अमेरिकन कंपनीनं शेअर बाजाराला कसं खेळवलं? भारतीयांना फसवून मिळवला हजारो कोटींचा नफा

अमेरिकन कंपनीने शेअर बाजारातून उकळले हजारो कोटी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, दिनेश उप्रेती
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

ट्रेडिंगमधील खास युक्त्या आणि जागतिक बाजारात आपला दबदबा निर्माण करणारी अमेरिकन 'जेन स्ट्रीट' ही कंपनी सध्या भारतात वादात अडकली आहे. भारतीय शेअर बाजारात झालेल्या काही संशयास्पद व्यवहारांमुळे या कंपनीविरोधात चौकशीची मागणी होत आहे.

भारतीय बाजार नियामक संस्था 'सेबी'नं अमेरिकन कंपनी जेन स्ट्रीटवर दिशाभूल आणि फसवणूक करणाऱ्या ट्रेडिंग व्यवहारांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून बंदी घातली आहे. जेन स्ट्रीटने भारतीय शेअर बाजारात बेकायदेशीर मार्गाने हजारो कोटी रुपयांचा नफा कमावल्याचा आरोप आहे.

या वादामागचं मूळ कारण म्हणजे जेन स्ट्रीटने डेरिव्हेटिव्ह (फ्युचर्स) विभागात वापरलेली आक्रमक ट्रेडिंग पद्धत. कंपनीने केवळ नफा कमवण्यासाठीच नव्हे, तर बाजारावर परिणाम घडवून आणण्यासाठीही अनेक व्यवहार केले, असं सेबीचं म्हणणं आहे.

सेबीच्या मते, ही धोरणं पारदर्शक नव्हती, तर मुद्दाम आखलेली होती. त्यामागचा उद्देश म्हणजे बाजारातील किमतींवर प्रभाव पाडणं आणि त्यातून मोठा आर्थिक फायदा मिळवणं.

नुकतंच सेबीने जेन स्ट्रीटवर भारतीय शेअर बाजारात पूर्णपणे बंदी घातली आहे. मात्र जेन स्ट्रीटनं ही कारवाई चुकीची असल्याचं म्हटलं. तसेच सेबीच्या या निर्णयाला कायदेशीररित्या आव्हान देण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

जेन स्ट्रीट ही कंपनी नेमकं काय करते?

जेन स्ट्रीट ही एक 'प्रोप्रायटरी ट्रेडिंग' कंपनी आहे. याचा अर्थ असा की, ही कंपनी इतर कोणाच्या नव्हे, तर आपल्या स्वतःच्या पैशातून शेअर बाजारात ट्रेडिंग करते. ती ग्राहकांचे पैसे वापरत नाही.

स्वतःच्या पैशांनी ट्रेडिंग करण्याचं हे स्वातंत्र्य वापरून या कंपनीने हजारो कोटी रुपयांचा नफा कमावला आणि तो पैसा भारताबाहेर पाठवला, असं बोललं जात आहे.

मात्र, जेन स्ट्रीटनं त्यांच्या विरोधात लावण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत.

अमेरिकन कंपनीने शेअर बाजारातून उकळले हजारो कोटी

फोटो स्रोत, Getty Images

बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, जेन स्ट्रीटनं आपल्या कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठवून माहिती दिली आहे. त्यांनी त्यात म्हटलं आहे की, त्यांच्यावरील आरोप चुकीचे आणि अतिशयोक्तीपूर्ण आहेत. त्यामुळे ते खूप निराश आहेत. कंपनी लवकरच या आरोपाला उत्तर देण्यासाठी आपली बाजू मांडणार आहे.

या अमेरिकन कंपनीने 'इंडेक्स ऑप्शन्स'मध्ये फेरफार करून हजारो कोटी रुपयांचा नफा कमावला आहे, असा सेबीनं आरोप केला आहे.

इंडेक्स ऑप्शन्स म्हणजे काय?

ही गोष्ट नीट समजून घेण्यासाठी, सर्वात आधी आपण 'इंडेक्स ऑप्शन्स' म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊयात.

आपण हे अशा पद्धतीनं समजून घेऊ शकतो, 'इंडेक्स ऑप्शन्स' हे शेअर बाजाराशी संबंधित असले तरी, काही वेळेसाठी ते 'नशिबावर' देखील अवलंबून असतात.

उदाहरणार्थ, समजा आपण एखाद्या विशेष ट्रेडिंग दिवशी 'बँक निफ्टी' 50,000 चा टप्पा पार करेल, यावर 2 रुपये लावतो. (या व्यवहाराची मुदत म्हणजे त्या दिवशीचा बाजार बंद होईपर्यंत म्हणजेच दुपारी 3:30 पर्यंतची असते.)

अमेरिकन कंपनीने शेअर बाजारातून उकळले हजारो कोटी

समजा बँक निफ्टी 50,001 वर बंद झाला, तर तुम्हाला 'जॅकपॉट' लागला समजा. कधी कधी जर खरंच 'चमत्कार' झाला, तर तुमचे 2 रुपये तुम्हाला 30-40 रुपये, कधी त्याहूनही जास्त परतावा देऊ शकतात. जेन स्ट्रीट कंपनीही, अशा प्रकारची पैज किंवा सट्टा एकाच वेळी लावत होती.

पण जर बँक निफ्टी 49,999 वर बंद झाला, तर तुमचे 2 रुपये गेलेच समजा.

पाहिलंत ना, एका आकड्यामुळे तुमचं नशीब पूर्णपणे कसं बदलू शकतं.

अमेरिकन कंपनीने शेअर बाजारातून उकळले हजारो कोटी

फोटो स्रोत, Getty Images

बाजाराच्या भाषेत 50,000 या आकड्याला 'स्ट्राइक प्राइस' म्हणतात. जर तुमचा अंदाज (या उदाहरणात बँक निफ्टी 50,000 पेक्षा जास्त जाईल) खरा ठरला, तर त्याला 'इन द मनी' असं म्हणतात आणि अशावेळी नफा खूप जास्त असू शकतो.

जर इंडेक्स तुमच्या ठरवलेल्या टार्गेटच्या खाली बंद झाला, तर तुमची पैज 'आउट ऑफ द मनी' म्हणून ओळखली जाते आणि मग सगळं वाया जातं. म्हणजे, एक तर तुम्हाला मोठा तोटा सहन करावा लागतो किंवा तुम्ही जे पैसे लावले होते, ते पूर्णपणे गमावाल.

'आउट ऑफ द मनी' ऑप्शन्स बऱ्याचदा खूपच स्वस्त असतात, इतके स्वस्त की ते 2-3 रुपयांमध्येही मिळू शकतात आणि कधी कधी तर त्याहूनही कमी दरात. कारण अशा ऑप्शनवर पैसे लावणारे पूर्णपणे नशिबाच्या भरवशावर अवलंबून असतात. ते शेवटच्या काही मिनिटांमध्ये एखाद्या 'चमत्काराच्या' आशेनं असं करतात.

जेन स्ट्रीटनं नेमका काय 'खेळ' केला?

बाजार विश्लेषक आसिफ इक्बाल म्हणतात की, 'इंडेक्स ऑप्शन्स' हा सगळा खेळ नशिबावर आधारित असतो, त्यामुळे इथे जिंकण्यासाठी नुसतं गणित नाही, तर थोडं नशीबही लागतं.

जरी तुम्ही खूप अभ्यास करून, वेगवेगळ्या पद्धती वापरून किंवा स्वतःला तज्ज्ञ म्हणवणाऱ्या लोकांच्या सल्ल्यानं या 'खेळात' उतरलात, तरीही तुम्ही इथे सातत्याने जिंकू शकत नाही.

पण जेन स्ट्रीटच्या बाबतीत गोष्ट थोडी वेगळी होती. सेबीच्या म्हणण्यानुसार, जेन स्ट्रीटनं कुठल्या चमत्काराची वाट पाहिली नाही, तर त्यांनी असं काही केलं की, ते पाहणाऱ्यांना खरंच एखादा चमत्कार झाल्यासारखं वाटावं.

आसिफ सांगतात, "ऑप्शन एक्सपायरीच्या दिवशी, जेन स्ट्रीटशी संबंधित व्यक्ती बाजार उघडताच मोठ्या प्रमाणात बँक निफ्टीतले शेअर्स खरेदी करत. याचा परिणाम असा व्हायचा की, बँक निफ्टीमध्ये अचानक उसळी यायची."

अमेरिकन कंपनीने शेअर बाजारातून उकळले हजारो कोटी

फोटो स्रोत, Getty Images

दुसरीकडे, जेन स्ट्रीट आणखी एका खास रणनीतीवरही काम करत होती. आसिफ सांगतात, "ते त्याच दिवशी कॉल ऑप्शन्स विकत असत आणि बाजाराला दाखवत की बँक निफ्टी घसरेल, अशी त्यांची अपेक्षा आहे. याचवेळी ते पुट ऑप्शन्स खरेदी करत असत, ज्याचा अर्थ असा की, त्यांना वाटायचं की बँक निफ्टी खाली जाणार आहे."

ट्रेडिंग सत्राच्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये जेन स्ट्रीट बँक निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रीचे (सेल) ऑर्डर देत. उद्देश एकच, बँक निफ्टी खाली आणणं. परिणाम असा व्हायचा की, जेन स्ट्रीटनं घेतलेले पुट ऑप्शन्स त्यांना 'जॅकपॉट'सारखा नफा देत असत.

आता प्रश्न असा पडतो की, जेन स्ट्रीट नेहमी व्यवहाराच्या शेवटच्या अर्ध्या तासातच असं का करत होते?

आसिफ सांगतात, "भारतामध्ये इंडेक्सची एक्सपायरी प्राइस हा शेवटचा व्यवहार झालेला दर नसतो, तर शेवटच्या अर्ध्या तासात इंडेक्समध्ये झालेल्या ट्रेडिंगची सरासरी किंमत असते. याचाच फायदा घेत जेन स्ट्रीट 2 रुपयांचे ऑप्शन्स घेऊन सातत्यानं 40 रुपये किंवा त्याहून अधिक नफा मिळवत होती."

यात चुकीचं किंवा बेकायदेशीर काय आहे?

सेबीचं म्हणणं आहे की, जेन स्ट्रीट फक्त हुशारीनं ट्रेडिंग करत नव्हती, तर मुद्दामहून शेअर्सच्या किमती वाढवण्याचा किंवा घसरवण्याचा प्रयत्न करत होती. म्हणजेच ते जाणूनबुजून इंडेक्सवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत होते.

सेबीचा दावा आहे की, जेन स्ट्रीटनं केलेले ट्रेड कुठल्याही कंपनीच्या बातम्या, सेक्टरमधील घडामोडी, फंडामेंटल्स किंवा खरी गुंतवणूक यांच्याशी संबंधित नव्हते. हे व्यवहार केवळ इंडेक्सवर कृत्रिमरीत्या प्रभाव टाकण्यासाठीच केले गेले होते आणि त्यातून नफा कमावण्यात आला.

याशिवाय, सेबीला असंही दिसून आलं की, जेन स्ट्रीट ही एक एफपीआय (परदेशी गुंतवणूकदार) कंपनी असल्याने, तिनं एफपीआयसाठी असलेल्या खास नियमाचंही उल्लंघन केलं आहे.

अमेरिकन कंपनीने शेअर बाजारातून उकळले हजारो कोटी

फोटो स्रोत, Getty Images

भारतीय कायद्यांनुसार, एफपीआयना 'कॅश मार्केट'मध्ये इन्ट्रा डे ट्रेडिंग (म्हणजेच एका दिवसातच शेअर खरेदी करून तोच शेअर विकणे) करण्यास परवानगी नाही. पण जेन स्ट्रीटनं या नियमाचंही उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

सेबीच्या म्हणण्यानुसार, जेन स्ट्रीटनं या नियमाला बगल देण्यासाठी भारतातील 'जेएसआय इन्व्हेस्टमेंट' या कंपनीच्या माध्यमातून हे व्यवहार केले.

सेबीचा अंदाज आहे की, जेन स्ट्रीटनं या संपूर्ण हेराफेरीतून एकूण सुमारे 36,500 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. मात्र सेबीने आपलं लक्ष मुख्यतः ऑप्शन्समधून मिळालेल्या कमाईवरच केंद्रित केलं आहे.

सध्या सेबीने 4,843 कोटी रुपयांची नफ्याची रक्कम गोठवली असून, जेन स्ट्रीटला ट्रेडिंग करण्यास बंदी घातली आहे.

फ्युचर अँड ऑप्शन्समधील तोटा

मे 2025 पर्यंत भारतात सुमारे 19.7 कोटी स्टॉक ट्रेडिंग खाते होती, जी 2020 च्या सुरुवातीच्या तुलनेत पाच पट अधिक आहेत. यापैकी अनेक गुंतवणूकदार आता तुलनेनं अधिक जोखमीच्या 'फ्युचर्स आणि ऑप्शन्स'सारख्या व्यवहारांमध्ये उतरत आहेत.

सेबीच्या ताज्या आकडेवारीनुसार, 'इक्विटी फ्युचर्स आणि ऑप्शन्स'मध्ये सक्रियपणे व्यवहार करणाऱ्या 90 टक्के रिटेल गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागला आहे.

या ट्रेडर्सपैकी 40 टक्क्यांहून अधिक वयाचे 30 वर्षांखाली होते आणि जवळपास तीन चर्तुथांश लोकांची वार्षिक कमाई 5 लाख रुपयांपेक्षा कमी होती.

नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, रिटेल गुंतवणूकदारांना मार्च 2025 पर्यंतच्या 12 महिन्यांत सुमारे 1.05 लाख कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. हा तोटा मागील वर्षाच्या तुलनेत 41 टक्क्यांनी जास्त आहे.

मार्च 2024 पर्यंतच्या वर्षातील आकडे सांगतात की, प्रोप्रायटरी ट्रेडर्स आणि परदेशी गुंतवणूकदारांनी या काळात अब्जावधी रुपयांचा नफा कमावला आहे.

आता यावरून राजकारणही सुरू झालं

या प्रकरणावर आता राजकारणही तापायला लागलं आहे. काँग्रेसनं या मुद्द्यावर अर्थ मंत्रालय, स्टॉक एक्स्चेंज आणि सेबीला जाब विचारला आहे.

जेन स्ट्रीटला भारतात पैसा आणण्याची परवानगी कोणी दिली? असा प्रश्न काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी सोशल मीडिया 'एक्स'वर विचारला आहे.

जर जेन स्ट्रीटनं बेकायदेशीर नफा कमावला होता, तर तो नफा अमेरिकेत परत नेण्याची परवानगी त्यांना कोणी दिली? जेन स्ट्रीट कोणाच्या देखरेखीखाली काम करत होती? आणि तिनं देशाबाहेर पाठवलेला बेकायदेशीर नफ्याचं काय होणार? असेही प्रश्न सुप्रिया श्रीनेत यांनी उपस्थित केले.

अमेरिकन कंपनीने शेअर बाजारातून उकळले हजारो कोटी

फोटो स्रोत, Getty Images

इतकंच नव्हे तर सुप्रिया श्रीनेत यांनी आणखी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांनी विचारलं, सेबीला जाग यायला चार वर्षं का लागली? कंपनीवर बंदी घालायला पाच महिने का लागले? त्यांनी लगेच कारवाई का केली नाही?

ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्ससारख्या एजन्सींना याचा सुगावा कसा लागला नाही?

देशाला शेअर मार्केटच्या टिप्स देणारे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना या सगळ्याची माहिती होती का?

जेव्हा जेन स्ट्रीट बेकायदेशीर नफा देशाबाहेर पाठवत होती, तेव्हा त्यावर तत्काळ कारवाई का झाली नाही?

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)