You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुण्यातली 'वावटळ' डासांची की किड्यांची? याचे कारण काय?
पुणे शहरातल्या एका व्हीडिओने गेले दोन दिवस सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हीडिओ आहे एकत्रितपणे उडणाऱ्या किटकांचा.
खराडीत इतक्या मोठा प्रकरणात डास झाले आहेत आणि ते उडत आहेत असं सांगत हा व्हीडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड शेअर झाला. पण प्रत्यक्षात हे डास नसल्याचं आता तज्ज्ञ सांगत आहेत. पण मग हे डास नसतील तर नक्की काय आहे आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणावर का दिसत आहेत?
पुण्यातला खराडी परिसर गेल्या काही वर्षात नव्याने विकसित झाला आहे. मोठ्या इमारती, आयटी पार्क असं सगळं असणाऱ्या या परिसरात साहजिकच नव्याने बांधकामं झाली.
यातली अनेक घरं ही अगदी नदीपात्राच्या काठावर आहेत. दरवर्षी वाढणारी जलपर्णी आणि त्यामुळे होणारा डासांचा त्रास हा या रहिवाशांसाठी नवा नाही.
पण यंदा मात्र डासांचं प्रमाण प्रचंड वाढलं असल्याचं रहिवासी सांगत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर या व्हीडिओचीही चर्चा होते आहे.
व्हीडिओ मध्ये नेमके काय?
खराडीच्या नदीपात्रात मोठ्या संख्येने डास सदृश्य कीटक आकाशात उडत जातानाचा हा व्हीडिओ आहे. यामद्ये नदीपात्रातून मोठ्या संख्येने काळ्या ढगासारखं काही उडत जात असल्याचे दिसत आहे.
वेगाने प्रवास करणारी ही झुंड संध्याकाळच्या आकाशात वावटळीसारखी उडताना आणि वाऱ्याने हलत असल्यासारखी दिसत आहे.
झूम केल्यावर त्यामध्ये किडे सदृश्य काही असल्याचं दिसतंय.
आकाशात बऱ्याच उंचावर हे कीटक उडत गेल्याचंही दृश्यात दिसत आहे. आणि त्यांचे एक नव्हे तर तीन ते चार जथ्थे एकाच वेळी एकाच भागात उडताना दिसत आहेत. उंच इमारतींच्याही बऱ्याच वर हे किडे उडत गेल्याचं दिसत आहे.
नागरिक काय म्हणतात?
खराडी परिसरातला हा व्हीडिओ समाजमाध्यमांवर फिरत आहे. यामुळे नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण दिसत आहे.
या परिसरात डासांचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढला आहेच. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी मुलांना खेळायला बाहेर सोडायला देखील भिती वाटत असल्याचं नागरिक सांगत आहेत. मात्र दृश्यात दिसत आहेत इतके डास मात्र दिसले नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना स्थानिक रहिवासी नितीन मेमाणे म्हणाले, “नदीपात्रापासून 500 ते 600 मीटर अंतरावर माझे घर आहे. इतके डास असते तर त्याचा प्रभाव मला मात्र जाणवला असता. या दृश्यांमध्ये दिसतो आहे तसा थवा तर दिसला नाहीच. शिवाय संध्याकाळच्या वेळी मी फिरायला बाहेर जातो तेव्हा डासांचा जेवढा त्रास होतो तो सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये जाणवला नाहीये.”
पण स्थानिक रहिवासी मेहजबीन सय्यद यांचे म्हणणे मात्र वेगळे आहे. नदी जवळ घर असणाऱ्या सय्यद यांना गेले काही दिवस डासांचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे जाणवत आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना सय्यद म्हणाल्या "डासांचा आणि जलपर्णीचा त्रास नेहमी होतो. मात्र यंदा त्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. नदीतील साचलेल्या पाण्यामुळे हे वाढत असल्याचं मला वाटतं, नदीसुधार योजनेच्या कामामुळे पाणी वाहत नाहीये. त्यामुळे जलपर्णी वाढली आहे.
"परिणामी डासांचे प्रमाण प्रचंड दिसत आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा दिसणारी डासांची संख्या खूपच जास्त आहे. आम्ही स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे याची तक्रार केली आहे. पुणे महापालिकेच्या ट्विटर हॅण्डलला टॅग करुन देखील सातत्याने हा प्रश्न नागरिक मांडत आहेत," सय्यद सांगतात.
तज्ज्ञांचे म्हणणे काय?
डासांचे प्रमाण वाढले असले तरी या व्हीडिओ मध्ये दिसणारे कीटक हे डास नसल्याचंं मत तज्ज्ञ मांडत आहेत.
बीबीसी मराठीशी बोलताना पुणे येथील मॉडर्न महाविद्यालयातील प्राणीशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक डॉ. हेमंत घाटे म्हणाले, “हे डासांसारखेच कायरोनोमिडी लार्व्हा आहेत. हे नदीपात्रात नेहमी दिसतात. त्यांची संख्या वाढल्याने आणि तापमान वाढल्याने ते इतक्या प्रमाणात बाहेर पडलेले दिसत आहेत. त्यांची संख्या मोठी असल्याने लोकांना ते विचित्र वाटलं असावं. ते डासांसारखेच दिसतात. डासांचे चुलत भाऊ म्हणता येईल अशी त्यांची जातकुळी आहे. त्यांच्यापासून कोणतेही रोग पसरत नाहीत.”
डॉ. घाटे पुढे म्हणाले, "ज्या भागात हे डास दिसतात त्या भागातले पाणी प्रचंड प्रदूषित आहे असा त्याचा अर्थ होतो. शुद्ध पाण्यात सांडपाणी मिसळले गेल्याने प्रदूषण वाढते. त्यातून जलपर्णी वाढते आणि अशा पाण्यात या लार्व्हा जगतात. त्यांचे लाइफसायकल कमी आहे. अगदी एक ते दोन दिवसांचेच त्यांचे आयुष्य असते. हे डास नाहीत कारण प्रदूषित पाण्यात डास अंडी घालत नाहीत.”
दरम्यान, आता पुणे महापालिकेने देखील या व्हिडीओची दखल घेत उपाय योजनांना सुरुवात केली आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी सुर्यकांत देवकर म्हणाले, "जे कीटक उडताना दिसत आहेत ते डास नाहीत. चिलटे सदृश्य कीटक असल्याचं आमच्या प्राथमिक पाहणीत निष्पन्न झालं आहे. आम्ही तिथे फवारणी केली आहे.
"त्या परिसरात डास असले तरी ते डेंग्यूचे नाहीत. तसेच उडताना दिसतायेत ते डास नसल्याचे पर्यावरण विभागाच्या पाहणीतही स्पष्ट झाले आहे. डास इतके उंच उडू शकत नाहीत. आम्ही दक्षता घेत आहोत. फवारणी सुरू आहे. यासाठी ड्रोन द्वारे फवारणी करण्याचेही नियोजन आहे. त्या भागात जलपर्णी वाढली आहे," देवकर म्हणाले.