या राबवली जात आहे.

मंगळवारी (11 एप्रिल) प्रवाशांनी भरलेल्या एका ट्रेनवर सशस्त्र कट्टरतवादी लोकांनी हल्ला करुन प्रवाशांना ओलीस धरलं होतं.

पाकिस्तानमधील लष्कराच्या सूत्रांनी बीबीसी उर्दूला सांगितलंय की, "त्यांच्या या सुटकेच्या मोहिमेमध्ये आतापर्यंत 155 लोकांना वाचवण्यात आलं आहे. तसेच, आतापर्यंत 27 कट्टरतावादी लोकांना ठार करण्यात आलं आहे."

जाफर एक्स्प्रेसवरील हल्ल्यामागे ज्यांचा हात असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे ते अफगाणिस्तानमध्ये ही योजना करणाऱ्या त्यांच्या लोकांच्या संपर्कात आहेत.

या ट्रेनवर हल्ला करण्याबाबतची जबाबदारी फुटीरतावादी संघटना असलेल्या बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) घेतली आहे. हा हल्ला क्वेटामधून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसवर झाला आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ट्रेनमध्ये नऊ डबे होते आणि यामधून 400 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते.

पाकिस्तानचे गृह राज्यमंत्री तलाल चौधरी यांनी म्हटलं आहे की, जाफर एक्स्प्रेसमधील अनेक प्रवाशांना ट्रेनमधून उतरवून त्यांना डोंगराळ प्रदेशामध्ये अतिरेक्यांनी नेलं आहे.

नेमकं काय घडलंय?

पाकिस्तानात एका एक्सप्रेस ट्रेनवर सशस्त्र लोकांनी हल्ला केला आहे.

बीबीसी उर्दूने दिलेल्या माहितीनुसार, बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी अशी घटना घडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

शाहिद म्हणाले की क्वेटा शहरातून पेशावरकडे जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसवर मोठा गोळीबार झाल्याचं वृत्तं आहे. या हल्ल्यात ट्रेनचा ड्रायव्हर जखमी झाल्याचं वृत्तं आहे.

क्वेटामधील रेल्वेचे सुरक्षा अधिकारी जिया काकर म्हणाले की या प्रदेशात नेटवर्कची समस्या असल्यामुळे ट्रेनच्या ड्रायव्हर टीममधील कोणाशीही संपर्क होत नाहीये.

ते म्हणाले की ज्या ट्रेनवर हल्ला झाला, त्याला 11 डबे होते.

पाकिस्तानातील लष्करातील सूत्रांनी सांगितलं आहे की क्वेटाहून पेशावरकडे जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसवर बलोचिस्तानमधील बोलन खिंडीत कट्टरतावाद्यांनी हल्ला केला आहे. हल्ल्यानंतर जाफर एक्सप्रेसमधील प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आलं आहे.

सूत्रांनी सांगितलं की कट्टरतावाद्यांनी ट्रेनवर धादर इथं हल्ला केला आणि तिथे असलेल्या बोगद्यामध्ये ट्रेन थांबवण्यात आली. त्यानंतर प्रवाशानंतर ओलीस ठेवण्यात आलं.

सूत्रांनी म्हटलं आहे की ओलिसांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे.

लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी हा हल्ला झाला आहे ते ठिकाण अतिशय अवघड जागी आहे आणि मुख्य रस्त्यापासून दूर आहे. मात्र सुरक्षा दलांनी या परिसराला वेढा घातला आहे. कट्टरतावाद्यांना संपवण्यासाठी सुरक्षा दलांनी कारवाई सुरू केली आहे.

एका सरकारी प्रवक्त्यानं प्रसारमाध्यमांना दिलेल्या वक्तव्यात म्हटलं आहे की सिब्बी हॉस्पिटलमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. तसंच घटनास्थळी अॅम्ब्युलन्स पाठवण्यात आली आहे.

पेशावरकडे निघालेल्या ट्रेनवर हल्ला

क्वेटामधील रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी मुहम्मद शरीफ म्हणाले की सशस्त्र हल्लेखोरांनी हल्ला केल्यामुळे ट्रेनला सिब्बीजवळ थांबवण्यात आलं आहे.

ते पुढे म्हणाले की, 'आतापर्यंत जी माहिती मिळाली आहे, त्यानुसार या हल्ल्यात ट्रेनचा ड्रायव्हर जखमी झाला आहे.'

मुहम्मद शरीफ म्हणाले की ही ट्रेन सकाळी 9 वाजता क्वेटाहून पेशावरला जाण्यासाठी निघाली होती.

सरकारी प्रवक्ते शाहिद रिंग पुढे म्हणाले की सुरक्षा दलांना घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे.

ते म्हणाले की रेल्वे विभागाकडून एक दुसरी ट्रेन मदतकार्यासाठी घटनास्थळी पाठवण्यात आली आहे.

ते म्हणाले की सुरुवातीला मिळालेल्या वृत्तांनुसार, हा हल्ला कट्टरतावाद्यांनी केलेला असू शकतो आणि त्याचा सविस्तर तपास सुरू आहे.

सरकारी प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, हा प्रदेश डोंगराळ आणि दुर्गम असल्यामुळे घटनास्थळी पोहोचण्यास अडचणी येत आहेत.

डॉ. वसिम बेग क्वेटामधील जिल्हा हॉस्पिटलचे प्रवक्ते आहेत.

त्यांनी बीबीसीला सांगितलं की सिब्बी आणि क्वेटामधील प्रमुख हॉस्पिटलमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

तिथे विशेष वार्ड तयार करण्यात आले आहेत. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना जखमींवर उपचार करण्यासाठीची तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

डॉ. असिम बेग म्हणाले की सिब्बी हॉस्पिटलची 100 रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे. मात्र गंभीररित्या जखमी झालेल्यांना क्वेटामधील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येणार आहे.

बलुच लिबरेशन आर्मीने आतापर्यंत कोणते हल्ले केले आहेत?

बलुच लिबरेशन आर्मी (BLA)या संघटनेला पाकिस्तान, युके आणि अमेरिकेसह अनेक देशांमध्ये दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केलेलं आहे. पाकिस्तानामधील सुरक्षा दलं, पायाभूत सुविधा, पाकिस्तानात काम करत असलेले चिनी कामगार आणि पाकिस्तानातील चिनी गुंतवणुकीवर हल्ले केल्याचा आरोप या संघटनेवर आहे.

बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ही एक कट्टरतावादी फुटीरतावादी संघटना आहे. बलोच लोकांच्या स्वायत्ततेसाठी आणि अधिकारांसाठी लढत असल्याचा या संघटनेचा दावा आहे. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात ही संघटना उदयाला आली.

तिची स्थापना प्रमुख बलुच राष्ट्रवादी नेते सरदार खैर बक्ष मारी याचे पुत्र बलाच मारी यांनी अफगाणिस्तानात निर्वासित असताना केल्याचं मानलं जातं.

बलाच मारी यांनी अधिकृतपणे कधीही या संघटनेची स्थापना केल्याचा किंवा तिचे नेते असल्याचा दावा केला नसला तरी, या संघटनेच्या स्थापनेशी त्यांचा मोठा संबंध आहे.

सुरुवातीच्या काळात बलुच लिबरेशन आर्मी (BLA)मध्ये मोठ्या संख्येनं स्थानिक आदिवासी आणि टोळ्यांमधील लोकांचा समावेश होता. त्यावेळेस या संघटनेनं बलोचिस्तानच्या दुर्गम आणि डोंगराळ प्रदेशात गनिमी पद्धतीनं हल्ले केले होते.

बलाच मारी यांचा अफगाणिस्तान मृत्यू झाल्यानंतर, त्यांचे भाऊ हिरबायर मारी यांनी या संघटनेचं नेतृत्व स्वीकारल्याचं म्हटलं जातं. मात्र भावाप्रमाणेच हिरबायर मारी यांनीदेखील या संघटनेचे नेतृत्व केल्याचा दावा केला नाही.

कालांतरानं, बलुच लिबरेशन आर्मीच्या डावपेच बदलले आहेत. ते आता गनिमी काव्यानं ग्रामीण भागात लढण्याऐवजी शहरी भागात आधुनिक पद्धतीनं वाढत्या संख्येनं हल्ले करत आहेत.

या संघटनेत फूट पडल्यामुळे अस्लम बलोच आणि बशीर झैब सारख्या नेत्यांना त्यातून काढून टाकण्यात आलं. त्यातून बलुच लढ्यामध्ये आणखी विभाजन होत गेलं.

2018 मध्ये अस्लम बलुच यांचा अफगाणिस्तान मृत्यू झाला. त्यानंतर बशीर झैब यांच्याकडे बलोच लिबरेशन आर्मीचं नेतृत्वं आलं आहे. बशीर झैब आधी बलुच स्टुडंट्स ऑर्गनायझेशन (BSO)या राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेशी संबंधित होते. हा संघटनेवर पाकिस्तानी सरकारनं बंदी देखील घातली होती.

बशीर झैब यांच्या नेतृत्वाखाली बलुच लिबरेशन आर्मी अधिक संघटित झाली आहे. ते आता अधिक आधुनिक डावपेच वापरत आहेत. यात आत्मघातकी हल्ल्यांचाही समावेश आहे. राष्ट्रवादी आणि फुटीरतावादी विचारसरणी असलेल्या संघटनेत झालेला हा महत्वाचा बदल आहे.

बलुच लिबरेशन आर्मी यांनी विशेषकरून पाकिस्तानातील चिनी कामगार आणि चिनी गुंतवणुकीला लक्ष्य केलेलं आहे. ते याकडे बलुचिस्तानवरील परकी नियंत्रण आणि बलुचिस्तानच्या शोषणाचं प्रतीक म्हणून पाहतात. त्याचबरोबर पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या जवानांवर देखील वारंवार हल्ले करण्यात आले आहेत.

बलुच लिबरेशन आर्मीनं केलेले काही प्रमुख हल्ले,

  • 2020 मध्ये कराची स्टॉक एक्सचेंजवरील हल्ला
  • पाकिस्तानची गुप्तहेर संस्था, इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI)च्या मुख्यालयावरील हल्ला
  • कराची आणि बलुचिस्तानातील चिनी इंजिनीअरवर केलेले हल्ले
  • अलीकडेच क्वेटा रेल्वे स्टेशनवर केलेला हल्ला, ज्यात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.