You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रभसिमरन सिंगचं तडाखेबंद शतक; पंजाबचं बल्ले बल्ले
धावांच्या राशी आणि शतकांचे रतीब यामध्ये प्रभसिमरन सिंग या भारतीय खेळाडूने दमदार भर घातली. पंजाब किंग्जतर्फे खेळणाऱ्या प्रभसिमरन सिंगने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना खणखणीत शतकाची नोंद केली. प्रभसिमरनचं आयपीएल स्पर्धेतलं हे पहिलंच शतक आहे. प्रभसिमरनच्या शतकाच्या बळावर पंजाबने दिल्लीवर 31 धावांनी विजय मिळवत प्लेऑफच्या शर्यतीत मुसंडी मारली. पराभवासह प्लेऑफ अर्थात बाद फेरीत प्रवेशाचं दिल्लीचं स्वप्न संपुष्टात आलं आहे.
पंजाब किंग्ज आणि पूर्वीच्या किंग्ज इलेव्हन पंजाबतर्फे शतक झळकावणारा प्रभसिमरन बारावा फलंदाज ठरला आहे. याआधी शॉन मार्श, माहेला जयवर्धने, पॉल वल्थाटी, अडम गिलख्रिस्ट, डेव्हिड मिलर, वीरेंद्र सेहवाग, वृद्धिमान साहा, हशीम अमला, ख्रिस गेल, के.एल.राहुल, मयांक अगरवाल यांनी शतकी खेळी केल्या आहेत.
आयपीएल स्पर्धेत शतक झळकावताना भारतासाठी न खेळलेल्या मोजक्या खेळाडूंमध्येही प्रभसिमनरचा समावेश झाला आहे. मनीष पांडे, पॉल वल्थाटी, देवदत्त पड्डीकल, रजत पाटीदार, यशस्वी जैस्वाल या यादीत आता प्रभसिमरने स्थान पटकावलं आहे.
प्रभसिमरनचं हे स्पर्धेतलं पाचवं वर्ष आहे. सगळी वर्ष प्रभसिमरन पंजाब किंग्ज संघाचाच भाग आहे.
प्रभसिमरनच्या शतकाच्या बळावर पंजाबने दिल्लीविरुद्ध 167 धावांची मजल मारली. प्रभसिमरनचा अपवाग वगळता पंजाबच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. प्रभसिमरनने 65 चेंडूत 10 चौकार आणि 6 षटकारांसह 103 धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. प्रभसिमरनला दुसऱ्या बाजूने साथ मिळू शकली नाही.
कर्णधार शिखर धवनने 7 धावा केल्या. स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध लायम लिव्हिंगस्टोन केवळ 4 धावा करु शकला. यंदाच्या हंगामात दमदार फॉर्मात असलेल्या जितेश शर्माला केवळ 5 धावा करता आल्या.
सॅम करनने 20 धावांचं योगदान दिलं. सिकंदर रझाने 7 चेंडूत 11 धावा केल्या. दिल्लीकडून इशांत शर्माने 2 तर अक्षर पटेल, प्रवीण दुबे, कुलदीप यादव, मुकेश कुमार यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
वॉर्नरची झुंज; बाकी दिल्लीकरांची शरणागती
कठीण खेळपट्टीवर लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि फिल सॉल्ट यांनी 69 धावांची खणखणीत सलामी दिली. हरप्रीत ब्रारने सॉल्टला बाद करत ही जोडी फोडली. यानंतर पत्याचा बंगला कोसळावा तशी दिल्लीची फलंदाजी कोसळली.
पॉवरप्लेच्या 6 षटकांमध्ये दिल्लीने 65 धावांची मजल मारली होती. पण 7-15 या मधल्या षटकात दिल्लीने 50 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स गमावल्या. पंजाबच्या फिरकी गोलंदाजांसमोर दिल्लीच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली.
डेव्हिड वॉर्नर खेळपट्टीवर असेपर्यंत दिल्लीला विजयाची आशा होती. हरप्रीतने वॉर्नरला बाद करत दिल्लीच्या विजयाच्या आशा संपुष्टात आणल्या. वॉर्नरने 27 चेंडूत 10 चौकार आणि एका षटकारासह 54 धावांची खेळी केली. दिल्लीने 136 धावांची मजल मारली. पंजाबकडून हरप्रीत ब्रारने 4 तर राहुल चहर आणि नॅथन एलिस यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)