थेट लढतींमध्ये भाजपची काँग्रेसवर मात, अजित पवारांची तुतारीवर तर शिंदेंची मशालवर सरशी

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जास्मिन निहालानी
- Role, बीबीसी डेटा व्हिज्युलायजेशन टीम
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतरच्या पहिल्याच विधानसभा लढतीत प्रभाव पाडण्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे अपयशी ठरले.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत 75 जागांवर भारतीय जनता पार्टीचा काँग्रेसशी थेट सामना होता. या जागांवर भाजपानं दणदणीत विजय मिळवला आहे.
थेट लढतीच्या 75 पैकी 64 जागांवर भाजपानं विजय मिळवला आहे तर काँग्रेसला फक्त 11 जागांवर विजय नोंदवता आला आहे. यातील 35 जागा विदर्भातील तर 12 जागा कोकण विभागातील होत्या.
या निवडणुकीतील काँग्रेसची कामगिरी इतकी घसरलेली होती की खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना साकोली मतदारसंघात निसटता विजय मिळाला आहे.
भाजपाच्या अविनाश ब्राह्मणकर यांच्याबरोबरच्या लढतीत नाना पटोलेंचा फक्त 0.08 टक्के मत फरकानं किंवा 208 मतांनी विजय झाला आहे.
तक्त्यातील प्रत्येक चौरस एक जागा दर्शवितो. चौरसातील रंग विजेता पक्ष दाखवतो आणि चौरसाचा आकार विजेत्या पक्षाच्या मतांचा फरक टक्केवारीमध्ये दर्शवितो. जितका आकार मोठा तितका मतातील फरक जास्त.

असाच दुसरा अटीतटीचा सामना अकोला पश्चिम मतदारसंघात पाहायला मिळाला. तिथे काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण यांना फक्त 0.62 टक्के मतांच्या फरकानं विजय मिळाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची 53 जागांवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी थेट लढत होती. तिथे देखील शिंदेंच्या शिवेसेनेला जवळपास 70 टक्के म्हणजेच 37 जागांवर विजय मिळाला आहे.
तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 14 जागांवर विजय मिळवता आला आहे. या दोन्ही पक्षांमधील बहुतांश लढती कोकण विभागात (27) होत्या. तर 11 लढती मराठवाडा विभागात होत्या.

बुलढाणा आणि सिल्लोड या मतदारसंघात देखील अटीतटीचा सामना होता. तिथे अनुक्रमे संजय गायकवाड आणि अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा 1 टक्क्यांहून कमी मतांनी पराभव केला.
एकनाथ शिंदे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून उभे होते. त्यांनी आपल्या विरोधी उमेदवाराचा जवळपास 60 टक्के मतांच्या फरकानं पराभव केला. शिंदे यांना एकूण मतांपैकी 78 टक्के मतं मिळाली तर केदार प्रकाश दिघे यांना जवळपास 18 टक्के मतं पडली.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा 41 जागांवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी थेट सामना होता.
अजित पवारांच्या पक्षानं यातील 29 म्हणजे 70 टक्के जागा जिंकल्या आहेत. त्या तुलनेत थेट लढतींमध्ये शरद पवारांच्या पक्षाला फक्त 7 जागांवर विजय मिळाला आहे. यातील बहुतांश जागा पश्चिम महाराष्ट्रातील (16) होत्या. तर खान्देश आणि मराठवाड्यात प्रत्येकी 7 जागा होत्या.

फोटो स्रोत, Getty Images


या दोन्ही पक्षांमधील अटीतटीची लढत असलेल्या जागांमध्ये पारनेरची जागा होती.
तिथे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काशिनाथ महादू दाते यांचा 0.62 टक्के किंवा 1,526 मतांच्या फरकानं विजय झाला.
तर कोपरगावमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सर्वाधिक म्हणजे जवळपास 60 टक्के मतांच्या फरकानं विजय मिळवला.

पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघात स्वत: अजित पवार यांची युगेंद्र पवार यांच्याशी लढत होती.
बारामतीत अजित पवारांनी युगेंद्र पवारांचा 1 लाखांहून अधिक मतांनी किंवा जवळपास 37 टक्के मतांच्या फरकानं पराभव केला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











