बद्धकोष्ठतेसाठी किवी परिणामकारक? पोट साफ होत नसेल तर ही माहिती वाचा

फोटो स्रोत, Getty Images
व्यायाम, भरपूर पाणी, आहारात फायबर्सचं चांगलं प्रमाण, योग्य झोप हे पोट साफ होण्यासाठी असलेलं सूत्र सर्वांनाच माहिती आहे. पण तरीही पोट साफ होत नाही ही अनेकांसाठी समस्याच असते.
पूर्वी बहुतांश ज्येष्ठ नागरिकांमध्ये असलेली ही समस्या आता तरुणवर्गात अत्यंत सहज दिसते.
आहारात फायबर म्हणजे तंतुमय पदार्थांचं कमी असणारं प्रमाण, बैठी जीवनशैली आणि हालचालीचा अभाव याचा पोटावर आणि पचनक्रीयेवर परिणाम होतो आणि बद्धकोष्ठतेला सामोरं जावं लागतं.
बद्धकोष्ठता हा आजार एकटाच येत नाही तर बरोबर मूळव्याध, फिशर, फिश्चुला मग आतड्याचे, गुदाशयाचे आजार असे सहकारी आजार घेऊन येतो. त्यामुळे बद्धकोष्ठता या मूळ आजारावर अनेक संशोधनं आणि त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न सुरू असतो.
आता किवी खाल्ल्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते आणि दिवसभरात आवश्यक असणारे फायबर्स या किवीच्या फळांतून मिळतात असं डॉक्टरांना दिलेल्या एका नव्या मार्गदर्शक सूचनावलीत म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
किवीची फळं आपल्याकडे आता नवीन नाहीत. वरुन थोडीशी केसाळ आणि चिकूच्या रंगाची ही फळं सर्वत्र मिळतात. आतून हिरव्या रंगाची ही फळं चवीला आंबट-गोड असतात. सी व्हीटॅमिन भरपूर असलेलं हे फळ सर्वच लहानमोठ्या शहरांत आणि गावांमध्ये मिळायला लागलं आहे.
या सूचनावलीत आणखी एक माहिती दिली आहे, ती म्हणजे पाण्याबद्दल. जर नेहमीच्या पाण्यापेक्षा पाण्यात जास्त खनिजं असतील तसेच मॅग्नेशियम ऑक्साईडची पूरक औषधं घेतली तर पोट साफ होण्यास मदत होते असं यात म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये संशोधन करणाऱ्या तज्ज्ञांनी ही सूचनावली तयार केली आहेत. फक्त फायबर्स खा या एका गोष्टीपेक्षा पोट साफ होण्यासाठी अनेक गोष्टी आहेत असं हे तज्ज्ञ म्हणतात.
बद्धकोष्ठता हा फक्त एक आजार नसून त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या पूर्ण आयुष्यावर परिणाम होऊ शकतो.
फळांची साल काढायची की ती सालीसकट खायची?
एनएचएस या युकेच्या आरोग्यसंस्थेच्या म्हणण्यानुसार गेल्या आठवड्यात तुम्हाला किमान तीनवेळा तरी शौचाला झालं नसेल तर तुम्हाला बद्धकोष्ठता आहे.
शौचाला गेल्यावर फार जोर करावा लागणं किंवा नंतर अजूनही पोट साफ झालेलं नाही असं वाटणं हे सुद्धा बद्धकोष्ठतेचं लक्षण असू शकतं. अर्थात बद्धकोष्ठतेची काही एवढीच लक्षणं नाहीत.
किंग्ज कॉलेजचे पोषणशास्त्राचे अध्यापक आणि या संशोधनाचे मुख्य संशोधक डॉ. आयरिनी दिमिदी सांगतात, बद्धकोष्ठतेची विविध 30 लक्षणं लोकांनी नोंदवेलली आहेत.
दिवसभरात दोन-तीन किवी खा किंवा 8-10 मनुका (प्रून्स) खा असं ते सांगतात.
एनएचएस या आरोग्यसेवेच्या माहितीनुसार त्यांनी काही लक्षणं प्रसिद्ध केली आहेत.
जर पुढील लक्षणं तुमच्यामध्ये दिसत असतील तर आपल्याला बद्धकोष्ठ आहे का याचा विचार करा असं एनएचएस सांगतं -
- जर तुम्ही आठवड्याभरात 3 वेळा तरी शौचालयाला गेला नसाल
- तुमची विष्ठा मोठी, कोरडी, घट्ट किंवा गाठीसारखी असेल तक
- शौचालयात तुम्हाला फार जोर लावावा लागत असेल किंवा तेव्हा वेदना होत असतील तर
- पोटात दुखून ते फुगत असेल किंवा आजारी वाटत असेल तरीही बद्धकोष्ठ असण्याची स्थिती असते.
किवी सालीसकट खायचं का?
"साल न काढता खाल्लं तरी चालतं, कारण त्यातही फायबर असतं," असं डॉ. दिमिदी सांगतात. किवीमधील फायबर पचनसंस्थेवर परिणाम करून विष्ठेचा आकार वाढवतं आणि आतड्यांमध्ये संकोच निर्माण करतो.
किवीमुळे पचनसंस्थेत पाण्याचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे विष्ठा मऊ होते. 8-10 प्रून्स आणि थोडा राय ब्रेड खाल्ला तरी असाच परिणाम होतो.
खनिजयुक्त पाणी आणि मॅग्नेशियमचे फायदे
डॉ. दिमिदी सांगतात की, खनिजयुक्त पाणी हे नळाच्या पाण्यापेक्षा अधिक फायदेशीर आहे. युकेमधील बाटलीबंद पाण्यात खनिजांचं प्रमाण कमी असतं, तर पूर्व युरोपमध्ये ते अधिक असतं.
मॅग्नेशियम हा एक महत्त्वाचा खनिज घटक आहे, ज्याचा सौम्य रेचक (laxative) परिणाम होतो.
मॅग्नेशियम ऑक्साइड सप्लिमेंट्समुळे पोटदुखी, फुगणे, जोर लावावा लागणे यासारख्या लक्षणांमध्ये सुधारणा होते आणि शौचास जाणं सुलभ होतं.
प्रोबायोटिक्सबाबत मार्गदर्शनात म्हटलं आहे की, काही प्रकार लक्षणांमध्ये सुधारणा करू शकतात, पण अनेक प्रोबायोटिक प्रकारांवर अजूनही पुरेसं संशोधन झालेलं नाही.
नवीन मार्गदर्शन अधिक आधुनिक आणि परिणामकारक
आतापर्यंत डॉक्टरांसाठी उपलब्ध असलेलं मार्गदर्शन जुनं आणि मर्यादित होतं, ज्यात केवळ फायबर आणि पाणी वाढवण्याचा सल्ला दिला जात असे. आताचे नवीन मार्गदर्शन 75 क्लिनिकल ट्रायल्सच्या पुराव्यावर आधारित आहे, तसेच त्याचं विश्लेषण तज्ज्ञांच्या पॅनेलने केलं आहे.
प्रोफेसर केविन व्हेलन, ज्येष्ठ संशोधक आणि डाएटेटिक्सचे प्राध्यापक, म्हणतात की हे मार्गदर्शन डॉक्टर आणि रुग्णांना आहाराच्या माध्यमातून बद्धकोष्ठता व्यवस्थापनासाठी सक्षम बनवेल.
ब्रिटिश डायेटेटिक असोसिएशनने या प्रकल्पाला निधी दिला असून, हे मार्गदर्शन पोषणतज्ज्ञ, डॉक्टर आणि परिचारिका यांच्यासाठी एक उत्कृष्ट साधन ठरतं, असं त्यांनी म्हटलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











