दसरा-दिवाळी सेल : क्रेडिट कार्ड वापरून ईएमआयवर खरेदी करत आहात? 'या' गोष्टी लक्षात घ्या

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

आपल्याकडे वर्षभर वेगवेगळ्या धर्मांचे सण साजरे केले जातात. गुडीपाडवा, नवरात्री, दसरा, दिवाळी, पोंगल, ईद, मोहरम, ख्रिसमस असे अनेक सण होत असतात.

या काळात आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन खरेदीसाठी डिस्काऊंट लागल्याच्या जाहिराती पाहतो. उत्पादने, कापड इत्यादी कमी किमतीत विकल्या जातात.

त्याचप्रमाणे ऑनलाइन कंपन्या आणि व्यावसायिक संस्था सणासुदीच्या काळात उत्पादनांवर विविध ऑफर जाहीर करतात.

Amazon, Flipkart सारख्या ऑनलाइन कंपन्या त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ऑफर जाहीर करतात.

आपल्या अहवालात, सल्लागार कंपनी Redseer ने नमूद केले आहे की यंदा दिवाळी सणादरम्यान भारतात एकूण खरेदी-विक्री क्षेत्रातली उलाढाल 90 हजार कोटी रुपये असेल.

सणासुदीच्या काळात वस्तुंची किमती कमी होत असते असं वाटतं म्हणून अनेकजण त्याची वाट पाहत असतात.

याकाळात मोबाईल फोन, फ्रिज, वाहने आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते.

या खरेदीसाठी आपण अनेकदा क्रेडिट कार्डचा वापर करतो. त्याठिकाणी डिस्काउंट आणि इंटरेस्ट फ्री किंवा व्याजमुक्त हफ्याच्या सुविधा असतात.

अशा ऑफर्समुळे काही लोक गरज नसतानाही वस्तू विकत घेतात आणि साठवून ठेवतात.

यामुळे अनावश्यक खर्च होतो आणि काहीवेळा रोखीची टंचाई होते.

मग सणासुदीचे बजेट कसे आखायचं? हप्त्याच्या आधारावर वस्तू खरेदी करणे योग्य आहे का? क्रेडिट कार्ड वापरून वस्तू खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत यावर एक नजर टाकूया.

काय आवश्यक आहे ते ठरवा

एखादे उत्पादन खरेदी करण्यापूर्वी ते आपल्यासाठी आवश्यक आहे का, याची खात्री करणं आवश्यक आहे.

आर्थिक आणि बचत सल्लागार सतीश कुमार यांच्यामते अनावश्यक वस्तू खरेदी करणे किंवा वस्तू सवलतीच्या दरात उपलब्ध असल्याने त्यांचा साठा करणे ही एक समस्या निर्माण करू शकतं.

“काही लोक किराणा सामानाचा साठा करतात कारण ते सवलतीत उपलब्ध आहेत. परंतु त्यांचा वापर होत नसल्याने ते कालबाह्य होऊन वाया जातात. त्यामुळे तुम्हाला एखाद्या वस्तूची गरज नसल्यास कितीही सूट असली तरीही ती खरेदी करणे टाळणे चांगले. अन्यथा पैशाचा अपव्यय होईल," सतीश कुमार यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

आर्थिक नियोजन करणं गरजेचं

तुम्हाला मोबाईल लॅपटॉप यांसारख्या वस्तू खरेदी करायच्या असतील तर सणासुदीच्या आधी तुम्हाला काय खरेदी करायचे आहे आणि त्याची किंमत किती असेल याचे नियोजन करणं गरजेचं आहे.

शक्य असल्यास पैशांची बचत सुरू करा. उत्पादन विकत घेण्याऐवजी आणि व्याजासह हप्ते भरण्याऐवजी तुम्ही पैशाची बचत करून कर्जमुक्त खरेदी करू शकता.

खरेदी

फोटो स्रोत, Getty Images

सणासुदीच्या सवलतींव्यतिरिक्त ऑनलाइन व्यवसाय स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यांसारख्या दिवशी सवलत देतात. त्यामुळे तुम्ही त्यानुसार नियोजन करू शकता.

किंमतींची तुलना करा

सतीश कुमार म्हणतात की कोणत्या वस्तूवर सर्वांत जास्त सूट मिळते याची तुलना करा.

"सवलत ऑनलाइन जाहीर केली जाते तेव्हा तुम्ही कोणती साइट सर्वाधिक सवलत देत आहे याची तुलना करू शकता आणि वस्तू खरेदी करू शकता. काही वस्तू ऑनलाइनपेक्षा कमी किमतीत स्टोअरमध्ये उपलब्ध असू शकतात. पण लोकांमध्ये याबाबत पुरेशी माहिती नाही. त्यामुळे आजूबाजूला खरेदी करणं आणि कुठे खरेदी करायची याची तुलना केल्याने तुमचे आणखी पैसे वाचू शकतात.

तसंच, पूर्वी स्टोअर्स 50 टक्के सवलतीच्या जाहिराती देत ​​असत. सध्या ते 10 ते 60 टक्क्यांपर्यंत सूट जाहीर करत आहेत. आपण केवळ ब्रॅंड आणि नॉन-ब्रँडेड उत्पादन अशी तुलना करता नेमकं कोण चांगली गुणवत्ता देऊ शकतं याकडेही लक्ष दिले पाहिजे."

क्रेडिट कार्डने कधी खरेदी करावी?

“ऑनलाइन कंपन्या क्रेडिट कार्डद्वारे उत्पादने खरेदी करताना अतिरिक्त फायदे देतात. त्यामुळे तुम्ही त्यानुसार क्रेडिट कार्ड वापरू शकता. उदाहरणार्थ, एखाद्या मोबाइलची किंमत 16,000 रुपये असल्यास विशिष्ट क्रेडिट कार्ड वापरून खरेदी करताना 2,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सवलत दिली जाते. त्यावेळी क्रेडिट कार्डने वस्तू खरेदी करतानाचा निर्णय योग्य ठरू शकतो," असं सतीश कुमार सांगतात.

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

असं असलं तरी व्याजमुक्त हप्ते आणि हप्त्यांवर वस्तू खरेदी करणं टाळण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

त्याऐवजी लाभापुरतं क्रेडिट कार्ड वापरावं आणि पुढच्या बिलिंग सायकलमध्ये त्या खरेदीची पूर्ण रक्कम भरण्याचा प्रयत्न करावा.

व्याजमुक्त हप्ते खरंच फायद्याचे असतात?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

काही बँका हप्त्यावरील खरेदीवर 20 टक्क्यांपर्यंत व्याज आकारतात. यासाठी प्रक्रिया शुल्क आकारलं जातं आणि GST आकारला जातो. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.

इतर पर्याय नसलेल्या परिस्थितीत आपण महागड्या वस्तू हप्त्याने खरेदी करतो. पण हप्त्यांमध्ये कमी किमतीच्या वस्तू खरेदी केल्यास अतिरिक्त खर्च होऊ शकतो,” सतीश कुमार म्हणतात.

त्याचप्रमाणे बहुतेकदा व्याजमुक्त हप्त्यांवर वस्तू खरेदी करणाऱ्यांसाठी कोणतीही सवलत नाही.

उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही एका हप्त्यात रु. 18,000 किमतीची वस्तू खरेदी करता, तेव्हा तुम्हाला ती वस्तू क्रेडिट कार्ड ऑफरसह रु. 16,000 किंवा रु. 17,000 मध्ये मिळू शकते. तथापि, व्याजमुक्त हप्त्याच्या योजनेत हे फायदे नाहीत.

त्याचप्रमाणे, बँका व्याजमुक्त हप्त्यांवर उत्पादने खरेदी करताना प्रक्रिया शुल्क आकारतात. व्याज नाही, असं सांगितलं जात असलं तरी त्यावरही वेगवेगळ्या फी आकारल्या जातात.

पण अनेक लोक त्या व्याजाच्या रकमेकडे लक्ष देत नाहीत कारण. त्याआधी आपल्याला आगाऊ सवलत म्हणून दिली जाते.

क्रेडिट कार्डने वस्तू खरेदी करताना आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे हप्ता एका विशिष्ट कालावधीत भरला जाणे आवश्यक आहे. उशीरा हप्ते भरल्याने जबरदस्त दंड होऊ शकतात.

त्यामुळे सवलतीपेक्षा मागणीनुसार वस्तू खरेदी केल्यास आर्थिक फायदा होईल, असा सल्ला सतीश कुमार देतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)