You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेवर तिसऱ्यांदा हल्ला, 'या' प्रकाराशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय
कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे येथील कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा एकदा हल्ला झाला आहे. हा कॅफेवरील तिसरा हल्ला आहे.
सोशल मीडियावर याबाबत एक व्हीडिओ व्हायरल झाला असून, त्याच्याशी हे प्रकरण संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे.
सरे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्याच्या वेळी कॅफेमध्ये कर्मचारीही उपस्थित होते. पण कोणालाही इजा झाली नाही.
याबाबत कपिलच्या टीमकडून अद्याप काहीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.
जुलैनंतर कपिलच्या कॅफेवर गोळीबार होण्याची ही तिसरी वेळ आहे. पहिला हल्ला 10 जुलै रोजी झाला होता, तर दुसरा हल्ला 8 ऑगस्ट रोजी झाला होता.
याबाबत माहिती देताना पोलिसांनी निवेदनाद्वारे सांगितलं की, 16 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3.43 वाजता सरेमधील 120 स्ट्रीटच्या 8400 ब्लॉकमध्ये गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
तिथं पोहोचल्यावर पोलिसांना एका ठिकाणी गोळीबार झाल्याचं आढळलं. पण त्यात कोणीही जखमी झालं नाही. याचा तपास करत असल्याचंही पोलीस म्हणाले.
याबाबत कुणाकडे काही माहिती असेल तर ती पोलिसांना देण्याची विनंती पोलिसांनी दिली आहे.
खंडणीचे संकेत - सरे पोलीस
एका भारतीय सेलिब्रिटीच्या कॅफेला दोनदा लक्ष्य करण्यात आलं आहे. आता परत तिसऱ्यांदा गोळीबार झाला. अनेकदा अशा प्रकाराचा संबंध खंडणीशी असतो, असं सरे पोलीस म्हणाल्याचं वृत्त सीबीसी न्यूजने दिलं आहे.
घटनेचा खंडणीशी संबंध आहे की नाही याबाबत सरे पोलिसांनी काहीही म्हटलं नसलं तरी, तसं दिसत असल्याचं त्यांनी सांगितलंय.
पोलिसांचा स्थानिक विभाग खंडणी संदर्भातील पथक या प्रकरणाचा तपास करत असल्याचं सरे पोलीस प्रवक्ते इयान मॅकडोनाल्ड यांनी सीबीसी न्यूजशी बोलताना सांगितलं.
शहरात यावर्षी आतापर्यंत खंडणीच्या 65 तर गोळीबाराच्या 35 घटनांची नोंद झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
पहिल्या हल्ल्याच्या वेळीही कॅफेमध्ये कर्मचारीही उपस्थित होते. पण तेव्हाही, कुणी जखमी झालं नव्हंत.
'एएनआय'च्या वृत्तानुसार, कॅफेच्या एका खिडकीवर किमान 10 गोळ्यांचे निशाण दिसून आले, तर दुसऱ्या खिडकीची काच पूर्णपणे फुटल्याची दिसते.
'धक्का बसला आहे, पण आम्ही हार मानणार नाही'
पहिल्या हल्ल्यानंतर या प्रकरणावर कॅफेकडून सोशल मीडियावर एक लेखी निवेदन जारी करण्यात आलं आहे.
कॅप्स कॅफेच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेल्या स्टोरीमध्ये म्हटलं की, "आम्हाला या घटनेनं धक्का बसला आहे, पण आम्ही हार मानलेली नाही."
पोस्टमध्ये लिहिलं आहे, "आम्ही हा कॅफे या आशेनं सुरू केला होता की, छान कॉफी आणि मैत्रीपूर्ण गप्पांमधून प्रेम आणि एकोप्याची भावना वाढेल. या स्वप्नावर असा हिंसक हल्ला होणं खूप दुःखद आणि मनाला दुखावणारा आहे."
तसेच या पोस्टमध्ये कठीण काळात मदत आणि सुरक्षा दिल्याबद्दल सरे पोलीस आणि डेल्टा पोलिसांचे आभार मानण्यात आले आहेत.
नुकताच सुरू झाला होता कॅफे
कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथ यांनी पहिला हल्ला झाला त्याच्या अवघ्या आठवडाभरापूर्वीच हा कॅफे सुरू केला होता.
अलीकडेच कपिल शर्माने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्यांच्या नव्याने उघडलेल्या कॅफेमध्ये मोठी गर्दी दिसत होती.
सरे येथील रहिवाशांनी गोळीबाराच्या घटनेबाबत चिंता व्यक्त केली होती. 'सीबीसी न्यूज'शी बोलताना रहिवासी मनिंदरदीप कौर यांनी या घटनेमुळे त्या चिंतेत असल्याचं सांगितलं होतं.
त्यांनी सांगितलं, "हा एक खूपच भयावह अनुभव होता. अशा वातावरणात राहणं कुणालाही आवडणार नाही. सरेसारख्या शहरात अशी घटना घडणं खरंच निराशाजनक आहे."
एखाद्या व्यवसायाला लक्ष्य बनवलं जाणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे, असं शेरिन व्हिट्टी यांनी म्हटलं.
आम आदमी पार्टीचे नेते आणि मंत्री लालजीत सिंग भुल्लर यांनी या हल्ल्याचा निषेध केला होता.
"अशा घटना कुठेही घडू नये," असं पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी म्हटलं.
ते म्हणाले, "कपिल शर्मा आमचा स्टार आहे. जग त्याला ओळखतं, लोक त्याच्यावर प्रेम करतात. ही एक अतिशय दुर्दैवी घटना आहे."
"अशा घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत, यासाठी कॅनडा सरकारनं लक्ष द्यायला हवं आणि अशा व्यक्तींना योग्य सुरक्षा मिळाली पाहिजे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.