भव्य राजवाडा ते टू बीएचके घरात राहिलेल्या राजाची गोष्ट

फोटो स्रोत, MUKARRAM JHA FAMILY
हैदराबादचे आठवे निझाम मुर्करम जाह यांचं शनिवारी टर्कीतल्या इस्तंबूल इथे निधन झालं. त्यांच्या कार्यालयाने यासंदर्भात माहिती दिली. ते 89 वर्षांचे होते. 1933 मध्ये जन्मलेले मुर्करम टर्कीत वास्तव्यास होते.
त्यांच्या कार्यालयाने सांगितलं की, हैदराबादचे महामहिम आठवे निझाम मीर बरकत अली खान वलाशन मुर्करम जाह बहादूर यांचं शनिवारी रात्री उशिरा निधन झालं. पार्थिवाचं दफन हैदराबाद इथे करण्यात यावं अशी त्यांची शेवटची इच्छा होती.
त्यांचं पार्थिव हैदराबाद इथे चौमहल्ला पॅलेस इथे आणण्यात येईल. लोकांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर त्यांना कुटुंबीयांच्या दफनभूमीत दफन केलं जाईल.
मीर उस्मान अली खान यांचे नातू

फोटो स्रोत, DR. MOHAMMED SAFIULLAH, THE DECCAN HERITAGE TRUST
हैदराबादवर शेवटचं राज्य करणारा राजा मीर उस्मान अली खान बहादूर यांचे ते नातू. मीर उस्मान अली खान यांनी 1948 पर्यंत हैदराबादवर राज्य केलं. ते सातवे निझाम राजे होते.
मुर्करम जाह यांचा जन्म 1933 मध्ये झाला ते जम जाह मीर उस्मान अली ख़ान यांचे सर्वांत मोठे पुत्र होते.
हिंदू वृत्तपत्राने दिलेल्या बातमीत म्हटल्याप्रमाणे मीर उस्मान अली खान यांनी आपल्या मुलांना बाजूला सारत मुर्करम जाह त्यांचे वारसदार असतील असं घोषित केलं होतं.
6 एप्रिल 1967 रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटल्याप्रमाणे मुर्करम जाह यांचे आठवे निझाम म्हणून नियुक्ती झाली. चौमहल्ला पॅलेस इथेच त्यांनी राजेपदाची जबाबदारी स्वीकाराली.
मुर्करम जाह भारतातून ऑस्ट्रेलियाला गेले. तिथे काही काळ व्यतीत केल्यानंतर ते टर्कीला गेले आणि तिथेच स्थायिक झाले.
मुर्करम जाह ट्रस्ट फॉर एज्युकेशन अँड लर्निंग या धर्मादाय संस्थेचे चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिलं. इंडिया टुडेने प्रसिद्ध केलेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे, सातव्या निझामाचे वंशज म्हणून मुर्करम जहा यांनी कार्यभार स्वीकारला. जगातील सर्वाधिक मालमत्तेचे ते मानकरी झाले होते.
सियासत डेलीने लेखात लिहिल्याप्रमाणे, मोठे राजवाडे, अवाजवी दागिने, विलासी जीवनशैली आणि मालमत्तेच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांची संपत्ती लयाला गेली. लेखात म्हटल्याप्रमाणे मुर्करम जहा यांना वारशात प्रचंड संपत्ती मिळाली होती.
30व्या वर्षी ते राजपदावर विराजमान झाले तेव्हा 25,000 कोटींची मालमत्ता त्यांच्या स्वाधीन झाली पण हळूहळू संपत्तीचा ऱ्हास झाला. या अतिश्रीमंत राजाला टर्कीतल्या इस्तंबूल शहरात एका टूबीएचके घरात राहावं लागलं.
मुर्करम जहा यांच्या निधनासह एका गर्भश्रीमंत पर्वाचा अस्त झाला आहे.
1724 मध्ये निझाम अल मुल्क यांच्या आगमनासह हैदराबादमध्ये निझामाचं राज्य सुरु झालं. निझाम घराण्याने हैदराबादवर 1724 ते 1948 इतका प्रदीर्घ काळ राज्य केलं.
शाही इतमामात अंत्यसंस्कार

फोटो स्रोत, DR. MOHAMMED SAFIULLAH, THE DECCAN HERITAGE TRUST
तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी आठव्या निझामाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. या धक्क्यातून सावरण्यासाठी कुटुंबीयांना बळ मिळो अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात ट्वीटही केलं आहे.
आठव्या निझामांवर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. शिक्षण आणि वैद्यकीय उपचार या क्षेत्रात त्यांनी मोलाचं योगदान दिलं, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मुर्करम जहा यांचे आजोबा कोण होते?

फोटो स्रोत, Getty Images
असफ जाह मुझफरलौल मुल्क सर मीर उस्मान अली खान हे एकेकाळी ब्रिटिश सरकारचे पाईक होते. त्यांनी 1911 मध्ये हैदराबादचं राजेपद स्वीकारलं. त्यावेळी ते जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होते.
22 फेब्रुवारी 1937 मध्ये टाईम मासिकाने त्यांच्यावर मुखपृष्ठ केलं होतं. जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असं त्याचं वर्णन करत त्यांनी त्यांचं व्यक्तिमत्व चितारलं होतं.
तत्कालीन हैदराबाद राज्य हे इंग्लंड आणि स्कॉटलंड या दोन देशांच्या एकत्रित क्षेत्रफळाएवढं होतं.
हैदराबादच्या निझामाकडे जगातला सगळ्यांत मौल्यवान हिरा होता. जेकब डायमंड असं या हिऱ्याचं नाव असून 282 कॅरटचा हा हिरा एका छोट्या लिंबाएवढा होता.
एका छोट्या पेटीत हा हिरा जपून ठेवला जात असे. काहीवेळेला पेपरवेट म्हणूनही त्याचा वापर केला जात असे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, देशातल्या तीन संस्थांनांनी भारतात सामील होण्यास नकार दिला. केंद्र सरकारने पोलीस कारवाईच्या माध्यमातून निझाम संस्थान खालसा करुन विलीन केलं.
हैदराबाद आर्मीने समर्पण केल्यावर राजवी आणि लईक अहमद या निझामाच्या समर्थकांना केंद्र सरकारने ताब्यात घेतलं.
लईक अहमद यांनी तुरुंगातून पळ काढला. त्यांनी मुंबईहून कराची गाठलं. केंद्र सरकारने निझामाला ताब्यात घेतलं नाही, अटकही केली नाही. उस्मान अली खान यांना त्यांच्या महालात राहण्याची परवानगी देण्यात आली होती.
नवाबाने एक हूकूम जारी केला. यापुढे भारताची राज्यघटना हीच हैदराबादची राज्यघटना असेल. या आदेशान्वये हैदराबाद ही भारतात सहभागी झालेली 562वी रियासत ठरली.
25 जानेवारी 1950 रोजी केंद्र सरकार आणि निझाम यांच्यात एक करार झाला. त्यानुसार केंद्र सरकारने निझामाला 42 लाख, 85 हजार 714 रुपये दरवर्षी एवढे रुपये देण्याचं मान्य केलं.
1 नोव्हेंबर 1956 पर्यंत हैदराबादचा निझाम नवाब यांनी राजप्रमुख अर्थात राज्यपालाला समांतर म्हणून काम पाहिलं. राज्य पुनर्रचना आयोगमुळे निझामाचं राज्य तीन वेगवेगळ्या प्रदेशात विभागलं गेलं. महाराष्ट्र, कर्नाटक आणि त्यावेळी नव्याने स्थापना झालेलं आंध्र प्रदेश राज्य. नवाबाचं 24 फेब्रुवारी 1967 रोजी निधन झालं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








