टर्कीमध्ये भीषण स्फोटात पाच जणांचा मृत्यू, 22 जखमी - स्थानिक महापौरांची माहिती

टर्की

टर्कीतील अंकारा शहरात विमान वाहतूक कंपनीजवळ मोठा स्फोट झाला. सरकारी मालकीच्या विमान वाहतूक कंपनीच्या मुख्यालयावर झालेल्या या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू तर 22 जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक महापौरांनी दिली.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कहरामनकाझान प्रांताचे महापौर सेलिम सिरपानोग्लू यांनी टेली 1 या टर्कीश टीव्ही चॅनेलला ही माहिती दिली आहे.

अंकारा शहरापासून 40 किमी अंतरावर असलेल्या 'टर्किश एरोस्पेस एंडस्ट्री' जवळ मोठा स्फोट आणि गोळीबार झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली.

गृहमंत्री अली येरलीकाया यांनी हा स्फोट 'दहशतवादी हल्ला' असल्याचे म्हटले आहे. दुर्दैवाने अनेक जण यात 'शहीद' झाले आणि अनेक जण जखमी झाले असे अली यांनी म्हटले आहे.

पुढे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांपैकी एक स्त्री आणि एक पुरुष अशा दोघांनाही निशस्त्र करण्यात आलं आहे. हा हल्ल्यामागे कदाचित 'पीकेके' या कुर्दिश बंडखोरांचा गट असू शकतो, असेही ते म्हणाले.

अद्याप कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

एनटीव्ही टीव्ही चॅनलवर या घटनेचे कापी फोटो प्रदर्शित करण्यात आले असून त्यात टर्किश एरोस्पेस इंडस्ट्रीजपुढे प्रचंड प्रमाणात धुराचे मोठे लोट उठल्याचे दिसून येत आहेत.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराचा आवाजही ऐकू आला आहे.

टर्कीमध्ये भीषण स्फोट

फोटो स्रोत, Getty Images

अंकाराचे महापौर मन्सूर यावस म्हणाले, “या बातमीने खूप दु:खी झालोय. या घटनेतील शहीदांना शांती मिळावी आणि जखमींना लवकरात लवकर बरं करावं, अशी ईश्वचरणी प्रार्थना करतो.” आम्ही दहशतवादाचा निषेध करतो असंही त्यांनी नमूद केलं.

'हे हल्ले नवे नाहीत'

बीबीसीचे डिफेन्स कॉरोस्पॉडन्ट फ्रँक गार्डनर यांनी म्हटलं आहे की, टर्कीमध्ये अशाप्रकारचा दहशतवादी हल्ला होणं ही काही नवी गोष्ट नाहीये.

आधीपासूनच अशा प्रकारच्या हल्ल्यांसाठी कुर्दिश बंडखोरांना जबाबदार ठरवलं गेलं आहे. कुर्दिश बंडखोरांचा उत्तर सीरिया भागामध्ये तळ आहे. या भागामध्ये टर्कीची वायूसेना सातत्याने एअर स्ट्राईक करत असते.

मात्र, टर्कीमध्ये इस्लामिक स्टेटची (आयएस) देखील उपस्थिती आहे.

टर्कीमध्ये भीषण स्फोट

फोटो स्रोत, AP

ज्या टर्कीस एअरोस्पेस कंपनीवर हा हल्ला झाला आहे, त्यांनी तयार केलेल्या ड्रोनच्या माध्यमातूनच आर्मेनिया आणि अजरबैजान यांच्या दरम्यानच्या युद्धाचं समीकरण पूर्णत: बदलूवन गेलं आहे.

रशियाने जेव्हा युक्रेनवर हल्ला केला होता तेव्हा सुरुवातीच्या दिवसांमध्ये टर्कीमध्ये तयार झालेल्या ड्रोन्सच्या माध्यमातूनच रशियन रणगाड्यांना लक्ष्य केलं जायचं. त्यानंतर युक्रेनने स्वत:हूनच ड्रोन्सची निर्मिती करण्यास सुरुवात केली.

सध्या या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. या हल्ल्यामुळे कुणाचा फायदा होईल आणि हा हल्ला का करण्यात आला, याबाबतची माहिती अधिक तपासाअंतीच स्पष्ट होईल.

टर्की एरोस्पेस इंडस्ट्रीज काय करते?

टर्की एरोस्पेस इंडस्ट्रीज ही राजधानी अंकाराजवळ स्थित सरकारी मालकीची शस्त्रे आणि एरोस्पेस तंत्रज्ञान कंपनी आहे.

ही कंपनी लष्करी आणि नागरी विमाने आणि हेलिकॉप्टर, तसेच टर्कीच्या सशस्त्र दलांसाठी आणि जगभरातील देशांसाठी ड्रोन प्रणाली तयार करते.

लष्करी वापरासाठी एरोस्पेस तंत्रज्ञानाच्या परदेशी आयातीवर टर्कीचं अवलंबित्व कमी करण्यासाठी TAI लाँच करण्यात आली होती.

यूएसद्वारे डिझाइन केलेल्या F-16 लढाऊ विमानांसाठी परवानाधारक उत्पादक म्हणून नाटो सदस्याने नियुक्त केलेली ही कंपनी आहे. टर्की सैन्याच्या वापरासाठी जुन्या विमानांचे आधुनिकीकरण करण्यातही TAI ची भूमिका आहे.

लाल रेष
लाल रेष

नाटोने केला घटनेचा निषेध

नाटोने ( North Atlantic Treaty Organization) या हल्ल्याचा निषेध केला आहे.

नाटोचे सरचिटणीस मार्क रूट यांनी या हल्ल्याचा निषेध करताना म्हटले आहे की ही 'गंभीर बाब' आहे.

टर्कीमध्ये भीषण स्फोट

फोटो स्रोत, Getty Images

नाटोचा सदस्य असलेल्या टर्कीसोबत आम्ही आहोत. या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. या घटनेवर आम्ही लक्ष ठेवून आहोत असं मार्क रूट यांनी म्हटलं आहे.

या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश टर्की सरकारने दिले आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)