'समलिंगी जोडप्यानं एकत्र राहणं वेगळी गोष्ट, पण त्यांचा विवाह भारतीय संस्कृतीच्या विरोधात'

फोटो स्रोत, Getty Images
आज वेगवेगळे वृत्तपत्र आणि वेबसाईटला छापून आलेल्या 5 महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
समलिंगी विवाहांना भाजप खासदाराचा विरोध
भाजप खासदार सुशील मोदींनी समलिंगी विवाहांना विरोध केला आहे. 2 न्यायाधीश कोर्टात बसून याबाबत ठरवू शकत नाहीत, संसदेत त्यावर चर्चा व्हायला पाहिजे, असं सुशील मोदी यांनी राज्यसभेत म्हटलं आहे.
कलम 377 हटवणं योग्य आहे, पण समलिंगी विवाह भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे. आम्हाला भारताचा अमेरिका करायचा नाही, असं याबाबत एनडीटीव्हीशी बोलताना मोदी म्हणाले आहेत.
भारत सरकार याला कोर्टात विरोध करेल, असंसुद्धा मोदी म्हणाले आहेत.
गे किंवा लेस्बियन जोडप्यांनी एकत्र राहणं ही वेगळी गोष्ट आहे, पण त्यांना कायदेशीर ठरवणं अयोग्य आहे, असं मोदी पुढे म्हणाले आहेत.
याविरोधात एक खासगी विधेयक संसदेत माडण्याचा निर्धारसुद्धा त्यांनी केला आहे.
तुमच्या घरातला कुत्रा तरी देशासाठी मेलाय? - मल्लिकार्जुन खरगे
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राजस्थानच्या अलवरमध्ये झालेल्या सभेत मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.
“आमच्या लोकांनी देशासाठी बलिदान दिलं, पण भाजपने कोणतं बलिदान दिलं,” असा सवाल केला आहे.
खरगे पुढे म्हणाले, “आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि देशाच्या एकात्मतेसाठी इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी बलिदान दिलं. आम्ही देशासाठी जीव दिला, तुम्ही काय केलं? तुमच्या घरातील कुत्रा तरी देशासाठी मेला आहे का? तुम्ही काही त्याग केला आहे का? नाही. यानंतरही ते देशभक्त आहेत आणि आपण काही बोललो तर देशद्रोही आहोत.”
सकाळनं हे वृत्त दिलं आहे.
भारतात कोव्हिड रुग्णांची निचांकी संख्या
सध्या जगभरात नोव्हेंबर पासून पुन्हा एकदा कोव्हिडच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
चीनमध्ये तर येत्या काही दिवसांमध्ये कोव्हिडच्या 3 लाटा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पण त्याचवेळी भारतात मात्र चित्र वेगळं आहे.
रविवारी संपलेल्या आठवड्यात भारतात कोव्हिड रुग्णांची सर्वांत कमी संख्या नोंदवली गेली आहे.
टाईम्स ऑफ इंडियानं याबाबतचा रिपोर्ट दिला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
रविवारी संपलेल्या आठवड्यात 1103 रुग्णांची संख्या नोंद झाली आहे तर 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
23 मार्च ते 29 मार्च 2020 पासून आतापर्यंतचा हा सर्वांत कमी आकडा आहे. याच दरम्यान भारतात पहिल्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती.
सुप्रीम कोर्टात विक्रमी खटले निकाली
भारताचे नवे सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी पदभार स्वीकारल्यापासून सुप्रीम कोर्टानं तब्बल 6,844 खटल्यांचा निपटारा केल्याचं वृत्त द हिंदूनं दिलं आहे.
चंद्रचूड यांनी 9 नोव्हेंबर रोजी त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. पण या दरम्यान कोर्टात 5,895 नव्या केस दाखल झाल्याचं द हिंदूने म्हटलंय.
दाखल झालेल्या खटल्यांपेक्षा निकाली काढण्यात आलेल्या खटल्यांची संख्या जास्त होण्याचं सुप्रीम कोर्टात क्वचितच घडतं. दरम्यान चंद्रचूड यांचे पूर्वसूरी उदय लळीत यांच्या 74 दिवसांच्या कारकिर्दीत 10,000 खटल्यांचा निपटारा केला होता.
पत्र्याच्या घरात छापल्या 10 कोटींच्या नोटा
मध्य प्रदेशात पत्र्याच्या घरात माय-लेकानं 10 कोटीच्या नकली नोटा छापल्याची घटना उघडकीला आली आहे.
ही घटना पाहून पोलिसही चक्रावले आहे. पोलिसांनी आणि नॅशनल काउंटरफिट करन्सी एजन्सीने खोट्या नोटा चलनात आल्यावर चौकशी केली असता ही घटना उघड झाली.
झी-24 तासने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
माय-लेक या नकली नोटा छापून त्या अंडरवर्ल्ड गँगच्या लोकांना विकायचे. अंडरवर्ल्ड गँग हे पैसै गुन्ह्यासाठी वापरायची, अशी माहिती समोर आलीय.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








