इराणमधील 'मोरॅलिटी पोलीस' दल अखेर बरखास्त

इराण, महिला, हिजाब, मोरॅलिटी पोलीस

फोटो स्रोत, Getty Images

इराणमधील मोरॅलिटी पोलिस दल अखेर बरखास्त करण्यात आलं आहे. देशामध्ये इस्लामिक पद्धतीच्या ड्रेस कोडची अंमलबजावणी करण्यासाठी नेमण्यात आलेलं हे दल बरखास्त करण्यात आल्याची माहिती इराणच्या अॅटर्नी जनरल यांनी दिली आहे.

मोहम्मद जफर मुन्तझरी यांनी रविवारी (4 डिसेंबर) एका कार्यक्रमात केलेल्या या वक्तव्याला अजून अन्य सरकारी संस्थांकडून दुजोरा मिळालेला नाहीये.

पोलिस कस्टडीमध्ये एका तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर इराणमध्ये या मोरॅलिटी पोलिसांविरूद्ध काही महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे.

हिजाबसंबंधीचे नियम मोडल्याबद्दल मोरॅलिटी पोलिसांनी महसा अमिनी या तरूणीला ताब्यात घेतलं होतं.

मोहम्मद जफर मुन्तझरी यांना एका धार्मिक कार्यक्रमात मोरॅलिटी पोलिस दलाच्या बरखास्तीबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी म्हटलं की, "मोरॅलिटी पोलिसांचा न्याय व्यवस्थेशी काहीही संबंध नाही. जिथून त्यांची सुरूवात झाली, तिथूनच ते बंद होत आहे."

या पोलिस दलाचं नियंत्रण हे न्यायपालिकेकडून नसून गृह मंत्रालयाकडे आहे.

इराणी महिलांना हिजाब घालणं अनिवार्य करणारा कायद्याचा पुनर्विचार करणं गरजेचं असल्याचं मुन्तझरी यांनी शनिवारी (3 डिसेंबर) म्हटलं होतं.

मोरॅलिटी पोलिस दल बरखास्त झालं असलं तरी याचा अर्थ इराणमधील अनेक दशकांपासून चालत आलेले कायदे बदलतील असा नाहीये.

इराण, महिला, हिजाब, मोरॅलिटी पोलीस

फोटो स्रोत, Getty Images

इराणमधील आंदोलनाची पार्श्वभूमी काय?

इराणच्या करमन शहरात एक महिला भर रस्त्यात वाहतूक अडवून आपल्या गाडीच्या बॉनेटवर उभी राहिली. त्यानंतर तिने सर्वासमोर चक्क डोक्यावरचा हिजाब उतरवला आणि तो पेटवून दिला! तिच्याबरोबर तिथं शेकडो महिला होत्या. पुरुषही होते जे या घटनेचा व्हीडिओ घेत होते. सगळे मिळून घोषणा देत होते 'हुकुमशाह मुर्दाबाद!'

इराणमध्ये 22 वर्षीय महिसा अमिनीचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाल्यानंतर तिथे शहरा-शहरांमध्ये हिजाबविरोधी आंदोलन पेटलं आणि सरकारनेही हे आंदोलन चिरडून टाकण्याचा कडक इशारा दिला.

खरंतर गेली 14 वर्षं महिलांची हिजाबमधून सुटका व्हावी यासाठी तिथं आंदोलन सुरू आहे. इराणमधलं हे आंदोलन आणि तिथं महिलांवर कधीपासून आणि कोणते निर्बंध आहेत हे समजून घेऊया.

एरवी केस मोकळे सोडले तर काय मोठं असं कुणालाही वाटू शकेल. पण इराणच्या कट्टरतावादी मुस्लीम राजवटीत तो गुन्हा आहे. महिलांसाठीचा ड्रेसकोड पाळला नाही तर तिथले नैतिकतावादी पोलीस तुम्हाला अटक करू शकत होते.

इराण, महिला, हिजाब, मोरॅलिटी पोलीस

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

महिलांना अर्थातच या अटी जाचक वाटतात. आणि मागची काही वर्षं अधून मधून तिथं हिजाब विरोधी आंदोलनं होत असतात. पण 13 सप्टेंबरचा दिवस वेगळा होता. मेहसा अमिनी या 22 वर्षीय महिलेला पोलिसांनी हिजाब नियमाचं पालन न करण्यावरून हटकलं. पोलिसांचं म्हणणं होतं की तिने हिजाब नीट घातला नव्हता.

दोघांमध्ये हुज्जत झाली. त्यानंतर पोलिसांनी तिला पकडून पोलीस व्हॅनमध्ये टाकल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी पाहिलं.

पोलीस कोठडीत असतानाच ती बेशुद्ध झाली आणि कोसळली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी हे सगळं टिपलं पण ही दृश्यं खूप एडिट केलेली होती.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर ती कोमात गेली आणि तीन दिवसांनी मेहसाचा मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासन म्हणतं, 'तिचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला.' पण लोक म्हणतात पोलिसांनी तिला दंडुक्याने मारहाण केली होती, त्यामुळेच तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी आरोप फेटाळला आणि म्हटलंय की तिचा मृत्यू हृदयविकारामुळे झाला. मेहसाच्या घरचे म्हणतात की ती निरोगी होती. पण, महसाच्या मृत्यूनंतर इराणमध्ये पुन्हा एकदा हिजाब विरोधी आंदोलन उग्र झालंय.

महिलांवर नेमके कोणते निर्बंध आहेत, जे महिलांना नको आहेत?

इराणमध्ये महिलांसाठी ड्रेस कोड

1979 साली इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली आणि इस्लामिक प्रजासत्ताक बनलं. आजवर इराणचे सर्वोच्च नेते हे धार्मिक नेतेच राहिलेत.लोकशाही निवडणुका होतात, पण निकालांनाही सर्वोच्च नेत्याकडून संमती मिळावी लागते.

धोरणं तसंच त्यांच्या अंमलबजावणीवर त्यांचंच नियंत्रण असतं. सध्या अली खामेनी हे इराणचे सर्वोच्च नेते आहेत.

इस्लामिक इराणमध्ये हिजाबविषयीचे कायदे काय आहेत?

  • घराबाहेर फिरताना महिलांनी केस पूर्णपणे झाकले जातील असा हिजाब परिधान केला पाहिजे.
  • अंग झाकेल असे सैलसर कपडे घातले पाहिजेत.
  • महिला हा ड्रेसकोड पाळतात की नाही हे तपासण्यासाठी गश्त-ए-इर्शाद नावाचं नैतिकता तपासणारं पोलीस दल गावांमध्ये तैनात असतं.
  • या पोलिसांना कुठेही महिलांची तपासणी करण्याचा आणि गुन्हा निश्चित करण्याचा संपूर्ण अधिकार.
  • महिला दोषी आढळल्यास दंड, तुरुंगवास आणि लोकांसमोर चाबकाच्या फटक्यांची शिक्षा दिली जाते.

या पोलीस दलाकडे अधिकार एकवटलेले असल्यामुळे अनेकदा त्यांच्यावर मनमानी केल्याचा आरोप होतो.

हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून असे व्हीडिओही व्हायरल होतात. आणि त्यातून हिजाबविरोधी आंदोलन इराणमध्ये आणखी जोर धरतंय.

उदाहरण म्हणून ट्विटर लिंकमधला हा व्हीडिओ बघा. एका वयस्क महिलेला हे पोलीस केस पूर्ण झाकले नाहीत म्हणून भर बाजारात चक्क थोबाडीत मारतेय.

Instagram पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

Instagram पोस्ट समाप्त

याविरोधात महिला एकत्र आल्या नाहीत असं नाही. 2014 पासून तिथं हिजाबविरोधी आंदोलनं सुरू आहेत. आणि सोशल मीडियावर त्यासाठी मोहीम सुरू करण्याचं श्रेय इराणी-अमेरिकन पत्रकार मसिह अलीनेजाद यांना जातं.