इशांत शर्मा परतला आणि दिल्लीचं गुणांचं खातं उघडलं

फोटो स्रोत, Getty Images
पावसामुळे दिल्ली-कोलकाता मुकाबला गुरुवारी रात्री उशिरा सुरू झाला आणि सोप्या गोष्टी अवघड करण्याच्या दिल्लीच्या सवयीमुळे सामना संपायला शुक्रवार उजाडला. अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या साक्षीने दिल्ली कॅपिटल्स संघाने यंदाच्या हंगामात गुणांचं खातं उघडलं.
विजयासाठी 128 धावांचं छोटेखानी लक्ष्य मिळालेल्या दिल्लीला एकाक्षणी 30 चेंडूत 24 धावांची आवश्यकता होती. समीकरण सोपं असतं. कठीण खेळपट्टी आणि सतत पडणाऱ्या विेकेट्स यामुळे दिल्लीला शेवटच्या षटकात 6 चेंडूत 7 धावा हव्या होत्या. अनुभवी अक्षर पटेलने कोलकाताला चमत्कार करू दिला नाही आणि दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अक्षरने 22 चेंडूत 19 धावांची खेळी केली.

फोटो स्रोत, Getty Images
पाच सामन्यात पाच पराभव यामुळे दिल्ली कॅपिटल्सची अवस्था केविलवाणी झाली होती. गुरुवारी फिरोझशहा कोटला अर्थात अरुण जेटली इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या लढतीत दिल्लीने अनुभवी दिल्लीकर इशांत शर्माला अंतिम अकरात खेळवण्याचा निर्णय घेतला. 34वर्षीय इशानने आयपीएल स्पर्धेत दोन वर्षानंतर पुनरागमन केलं. भारतासाठी 100 टेस्ट खेळलेल्या इशांतने दोन विकेट्स घेत दिल्लीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. इशांतच्या समावेशाने दिल्लीला विजयाचा मार्ग गवसला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
पावसामुळे ही लढत तासभर उशिराने सुरू झाली. गेले काही दिवस राजधानी दिल्लीत आदित्यराजाचा जणू प्रकोपच झाल्यासारखं वातावरण होतं. गुरुवारी दुपारहून मळभ अवतरल्यााने दिल्लीतल्या क्रिकेटरसिकांना धाकधूक वाटू लागली. फिरोझशहा कोटलाचं प्रांगण गाठेपर्यंत जोरदार वारा, गडगडण्याने खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं स्वागत झालं. पाठोपाठ पाऊसही अवतरला. पावसाचा जोर जास्त नसल्यामुळे सामना होण्याची शक्यता वाढली. 8.15 वाजता पंचांनी मैदानाचं परीक्षण केलं. मैदान खेळण्यासाठी सुरक्षित असल्याचा कौल दिली आणि दिल्लीच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
लिलावात दिल्ली कॅपिटल्सने 50 लाख रुपये खर्चत दिल्लीकरांच्या लाडक्या लंबूला ताफ्यात समाविष्ट केलं होतं. भारतासाठी 105 कसोटीत 311 विकेट्स नावावर असणाऱ्या इशांतने आपल्या अनुभवाची झलक ट्वेन्टी-20 प्रकारातही दाखवून दिली. आयपीएल स्पर्धेत डेक्कन चार्जर्स, कोलकाता नाईट रायडर्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स अशा विविध संघांकडून खेळण्याचा अनुभव इशांतकडे आहे. 2008 मध्ये आयपीएलच्या पदार्पण वर्षात खेळलेल्या इशांतने 15 वर्षानंतरही तय्यार असल्याचं दाखवून दिलं.
दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीचा कुठलाच प्रयोग यशस्वी होत नसल्याने कोलकाताने जेसन रॉय आणि लिट्टन दास ही सर्वस्वी नवी जोडी सलामीला आणली. पण या जोडीलाही यश मिळालं नाही. मुकेश कुमारने लिट्टन दासला झटपट माघारी धाडलं. त्याने 4 धावा केल्या. अँनरिक नॉर्कियाचा भन्नाट वेग वेंकटेश अय्यरला झेपला नाही. वेगाने बॅटवर आलेला चेंडू जमिनीलगत तटवून काढण्याचा अय्यरचा प्रयत्न स्लिपमध्ये मिचेल मार्शच्या हातात जाऊन विसावला.
अनुभवी इशांत शर्माने दिल्लीकडून खेळणाऱ्या आणि आता कोलकाताचा कर्णधार झालेल्या नितीश राणाला फसवलं. इशांत शर्माला डोक्यावरून मारायचा नितीशने प्रयत्न केला पण मुकेश कुमारने मागे जात उत्तम झेल घेतला. तब्बल 723 दिवसांनंतर इशांतने आयपीएल स्पर्धेत विकेट पटकावली.
नितीशने 4 धावा केल्या. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर तिन्ही स्टंप दाखवून अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न मनदीप सिंगच्या अंगलट आला. त्याने 12 धावा केल्या. शेवटच्या षटकात पाच चेंडूत पाच षटकार लगावणारा रिंकू सिंग अक्षरच्याच गोलंदाजीवर स्वीपचा फटका मारताना बाद झाला. तो 6 धावाच करु शकला. इशांत शर्माने पिंचहिंटर सुनील नरिनला मामा बनवलं.
एकीकडून सहकाऱ्यांनी तंबूत परतण्याची रीघ लावलेली असताना जेसन रॉय धडपडत का होईना खेळत होता. कुलदीपची फिरकी रॉयला कळली नाही आणि आडव्या बॅटने खेळलेला फटका अमन खानच्या हातात गेला. जेसनने 43 धावांचं योगदान दिलं. कोलकाताने वेंकटेश अय्यरला वगळून अनुकूल रॉयला आणलं. पण कुलदीपने त्याला पहिल्याच चेंडूवर पायचीत केलं. हॅट्र्टिक घेण्याची संधी कुलदीपला होती पण तिसरा चेंडू उमेश यादवने तटवून काढला. वादळी खेळीसाठी प्रसिद्ध आंद्रे रसेल हताशपणे नॉन स्ट्रायकर एन्डला घडामोडी पाहत होता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
अँनरिक नॉर्कियाचा वेग उमेश यादवला झेपला नाही. नॉर्कियाने स्वत:च्या गोलंदाजीवर झेल टिपत त्याला बाद केलं. वरुण चक्रवर्तीने रसेलला साथ दिली. या दोघांनी शेवटच्या विकेटसाठी 26 चेंडूत 31 धावांची भागीदारी करत कोलकाताची इभ्रत राखली. रसेलने 31 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 38 धावांची खेळी केली. रसेलला स्ट्राईक आणि सहकाऱ्यांची साथ मिळाली असती तर कदाचित या सामन्याचं चित्र वेगळं दिसलं असतं.
या छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करतानाही दिल्लीची दमछाक झाली. पृथ्वी शॉ याचा धावांसाठी झगडा या सामन्यातही कायम राहिला. 13 धावा करुन तो तंबूत परतला. वरुण चक्रवर्तीने त्याला चकवलं. मिचेल मार्शला कोलकाताचा कर्णधार नितीश राणाने बाद केलं. आयपीएल पदार्पणवीर फिल सॉल्ट 5 धावा करुन परतला. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने मात्र एका बाजूने किल्ला लढवला. वॉर्नरने 41 चेंडूत 11 चौकारांसह 57 धावांची खेळी केली. वॉर्नरपाठोपाठ मनीष पांडे आणि अमन खानही माघारी परतले. ललित यादवने अक्षर पटेलला साथ देत संघाला विजयपथावर नेलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








