मूल नको असलेली 'DINK' जीवनशैली काय आहे? मूल जन्माला घालणं का टाळत आहे जोडपी?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सिराज
- Role, बीबीसी तमिळ
आजच्या आधुनिक समाजात "DINK" (डबल इन्कम, नो किड्स) जीवनशैली अधिक लोकप्रिय होत आहे. यामध्ये दाम्पत्यं करिअरवर लक्ष केंद्रित करतात आणि मुलं जन्माला न घालण्याचा निर्णय घेतात.
आर्थिक स्वातंत्र्य, करिअरची प्रगती आणि वैयक्तिक आनंदावर भर देणारी ही जीवनशैली विशेषत: युवक आणि तरुण पिढीत अधिक स्वीकारली जात आहे.
अशा जीवनशैलीचे सामाजिक, मानसिक आणि आर्थिक परिणाम काय असू शकतात, यावर चर्चा वाढत आहे.
भारतीय समाजात विवाहाला जितकं महत्त्व आहे, त्याहूनही अधिक महत्त्व 'मुलं होणं आवश्यक आहे' या अपेक्षेला दिलं जातं.
लग्न मुलं होण्यासाठीच असतं असा मुख्यत्वेकरून समज असलेल्या समाजांसाठी DINK सारखी संकल्पना धक्कादायक ठरू शकते.
'डबल इन्कम, नो किड्स' हे डिंकचे संक्षिप्त रूप आहे. एका कुटुंबात दोघंही नोकरी करत असताना, मुलं जन्माला घालण्याचा निर्णय पुढं ढकलणं किंवा पूर्णपणे टाळणं, हाच या जीवनशैलीचा मूळ अर्थ आहे.
अशा प्रकारे जगणाऱ्या दाम्पत्यांकडे खर्चासाठी उपलब्ध असलेले उत्पन्न (डिस्पोजेबल इन्कम), म्हणजेच कर आणि अत्यावश्यक खर्च वगळता हाती राहणारे उत्पन्न जास्त असते, त्यामुळे अनेकजण ही जीवनशैली निवडत असल्याचं काही अभ्यासांमध्ये सांगितलं जातं.
विशेषतः मिलेनियल्स (1980 ते 1990 च्या मध्यापर्यंत जन्मलेले) आणि जेन झी (1997 ते 2012 दरम्यान जन्मलेले) या पिढीतील 23 टक्के लोकांना मूल जन्माला घालण्याची इच्छा नाही, असं एका अभ्यासातून समोर आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
प्यू रिसर्च सेंटरने (अमेरिकेत) केलेल्या दुसऱ्या एका अभ्यासात सहभागी झालेल्यांपैकी बहुसंख्य लोकांनी, "मुलं नसल्यामुळे त्यांना आवडती वस्तू खरेदी करणं, सहलींना जाणं, मनोरंजन आणि आवडीनिवडींसाठी वेळ देणं तसेच भविष्यासाठी बचत करणं खूप सोपं झालं आहे," असं म्हटलं.
विशेषतः या अभ्यासात सहभागी झालेल्या दहा तरुणांपैकी सहा जणांनी, "मुलं नसल्यामुळे नोकरी किंवा व्यावसायिक जीवनात यश मिळवणं आणि सक्रिय जीवनशैली जगणं शक्य झालं आहे," असं सांगितलं.
हा अभ्यास 29 एप्रिल ते 19 मे 2024 या कालावधीत दोन गटांमध्ये करण्यात आला. त्यात मुलं नसलेले, 50 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे तसंच मुलं नसलेले 18 ते 49 वयोगटातील लोक यांचा समावेश होता.
त्यात 18 ते 49 वयाच्या लोकांमध्ये 57 टक्के लोकांनी म्हटलं की, त्यांना मुलं नको आहेत. तर 44 टक्के लोकांनी म्हटलं की, त्यांना काम आणि आवडीच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मुलं नको आहेत.
त्याशिवाय 36 टक्के लोकांनी म्हटलं की, मुलांना वाढवण्यासाठी आमची आर्थिक परिस्थिती चांगली नाही.
विशेषतः तरुण महिलांमध्ये 22 टक्के महिलांनी सांगितलं की, पालकांद्वारे किंवा कुटुंबातील इतर सदस्यांकडून मिळालेल्या वाईट अनुभवांमुळे त्यांनी मूल जन्माला घालण्याचं टाळलं आहे.
पन्नास आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींमध्ये, 33 टक्के लोकांनी मूल जन्माला न घालण्याचं कारण योग्य जोडीदार न मिळाल्याचं सांगितलं आहे. त्यात, 38 टक्के लोकांनी एकेकाळी मूल होण्याची इच्छा होती, पण नंतर त्यांचं मत बदललं असं सांगितलं.
आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे का?
'DINK' म्हणून ओळखली जाणारी ही पद्धत किंवा जीवनशैली 1980 ते 90 च्या दशकात पाश्चात्य देशांमध्ये लोकप्रिय होऊ लागली. गेल्या काही वर्षांत भारतातही यावर चर्चा सुरू झाल्या आहेत.
"भारतातील याआधीच्या पिढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या पालकांवर आणि समाजावर अवलंबून होत्या. त्यामुळं शिक्षण, काम, लग्न आणि मुलं जन्माला घालण्यापासून ते सर्व काही त्यांच्या निर्णयाच्या पलीकडे होतं.
जागतिकीकरणाने आजच्या तरुण पिढीला आर्थिक स्वातंत्र्य दिलं आहे. म्हणूनच, आजच्या पिढीला ही जीवनशैली हवी आहे," असं अर्थशास्त्रज्ञ नागप्पन पुगाझेंडी म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
आर्थिक दृष्टिकोनातून एक जोडप्यास हे फायदेशीर ठरू शकत असलं तरी, हे प्रत्येकाच्या वैयक्तिक इच्छेवर आधारित आहे, असं ते म्हणाले.
"प्रत्येक गोष्टींचे फायदे आणि तोटे असतात. त्यांना तोंड देण्यास तयार असाल, तर तुम्ही ते करू शकता. अन्यथा भारतासारख्या देशात राहणारे आपल्याला, योग्य-अयोग्य म्हणून या विषयावर मत व्यक्त करणं शक्य नाही.
आर्थिक दृष्टिकोनातून काही फायदे नक्कीच असू शकतात, पण आपण काय गमावत आहोत आणि त्याऐवजी काय मिळवतो हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे," असं ते म्हणतात.
भारतात, विशेषतः दक्षिण भारतात, घटत्या जन्मदराकडेही लक्ष वेधलं जात आहे.
एसआरएस - नमुना नोंदणी सर्वेक्षण 2021 च्या ताज्या आकडेवारीनुसार, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांमध्ये प्रजनन दर 1.5 आहे, तर तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये प्रजनन दर 1.6 आहे. स्थिर लोकसंख्या राखण्यासाठी आवश्यक असलेल्या 2.1 च्या प्रजनन दरापेक्षा हे कमी आहे.
मुलांच्या संगोपनासाठी आवश्यक आर्थिक परिस्थिती
होसूर येथील कन्नन आणि विनोथिनी (नावं बदलली आहेत) हे जोडपं लग्नानंतर काही वर्षांपासून 'DINK' जीवनशैली पाळत आहेत.
"प्रेमविवाह केल्यानंतर, आम्ही दोघंही तेव्हा नुकतंच नोकरीला लागलो होतो. आम्हाला तत्काळ मूल नको होतं.
खरं तर, त्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक परिस्थिती तेव्हा आमच्याकडे नव्हती," असं कन्नन सांगतात. ते सध्या बेंगळुरूमध्ये स्वतःचा स्टार्ट-अप चालवत आहेत.
"विवाहानंतर माझ्या पत्नीने एक पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स पूर्ण केला. आज ती ज्या पदावर आहे त्याचे हेच मुख्य कारण आहे. लग्नाच्या आठ वर्षांनी आम्हाला मूल झालं. या कालावधीत मी अनेक प्रकारची 'जोखीम' पत्करू शकलो."
"आज चांगल्या स्थितीत असल्यामुळे, त्या 8 वर्षांत मूल न झाल्याबद्दल आम्हाला कोणताही पश्चाताप नाही. आम्ही घेतलेला निर्णय योग्यच होता, असं आम्हाला वाटतं," असं कन्नन म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
कन्नन यांनी या आठ वर्षात त्यांच्यावर आलेल्या सामाजिक दबावाबद्दलही सांगितलं.
"आम्हाला भेटणारे सर्व नातेवाईक मूल नसल्याबद्दल दुःख व्यक्त करत, डॉक्टरांची शिफारस करत, सल्ले देत. कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये आम्हाला नावंही ठेवत.
असा सल्ला देणाऱ्यांपैकी एकही जण आमच्या मुलांसाठी आम्हाला एक साधा 'डायपर'ही आणून देणार नाही हे माहिती होतं. चांगली नोकरी आणि चांगली आर्थिक परिस्थिती महत्त्वाची आहे, यावर आम्ही ठाम होतो," असं कन्नन म्हणाले.

फोटो स्रोत, NAGAPPAN
येत्या काळात मुलांचं संगोपन किंवा पालनपोषण करणं आर्थिकदृष्ट्या अधिक आव्हानात्मक असेल, असं अमेरिकेतील सामाजिक विज्ञान संशोधन संस्था ब्रूकिंग्स इन्स्टिट्यूशनने म्हटलं आहे.
याचा अर्थ असा की मूल होण्यासाठी आणि 18 वर्षांपर्यंत त्यांचं संगोपन करण्यासाठी 2,00,000 ते 3,10,000 अमेरिकन डॉलर्स (भारतीय चलनात 1.70 ते 2.64 कोटी रुपये) खर्च येतो. वाढत्या महागाई दराचा विचार करून हा अंदाज वर्तवला आहे.
पण हे आकडे भारताच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीला तंतोतंत लागू पडत नाहीत, असं अर्थतज्ज्ञ नागप्पन पुगाझेंडी म्हणतात.
"पाश्चात्य देशांमध्ये, एका मुलाच्या संगोपनाचा खर्च खूप जास्त आहे. इथं तसं नाही. उदाहरणार्थ, जर तुम्ही तमिळनाडूमधील शिक्षण आणि वैद्यकीय शुल्काची तुलना पाश्चात्य देशांमधील शुल्काशी केली तर ते लक्षात येईल," असं ते म्हणतात.
"त्याच वेळी, स्वतःच्या इच्छेनं शिक्षणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणं ही वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे पाश्चात्य देशांमधील परिस्थिती आणि प्रवृत्ती यांना येथील परिस्थितीशी गोंधळून टाकण्याची गरज नाही," असं त्यांनी स्पष्ट केलं.
मानसिक परिणाम काय?
मदुराई येथील प्रिया (नाव बदललं आहे) यांनी 2000 च्या दशकाच्या सुरुवातीपासून ही 'DINK' जीवनशैली स्वीकारली आहे.
"मी आणि माझे पती जेव्हापासून प्रेमात पडलो, तेव्हापासूनच आम्ही मूल नको, या निर्णयावर ठाम होतो. आमचं मूळ गाव जरी मदुराई असलं, तरी आम्ही दोघेही शिक्षण आणि नंतर नोकरीसाठी परदेशात होतो. त्यामुळं आमची मानसिकताही तशीच झाली होती."
"परंतु, वयाच्या चाळीशीनंतर, आम्ही आयुष्यात एक प्रकारची शून्यता अनुभवायला सुरुवात केली. आम्ही आमच्या मूळ गावी परत आलो. पण तरीही त्या शून्यतेवर मात करायला आम्हाला जमलं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतरच, एका बाळाला कायदेशीररित्या दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. आता त्या बाळाचा हसतानाचा चेहरा पाहून, पूर्वीच हा निर्णय का घेतला नाही, असा प्रश्न मला नेहमीच पडतो," असं प्रिया सांगतात.
या लेखात आधी उल्लेख केलेल्या प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 50 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांपैकी 26 टक्के लोकांनी 'वृद्धापकाळात त्यांची काळजी कोण घेईल याची चिंता' असल्याचं कबूल केलं आहे आणि 19 टक्के लोकांनी एकटेपणाची भीती असल्याचं मान्य केलं आहे.

'DINK' जीवनशैलीच्या मानसिक परिणामांबद्दल बोलताना किलपॉक सरकारी मानसिक आरोग्य रुग्णालयाच्या डॉ. पूर्णा चंद्रिका यांनी सांगितलं की, त्यांच्याकडे मानसिक आरोग्य सल्लामसलतीसाठी येणाऱ्या काही दाम्पत्यांमध्ये "पतीला मुलं हवी असतात, पण पत्नीला नको असतात. कधी कधी याच्या उलटही दिसून येतं," असं त्यांचं निरीक्षण आहे.
"त्यासाठी ते अनेक कारणं देतात, जसं की काम, सध्याची आर्थिक परिस्थिती कायम ठेवण्याची काळजी व इतर अनेक कारणं सांगतात. काही जण तर यासाठी घटस्फोटापर्यंत जातात," असं डॉ. पूर्णा चंद्रिका म्हणाल्या.
"त्याच वेळी, मुलांना जन्म देऊन, त्यांना परदेशात शिक्षण किंवा नोकरीसाठी पाठवून, मानसिक सल्ला घेणारे पालकही येतात," असं डॉ. पूर्णा चंद्रिका सांगतात.
"मी अशा एका व्यक्तीला ओळखते ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. पण त्यांचा मुलगा, जो नोकरीसाठी अमेरिकेत गेला आहे, तो दर 5 ते 7 वर्षांनी फक्त एकदाच भारतात येतो."
"ही व्यक्ती आता निवृत्त लोकांबरोबर राहते. त्यामुळं यामध्ये योग्य किंवा चुकीचं काहीच नाही. पूर्णपणे हे व्यक्तीच्या वैयक्तिक इच्छेवर अवलंबून असतं," असं मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. पूर्णा चंद्रिका सांगतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











