क्रेडिट स्कोअर म्हणजे काय? तो कमी होऊ नये यासाठी कोणती सावधगिरी बाळगावी?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, आयव्हीबी कार्तिकेय
- Role, बीबीसी तेलुगू
पूर्वी दूरदर्शनवर 'मर्यादा रामण्णा' नावाची एक मालिका लागत असे. या मालिकेचं कथानक साधारणपणे असं होतं- दोन शेतकरी त्यांच्यातलं भांडण सोडवायला मर्यादा रामण्णांकडे जातात. यातील एक शेतकरी 25 एकर जमीन आणि 10 गायी राखणारा जमीनदार असतो. तर दुसरा शेतकरी दोन एकरांची जमीन कसणारा अल्पभूधारक असतो.
जमीनदार शेतकऱ्याने आपल्याकडून पैसे उधार घेतले आणि तो त्याची परतफेड करत नाहीये, असा अल्पभूधारक शेतकऱ्याचा आरोप असतो. आपल्याकडे 25 एकरांची शेतकी जमीन असताना याच्याकडून पैसे उधार घेण्याची आपल्याला काय गरज, असा युक्तिवाद जमीनदार करतो. यातील सत्याची बाजू ओळखून न्याय देण्याची जबाबदारी मर्यादा रामण्णावर असते.
आपल्या बँकिंग व्यवस्थेसमोरसुद्धा अशीच समस्या उद्भवली होती.
1991 सालच्या आर्थिक सुधारणानंतर अनेक लोक बँकांकडून गृह कर्ज, वाहनखरेदीसाठी कर्ज आणि व्यक्तिगत कर्ज घेऊ लागले. दुसऱ्या बाजूला क्रेडिट कार्डांचा वापरही प्रचंड वाढला.
एका अंदाजानुसार, आजघडीला भारतात सहा कोटी क्रेडिट कार्ड वापरात आहेत. ग्राहकांना काहीही गहाण न ठेवता क्रेडिट कार्डाद्वारे बँकेचा पैसा वापरता येतो, हे यामागील मूलभूत तत्त्व आहे.
निराळ्या शब्दांत सांगायचं तर, काहीच गहाण न ठेवता मिळणारं हे कर्ज असतं. त्यामुळे क्रेडिट कार्ड देताना बँकांनी खूप सावधगिरी बाळगणं गरजेचं असतं. एकसारखाच पगार कमावणाऱ्या घटकांपैकी कोण कर्जाची परतफेड करेल आणि कोण करणार नाही, याचा अंदाज बांधणारी व्यवस्था म्हणून क्रेडिट रेटिंगची (पतपात्रता निर्धारण) यंत्रणा उदयाला आली.
एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक शिस्तीचा अंदाज बांधणारी ही यंत्रणा आहे.

फोटो स्रोत, WWW.CIBIL.COM
आजच्या काळात क्रेडिट रेटिंगविषयी जागरूकता असणं अत्यावश्यक आहे.
जागरूक न राहिल्याने काही लहानशी चूक केली, तरी कर्जाच्या बाबतीत मोठे संकट उद्भवू शकते.
सुरुवातीला आपण चांगल्या क्रेडिट रेटिंगमुळे होणारे लाभ समजून घेऊ-
- कर्ज मंजूर करताना बँका कटकट करणार नाहीत. चांगलं क्रेडिट रेटिंग असलेल्या लोकांसाठी प्रक्रिया शुल्कसुद्धा कमी असू शकतं.
- व्याजावर सवलत. काही बँका चांगलं रेटिंग असणाऱ्या लोकांना व्याजात 0.5 टक्के सवलत देतात. गृहकर्ज किंवा वाहनखरेदीसाठीचं कर्ज यांसारख्या दीर्घकालीन कर्जांच्या बाबतीत ही सवलत चांगलीच लाभदायक ठरते.
- इतरांकडून जामिनाविना कर्ज मिळू शकतं. पूर्वी कर्ज मिळवण्यासाठी जामीन द्यावा लागत असे. आता हा मार्ग फारसा वापरला जात नाही. पण, चांगलं क्रेडिट रेटिंग असलेल्या लोकांना यात काही अडचण येत नाही.
- क्रेडिट कार्डाद्वारे खर्च केली जाणारी रक्कम सर्वसाधारणतः जास्त असते. जास्त रकमेची खरेदी करताना याचा उपयोग होतो.
भारतातील क्रेडिट रेटिंग करणाऱ्या कंपन्या
- CIBIL
- Experian
- Equifax
- CRIF
CIBIL ही यातील सर्वांत प्रसिद्ध कंपनी आहे. CIBILच्या रेटिंगची व्याप्ती 300 ते 900 अशी आहे. CIBILच्या निकषांनुसार 800हून अधिक स्कोअर असलेल्या लोकांना चांगले लाभ मिळवता येतात.
Equifax आणि CRIF या कंपन्यांच्या रेटिंगची व्याप्तीसुद्धा 300 ते 900 आहे.
Experian ही संस्था 300 ते 850 या दरम्यान रेटिंग देते.
विशिष्ट रक्कम भरून कोणालाही स्वतःचा क्रेडिट स्कोअर ऑनलाइन तपासता येतो. सर्व कंपन्या ही सेवा पुरवतात.
वरील सर्व कंपन्या बँकांसोबत करार करतात आणि ग्राहकांची माहिती गोळा करतात, त्यानंतर आपापल्या पद्धतीने या ग्राहकांचं रेटिंग काढलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
या कंपन्या वेगवेगळ्या असल्या, तरी क्रेडिट रेटिंग काढण्यासाठीची पद्धती एकाच निकष संचावर आधारलेली आहे. आता क्रेडिट रेटिंगचा अंदाज बांधण्याची प्रक्रिया पाहू.
तुमच्या गतकाळातील कर्जांचा / क्रेडिट कार्डांचा इतिहास. कर्जाची परतफेड करताना किमान तीन वर्षं विलंब लागू नये, याची काळजी घ्यायला हवी.
- तुम्ही मुदतीनंतर दंडासह क्रेडिट कार्डाचं बिल भरलं, तरीसुद्धा त्याचा तुमच्या क्रेडिट रेटिंगवर नकारात्मक परिणाम होतो, हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे इतर कर्जाचे हप्ते विनाविलंब भरायला हवेत.
- कर्जाचा प्रकार. वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या आणि गृह कर्ज किंवा वाहनखरेदीसाठी कर्ज न घेणाऱ्या लोकांचे क्रेडिट रेटिंग कमी असते. तारण न ठेवता दिलेल्या कर्जावरचं व्याज जास्त असतं, त्यामुळे असं कर्ज घेणाऱ्या व्यक्ती ताजं कर्ज फेडण्याची शक्यता कमी असते, असं क्रेडिट रेटिंग संस्था मानतात.
कर्जाची नियमित परतफेड करण्याने क्रेडिट रेटिंग वाढतं.
क्रेडिट रेटिंग कमी राहू नये, यासाठी कोणती काळजी घ्यावी?
- क्रेडिट कार्डाचं बिल / ईएमआयचे हप्ते वेळेत भरले जातील, याची खातरजमा करावी. यात विलंब झाला, तर संबंधित देयक पूर्ण केलं नाही असा अर्थ घेतला जातो, हे लक्षात ठेवावं.
- येणं असलेली रक्कम परत मिळवण्यासाठी बँका काही कंपन्यांची मदत घेतात. अशा कंपन्यांच्या यादीत कोणाचं खातं नोंदवलं गेलं की संबंधित व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर चांगलाच खालावतो.
- आपलं क्रेडिट कार्ड परत करायचं असेल, तर कार्डाची संपूर्ण रक्कम भरून झाल्यानंतरच ते बंद करण्यासाठी संबंधित बँकेला सूचना करावी. तसंही क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी बँकेकडे विनंती केल्यानंतर बँक स्वाभाविकपणे उरलेलं बिल भरायला सांगतेच. पण सावधगिरी बाळगणं कधीही चांगलं.
- तुम्ही दीर्घ काळ एखादं क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर ते परत करू नका. तसं केल्याने तुमच्या बिल भरलेल्या प्रक्रियेचा इतिहास रेटिंग संस्थांच्या डेटाबेसमधून वगळला जाईल.
- अल्प कालावधीमध्ये विविध बँकांकडे क्रेडिट कार्डासाठी अर्ज करणं इष्ट नाही. या बँका क्रेडिट कार्डाचा प्रस्ताव स्वीकारण्यापूर्वी रेटिंग कंपन्यांकडून सल्ला घेतात.
- क्रेडिट कार्डासाठी थोडक्या काळात एकाहून अधिक अर्ज केले, तर या संस्था तुमच्या क्रेडिट रेटिंगमध्ये बदल करतात, कारण तुम्ही आत्यंतिक गरजेपोटी असे अर्ज करत असल्याचं गृहित धरलं जातं.
- स्वतःचं क्रेडिट रेटिंग ठराविक काळाने तपासत राहावं, आणि त्यात काही उणिवा असतील, तर क्रेडिट रेटिंग संस्थांच्या ते निदर्शनास आणून द्यावं. याबाबतीत कधीही निष्काळजीपणा करू नये.
- क्रेडिट कार्डांची अतिरिक्त संख्या. क्रेडिट स्कोअर हा केवळ आपल्या उत्पन्नाचा निर्देशांक नसतो, तर आपल्या आर्थिक शिस्तीचा निर्देशांक असतो. त्यामुळे अतिरिक्त क्रेडिट कार्ड बाळगल्याने आपल्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








