जेव्हा एका महिलेला 48 वर्षांनंतर मिळाले नोकरीसाठी केलेल्या अर्जावर उत्तर

    • Author, जेक झुकरमन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

आपल्याला स्वप्नातील नोकरीसाठी अर्ज केलेल्या एका महिलेनं, तिला तिच्या नोकरीच्या अर्जाला कधीच उत्तर का मिळालं नाही? याचं उत्तर शोधण्याचा अनेकदा प्रयत्न केला.

पण, तिला त्याचं उत्तर मिळालं तब्बल 48 वर्षानंतर.

लिंकनशायरमधील गेडनी हिल इथल्या टिझी हॉडसन या 70 वर्षीय महिलेनं 1976 मध्ये स्टंट रायडर म्हणून नोकरीसाठी अर्ज केला होता.

पण अर्ज केल्यानंतर एवढ्या वर्षानंतर पत्रपेटी उघडली तेव्हा त्यांना धक्का बसला.

त्यांनी 1976 मध्ये मोटारसायकल स्टंट रायडरच्या नोकरीसाठी केलेला अर्ज त्यांना दिसला. ते पत्र इतकी वर्ष पोस्ट ऑफिसच्या ड्रॉवरच्या मागे अडकले होते.

हे पत्र जरी अडकलं असलं तरी त्यांची कारकिर्द मात्र थांबली नाही. त्यांना चांगल्या क्षेत्रामध्ये करिअर घडवता आलं.

या पत्राचं वर्णन करताना त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. मला नेहमी वाटायचे की, मला नोकरीच्या अर्जाचं उत्तर का मिळालं नाही? पण आता मला माझं उत्तर मिळालं आहे, असं हॉडसन म्हणाल्या.

पत्राच्या वरच्या भागात हाताने एक संदेश लिहिलेला होता.

'स्टेन्स पोस्ट ऑफिसद्वारे उशिरा वितरण झालं. फक्त फक्त 50 वर्ष उशिरा. पत्र ड्रॉवरच्या मागे सापडले,' असं लिहिलेलं होतं.

हे पत्र त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचवलं हे देखील हॉडसन यांना माहिती नाही. “मी 50 वेळा घर बदललं आणि चार ते पाच वेळा दुसऱ्या देशात सुद्धा राहायला गेले. तरीही मला कसं शोधलं असेल हे आश्चर्यजनक आहे,” असंही त्या म्हणाल्या.

हे पत्र परत मिळालं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. मला आताही आठवतं की, लंडनमधल्या फ्लॅटमध्ये बसून मी हे पत्र लिहिलं होतं. दररोज मी माझ्या पत्राचं उत्तर डाकपेटीत शोधायचे. पण, काहीच दिसत नसल्यानं मी निराश होत होते. कारण मला खरोखरच मोटारसायकल स्टंट रायडर व्हायचं होतं, असंही त्यांनी सांगितलं.

या अर्जाचं उत्तर मिळत नाही म्हणून आलेल्या नैराश्यामुळं इतर नोकऱ्यांसाठी प्रयत्न करण्यापासून मात्र त्या दूर गेल्या नाहीत.

त्या आफ्रिकेत गेल्या होत्या. तिथं सर्पमित्र (साप हाताळणारे) आणि घोड्याला प्रशिक्षण देण्याचं काम करत होत्या. तसेच एरोबॅटीक पायलट आणि फ्लाइंग इन्स्ट्रक्टर या क्षेत्रात त्यांना करिअर करता आलं.

त्या पत्राची आठवण सांगत हॉडसन म्हणाल्या, “स्टंट रायडरसाठी अर्ज करताना जाहिरातदारांना मी स्त्री आहे हे कळू नये यासाठी खूप काळजी घेतली होती.

मला मुलाखतीपर्यंत पोहोचण्यासुद्धा संधी मिळणार नाही, असं मला वाटतं होतं. माझी कितीही हाडं मोडली तरी हरकत नाही असंही मी त्यांना सांगितलं होतं.”

पण, इतक्या वर्षानंतर पत्र परत मिळणं हे सर्व अविश्सनीय वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं. मला माझ्या तरुणपणासोबत संवाद साधता आला तर मी सांगेन की जा तुला जे करायचं ते कर. कारण मी आयुष्यात खूप छान अनुभव घेतले आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)